नवीन लेखन...

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ४

भाग- ४ था 
गुरुजी वाड्याकडे निघाले तेंव्हा तिन्हीसांजेची वेळ झालेली होती . डोक्यावर गवताचा भरा , हातात काही भाजीपाला घेऊन येणारी गडी-माणसे, त्यांच्या मागेमागे बाया आणि बारकी-सारकी पोरं चालत घराकडे जातांना दिसत होती.
दिवसभर शेतात राबून थकलेले हे लोक घराच्या ओढीने येत होते. घरी त्यांची वाट पहानाऱ्यांच्या समोर कधी जातो असे त्यांना वाटत होते .
खड-खड आवाज करीत एखादी बैलगाडी समोरून जातांना दिसत होती. त्यातलं बारकं पोरगं कासरा धरून बसलेला पाहून गुरुजींना वाटले, “
 या वयात पोराच्या हातात जर पुस्तक आले असते तर हा पोरगा शिकला असता, पण नशीब बिचाऱ्याच , बसलाय या अडाणी गावात.
चार-दोन घरातून विजेच्या दिव्याचा उजेड, बाकी घरातून कंदिलाचा, अगर मिणमिणत्या चिमण्यांचा पिवळसर उजेड दिसत होता .
रस्त्यावरचा धुराळा हवेत तरंगून साऱ्या गावभर पसरला आहे पाहून गुरुजींनी निराशेने स्वत:चे खांदे उडवीत म्हटले -,
“या गावाचं काही खरं नाही.
रावसाहेबांच्या वाड्यावर ते गेले ,त्यांना पाहून नोकर म्हणाला –
आज मालकांची तब्येत जरा बरी नाही. कसर हाय अंगात , म्हणून पडून आहेत ,
पर गुरुजी , तुमी आल्यावर सांगा , म्हणजे खाली येतो “, असे म्हणालेत मालक.
बैठकीतल्या लोडाला टेकत गुरुजींनी समोर पडलेला पेपर डोळ्यासमोर धरला , मात्र त्यांच्या मनात , रावसाहेबांच्या बरोबर काय बोलायचं ? याची जुळवा-जुळव चालू होती.
थोड्याच वेळात रावसाहेब बैठकीत येऊन बसले , गुरुजींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
रावसाहेब गुरुजींना म्हणाले –
कशी काय वाटली आमची वाडी  ?, हाय लहान पर लई गुणाची बरं का आमची वाडी.
त्यावर गुरुजी सांगू लागले – रावसाहेब , सगळं व्यवस्थित लागलायं , तुम्ही माझी काळजी अजिबात करायची नाही.
तुम्ही पाठवलेली माणसं फार चांगल्या स्वभावाची आहेत बरं का.
गुरुजींनी केलेली स्तुती ऐकून रावसाहेब म्हणाले –
ते खरं आहे , पण, त्याचा उपयोग काय ? शेवटी सगळा कारभार आडण्याचा आहे ना !
गुरुजी, अडाण्याचा गाडा, तो कुठवर चालणार ?,मध्येच खडखड करीत तो थांबणारच की ..!
रावसाहेबांच्या बोलण्यात सत्यता होती .पण त्यातून गावाविषयी, गावातल्या लोकांच्या विषयी असलेले प्रेमच व्यक्त होत आहे हे गुरुजींना जाणवत होते
रावसाहेबांसारखा जाणता माणूस गावात असून देखील लोकांना मात्र त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेता येत नव्हता “,
याच गोष्टीचे गुरुजींना वाईट वाटत होते .
गुरुजीकडे पहात रावसाहेब म्हणाले –
तुमचं बस्तान आता नीट बसलयं,एक काळजी मिटली.
आता आपल्या शाळे बद्दल  तुम्ही काय आणि कसं ठरवलय ते सविस्तर सांगा –
रावसहेब मूळ विषयावर आलेले पाहून गुरुजी सांगू लागले –
” आपली शाळा पुढच्या जून मध्ये सुरु करू या. त्या अगोदर काही कागदोपत्री कारवाई राहिली असेल तर , तुम्ही ती पूर्ण करून टाकावी.
आता आपल्या शाळेच्या जागेबद्दल , तुम्ही मला जी जागा दिली आहे, त्याच्या मागेच मोकळी जागा आहे , त्या जागेत शेड उभारून आपण
वर्ग सुरु करू शकतो.
रावसाहेब , मला वाटतं की , पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून आपण फक्त पहिलीचा वर्ग सुरु करावा , मग, पुढे एकेक वर्ग आपोआप सुरु होतीलच.
गुरुजींची योजना ऐकून रावसाहेबांनी समाधानाने मान डोलवित म्हटले,
“छान -,छान गुरुजी , अहो, आपल्या शाळे बद्दलची  सगळी कारवाई अगोदरच पूर्ण झालेली आहे. फक्त तुमच्या सारखे गुरुजी आम्हाला भेटत नव्हते ,
म्हणून आमची शाळा सुरु होत नव्हती..
तुम्हाला सांगतो गुरुजी, आजूबाजूच्या गावातून कुणी येण्यास तयार आहे का ?, हेही आम्ही पाहिलं , पण, इथे खेड्यात येण्यास कुणी तयार नाही.
सगळ्यांना शहरातल्या शाळेत नोकरी पाहिजे , आणि , आमची वाडी, ती तर खेड्याहून बत्तर, त्यात अगदी आडवळणाला असणारी ,
आता तुम्हीच सांगा , आम्हाला कोण भेटणार ?
” चांगल्या गोष्टी घडायला अडथळे आले तरी ,उशिरा का होईना त्या मार्गी लागतात , हे मात्र खरं बरं का गुरुजी ..!
रावसाहेब बोलण्याच्या रंगात आहेत हे पाहून गुरुजी फक्त ऐकण्याची भूमिका करू लागले..
गुरुजी , मागच्या खेपेला अचानक आप्ण्णासाहेब भेटतात काय, तुमच्याशी गाठ घालून देतात काय , सगळा योगचं म्हणा ,
अगदी अचानकपणे तुम्ही भेटलात आणि आमची इच्छा पूर्ण झाली.
या वर गुरुजी म्हणाले –
रावसाहेब , तुमच्या मनात जनकल्याणाची तळ्मळ आहे. तुमची प्रार्थना त्या परमेश्वराला ऐकावी लागली. मी फक्त निमित्त आहे.
हे ऐकून घेत रावसाहेब  म्हणाले –
 गुरुजी , माझ्या वाडीच्या पोरांचं भलं कसं होईल ही काळजी आता तुम्ही करायची. पैशामुळे तुमचं कोणतही काम अडणार नाही.
आपल्या शाळेचं नाव आम्ही “शारदा विद्यालय ” ठेवण्याचं पक्क केलं आहे. तेंव्हा वाडीच्या शारदा विद्यालायाच काम तुम्हाला तुमच्या एकट्याच्या हिम्मतीवर
करायचं आहे. मी तुमच्या पाठीशी आहेच.
रावसाहेबांचा हा भक्कम आधार , त्यांचे धीर देणारे शब्द ऐकून गुरुजींना वाटले “आपण इथे येण्यात चूक केलेली नाही ..!”
अण्णासाहेबांनी मोठ्या विश्वासाने आपले नावं  सुचवले आहे ” , तेंव्हा त्या शब्दांची किंमत आपण ठेवली पाहिजे .
या अण्णासाहेबा  मुळे तर आपण आज स्वतहाच्या पायावर उभे आहोत .
आपल्यासारख्या अनाथ मुलाला आश्रय देऊन अण्णासाहेबांनी मोठं केलं , चार चौघात मनाने उठता -बसता येईल असे शिक्षण दिले.
त्यांच्या या कार्याची आपण भरपाई करण्याची वेळ आता आली आहे.
अण्णासाहेब मुलांना नेहमी म्हणयचे ..
“एष-आरामाचे जीवन म्हणजेच काही जीवन नाही. घरादारा कडे पाठ फिरवून  जगलेल्या अनेक थोर पुरुषांचे आदर्श
आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतात.
आपल्या जवळ जे ज्ञान आहे , ते दुसर्याला दिलेच पाहिजे.
ज्ञानदाना सारखे दुसरे पुण्य-कार्य नाही.
अण्णासाहेबांनी दिलेली ही शिकवण आपण आचरणात आणायची , हे गुरुजीनी पक्के ठरवले.
रावसाहेब गुरुजींना म्हणाले-
“हे पहा गुरुजी , अगोदर तुम्ही पाच-दहा मुले हुडकून काढा, त्यांची तयारी करून घ्या, अशी मुले तुम्हाला सापडतील असा मला विस्वास आहे.
या बिचार्या मुलांना आतापर्यंत कुणी संधीच दिली नाही.
मग बघा गुरुजी – या मुलांना चौथीच्या परीक्षेला थेट तालुक्यालाच घेऊन जायचं , लगेच आपण सातवी पर्यंतची शाळा इथेच सुरु करू.
अहो , बाजूच्या गावातली पोरं सुद्धा आपल्या वाडीच्याच शाळेत येतात की नाही , ते तुम्हीच पाहाल ..!
रावसाहेबांचा हा उत्साह पाहून गुरुजीना हसू येत होते.या उत्साहासमोर आपला टिकाव लागावा “, अशी प्रार्थना ते करू लागले.
ते म्हणाले – रावसाहेब , उद्यापासून मी पोरांना हुडकण्याची मोहीम सुरु करतो. दोन-चार  दिवसात पुढील अंदाज घेऊन , मगच तुम्हाला भेतो .
आता येऊ मी ?
निरोप घेऊन बाहेर पडणार्या गुरुजी कडे पाहून रावसाहेबांना वाटत होतं की -,
” या दिवसात ही मनापासून कार्य करणारे लोक या जगात आहेत , फक्त आपल्याला त्यांना पाहण्याची नजर यावी लागते .
गुरुजीची निवड बरोबर जमली “, याचे मोठे समाधान त्यांच्या मनाला वाटत होते .
गुरुजी वाड्याच्या बाहेर आले तेंव्हा बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. आताच खोलीवर जाऊन काय करणार ?, थोडं फिरून येऊ ,
तेव्हढेच पाय मोकळे होतील, असे म्हणत ते नदीच्या काठावर आले. बसण्याजोगा एक खडक पाहून त्यावर बसत , त्यांनी नदीच्या पाण्यात
पाय सोडले . नदीच्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने मनाला एकदम छान वाटले .
सभोवताली सगळं शांत वातवरण होतं , घाई नाही , गर्दी नाही , गोंगाट नाही “, त्या निरामय शांतेत गुरुजींच्या मनाला निवांत वाटत होते.
शे-दोनशे घरांची वस्ती असलेल्या चिमुकल्या वाडीत शांतता होती. दिवसभर मेहनत करून थकलेल्या जीवांना वाडीने जणू आपल्या
उबदार कुशीत घेतले होते .
“आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. त्यांचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडलेले पाहून एखादी चमकदार रांगोळीच पहातो आहोत
असे गुरुजींना वाटते होते.
” या अनोळखी गावात आपण फक्त पोट भरणे “, या उद्देशाने आलेलो नाहीत. चंद्राचा प्रकाश घेऊन चमकणार्या या चांदण्या आणि रावसाहेबांचा
आधार घेऊन या गावात राहण्याचे ठरवणारे आपण , दोघेही सारखेच आहोत.
आज रावसाहेबांनी आपल्या योजना ऐकून घेतांना विस्वास दाखवून, पाठीवर आधाराचा हात ठेवला “, हे किती छान झाले.
गुरुजींच्या मनाला अधिकच उभारी आली. आपण हाती घेतलेले कार्य , सर्वांच्या सहकार्याने पूर्ण व्हावे ” अशी प्रार्थना करतांना त्यांनी आकाशातल्या देवाकडे पाहिले. शांत -शीतल चांदण्या ,आणि प्रसन्न चांदोबा जणू गुरुजीकडे पाहून हसत होता ..,
त्याला जणू म्हणायचे होते , आमचा आशीर्वाद तूझ्या मागे आहेच.
मोठ्या समाधानाने गुरुजी आपल्या खोली कडे परत फिरले ……
क्रमश:
— अरुण वि.देशपांडे
मो- 9850177342

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..