नवीन लेखन...

चार धाम

Char Dham Yatra

काही वर्षापूर्वी, ब्रह्मविद्या साधना मंडळाच्याबरोबर सिद्धटेकचा गणपति व भीमा शंकर ही ठिकाणे बघण्यासाठी एक ट्रीप आयोजित केली होती. या ट्रीपबरोबरच आमचे ‘केदारनाथ’ सोडून इतर सर्व ज्योतिर्लिंग पाहून झाली होती, विनासायास झाली होती. तेव्हा पासून माझ्या मनात राहिलेले ज्योतिर्लिंग, केदारनाथ पाहण्याची खूप उत्सुकता होती. काही कारणांसाठी शशीचा यास ठाम नकार होता. केवळ आपापसात वाद नकोत म्हणून मी तिथे जाण्याचा तेव्हा हट्ट केला नाही.

जानेवारी महिन्यापासून ‘सचिन ट्रॅव्हल’ च्या चार धाम यात्रेच्या जाहिराती येण्यास सुरवात झाली. अगाऊ बुकिंग केल्यास बर्‍यापैकी Discount मिळतो म्हणून त्या यात्रेस बुक करण्याचे मी ठरवले व तसा सचिन ट्रॅव्हल्सला फोन केला व साधारणपणे मे महिना अखेर ट्रीपला जाण्याचा मी बेत आखला. शशीच्या निधनानंतर प्रथमच मी एकटा सहलिला जाणार होतो, शिवाय शशीचा या ट्रीपसाठीचा ठाम नकारही माझ्या लक्षात होता, त्यामुळे मनात थोडी चलबिचल होत होती. तरीही एक मन सांगत होते की बुकिंग करून ठेऊया वाटले तर आयत्या वेळी बुकिंग रद्द करता येईल.

बुकिंग केल्या नंतर एकदा वसंता बरोबर तिरलोटला माघी गणपति उत्सवानिमित्त मी घराबाहेर प्रथमच जाऊन आलो होतो व तो एक चांगला बदल होता. परत आल्यावर केदारनाथ/चार धाम यात्रेच्या ट्रीपचे वारे परत एकदा मनात घर करू लागले, जावे की न जावे काही पक्के होत नव्हते. काही नातेवाईकांनी या यात्रेस शशीच्या विरोधाचे माझ्या लक्षात आणून दिले, परंतु राहिलेले शेवटचे ज्योतिर्लिंग दर्शनाचे माझ्या मनात परत परत येत होते, तेव्हढ्यातच प्रीतीने एक दिवस मला तिलाही चार धाम यात्रेची इच्छा असल्याचे व ती माझे बरोबर आल्यास चालेल का अशी विचारणा केली. तिच्या येण्याने आम्हा दोघांनाही एकमेकांची सोबतच होणार होती त्यामुळे तिच्या सोयीस्कर तारखा मला कळविण्या बद्दल मी तिला बोललो, व दोघांच्या सोयीने जून २ ही तारीख पक्की झाली व तसे बुकिंग तिच्यासाठी मी ठाण्यात करून आलो.

टी.व्ही.वर सचिनचे बरेच वेळा कार्यक्रम लागत. एकदा पुण्याहून इंदुताईने त्या विषयी मला फोन करून कळवले होते, मुद्दाम तो कार्यक्रम पाहिला. चार धाम यात्रेतील दोन कठीण ठिकाणे म्हणजे जन्मोत्री व केदारनाथ इथे जाण्यास पर्याय म्हणजे चालणे,डोली, कंडी किंवा घोडा. चढ बराच असल्याने कुठल्याही पर्यायात त्रास हा होणारच होता त्यातल्या त्यात चालण्याने कमी त्रास होतो असे आयोजकांचे म्हणणे होते.

मी लगेचच चालण्याचा सराव करण्याचे ठरवले. हा पर्याय मला पसंत होता. हळू हळू चालण्याची वेळ वाढवत मी दररोज दोन तास चालण्याचा सराव सुरू ठेवला. व तो सराव अगदी ट्रीपला जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालू ठेवला. प्रीतीलाही चालण्याचा सराव करण्याचे सुचविले, तिही तिला जमेल तसा सराव करत होती.

तीन महिने अगोदरपासून बुकिंग करूनही ट्रीपचा दिवस नकळत जवळ आला, तयारी सुरूच होती, योग्य ती ख्ररेदी उरकली व एक दिवस अगोदर म्हणजे १ जून रोजीच गिरगावात जाणे सोयीचे असल्याने तसे ठरविले.

१ जून रोजी दुपारीच सचिन कडून फोन आला “आमची गाडी” रद्द करण्यात आली आहे… बोंबला ! इतके दिवस आधीपासून तयारी करून आयत्यावेळेसच ‘पचका’!!!

पर्याय दुसरे दिवशी सकाळच्या Flight चा.. ह्यालाही आम्ही दोघे तयार झालो. सचिनने तशी व्यवस्था करून विमानाची तिकिटे गिरगावात संध्याकाळ पर्यंत आणून दिली. विमान प्रवासाच्या सोयीसाठी बॅगा परत उचकटून सोयीस्कर अशा लावल्या जेणे करून बोर्डिंगसाठी त्रास वाचेल. दिल्ली मार्गे आम्ही जाणार असल्यामुळे स्टेशनवर शशीच्या मैत्रीणींना तसेच समीरला बोलावले होते, काही सामान त्यांना द्यावयाचे होते… आता त्या कार्यक्रमातही बदल आवश्यक होता.. परत फोना फोनी.. व केवळ समीरला दिल्ली एअरपोर्ट वर बोलवले.. २ तारखेला आम्हाला सकाळी ६ वाजेपर्यंत पोचणे आवश्यक होते त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून तयार झालो, वसंता आम्हाला एअरपोर्ट वर सोडण्यास आला होता, प्रीतीची Flight ची पहिलीच वेळ त्यामुळे तीही थोडी Tension मध्ये, शिवाय आदल्या दिवसापासूनचे आयत्यावेळी कार्यक्रमात बदल झाल्याने मानसिक दबावात होतो. वेळेवर एअर पोर्ट वर पोचलो, प्रीतीने उत्सुकतेने नवी नवलाई पाहिली व आम्ही बोर्डिंग केले खिडकीची जागा मागून घेतली होती, नेमकी पंखावरची सीट मिळाली. विमानात शिडीवरून चढून आत गेलो मात्र .. आणि माझा मोबाईल बोलला ! आता या वेळेला कोण ? दबकतच फोन उचलला.. ‘गिरीश बोलतोय’ त्याला बहुदा आमच्या कार्यक्रमाची नीट माहिती नसावी… त्याला एकंदर प्रकाराची माहिती मी आमच्या सीटवर जाता जाता दिली .. तोही त्यांच्या काश्मीरच्या ट्रीपवरून असाच ‘इमर्जन्सी’ विमानाने परत आला होता… प्रवासाच्या ‘शुभेच्छा ‘ दिल्या.. त्यामानाने विमानाने काहीही घोळ केला नाही व आम्ही ठरल्या वेळे वर दिल्लीला पोचलो. एअर पोर्ट वर ठरल्याप्रमाणे समीर आला होता, त्याच्या हातात त्याच्यासाठी आणलेले सामान ठेवले व आम्ही सचिनच्या बस मध्ये पोचलो.. समीरने येताना आमच्यासाठी खाऊ म्हणून बिस्कीटाचा मोठा पुडा दिला ( दिल्लीला १६ दिवसांनी परत आल्यावरही तो तसाच, न उघडता परत आला, वाटेत खाण्यासाठी योग्य वेळच आली नाही!!!) विमानातील AC च्या तुलनेत दिल्लीतील तापमान होते ४५ डिग्री से.! चांगलेच होरपळलो, पण समीरच्या म्हणण्या प्रमाणे आदल्या दिवशीच्या तुलनेत हवा बरी होती. ट्रीपच्या सर्व सहप्रवाशांना एकत्र आणण्यात थोडा वेळ अधिकच गेला.. एका सहप्रवासी बाईंची बॅग दिल्ली एअरपोर्टवर उतरलीच नाही व ती पुढे गेली.. ट्रीपमधील आणखी एका घोळाची सुरवात!.. सचिनच्या ‘organiser’ ने त्याची काही तरी व्यवस्था केली … पण त्या बाई मात्र अस्वस्थच होत्या, नाही म्हटले तरी त्यांचे सामानच बरोबर नाही!! शेवटी एकदाचे सर्व प्रवासी बस मध्ये स्थानापन्न झाले .. ‘गणपति बाप्पा मोर्या’ ने बस सुरू झाली. बस सुटे पर्यंत साडे दहा वाजलेच, बारा पर्यंत वाटेत जेवणासाठी थांवणार असल्याचे आम्हाला सांगितले… दिल्लीच्या उन्हात हाय हुश्श करत खिडकी बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होतो, दिल्ली बसमधून बघवत नव्हती .. खिडक्या उघडल्या तर आत गरम हवा नाही उघडल्या तर घुसमट ! दोन्ही प्रयोग आलटून पालटून चालू होते, त्यातल्या त्यात मला दिल्लीत राहिलेलो असल्याने हवामानाची थोडीशी कल्पना होती व तशी माझी मानसिकता झाली होती. बाकी सर्वजण हैराण !! बसम्ध्ये देखील बॅग हरविल्या बद्दल थांबून थांबून ‘बाचा-बाची’ चालूच होती. काही वेळाने आम्ही दिल्ली उपनगराच्या बाहेर आलो व एका चांगल्या हॉटेल मध्ये जेवणासाठी उतरलो. विमानात पोटभर नाश्ता झालेला असल्याने खरी म्हणजे तेव्हढीशी भूक अशी नव्हतीच .. पण वेळेवर खाल्लेले बरे .. असे म्हणत जेवून घेतले. त्यानंतर मिळालेली कुल्फी पण कटकट न करता खाल्ली .. थोडेसे गार झालो .. बस परत एकदा मार्गस्थ झाली. सोयीस्करपणे प्रवाशांनी झोपेची थकबाकी वसूल करण्यास प्रारंभ केला .. व पु.ल. म्हणतात तसा ‘प्रवाशांतर्फे मी व बसतर्फे ड्रायव्हर’ असे दोघे जागे होतो. बस एक तास दीड तास चालली, आता उन्हाचीही सर्वांना सवय झाली व थोडीशी गरमी कमी आहे असे वाटू लागले .. हरिद्वारला वेळेवर म्हणजे ५ वाजेपर्यंत पोहचू असा अंदाज बांधत होतो, इतक्यात आमच्या बसचे ब्रेक्स फेल झाले व बस अलगद जाऊन पुढे असलेल्या एका ट्रकवर भिडली..ड्रायव्हर समोरील स्क्रीन खळ्ळ्ळ ….आवाज करत चूर झाली .. काहींच्या झोपा उडाल्या .. सुदैवाने कोणालाही जखमा झाल्या नाहीत .. अपेक्षे प्रमाणे प्रवाशांमधून उलटसुलट बोलणे/टोमणे /comments सुरू झाल्या. बसचा ताबा आता सचिनच्या organiser ने घेतला mobile वरून त्यांनी योग्य त्या माणसांना गाठून पुढचा बंदोबस्त केला ? आता सारी मंडळी त्याच्या भोवती गोळा झाली … “शांत राहा, दुसरी बस थोड्याच वेळात येईल तुम्ही जवळच असलेल्या ढाब्यावर जाऊन चहा पाणी करा” मंडळींची तात्पुरती बोळवण झाली. काय मुहुर्तावर निघालोय असे मनात आले, काहींनी बोलून दाखवले ! एकंदर घोळ सुरुच होता. मी मनात हिशोब केला की आपण दिल्लीहून निघून ३ तास झालेले आहेत तेव्हा दुसरी replacement म्हणून येणारी बसही लवकरात लवकर म्हणजे आणखी चार तासाने यावी. तशी मनाची तयारी ठेवली प्रीतीला ही कल्पना दिली. व आम्ही असेच आजू बाजूच्या शेताचे निरिक्षण करत फिरत वेळ काढत होतो. हळू हळू एकमेकांच्या ओळखी करून घेत होतो. चहा घेऊन काही वेळ झाल्यावर काही उत्साही मंडळींनी ढाब्यावर भज्यांची order केली, हे जरा त्या ढाबेवाल्याला नवीनच प्रकरण.. महिला मंडळींनी, त्यांच्या हिंदीमध्ये त्याला समजाऊन सांगितले व भजी प्रकरण मार्गी लागले… तयार होण्याची वाट पाहण्यात व नंतर ती गरमा गरम खाण्यात चांगला Time pass झाला .. पुढे काय? मंडळींना आठवण झाली. परत एकदा organiser च्या मागे मागे, बस कुठपर्यंत आली, अजून किती वेळ लागेल, आम्हाला असेच ढाब्यावर बसवून ठेवणार का …. organiser स्वत:च शांत राहण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता .. काय करणार बिचारा … आलिया भोगासी, त्याच्या कल्पने प्रमाणे सामोरे जात होता … पण हुशार होता त्यानी त्यातल्या त्यात अक्कल लढवून mobile वरून त्याच्या मित्राशी बोलला व ‘बॅग’ प्रकरणाची चौकशी केली खडा अचुक लागला, बाईंच्या सुदैवाने बॅग locate झाली व ती मधल्या वेळात परत दिल्ली एअरपोर्टवर आली.!! त्याने आपले सर्व resources वापरून ती बॅग replacement म्हणून येणार्‍या बसमधे आणण्याची सोय केली… मंडळींपुढे फेकायला एक good news तयार झाली.. थोडा वेळ मंडळींनी धीर धरला परत काही वेळाने चुळबुळ सुरू…. नशीबाने त्याच्या mobile ने आवाज केला .. नवीन बस आम्ही थांबलो होतो तिथून ६० कि.मि. अंतरावर आल्याची खबर मिळाली.. break news देऊन मंडळींना थोडा धीर दिला .. दीड तासानंतर एकदाची नवीन बस आली … सामान जुन्या बसमधून नव्या बसमधे लोड केले, दमलेली मंडळी नवीन बसमधे येऊन हुश्श झाले. एव्हाना साडे आठ वाजून गेले .. ठीक आहे हरिद्वारला १० वाजे पर्यंत तरी पोचण्याची शक्यता निर्माण झाली.. एकदाचे हरिद्वार गाठले, वाटेत जेवण उरकले व सर्व प्रवाशांना हॉटेल मधे आणून सुखरूप सोडले.. दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमाविषयी सांगितले व सर्वांना आराम करण्यास सांगितले. या सर्व व्यापात आमचा ‘हरी की पावडी’ हा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला.

दि.४ जून ०७ – आज दिवसाची सुरवात फार लवकर नव्हती, ८ वाजता नाश्ता घेऊन नंतर हरी की पावडी दर्शन पासून पुढील कार्यक्रम होता. त्यामुळे झोप पूर्ण झाली, मी धोबी घाट कार्यक्रम थोडा लवकर उठून आटोपून घेतला. गंगेच्या काठावरील हरी की पावडी चे दर्शन घेतले, चार धाम यात्रेसाठी इथून सुरवात करण्याची प्रथा आहे. आमचा प्रवास नेमका अधिक मासात सुरू असल्याने गर्दी थोडीशी अधिकच होती. वाहत्या गंगेत पाय बुडवून ‘अंघोळ’ केल्याचे पुण्य पदरात पाडले, देव दर्शनाचा, फोटो / Video काढण्याचे इ.कार्यक्रम झाले. बस जिथे पार्क केली होती तेथे सर्वांनी जमण्याचे ठरले होते, नेहमी प्रमाणेच एक दोन प्रवासी ”गायब” झाले, वाट बघूनही त्यांचा पत्ता नव्हता, या घोळात चांगलाच उशीर झाला. मनसादेवीला कार्यक्रम आयोजिला होता परंतु तो रद्द किंवा जमल्यास परतीच्या प्रवासात करण्याचे re-schedule केले, चुकलेल्यांना तसेच मागे ठेवत उरलेल्या प्रवाशांबरोबर जेताणासाठी हॉटेलवर परतलो, अर्धे अधिक जेवण होईपर्यंत आमचा कॅप्टन ‘चुकलेल्या प्रवाशांना’ घेऊन (बहुदा थोडासा दम / समज देऊन ) परत आला, सर्वांचा जीव भांड्यात पडला. लगेचच हॉटेलवर परतलो व गाशा गुंडाळला. ऋषीकेश – मसूरी या टप्प्यातील प्रवासास सुरवात झाली. ‘लक्ष्मण प्रधान’ ऋषीकेश मधील देवळांची दर्शने घेत, जमेल तसे नाश्टापाणी उरकत, ऐतिहासिक लक्ष्मणझुला पार करत स्वर्गाश्रम व इतर ठिकाणे बघितली, इथे रुद्राक्ष, वेगवेगळ्या राशींवर आधारित खडे / हिरे, पंच धातूंच्या आंगठ्या, शाली, स्वेटर्स इ.चे बहुदा window shopping झाले ‘चोटी वाले’ ची प्रसिद्ध कुल्फी, लस्सी इ.चा स्वाद घेतला. चोटी वालेची जाहिरात म्हणून दोन माणसे स्पेशल मेक अप करून हॉटेलच्या बाहेर बसले होते, दोनही जणांचे चेहरे कंपासने आखल्या प्रमाणे गोल व मोठे होते, व तुळतुळीत गोटा करून ताठ व उंच शेंडी (चोटी) मिरवीत होते, त्यांचे लोकांना खूपच कुतुहल वाटत होते, त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे व मेक-अपमुळे हॉटेलची खरोखरच जाहिरात होत होती. बहुतेक प्रवाशांनी गमत म्हणून त्यांचे फोटो काढून घेतले. नंतर बोटींगचा कार्यक्रम झाला व गंगा ‘उसपार’ केली व बस पर्यंत जीपने प्रवास केला पुढील मसूरी साठीचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आपल्या येथील महाबळेश्वरच्या घाटाची आठवण करून देणारा आहे. काही जणांना घाटानी थोडासा हिसका दाखवलाच. जसजसे घाट चढून वर गेलो तस तसे हवेतील थंडावा सुखद वाटत होता. मजल दर मजल करत संध्याकाळ पर्यंत मसूरी मुक्कामी पोहोचलो, शेअर टॅक्सी करून ६ च्या ग्रूप्सने हॉटेलवर पोहोचलो, रुम्स ची अलॉटमेंट झाली व बहुतेक प्रवाशांनी हातपाय पसरले, हे हॉटेल खूपच प्रशस्त होते, छान होते, आजू बाजूचा सेटअप सुद्धा छान होता, गार्डन मधील फुलांची व इतर झाडे नीट नेटकी होती, आणि मुंबई सोडल्या पासून इतकी छान व थंड हवा यामुळे मूड बदलून गेला, काही उत्साही मंडळींनी जवळच फेर फटका मारून खरेदी करून दिवस कारणी लावला. रात्रीचे जेवण उरकून थंड हवेची मजा चाखत रजईच्या उबेत झोपी गेलो.

दि.५ जून ०७ – सकाळचा नाश्ता उरकून थंड हवेचा आस्वाद घेत घेत, निसर्ग न्याहाळत, फुल झाडांचे फोटो घेत एका छान मुक्कामाचा निरोप घेत आम्ही केंप्टी फॉल मार्गे राणाचेट्टी ह्या चार धामच्या पहिल्या टप्प्यातील प्रवासास सुरवात केली. मी फार पूर्वी केंप्टी फॉल पाहिले होते तेव्हा तिकडे rope-way अस्तित्वात नव्हता, परंतु पर्यटकांसाठी एक आकर्षण म्हणून याची नंतर सोय करण्यात आली होती, तो rope-way ride उरकून केंप्टी फॉल जवळून बघितला लोक त्याचा मनमुराद आनंद उपभोगत होते, मोठ मोठे टायर वापरून, पाण्यावर तरंगत धबधब्याच्या खाली स्वत:ला भिजवून घेत होते, आरडा ओरडा मस्तीचे वातावरण सोबत खायला कुरकुरे, वेफर्स, आइस्क्रीम, जे मिळेल ते चालू होते अर्थात जोडीला फोटो / शूटींग ही सुरू होते. rope-way return ride घेऊन जवळच एका ढाब्यात दुपारचे जेवण उरकले, व साधारण १५० कि.मी.चा प्रवास संध्याकाळ पर्यंत उरकला व एकदाचे राणाचेट्टी ह्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळी हलकासा पाऊस सुरू झाला व आमच्या हॉटेलच्या मागील गॅलरी मधून बर्फाच्छादित डोंगराचे दर्शन झाले, लोकांना फोटो काढण्यासाठी चांगलेच निमित्त मिळाले. हवेत सुंदर गारवा पसरला होता. प्रवाशांनी फ्रेश होत बाहेरचा फेर फटका सुरू केला, किरकोळ खरेदी झाली. छोटेसे पण टुमदार गाव होते. येथे मोबाईल रेंजच्या बाहेर गेल्याने लोकांनी पब्लिक टेलिफोन बूथचा आसरा घेतला. दुसरे दिवशी आमचा जम्नोत्री ला जाण्याचा कार्यक्रम होता, खूप उत्साह होता. मला वाटते मी व प्रीतीने त्यादिवशी प्रथमच आठवतील तेवढ्या सर्व नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधला व आमच्या झालेल्या व पुढील प्रवासाची माहिती कळवली, लांबच्या व अधिक दिवसांच्या अशा ट्रीपमधे नातेवाईक व मित्रमंडळींशी फोन वरून संपर्क साधण्याचा आनंद काही वेगळाच! रात्री जेवणाच्या नंतर एका शास्त्रीजींचे चारधाम यात्रा या विषयावर व्याख्यान आयोजले होते. खरे म्हटले तर शास्त्रीजींनी व्यासंगपूर्वक फार छान माहिती सादर केली होती, गंगेच्या पाण्याने स्नान, यमुनेच्या पाण्याचे सेवन (पिणे) व चारधाम यात्रेनंतर येणारी विरक्ती ही यात्रेची खरी फलश्रृती असल्याचे कथन केले होते, शास्त्रीजींना बोलण्याचाही छान सराव असल्याचे जाणवत होते … पण मला वाटते वेळ चुकली होती, बहुतेक जणांना जेवणा नंतर झोप येत होती व व्याख्यान ऐकण्याचा उत्साह नव्हता – बिचारे शास्त्रीजी ! आम्ही आमच्या उद्याच्या कार्यक्रमाच्या अगाऊ कल्पनेनेच भारावलेले होतो शास्त्रीजींचा निरोप घेत व सुखद हवेचा आस्वाद घेत आम्ही झोपणे पसंत केले…प्रत्येक दिवशी रात्री झोपतांना मोबाईल व कॅमेरा यांच्या बॅटरीज चार्ज करणे हा इथून पुढे नियमीत पायंडा पडला….

दि. ६ जून ०७ – आज सकाळी लवकर ६ वाजताच सर्व बसमधून बाहेर पडलो व २० कि.मी. दूर असलेल्या गावी गेलो व तेथून पुढे जीपने हनुमानचेट्टी पर्यंत आलो. जम्नोत्रीच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण आहे, येथून आपापल्या सोयीनुसार घोडे किंवा डोल्या केल्या मी, प्रीती व आमच्या ग्रूप मधील एक महिला असे आम्ही ३ जण कोणाची वाट बघत न बसता काठ्या विकत घेऊन चालू पडलो. जेम तेम १५/२० मि. चालून गेल्यावर मला जरा दमल्या सारखे वाटले, प्रीतीला सांगून थोडा वेळ वाटेतच उभे राहिलो. यात्रेला निघण्यापूर्वी मी २ तास चालण्याचा २ महिन्यांहून अधिक काळ सराव केला होता व मला अनुभवाने माहित होते की सुरवातीला मला थोडासा त्रास होतो, दमल्यासारखे वाटते परंतु जसे जसे चालणे सुरू राहते तस तसा हा त्रास कमी होऊन पूर्णपणे थांबतो. परत हळू हळू चालणे नेटाने सुरू ठेवले, आणि अपेक्षेप्रमाणे दम लागण्याचा त्रास थांबला व मी ठीक ठाक चालत होतो. परंतु चालता चालता लक्षात आले की आपला दोन तास चालण्याचा सराव फारच कमी होता. अर्थात अजिबात न चालण्यापेक्षा तो बरा होता इतकेच, चढाव बरेच ठिकाणी उभा होता, कठीण होता. परंतु हळू हळू चालत राहिलो, कुठेही बसून विश्रांती घेतली नाही व वाटेत सुका मेवा, बदाम, किसमिस असा खुराक चालू ठेवला होता. आमच्या ग्रूपमधील माणसे घोड्यावरून अगर डोलीवरून जाताना वाटेत भेटत होती व आमची चौकशी करून पुढे जात होती. चालताना या घोडेस्वारांचा व डोली वाल्यांचा अडथळा होत होता, विशेषत: वरून खाली येणारे वेगाने खाली येत व बाजू … बाजू असे आवाज देत. त्यांना पटकन वाट करून द्यावी लागे. आमचे यमुनोत्रीचे ठिकाण हळू हळू जवळ येत होते, वाटेत कि.मी.च्या पाट्या लागत त्यामुळे बाकी अंतर किती राहिले याचा अंदाज येत होता. तरी पण प्रत्यक्षात ठिकाण आल्याच्या काही खाणाखुणा दिसत नसल्याने आम्ही कधी पोचणार, खास करून शेवटचा एक कि.मी.चा प्रवास संपता संपत नव्हता, वरून येणार्‍या यात्रेकरूंना विचारले तर ते प्रत्येक वेळी “बस, आही गये हो” असे म्हणत पण आम्ही तर पोचत नव्हतो, चालून चालून आता दमछाकही झाली होती. फक्त खाण्याचे व अंघोळी पुरते कपडे एवढेच सामान आमच्या बॅगमधे होते, पण ते देखील जाणवत होते. शेवटाचे यम्नोत्रीच्या मंदिराचे दुरून दर्शन झाले व आमचा चढण्याचा प्रवास संपुष्टात येण्याची चिन्हे प्रत्यक्षात दिसली तेव्हा खूपच बरे वाटले, चालत येण्याचे चीज झाले, एक प्रकारची जिंकल्याची भावना मनात आली व मन प्रसन्न झाले, उत्साह अंगात जाणवू लागला. वाटेतच गरम पाण्याचे कुंड आहे पाणी कडकडीत तापलेले होते, (परंतु स्त्रीयांसाठी असलेल्या ठिकाणी पाणी तितकेसे गरम नव्हते)(सूर्य कुंडात पाणी इतके उकळते होते की, बर्‍याच जणांनी पुरचुंडीत तांदूळ ठेवून ते कुंडात ठेवून शिजवून त्याचा प्रसाद म्हणून उपयोग केला.) तेथे छानपैकी अंग शेकून घेतले, आंघोळ केली, जरा अधिक तरतरी आली. मंदिरात जाऊन दर्शन घेतले, व आम्हाला वाटलेला लंच बॉक्स उघडून थोडेसे खाऊन घेतले. आम्ही चालत वर आल्याने बाकीच्या प्रवाशांच्या मानाने आम्हाला जास्त वेळ लागला होता, शिवाय वाटेत येता येता कॅमेराचे कामही चालू होतेच. वर येताना वाटेत घोडे व डोली वाल्यांचा अडसर ही एक इष्ट आपत्तीच वाटायची कारण त्यानिमित्ताने आम्हाला थोडा वेळ आपोआपच विश्रांती मिळत असे. पण तीच गोष्ट खाली जाताना अडचणीची वाटायची कारण आम्हाला खाली उतरायला त्यामुळे उशीर होत असे दम लागण्याचा प्रश्नच नव्हता. थोड्याशा विश्रांती नंतर व परत एकदा मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासास म्हणजे खाली उतरण्यास सुरवात केली, आता दम लागण्याचा प्रश्नच नव्हता, तरीही ७ कि.मी.चा प्रवास म्हणजे अगदीच थोडा प्रवास नव्हता. वातावरण अपेक्षे इतके थंड नव्हते, हळू हळू स्वेटर्स उतरवून टाकले, वाटेत चहा पाणी / लिंबू सरबत उरकत उतरणे चालू होते, परंतु शेवटचा एक कि.मी. अंतर संपता संपत नव्हते, त्यातच थोडीशी वाट चुकलो व आमच्या ठरलेल्या हॉटेलवर जाण्यास उशीर झाला, आमच्या ग्रूपमध्ये आम्ही शेवटचे प्रवासी तेथे पोहोचल्यावर सर्वांनी आमची चौकशी व कौतुक केले, कितपत दमलात ? त्रास झाला का ? वगैरे चौकशा झाल्या. जेवायला टेबलावर बसल्यावर खुपच आराम वाटला. जेवण झाल्यावर आम्ही सर्व प्रवासी जीप व बसमार्गे आल्या वाटेने परत आमच्या राणाचट्टी येथील हॉटेलमधे संध्याकाळ पर्यंत विसावलो. टेलिफोन बूथवर जाऊन आमच्या चालत जाण्याच्या पराक्रमाचे वर्णन नातेवाईकांपर्यंत पोचवले. चार धाम यात्रेतील पहिला, अवघड पाडाव सफल व संपन्न झाला, रात्री झोप छान लागली.

दि. ७-६-०७ — सकाळी वेळेवरच आम्ही आमच्या पुढील प्रवासासाठी, म्हणजे उत्तरकाशी ह्या ठिकाणासाठी प्रयाण केले. या प्रवासात भागिरथी नदीच्या सोबत आपला प्रवास होतो, प्रवास तसा लांबचाच, १३० कि.मी. अंतराचा आहे, घाट सेक्शन आहे, रस्ते अरुंद आहेत, पण बसड्रायव्हरचे कौशल्य वाखाणण्या जोगे, बराचसा रस्ता धुळीचा आहे, वाटेत काही जलविद्युत प्रकल्पाची कामे चालू आहेत, ठिकठिकाणी ब्लास्टिंगसाठी बस थांबवावी लागते. नद्या नाल्यांचे प्रचंड वेगाने खाली वाहणे, खोल दरी, वाटेत अनेक ठिकाणी प्रचंड आकाराचे खडक, हे खडक कधीही खाली कोसळतील अशा अवस्थेत व त्या खालून बसने जाताना मनात धडकच भरते, असे अनेक अंगांनी दिसणारे रौंद्र स्वरूप एका बाजूला, तर निसर्गाने नटलेली उंच पर्वतांच्या माथ्यावर विलसणारी विविध रूपांची हिरवी पर्णराजी पाहून निसर्गाच्या निर्मितीचे आश्चर्य तसेच कौतुक वाटते आणि मनातील मरगळ दूर झाली. नकळत आयुष्यातील सुख आणि दु:ख याची तुलना मनात होते, नदी / नाले यांचे वेगाने वाहणे हे क्षणो क्षणी बदलणारे जीवन वाटते व निसर्गाने नटलेले सौंदर्य जीवनातील सौंदर्याची आठवण करून देते. अशा खडतर जागी जलविद्युत किंवा अन्य प्रकल्प राबवताना माणसामधील असलेल्या जिद्दीला दाद द्यावी असे वाटते. या संपूर्ण प्रवासात भागिरथी नदीचा उसाच्या रसासारखा रंग मात्र खटकतो, कदाचित आम्ही ज्या मोसमात हा प्रवास केला (पावसाळ्याच्या तोंडावर) त्यामुळे असे असेल. (आमच्या संपूर्ण चारधाम यात्रेत तेथील सर्व नद्या व उपनद्या पाण्याच्या रंगाच्या वाटल्याच नाहीत!) वाटेत भागिरथी नदीच्या किनारी असलेल्या एका हॉटेलवर आम्ही चहा पाणी केले, मंडळींनी नदीमधे पाय बुडवून नदीचा थंडगार स्पर्श अनुभवला, (आमच्याच एका सहप्रवाशाने तेथील माळ्याकडे जाऊन फुलांच्या झाडाच्या बिया गोळा करून घरी लावण्यासाठी मला दिल्या त्या मी जपून घरी आणल्या व त्याचे रोप फुलताना, त्याला रोज पाणी देताना माझ्या चारधाम यात्रेच्या आठवणींनाच मी खत पाणी देत असतो.) संध्याकाळ पर्यंत आम्ही उत्तरकाशी ह्या आमच्या मुक्कामी पोचलो. फ्रेश होऊन त्या दिवसाचा बाजारात जाण्याचा व काशी विश्वेश्वर मंदिर दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या मंदिरातील नंदीच्या समोरच एक त्रिशूळ उभे केले आहे तो खांब किती उंच आहे ह्याचा शोध लागलेला नाही अशी आख्यायिका आहे, त्याचे फोटो घेण्याचा कार्यक्रम उरकला, चुकुन राहिलेली औषधे, अन्य जरूरीच्या हव्या असलेल्या किंवा अशाच ! हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करण्याचा कार्यक्रम उरकून जवळच एक slide show बघितला. एका स्वामीजींनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारीत चारधामचे फोटोंसहित प्रवास वर्णनाचे कथा कथन केले, प्रवासातील फोटोंचा अलबम अप्रतीम आहे. त्यांच्याच जागे जवळ एका छोट्याशा बागेत विविध रंगाची फुलझाडे पाहिली, फोटोत टिपली. कार्यक्रम आटोपून बसने मुक्कामी परत आलो वाटेत एके ठिकाणी कालव्याचा एक दरवाजा उघडा केल्याने कृत्रीम धबधबा निर्माण झाला होता त्याच्या फवार्‍याचे दृश्य फारच मोहक होते, त्याचे शूटिंग झाले. रात्रीचा जेवणाचा व पाणी (mineral water/ Bisleri) खरेदीचाही कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, एका सहप्रवाशाने वाटाघाटी करून दुकानदाराकडून स्पेशल डिस्काउंटही सर्वांच्या पदरात टाकला. दिवसभराच्या प्रवासात आम्हाला कुठेही गारवा भासला नाही, उलट उकडतच होते.

दि. ८-६-०७ – – आज गंगनानी मार्गे गंगोत्री असा दौरा होता. सकाळी आम्ही प्रथम गंगनानी येथे गेलो, बस सुरू होताच हवेतील गारवा जाणवला, स्वेटर / शाली बाहेर आल्या. वाटेत साथीला भागिरथी नदी होती, नदीच्या प्रवाहात कुठेही खंड नाही, सतत खळखळत वाहात आहे. नदीच्या दोनही तीरावर वस्ती असल्याचे जाणवले कारण बरेच ठिकाणी नदी पार करण्यासाठी छोटे rope bridges दिसत होते. काही ठिकाणी नदीचे पाणी पुलाला जवळ जवळ टेकलेले दिसले. नदीच्या पात्रात असंख्य लहान ते अतिमोठे दगड आहेत, काही ठिकाणी मध्येच बेट निर्माण झालेले दिसले, कमी अधिक रुंद असलेले नदीचे पात्र आहे. अनेक ठिकाणी नदीवरील पुलावरून पैलतीर गाठावा लागतो, घाटावरील वळणा वळणाचे अरुंद रस्ते, नदी कधी डावी कडे कधी उजवीकडे. जस जशी उन्हे वर आली तशी हवेतील थंडी गायब झाली, व स्वेटर्स पिशवीत गेले. साधारण दीड तासाने आम्ही गंगनानी या ठिकाणी पोचलो. येथे गरम पाण्याचे झरे आहेत व अंघोळी साठी चांगली व स्वच्छ सोय आहे. पराशर ऋषींनी येथे साधना केली अशी आख्यायिका आहे. ऋषीमुनींनी तपश्चर्येसाठी निवडलेली सर्व ठिकाणे उबदार ठिकाणी शोधून काढलेली दिसतात तसेच तेथे गर्द झाडी असल्याने उन्हापासूनही संरक्षण आहे, मानवी वस्तीपासून दूर असल्यामुळे एकांत आहे. तेथील मंदिरांचे दर्शन घेऊन जवळच नाश्ता घेऊन आम्ही गंगोत्री साठी निघालो. वाटेत अधिक मासामुळे बरीच गर्दी होती, वाटेत एका फॉरेस्ट आधिकार्‍याच्या जीपला आमच्या ड्रायव्हरने ‘साईड न दिल्याने सरकारी अधिकारी मारामारीची भाषा बोलू लागले व वातावरण थोडेसे तंग झाले, परंतु कोणी तरी मध्यस्ती करून तडजोड केली. ‘इतक्या बसेसची पार्किंगची सोय गंगोत्री जवळ नसल्याने थोड्या दूर अंतरावर तशी सोय केली होती व या कामात ट्रॅफिक पोलिसांनी मदत केली होती. दर्शनासाठी तिरुपती सारखी धर्म दर्शन किंवा ६ जणांच्या ग्रूपसाठी पैसे भरून स्पेशल दर्शनाची सोय होती. गर्दी फार असल्याने आम्ही दुसरा पर्याय निवडला. तरीही खेचा खेची, ढकला ढकली होतीच. कसे तरी दर्शन घेऊन, खाली घाटावर भगिरथीचे पाणी आणण्यासाठी गेलो, नदीला प्रचंड प्रवाह आहे, आमच्या आधीच दोन दिवस येऊन गेलेल्या एका प्रवासी महिलेचा पाण्यात वाहून अपघाती मृत्यू झाल्याचे ऐकले. प्रवाहाला भीतीदायक गती आहे. पाणी मात्र अती थंड पण गढूळ ! तिथून जवळच एके ठिकाणी जेवण उरकले व आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. एकंदर प्रवासात जेवणाची सोय घरगुती व चांगली होती, त्यामुळे पोट बिघडण्याचे प्रकार अपवादात्मकच. पाण्यासाठी मात्र प्रवाशांचा Bisleri वरच भरौसा / भर होता. संध्याकाळ पर्यंत हॉटेल वर पोचलो, काही जणांनी बाजारात जाऊन राहिलेली खरेदी उरकली. अशा रितीने चार धाम मधील गंगोत्री हे धाम पार पडले.

दि. ९-६-०७ –(शशीच्या वाढदिवसाची आज आठवण आली) आमचा पुढील प्रवास हा केदारनाथला जाण्यासाठीच्या अगोदरचा मुक्काम – हा गुप्तकाशी या ठिकाणी होता. हा प्रवास सर्वात लांबचा म्हणजे जवळ जवळ २८५ कि.मी.चा होता. वाटेत टेहरी डॅमचे प्रचंड काम पाहीले. गेल्या वर्षीच अतिवृष्टीमुळे पायथ्याची गावे वाहून गेली होती व कामाचे खूप नुकसान झाले होते, ह्याचे काम परत सुरू झालेले आहे. ह्या प्रोजेक्टचा परिसर पार करायलाच दीड तास वेळ लागतो. वाटेत श्रीनगर नावाचे उच्च्भ्रू लोकांचे एक ठिकाण आहे, पॉश वस्ती आहे. जाताना वाटेत अलकनंदा ही बद्रीनाथहून येणारी नदी सोबत असते व वाटेत केदारनाथहून येणारी मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम आहे, रुद्रप्रयाग नावाने हे ठिकाण ओळखले जाते. अलकनंदा ह्या नदीस प्रचंड वेग आहे. ह्या संगमाकाठी मंदिर आहे. त्याचे दर्शन क्ररून आम्ही पुढील प्रवासास निघालो. हा प्रवास खूपच लांबचा व कंटाळवाणा आहे. संध्याकाळी उशीरा आम्ही गुप्तकाशी येथे आमच्या मुक्कामी पोचलो. त्यामानाने हॉटेल छान वाटले. रात्री जेवण उरकून उद्याच्या केदारनाथ मुक्कामासाठी तयारी करून ठेवली फक्त गरम कपडे व अंघोळीचे कपडे घ्यायचे होते. केदारनाथला वर जाताना लागणारा थोडासा फराळही बरोबर होता त्याची स्वतंत्र बॅग करून बाकी सामान रूमवरच ठेवण्याच्या दृष्टीने आवरून ठेवले.

दि. १०-६-०७ – आज सकाळी उठून नाश्ता उरकून जवळच असलेल्या मंदिरात गेलो. परतीच्या वेगळ्या वाटेने आलो तो थेट आम्ही राहात असलेल्या हॉटेलच्या गच्चीवर आलो. सर्व प्रवासी जमल्यावर आम्ही गौरी कुंड ह्या केदारनाथच्या पायथ्याच्या ठिकाणी निघालो, अंतर फक्त ४२ कि.मी.चेच होते पण बसच्या पार्किंगची सोय तिथे नसल्याने बस दूर उभी करावी लागली तेथून थोडेसे चालत केदारनाथसाठी घोडे व डोली यांची व्यवस्था करे पर्यंत दीड वाजून गेला होता. आम्ही घोड्याचा पर्याय निवडला, प्रीती घोड्यावर बसताच घोड्याने बैठक मारली, नशीबाने तिने आपली बैठक पक्की ठेवल्याने ती अलगद घोड्यावरच बसून राहिली, घोड्याचा पाण्यामुळे पाय सरकला होता. थोडीशी पुढील प्रवासाची भीती वाटत होती, पण पुढे घोड्याने काहीही त्रास दिला नाही. ज्यावेळेस घोडा दरीच्या बाजूने जातो त्यावेळी नकळत प्रवासी दरीच्या विरुद्ध बाजुला झुकतात, वळणाच्या ठिकाणी घोडे आपोआपच बस प्रमाणे लांबचे वळण घेऊन वर चढतो (त्यातल्या त्यात कमी चढावाचा मार्ग) विरुद्ध बाजूने येणारे घोडे तसेच डोल्या यामुळे एकमेकांवर आपटण्याचा संभव असतो, घोडे पटकन आपली मान बर आणि बाजूला वळवतात पण आपण (घोडेस्वारांचे पाय) आपापसात टक्करतात. ७ कि.मी.अंतरावर रामवाडी म्हणून ठिकाण आहे येथे घोड्यांच्या पायाला खरारा व नाश्त्यासाठी ब्रेक असतो. घोडे त्यांच्या ठराविक ठिकाणीच आपोआप थांबतात. घोड्यांचा व आपला चहापान झाल्यावर उरलेला प्रवास सुरू. साडे तीन तासामध्ये आम्ही केदारनाथ मुक्कामी पोचलो, घोड्यावरील फोटो होतातच. प्रीती साठी घोड्यावरील हा पहिलाच प्रवास पण तिने तो एंजॉय केला. इथे पोहोचल्यावर आम्ही फ्रेश होऊन लगेच केदारनाथच्या देवळात जाण्यासाठी बाहेर पडलो, अधिक मासा मुळे इथेही बरीच गर्दी होती, खूप लांबलचक लाईन होती, आम्ही लाईनमधे उभे राहून दर्शनाची वाट पहात होतो, देऊळ रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी उघडे असते असे लाईनीत उभ्या उभ्या समजले, ह्ळू ह्ळू लाईन सरकत होती व आम्हाला दर्शन निश्चित मिळेल इतक्या लांब आम्ही लाईनीत उभे होतो. आमच्या ग्रूपचे व्यवस्थित दर्शन पार पडले, देवळाला दिव्यांची छान आरास केलेली होती. देऊळ खूपच भव्य आणि देखणे होते. पूजे संबंधी चौकशी केली असता सकाळी खूप लवकर उठून लाईन लावल्यास ६ ते ७ पर्यंत नंबर लागण्याची शक्यता होती, आमच्या ग्रूपमधील काही मंडळींनी पूजा करण्याचे ठरविले, शक्य तेव्हढ्या लवकर जेवणे उरकून घेतली व सकाळी ३ वाजता उठण्याची व गरम पाण्याची व्यवस्था करवून घेतली, हळू हळू थंडीचा जोर वाढत होता, अंघोळीची तयारी करून झोपी गेलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथून मोबाईलला रेंज मिळत होती. लगेचच आम्ही केदार सर केल्याची बातमी थेट मुंबईपर्यंत पोचवली. दुसरे दिवशी लवकर आटोपून, थंडीचा बंदोबस्त करून पहाटे चारच्या सुमारास लाईनीत उभे राहिलो, आमच्या पुढे फारसे नंबर नव्हते, पण जस जसे उजाडू लागले तस तसे घुसणार्‍या मंडळींची गर्दी वाढू लागली व म्हणता म्हणता आमच्या पुढे बरीच मंडळी येऊन उभी राहिली, हळू हळू धक्का बुक्की सुरू झाली, पण लवकरच मंदिरातील शिपाई तेथे आले व लाईन थोडी शिस्तीत लागू लागली. त्या लाईनीतच आम्ही गरम गरम चहा पाणी उरकले. सहा वाजण्याच्या सुमारास देवळाची दारे उघडली व लाईन कूर्म गतीने पण निश्चितपणे पुढे सरकू लागली. यथावकाश आमचा नंबर लागला व गुरुजींनी व्यवस्थीत पूजा करवून घेतली. सर्वांना खूप आनंद झालाच पण मला विशेष कारण आज बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटच्या देवस्थानात पूजा करून झाली होती. आमच्या रुम्सवर परतून आम्ही आमचा नाश्ता उरकला व सामान आटोपून परत जाण्याच्या तयारीस लागलो, आम्ही दोघांनी चालतच प्रवास करायचा अगोदरच ठरवले होते त्यामुळे घोडे, डोली इ.च्या नादास न लागता आम्ही सरळ चालण्यास सुरवात केली, १६ कि.मी. म्हणजे बराच लांबचा पल्ला गाठायचा होता, उतरताना दमछाक होणार नाही अशी आमची खात्री होती. तरी पण उतरताना सारखे ब्रेक्स लावून पाय चार पाच कि.मी. अंतर चालल्यावर बोलू लागले, पायाचा चवडा तसेच पायाची सर्व बोटे बुटाच्या आतील भागात आपटून दुखायला सुरवात झाली. पण तसेच जिद्दिने आम्ही रेटून पुढील प्रवास कधी थांबत, कधी लिंबू सरबत घेत सुरू ठेवला. शेवटचा १ कि.मी. अंतर मात्र कटता कटत नव्हते, बेस कॅंप तर दिसत होता, आणि आता ठिकाण आमच्या पल्ल्यात आले, थोडासा पाऊस आला, पण तोवर आम्ही अगदी जवळ येऊन पोहोचलो होतो, ऐन थंडीतही घामाने भिजलो होतो. एकूण साडे चार तासानंतर आम्ही १६ कि.मी. हे अंतर पुरे केले व पायपीट सार्थकी लागली. दुपारची जेवणे उरकून बसच्या प्रतिक्षेत होतो, ती पण लवकरच गौरी कुंडाजवळ आली व आम्ही सर्व प्रवासी ३५ कि.मी.चा प्रवास उरकून आमच्या गुप्तकाशीतील हॉटेलवर परतलो. रात्री आराम करून दुसरे दिवशी आम्ही आमच्या पिपलकोटी ह्या मुक्कामासाठी रवाना झालो.

दि.१२-६-०७ – वळणा वळणाचा, घाटातील पिपलकोटी पर्यंतचा प्रवास साधारण ७० कि.मी. चा होता, आम्ही संध्याकाळच्या सुमारास तेथे पोहचलो. हॉटेल ठीक होते, चहा पाणी व हलकासा नाश्ता झाला. पण माझे पोट ठीक नसल्याने मी त्यात जास्त रुची दाखवली नाही व सरळ रूमवर जाऊन आराम केला. येथे तसे बघण्यासारखे काही नव्हते फक्त पुढील प्रवासासाठीचा हा एक तांत्रिक थांबा होता.

दि. १३-६-०७ – आशियातील नंबर एकची रोपवे असणार्‍या औली ह्या ठिकाणी प्रथम गेलो. रोपवेच्या फेरीचे अगोदरच्या दिवशीच मोबाईलवरून रिझर्वेशन झालेले होते. रोपवेच्या केबीनची क्षमता चांगलीच मोठी असल्याने आमच्या ग्रूपमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६ प्रवासी आम्ही एकाच वेळी त्यात मावू शकलो. खूप उंचावरून जाताना खालील दृश्य फारच छान दिसत होते, पण थोडेसे धुके असल्याने ट्रॉली मधून एरव्ही दिसणारी हिमशिखरे आम्ही बघू शकलो नाही, तरीही आजू बाजूच्या वृक्षराजी बघत व ट्रॉलीच्या ड्रायव्हर कडून इतर माहिती ऐकत आम्ही एकदाचे दुसर्‍या वरच्या टोकावर पोचलो. वातावरणात आता छान गारवा होता, पाळण्यातून खाली उतरून गरमा गरम कॉफी घेतली व आजू बाजूला फेरफटका मारला, धुके आणि ढगातून वावरताना वेगळाच अनुभव घेत होतो. रोपवेची खाली गेलेली ट्रीप परत वर येईपर्यंत भटकलो व मग रोपवेने खाली आलो, यावेळीस आजूबाजूचे दृश्य नीट बघण्यासाठी योग्य जागा निवडल्या रोपवे राईड एंजॉय केली. जवळच जेवण उरकून आमच्या चारधामच्या शेवटच्या टप्प्यासाठी, बद्रीनाथला जाण्यासाठी निघालो. इथे जाताना काही ठिकाणी सोयीच्या दृष्टीने एकतर्फी मार्ग आहे. त्या गेटमधून जाऊन आता बद्रीनाथला पोचण्याची वाट पाहत होतो. संध्याकाळ पर्यंत तिथे पोचलो, फ्रेश होऊन लगेचच दर्शनासाठी बाहेर पडलो, देवळा जवळ प्रचंड लांबीची रांग होती. ह्या ट्रीप मधील सर्वात जास्त थंडी आम्ही अनुभवत होतो. ३ तास रांगेत उभे राहिल्या नंतर आमचा नंबर लागला, दर्शन थोडे गडबडीतच उरकावे लागले. चपला ज्याठिकाणी ठेवल्या होत्या तेथे जातांना मी धडपडलो, बद्रीनाथाला साष्टांग नमस्कार झाला, थंडीमुळे जरा जास्तच लागल्याची जाणीव होत होती, अंगठ्याला मार बसला होता व थोडासा खरचटला होता, सहप्रवाशांनी मला पटकन सावरले, चपला घेऊन थोडावेळ आरामात बसलो व रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल मधे गेलो. हॉटेल मधूनही बद्रीनाथच्या देवळाचे छान दृश्य दिसत होते. जेवणे उरकून आम्ही आमच्या मुक्कामी परत गेलो, आता आम्हा सर्वांनाच परतीचे वेध लागले होते. दुसरे दिवशी बद्रीनाथच्या दर्शनाला जाण्याचे रांगेच्या कल्पनेने सर्वांनीच टाळले शिवाय इथे आत जाऊन केदारनाथ सारखी पूजा करण्याचीहि सोय नाही. सर्वांनी ब्रेकफास्ट उरकून आम्ही इथून जवळच असलेल्या “भारत की चाय की आखिरी दुकान” अर्थात बॉर्डरच्या ठिकाणी आलो, येथून जवळच सरस्वतीचा उगम गणेश मंदिर, व्यासांची गुफा अशी बरीच ठिकाणे आहेत. बॅटरी नीट चार्ज न झाल्याने फोटो सेशन चुकले. ती सर्व बघून आम्ही आमच्या पिपलकोट ह्या ठिकाणी जाण्यास निघालो, हा प्रवास १०० कि.मी. दूरीचा होता, वाटेत पाऊसही लागला, आणि आम्ही थोडेसे उशीरा हॉटेलवरआलो, हे आतापर्यंतच्या प्रवासातील उत्तम हॉटेल. परंतु इथे लाईट्स ये जा करत होते, पाऊस होता व लगेचच दुसरे दिवशी सकाळी हरिद्वारसाठी २५० कि.मी.चा पल्ला गाठायचा होता त्यामुळे हे वास्तव्य एंजॉय करू शकलो नाही.

दि.१४-६-०७ सकाळी ब्रेकफास्ट घेऊन आम्ही आता आमच्या अखेरच्या टप्प्यातील, हरिद्वार येथे जाण्यास निघालो, वळणावळणाचे रस्ते, या डोंगरावरून त्या डोंगरावर असा प्रवास करत आम्ही हरिद्वार येथे पोचेपर्यंत संध्याकाळचे साडे पाच वाजले, हॉटेलवर सामान ठेवले व लगेचच फ्रेश होऊन गंगेच्या आरतीसाठी प्रवासी निघाले, मी हा सोहळा अनेक वेळा बघितला असल्याने व थोडीशी तब्येत ठीक नसल्याने हॉटेलवरच बसणे पसंत केले, थोडा नाश्ता घेऊन आराम केला, प्रीती आरती बघण्यासाठी गेली होती. सर्व कार्यक्रम आटोपून मंडळी रात्री आठ पर्यंत परत आले, जेवणाचा कार्यक्रम झाला, सर्व प्रवाशांना सह प्रवाशांचे पत्ते आणि फोन नंबर इ. माहिती देण्यात आली. ड्रायव्हर व त्याचा असिस्टंट यांच्या बक्षिसी वाटपाची जमवा जमव झाली, एकमेकांचे आभार प्रदर्शन झाले व दुसरे दिवशी अंतिम टप्प्यातील दिल्ली स्टेशन / एअर पोर्ट येथे जाण्यासाठी मानसिक तयारी झाली. आत्ता पर्यंत १५ दिवसांचा आमचा प्रवास सफल संपन्न झाला. हा प्रवास काही विशेष अडचण न येता पूर्ण होणे यातच मला वाटते की प्रवाशांचे फिटनेस सर्टिफिकीट आहे, अर्थात त्याला परमेश्वराच्या कृपेची, आशिर्वादाची, संमतीची नितांत आवश्यकता आहेच. मनोमन त्या परमेश्वराचे मी आभार मानले.

दि.१५-६-०७ – आत्तापर्यंतच्या प्रवासात वाटेत खरेदी केलेले, चारधाम यात्रेत वेळोवेळी मिळालेले प्रसाद इ. वाढलेल्या सामानाची जमेल तशी बांधाबांध करून व सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून दिल्लीसाठी रवाना झालो. थोड्याच वेळात वाटेत पावसाने हजेरी लावली ती जवळ जवळ दिल्लीला पोचे पर्यंत, त्यामुळे हवेत गारवा आला होता. वाटेत एका छानशा हॉटेल मधे दुपारचे जेवण उरकले. दिल्ली जवळ मात्र हवामानात अचानक बदल झाला, व प्रचंड उन्हाळ्याला सामोरे जावे लागले, टेंपरेचर ४५ डि.से.च्या आसपास होते. निजामुद्दीन स्टेशन दिसत होते परंतु फ्लाय ओव्हरच्या सोईमुळे ? बराच वेळ बस स्टेशना भोवती योग्य दिशेने प्रवेश करण्यासाठी फिरत राहिली व प्रवाशांच्या संयमाची परीक्षा झाली. सामान उतरले व आता हमालाशी वाटाघाटी करून सर्वजण कडकडीत उन्हातून प्लॅटफॉर्मवर पोचलो. लवकरच राजधानी एक्सप्रेस आली व आता आम्ही एअर कंडीशन डब्यात थंड झालो. सह-प्रवाशांबरोबर प्रवासातील आठवणी चघळत, अनुभवत होतो. लवकरच इतके दिवसांच्या सहवासापासून प्रवासी विभक्त झाले. नेहमी प्रमाणे सहप्रवाशांची फोनची डायरी बनली, बहुदा विसरण्यासाठीच?

दि.१६-६-०७ – वेळेवर मुंबई सेंट्रल येथे पोचलो, उतरवून घेण्यास वसंता आला होता, एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी ठाणे येथे जाण्याचा मानस होता, परंतु परमेश्वराची तशी इच्छा नसावी, प्रवासातील दगदगीमुळे मला ताप आला, रविवार असल्यामुळे डॉक्टरांसाठी एक दिवस वाट पहावी लागली, नंतर औषध घेऊन व एक दिवस आराम करून बुधवारी १९ तारखेला ठाणे मुक्कामी परत आलो.

प्रवासात एक गोष्ट परत एकदा अधोरेखीत झाली ती म्हणजे अशी बरेच दिवसांची ट्रीप आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर निदान दोन वर्षांनी तरी निश्चितच आयोजित केली पाहिजे, एरव्ही आपण बरेच वर्षांच्या कालावधी नंतरही गतीमान जीवनामुळे आपापसात जवळीक साधू शकत नाही, आपला पूर्ण परिचय होत नाही, अशा प्रवासाच्या निमित्ताने ते साधते असा माझा अनुभव आहे. इतक्या वर्षांनंतर मला प्रीतीची व प्रीतीला माझी थोडी अधिक ओळख झाल्याचे जाणवले. ही देखील चार धाम यात्रेची जमेची बाजू !!

आता पुढील ट्रीपच्या शोधात !

— श्रीकृष्ण जोशी

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..