कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय.
आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी !
आणि १९९१ मध्ये प्रशांत दळवींना अशाच चौघींच्या जीवनलढ्याने खुणावणे हे प्रश्नाच्या गुंत्याचे अभिजात लक्षण आहे की समकालीन वास्तव कधीच जुने होत नसते याचे निर्देशक ? एखाद्या कलाकृतीचे उत्तुंग आभाळ मग खऱ्या कलावंतांना सतत खुणावत असते, त्यांना त्याच्याशी नाळ जोडून बघावीशी वाटते, इथेच श्रमांचे निम्मे यश असते.
परवा ठरवून पाहिलेल्या नव्या संचातील “चारचौघी “ने मला जुन्या उंबऱ्याशी नेऊन उभे केले. तुलनेची झापडं बालगंधर्वच्या कट्ट्याबाहेर ठेवून मी निखळ असं काहीतरी अनुभवायला आत गेलो खरा, पण टाइम मशीनने मला दीपा श्रीराम, वंदना गुप्ते यांच्या थरारक आणि तितक्याच दाहक क्षणांपाशी ताटकळत ठेवले.
आताची आई- रोहिणी ! मराठीतील अभिनय पेलणारा महत्वाचा स्तंभ ! माझी यादी सुरु होते शांताबाई जोगांपाशी, मग विजयाबाई मेहता, तिसरी सुहास जोशी आणि सुहासची समकालीन रोहिणी. बस्स ! तिच्या निव्वळ अस्तित्वाने सगळे नाटक उंचीवर गेलेय.असावीत अशी माणसे आसपास ज्यांच्या उबेला जाऊन बसले की सारं विसरायला होतं. तिन्ही कन्यांच्या कंठी स्वतःसारखी साखळी बांधली आहे याचा विसर न पडू देणारी रोहिणी ! स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि त्यांच्या बऱ्यावाईट परिणामांना तोंड द्या असे तिन्ही मुलींना बजावणारी आणि स्वतःही त्याचे कसोशीने पालन करणारी !
मुक्ता उत्तुंग आहेच. स्मिता पाटीलची तीव्रता (इंटेन्सिटी) प्रोजेक्ट करू शकेल अशी तीच आहे फक्त मराठीत. हिंदीतील सध्याची तिची जोडीदार शोभावी अशी तापसी पन्नू आहे. ” मशाल” मध्ये वहिदाला वाचविण्यासाठी केलेला आकांत दिलीपकुमार ने दोनदा सादर केला,त्यांत काना -मात्रा , वेलांटीचाही फरक नव्हता.
पण तेथे संवाद तेच, कलावंत तोच, फक्त मागचा काळाचा पडदा बदललेला ! इथे वंदना गुप्तेच्या तोडीसतोड वीस मिनिटांचा फोनवरील संभाषणाचा नमुना मुक्ता समोर ठेवते. तीव्रता तीच आणि क्षणार्धात त्यातून अलिप्त होणे तितक्याच ताकतीचे. अभिनयातील नवरस ती अनुभवायला देते तेव्हा तिची क्षमता नव्याने पटते. आणि तिची “विद्या”, वंदना गुप्तेंच्या “विद्या ” पेक्षा वेगळी भासते. तीव्रता, मनस्वीपणा फक्त कॉमन !
कादंबरी कदम तशी कोपऱ्यात पण मिळाली संधी की त्याचे सोने करते. तीही अत्यंत ताकतीची कलावंत आहे,पण पूर्ण लांबीचे आभाळ अजून तिच्या वाट्याला यायचे आहे !
राहता राहिली पर्ण पेठे- पुन्हा कुसुमाग्रजांच्या शब्दांत तिचे चपखल वर्णन आलेले आहेच- “आणि एकीला कळेना, जात माझी कोणती?”
प्रत्येक स्त्रीचे लढे वेगळे, रणांगणे वेगळी, त्यानुसार रणनीती वेगळी.
मग सामाईक काय- स्त्री, लढे आणि जखमा ! ते शाश्वत, सनातन, अनुत्तरित !
साल असो १९७० किंवा १९८२ वा १९९१ किंवा परवाचे २०२२. आपल्याला इथे आणून दळवी थांबतात.
कॅलेंडरची पानेच फक्त आपलं वय ठरवितात असे नाही, अशा कलाकृतीही आपले वय वाढवितात.
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply