नवीन लेखन...

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

chandrakor

चंद्रकोर..

परिस्थितीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या जिवांचा आकांत ऐकतो का कुणी….
काळाचे तत्त्व कसे जाणावे
सैरभैर झालेल्या मनाने… शिरावं रात्रीच्या कुशीत….
गुढग्यात मान घालून बसावं,
थोडं थोडं घाबरत राहण्यापेक्षा
मनसोक्त एकदाच,आताच,
एकहाती घाबरुन घ्यावं,
हताशपणाने ढसढसा रडूनही घ्यावं वाटलंच तर
आणि झालाच समजा मनातल्या भितीचा पूर्ण निचरा
या प्रयत्नांनी तर मग समजुतदारपणे
स्वाधीन होत रात्रीला सहज विझावं.
काळाच्या या विभत्स तुकड्याचा भाग असल्याचा त्रागा सोडून.
प्राप्त परिस्थितीशी जराही वादविवाद न करता.
शहाण्या माणसासारखं.
ठरवते मी.
आजकाल रोजच.
पण विझता विझता तटतटून फुगून कसे येतात अशक्त
बरगड्यांत मजबूत श्वास ?
दाटून असलेल्या भयाच्या नाकात वेसण घालून,
परिस्थितीच्या कुरुप-बेढब पाठीवर ताकदीने चाबूक ओढत,
आनंदाच्या रथावर आरुढ होऊन दौडत कुठे निघतं मन ?
काळोख काळा होता होता नीळा कसा होतो ?
शांत शितल कसा वाटू लागतो आजूबाजूचा सारा भोवताल ?
अच्छा,तर तू प्रकाशलेला असतोस
काळोखाला भेदून
मी पाय दुमडून बसलेल्या गॕलरीसमोर.
तुझ्या किरणांचा स्पर्शच वेगळा मित्रा
तुझी मायाच निराळी.
सा-या अशाश्वततेच्या गदारोळात तूच तेवढा शाश्वत.
अरे हो,जोवर तू आहेस
तोवर मीही असणारच आहे,हो ना ?
चंद्रकोर….!!!

सुनिता (मधुरा उमरीकर)

मधुरा उमरीकर यांची कविता वाचली,छान वाटली,त्याबद्दल थोडंसं…

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही.अगदी अलीकडील काळातील कवी कशयित्रींनी देखील या दु:खाचे उत्सव करत परिस्थितीशी दोन हात केलेले आहेत.ह्याच प्रभावातून मधुरा उमरीकर या कवयित्री देखील सामान्याप्रमाणे दु:खाला भयभित होऊन लगेच काहीतरी प्रतिक्रिया न देता नेहमी त्यातही आल्हाददायक सुखाच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतात.म्हणूनच त्या कवितेत म्हणतात की,

रात्रीला विझावं
काळाच्या या विभत्स तुकड्याचा भाग असल्याचा त्रागा सोडून
प्राप्त परिस्थितीशी
जराही वादविवाद न करता….. शहाण्या माणसासारखं

वाट्याला आलेले नकोनकोशा दु:खाचे भयभित करणारे काळे तुकडे यांच्याशी एकदाच दोन हात करुन दु:ख आणि भीतीचा मनातून पूर्ण निचरा व्हावा यासाठी कवयित्री धडपड करते,एवढंच नाही तर ती दाटून आलेल्या भयाच्या नाकात वेसण घालून परिस्थितीने ओढवलेल्या दु:खावर चाबूक ओढण्याची भाषा करते.यामध्ये कवयित्रीला सतत सोबत असणारी चंद्रकोर मनात आशावाद निर्माण करते,दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करते,प्रकाशाचे कवडसे काळोख्या अंधारावर मात करु लागतात,क्षणभरात काळाकुट्ट भयान काळोख निळसर आणि आल्हादक होत जातो…अशी सशक्त अभिव्यक्ती कवयित्री करते

मधुरा उमरीकर यांच्या कवितेचे रसग्रहण

— संतोष सेलूकर

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..