सकाळची वेळ होती, गार वारं सुटलं होत. कॉलनीला झोपेतून पूर्ण जाग आलेली नव्हती. दाराशी उभे राहून इकडे तिकडे पाहत असतानाच पेपरवाला आला. नमस्कार केल्यानंतर थोडा वेळ तो थांबला, म्हणाला, ‘तीन नंबरच्या घरातल्या साहेबांनी दोन महिन्यापासून बिल दिलेलं नाही, काय करावं’ असं सांगून त्याने बोलायला सुरवात केली. पाच-दहा मिनिटे तो गप्पा मारत होता. थकलेल्या बिलापासुन सुरवात होऊन विषय राजकारणापर्यंत येऊन थांबला. थोड्या वेळातच निरोप घेऊन तो निघुन गेला. अजुन पेपर घेऊन घरात आलो नव्हतो इतक्या वेळात दुधवाला देखील आला. त्यानेही मला पाहून नमस्कार केला, दुधाच्या दराबाबत तो माझ्याशी चर्चा करून लागला. चारा कमी झाल्याने दुधाला फॅट कसे कमी लागते, मग भाव कसा कमी मिळतो अशा विषयावरून आमची चर्चा पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडला तर दुधाच्या भावात काही तरी फरक पडू शकेल येथे येऊन थांबली. तोही मग निघुन गेला. चर्चेच गुऱ्हाळ सुरू झालं होतं. स्वयंपाक घरात दुधाच भांड दिल्यावर गृहमंत्र्यांनी देखील विचारणा केलीच, ‘कुणाशी बोलत होता इतका वेळ..’ त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन पुढच्या कामाला लागलो. सकाळची कार्ये आटोपून घराबाहेर पडलो तोच कॉलनीच्या कोपऱ्यावर आणखी दोघे तिघे भेटले. तेथे थोडावेळ थांबलो तर पुन्हा चर्चा सुरू झाली. चर्चेला विषय काही असे ठरवून घेतलेले नव्हते. पण चर्चा सुरू होती. हवेच्या झोता बरोबर कागद इकडुन तिकडे उडावा तसा या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत चर्चेच गुऱ्हाळ सुरू होतं. थोडा वेळ तसाच गेल्यानंतर वेळेचं भान आलं. आता ऑफिसला गेलं पाहिजे. मग गाडी घेऊन ऑफिसच्या मार्गाला लागलो.
ऑफिसमध्ये आल्यानंतर पुन्हा दोघे-तिघे सहकारी भेटले. त्यांच्यातही चर्चा सुरू होती. विषय पुन्हा तसाच… न ठरवलेला. कोणत्याही विषयावर गप्पा मारता येऊ शकतात, हे या चर्चेतून लक्षात येत होत. अर्थात चर्चेमध्ये ऑफिसच्या बॉसचा विषय हमखास निघतोच. बॉस या विषयावरून सुरू झालेल्या चर्चेची नौका कधी देशाच्या विकासापर्यंत येऊन पोहोचते ते समजत नाही. कधी कधी चर्चा सुरू झालेली असते साध्या –साध्या गोष्टींवरून आणि पोहोचते अगदी नकोशा वळणावर. कधी असही होतं आपल्याला न आवडणाऱ्या विषयांवर देखील आपण बोलत असतो. काही वेळेला कुणीतरी मुद्दाम एखाद्या विषयाचं पिल्लू चर्चेच्या गुऱ्हाळात सोडुन देतं आणि मंडळी त्यावर चर्चा करू लागते. ऑफिसमधुन बाहेर पडल्यावर पावले घराकडे वळलेली असतात. घरी आल्यानंतर मुलांशी चर्चा सुरू होते अर्थात इथे विषय अभ्यासाचा असतो. त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा असतो, त्यांच्या आवडीच्या खेळाचा असतो इ. मग टीव्ही सुरू होतो. तिथे तर चर्चा करण्यासाठी खास आंमत्रित केलेली मंडळी असते. चार जण समोर बसुन कोणता तरी एक विषय घेऊन त्यावर चर्चा करत असतात. बर या मंडळींना विषयाच काही बंधन नसतं. कोणत्याही विषयावर ते चर्चा करत राहतात. अगदी परवा रावण दहनावेळी झालेला रेल्वेचा अपघात असो किंवा विराट कोहलीने केलेल्या दहा हजार धावा असो किंवा पेट्रोलचे वाढणारे दर असो. कोणत्याही विषयावर ही मंडली चर्चा करत राहते. चर्चेच गुऱ्हाळ सुरू राहतं.
या सर्व चर्वित चरणातून बाहेर पडुन, जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येई पर्यंत चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…!
दिनेश दीक्षित
Leave a Reply