नरहर सरळ मनाचा, दादा अमुचा, पंडित होता ।
लता प्रियतमा, खास तयाची, आहे अमुची स्नेहलता ।।धृ।।
अधिकार आहे वाणीमध्ये, हृदयींपरी, अपार माया,
स्वजनांसह, सर्वांसाठी, झिजवली, अवघी काया ।
सुयोग्य सल्ला, देण्यां सकलां, ती सदैव तत्पर,
संकट समयीं, सर्वांपाठीं, ही उभी ठाकते कणखर ।।
अशी ही आहे, अमुची स्नेहलता ।।१।।
मनांपासुनि, अंतरी जपला, पेशा शिकवीण्याचा,
निर्धार मनीं, होता पक्का, सकला ज्ञानी करण्याचा ।
ध्येय उत्तुंग उरीं, शिकवुनि बालां, शहाणे करण्याचे,
काढूनि शाळा, पुरते केले, ते, भव्य स्वप्न मनींचे ।।
अशी ही आहे, अमुची स्नेहलता ।।२।।
कणव आश्रीतांची, आहे जागृत, सदैव मनांत,
झोकुनि दिधले, आयु सारे, हिंगणे आश्रमांत ।
स्वत:स, सदा देखिलेस तूं, इतरांच्या दु:खात,
ऐशा वृत्तीतुनीच तूं, आहेस चिरंतन सौख्यात ।।
अशी ही आहे, अमुची स्नेहलता ।।३।।
हौस सदैव मनीं, बाळगलीस तूं, जनसंपर्काची,
अभिष्ट चिंतण्या तव, जमली गर्दी आप्तांची ।
शोधिलीस, सुरेल घटिका, सहस्त्र-चंद्रदर्शनाची,
आंस, गुरुदासांमनीं, तव दश सहस्त्र चंद्र दर्शनाची ।।
अशी ही आहे, अमुची स्नेहलता ।।४।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply