भाग-७ वा
———-
आज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता .
याला कारण ही तसेच होते. गावातील पोरांना घेऊन गुरुजी शहराकडे निघाले होते. उद्या तिथे बोर्डाची परीक्षा सुरु होणार होती , त्यासाठी अगोदर तिथे
पोचणे आवश्यक होते . सारी मुलं रावसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली होती.
मुलांना आशीर्वाद देतांना रावसाहेब म्हणाले –
” इतके दिवस आपल्या गावातली मोठ्याघरची पोरं ,त्यांना शहरात जाऊन , तिथे राहून शिकता आले . पण आजची गोष्ट वेगळी आहे .आज निघालेली पोरं
गरीब आई-बापाची आहेत , ज्यांना शाळा म्हणजे काय ?, हे माहिती नव्हते , अशा घरातली पोरं परीक्षा देण्यासाठी जात आहेत “, ही खरी आनंदाची गोष्ट आहे.
“माझ्या बाळानो , यशस्वी व्हा. ! “,
“चंदर , पंढरी , गणेश , शालीकराम आणि व्यंकटी ” अशा पाच जणांना गुरुजींनी निवडले होते. गुरुजी आणि पोरं गाडीत बसले. . बापू आणि गिरीजा गाडी जवळ उभे होते.
आपली आई पदराने डोळे पुसत आहे “, हे चंदरला दिसत होते.
गुरुजी म्हणाले – वेशीजवळच्या मारुतीला नमस्कार करून पुढे निघायचं , आपल्या ग्राम-देवतेला विसरायचं नाही बरं का ! ,
आमच्या ध्यानात हाय की गुरुजी !, असे म्हणत पोरांनी मना डोलावल्या .
दोन-तीन तासाच्या प्रवासा नंतर शहर -गाव आले. गावातून आलेली गाडी सरळ मोंढा-बाजाराच्या आवारात थांबली . रावसाहेबांच्या व्यापारीमित्राच्या आडत -दुकानच्या मागे
असलेल्या खोल्यामध्ये गुरुजींची आणि पोरांच्या उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रावसाहेबांच्या सुचनेनुसार सगळी व्यवस्था अगदी चोखपणे केलेली दिसत होती.
लहानशा वाडीत वाढलेली ही पोरं शहरात दिसणार्या झगमगाटकडे तोंडात बोटं घालून पहात होती .रस्त्यावरून पाळणार्या मोटारी , फटफटी, सायकली या सगळ्या गोष्टींना पाहून त्या जादूच्या
खेळण्या सारख्या वाटत होत्या . इकडून -तिकडे फिरणाऱ्या वाहनांना कुणी जादूची किल्ली देऊन रस्त्यावर सोडलं की काय ? असेच जणू त्या पोरांना वाटत असावे.
गुरुजी परीक्षा केंद्रावर आले, केंद्र- प्रमुखांना शिक्षणाधिकारी साहेबांनी दिलेले परीक्षेचे परवानगी -पत्र त्यांनी दाखवले . गुरुजींच्या कामाची महती या केंद्र-प्रमुखांच्या कानापर्यंत
आलेली होतीच . दूर असलेल्या वाडीसारख्या गावात राहून गुरुजी करीत असलेल्या कामाचे त्यांना कौतुक वाटत होते.
आजच्या काळात शिक्षणाची होत असलेली परवड पाहून हताश न होता मोठ्या उमेदीने काम करणारे गुरुजी सगळ्यापेक्षा वेगळे वाटत होते . केंद्र-प्रमुखांनी गुरुजींना सर्व
सहकार्याचे आश्वासन दिले , काहीच अडचण येणार नाही “, हे सांगितले , तेंव्हा निश्चिंत मनाने गुरुजी मुकामाच्या ठिकाणी परतले .
वर्ष-सहा महिन्यापूर्वी या पोरांना शाळा म्हणजे काय ? हे माहिती नव्हते , पुस्तकात काय असते हे कळत नव्हते.. अशी ही मुले उद्या परीक्षा देणार होती .
गुरुजींना वाटले –
“खरी परीक्षा तर आपली आहे “, या पोरांसाठी आपण जी मेहनत घेतली आहे..त्याची खरी कसोटी ..म्हणजे मुलांची ही परीक्षा . या परीक्षेत आपण पास झालेच पाहिजे .
रात्रीचे जेवण झाल्यावर गुरुजी आणि पोरं परीक्षेब्द्द्लच बोलत होती. त्यांची तयारी कशी आहे ? ,हे पहावे म्हणून पुन्हा एकदा गुरुजीनी नमुना प्रश्न-पत्रिका सोडवण्यास सांगितले.
चंदर , गणेश आणि पंढरीने सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिली , तर शालिकराम आणि व्यंकटी या दोघांनी लिहिलेली उत्तरं समाधानकारक आहेत “, हे गुरुजीनी पाहिले .
सकाळ झाली, पेपर सुरु होण्याच्या एक तास अगोदर मुलांना घेऊन गुरुजी परीक्षा केंद्रावर येऊन पोंचले होते. परीक्षा -केंद्रावर पोरांची आणि पालकांची गर्दी दिसत होती . आपला
नंबर कोणत्या खोलीत आहे ?, हे पाहण्याची घाई प्रत्येकाला झालेली होती . गर्दीतल्या मुलांकडे चंदर पहात होता. त्याच्यापेक्षा लहान असणारी पोरं त्याला खूप हुशार आहेत हे
दिसत होते, शहरात वाढलेल्या त्या पोरांमध्ये एक प्रकारचा सफाईदारपणा होता., धीटपणाने ती पोरं सगळीकडे वावरत होती, एकमेकांशी बोलत होती .
चंदर , पंढरी आणि गणेश यांचा नंबर एकाच वर्गात आलेला होता तर व्यंकटी आणि शालिकराम या दोघांचा नंबर बाजूला असलेल्या वर्गात होता. गुरुजींनी प्रत्येकाला त्यांच्या
बेंच जवळ नेऊन बसवले.
ते म्हणाले- अगोदर पेपर वाचायचा, प्रश्न समजून घायचा,जो सोपा वाटेल तो अगोदर सोडवायचा. कठीण वाटणारा प्रश्न नतर सोडवा !, अजिबात घाबरून जायचे नाही..!
पोरांना सूचना देऊन गुरुजी वर्गाच्या बाहेर येऊन बसले.
बाकावर बसलेल्या चंदरची छाती धडधड करीत होती. त्याच्या हाताला घाम फुटला होता .थरथरी सुटलेल्या हाताकडे पाहून चंदर वाटले, “खुरपीने काम केलेल्या हातात आज पेन आले “!
ही देवाचीच कृपा म्हणायची .
प्रश्न-पत्रिका वाटल्या गेल्या , साऱ्या वर्गात एकदम शांतता पसरली. अधीऱ्या मनाने सारी मुले हातातला पेपर वाचीत होती. कोणता प्रश्न अवघड , कोणता प्रश्न सोपा ?,हे मनाशी
ठरवत होती.
चंदरने हातातली प्रश्न-पत्रिका वाचून काढली, हे प्रश्न आपण लिहू शकतो , याची उत्तरे आपल्याला येतात “, हे त्याला जाणवले ,तशी त्याच्या छातीची धडधड थांबली. सोपे प्रश्न
अगोदर सोडवायचे “, गुरुजींची सूचना आठवली आणि त्याने पेपर लिहायला सुरुवात केली.
त्या दिवशी रात्री गुरुजीनी प्रश्न-पत्रिका समोर ठेवून प्रत्येकाची चौकशी केली. चंदर , गणेश आणि व्यंकटी ने सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवले होते. पंढरी आणि शालिकराम या दोघांचा
एकेक प्रश्नच लिहायचा राहिला होता. तरी पण काळजीचे कारण नव्हते. गुरुजींना पोरांच्या यशाब्द्द्लची खात्री वाढली . नंतर मात्र सर्व व्यवस्थित पार पडले . अभ्यासाच्या नादात परीक्षा
कधी संपली हे कळलेच नाही. परीक्षा संपवून सारेजण गावाकडे परतले.
गुरुजींनी परीक्षेचा सगळा वृतांत रावसाहेबांना सांगितला, ते ऐकून पोरांचा निकाल व्यवस्थित लागणार “, याची कल्पना त्यांना आली. ते म्हणाले –
गुरुजी – आता आपल्याला शाळेच्या तयारीला लागले पाहिजे. शाळेला परवानगी मिळाल्याचे पत्र आजच आले आहे.विद्यार्थी मिळाल्यास सातवी पर्यंतची शाळा आपल्याला सुरु
करता येणार आहे. प्रत्येक वर्गाची एकेक तुकडी म्हटली तरी चार-पाचशे मुले सहज शाळेत येतील. त्यासाठी इतर शिक्षकांच्या नेमणुका कराव्या लागणार होत्या . हे सर्व काम
स्वतः: रावसाहेब करणार त्यामुळे या गोष्टींची काळजी गुरुजींना करावी लागणार नव्हती.
आठ दिवसांनी गुरुजींनी चंदर , व्यंकटी ,गणेश आणि शालिकराम यांना बोलावून घेतले. ते म्हणाले – पोरांनो – आपली शाळा सुरु होणार आहे पण तुमच्यासाठी ही शाळा नाही,
तुम्ही बोर्डाची परीक्षा पास झालात तर मी एकदम सातवीच्या वर्गाची तयारी करून घेणार आहे. तुम्ही वेळेवर शाळेत गेला असतात तर आज आठवीत शिकला असता आणि जर उद्या
पाचवीच्या वर्गात बसलात तर ,नवी बारकी पोरं हसतील तुम्हाला ..!
” त्या दिवशी – अगदी भल्या पहाटे गुरुजींच्या बोलण्याचा आवाज चंदरच्या कानावर पडला .तसा तो बाहेर आला ..
अंगणातल्या बाजेवर बापू आणि गुरुजी बसले होते. बापूच्या शेजारी उभी असलेली गिरीजा पदराने डोळे पुशीत आहे ” , हे पाहून चंदरच्या पोटात धस्स्च झाले .
गुरुजींनी कोणती बातमी सांगितली ?,
समोर चंदरला आलेला पाहून बापू म्हणाला , चंदर , अदुगर गुरुजींच्या पाया पड बाबा , “तू पास झालास हे सांगायलाच गुरुजी आलेत की रं !
चंदरने गुरुजींच्या पायावर डोके टेकवले. त्याला उठवीत गुरुजी म्हणाले –
चंदर , अरे तुम्ही पाच ही जण पास झालात. तू आणि पंढरी पहिल्या वर्गात तर गणेश , व्यंकटी आणि शालिकराम हे तिघेजण दुसऱ्या वर्गात पास झाले . आपल्या शाळेचा निकाल
शंभर टक्के ” लागलाय ..!
एव्हढ्यात तिथे रावसाहेब आणि इतर काही मंडळी चंदरच्या घरी आली ,स्वतः: रावसाहेब आपल्या पोराचे कवतिक करायला आलेले आहेत ” , हे जाणवून बापूचे मन भरून आले.
रावसाहेब स्वतः या मुलांच्या यशाबद्दल गावभर पेढे वाटीत होते. गुरुजी , बापू आणि गिरीजा यांच्या हातावर त्यांनी पेढे ठेवला , स्वतहाच्या हाताने चंदर ला पेढा खाऊ घातला
त्यांच्या मनाचा हा मोठेपणा पाहून गुरुजींना आनंद होत होता. शाळेचे खरे श्रेय तर रावसाहेबांना दिले पाहिजे, आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत.
रावसाहेब सांगू लागले –
गुरुजी , केवळ तुमच्या मुळे या गरीब घरच्या पोरांना हा आनंदाचा दिवस दिसला आहे. तुम्ही भेटला नसता तर ही पोरं आज ही डोंगर माळ्यावर गुरं चरायला
घेऊन जातांना दिसली असती., शेतात राबतांना दिसली असती.पैसेवाल्या पोरांनी शिकण्यात काही नवल नाही , शिकण्याची खरी गरज या पोरांना आहे. गुरुजी , तुमच्या हातात ही
पोरं पडली , आता मात्र त्यांच्या आयुष्याचे कल्याण होणार आहे “, यात शंका नाही.
गुरुजी या स्तुतीने भारावून गेले . ते म्हणाले –
रावसाहेब , मी फक्त निमित्त आहे . खरा मोठेपणा तुमच्या मनाचा आहे. तुम्ही आमच्या पाठीशी आहात, म्हणून हे करता येतंय . तुमच्या परीक्षेत मी पास झालो “, याचाच आनंद मला
होतो आहे. रावसाहेब आणि गुरुजीकडे चंदर पहात होता –
त्याच्या मनात विचार सुरु होते ..
“हे यश आपल्या एकट्याचे नाही . यात आपल्या बापूचा , आणि आईचा फार मोठा वाटा आहे. गुरुजींच्या प्रयत्ना मुळे हे जमले . त्यांच्या सारखा योग्य गुरु भेटला “, म्हणून आपली ही
परीक्षेची घडी निभावली आहे.
“आनंदाचे अश्रू लपवणे चंदरला अवघड जात आहे ” ,गुरुजी मोठ्या समाधानाने त्याच्याकडे पहात होते …….!
(क्रमश:)
— अरुण वि.देशपांडे
मो- 9850177342
Leave a Reply