काल संध्याकाळी आमच्या कट्यावर चंद्रयानाचा विषय नसता तर ते फार मोठे आश्चर्य झाले असते .
आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक सर्व इंजिनिअरस् आहेत . जोरात चर्चा सुरू होती .
यान नक्की कशामुळे कोसळलं , एकंदर प्लानिंगमधे इस्रोच्या शात्रज्ञांच्या काय चुका झाल्या , त्यांनी काय केलंअसतं तर यान व्यवस्थित चंद्रावर उतरलं असतं , ह्याबाबत अगदी दणकून चर्चा झाली प्रत्येक जण आपण ह्या विषयातील सर्वश्रेष्ठ तज्ञ आहोत अशा अविर्भावात तावातावाने बोलत होता
आमच्या ग्रुपमधे एक रिटायर्ड ex B.A.R.C. शास्त्रज्ञ आहेत . बर्याचवेळाने त्यांच्याकडे सगळ्यांच लक्ष गेलं .
आता पर्यंत ते गप्प बसून होते .ते अगदी शांतपणे म्हणाले , ‘ आमच्या क्षेत्रात अशा घटना नेहमीच होत असतात तेव्हा इतकं अपसेट व्हायची गरज नाही फेल्यूअर अनेलिस करणं हा संशोधनाचा अविभाज्य भाग आहे . पहिल्या झटक्यात यश मिळालं तर आम्ही त्याला miracle समजतो .
मी मात्र ह्या बाबतीत कोणतेही भाष्य करणार नाही कारण तो माझा विषय नाही.
मंडळी , मला सांगायला आनंद वाटतो की काल मी एक फार मोठी डिस्कव्हरी केली व लगेच वेळ न दवडता मोदीजींना कळवून ही टाकलं . वाईटातून चांगलं निघतं ते असं!
‘ कचऱ्यात हरवलेली काही रत्ने मला सापडली आहेत त्यांचे मोबाईल नं मी पाठवत आहे ‘ ह्या माझ्या sms ला त्यांचा लगेच रिप्लाय आला
‘ सध्या सफाई अभियान जोरात चालू आहे . ही अनमोल रत्ने कचऱ्यात हरवून गेली असती तर आपल्या देशाची अपरिमीत हानी झाली असती तुमच्यामुळे ही देशाला मिळाली त्याबद्दल देश आपला सदैव ऋणी राहील ‘ .
मंडळी ,चंद्रयान 3 हे शंभरटक्के व्यवस्थित चंद्रावर उतरेल तेव्हा सर्वात आधी माझे आभार मानायला विसरू नका !
© सुहास टिल्लू
08 /09 /2019
Leave a Reply