नवीन लेखन...

चारित्र्य

आपला समाज सभ्य आणि सुसंस्कारित रहावा असं वाटत असेल तर काही गोष्टींपासून त्याला दूरच ठेवावं लागतं. आणि काही गोष्टी अनिवार्य कराव्या लागतात. भंपक विषयांना नको तितकी प्रसिद्धी देऊन समाजात नवनवे प्रश्न जन्माला घातले जात आहेत. परंतु या प्रश्नांवरच्या उपायाविषयी जाहीरपणे कुणीच बोलताना दिसत नाही. बरं, कुणी असंही म्हणत नाही की, अशा विषयांना दिवसरात्र प्रसिद्धी देण्याचा उद्योग प्रसिद्धीमाध्यमांनी आधी बंद करावा. कारण समाजात यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे आणि आवश्यक विषय दुर्लक्षित होऊन धूळ खात पडून आहेत. आधी त्या विषयांचा पाठपुरावा करावा आणि मग समाजाच्या विकासासाठी उपयोगी पडेल अशा गोष्टी सतत लोकांच्या मनावर बिंबवत रहाव्या.
परंतु आपले दुर्दैव आहे की, समाजाच्या या सकारात्मक भूमिकेचा पार बट्याबोळ झाला आहे. एका बाजूला ‘मी टू’ या विषयावर टीका करायची आणि दुसरीकडे ‘बाई वाड्यावर या’ सारख्या गाण्यांवर जाहीरपणे बेभान होऊन नाचायचं !!! समाजाला एकाच वेळी दोन्ही हातांमध्ये दोन्ही गोष्टी हव्या आहेत. लोकांचंही जरा विचित्रच आहे.  ‘मी टू’ बद्दल ओरडणाऱ्यालाच द्विअर्थी आयटम गाणे ऐकण्यात इंटरेस्ट असतो. अगदी सोशल मीडीयावर ‘मी टू’ प्रकरणाला दणदणीत पाठिंबा देणारे अनेकजण महाभाग रास दांडिया च्या कार्यक्रमांमध्ये नेत्रसुख घेण्यासाठी जमलेले पाहिलेत. बरं, ही डबल ढोलकी वाजवतंय कोण? तर, लोकशाहीचा चौथा खांब म्हणवणारे प्रसिद्धी माध्यमं अर्थात मिडीया…! ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काहीही खपवून घ्यायला लोक तयार आहेत म्हटल्यावर वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी कोण सोडेल?
आपल्याला हवी असलेली गोष्ट किंवा संधी देताना एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडून काही अपेक्षा केली तर कुणाला त्यात काही गैर वाटण्याचं कारणच नाही. पण कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि आपण त्याची कोणती मागणी पुरवावी किंवा कोणती मागणी पुरवू नये, हा आपल्या तारतम्याचा प्रश्न असतो. एखाद्यानं पैसे किंवा प्राॅपर्टी मागितली तर आपण त्याला भ्रष्टाचार म्हणतो. पण जर त्याच व्यक्तीनं आपलं शरीर मागितलं तर?  कुणीही व्यक्ती अगदी चारचौघात चौकात उभी राहून अशी मागणी करायला धजावत नाही, हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे, ‘दिसली बाई की कर मागणी’ असंही होत नसावं. आपण एखादं काम मिळवण्याकरिता वाट्टेल ती किंमत मोजायची असं मनातून ठरवलेलंच आहे, हे समोरच्याला कळू नये इतका कुणी दूधखुळा नसतो. समोरच्या व्यक्तीला आपल्यामध्ये अशी काही ‘विशिष्ट आशा-महत्वाकांक्षा’ दिसली की, ‘मी टू’ सारखी प्रकरणं घडायला वेळ लागत नाही.
खाजगी आयुष्यात, पूर्ण एकांतात असतानाही, स्वत:च्याच पतीसोबतदेखील शारिरीक जवळीक मोकळेपणाने साधू शकत नसणाऱ्या स्त्रियांपासून ते ‘बघा बघा माझं शरीर’ असं म्हणत अंगप्रदर्शन करणाऱ्या आणि दर चार दिवसांनी बाॅयफ्रेंड बदलणाऱ्या स्त्रियांपर्यंत सांस्कृतिक महाराष्ट्राचा प्रवास फार वेगानं होत चालला आहे. महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था सुधारावी, पर्यटन व्यवस्था सुधारावी, रोजगार व्यवस्था सुधारावी, महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरचं उत्कृष्ट वाचनसंस्कृती असणारं राज्य व्हावं या पैकी कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्राचा प्रवास अशा वायुवेगानं कधीच झाला नाही. पण ‘मी टू’ सारखी प्रकरणं चवीनं चघळण्याकडे मात्र महाराष्ट्र आघाडीवर आहे.
भौतिक सुखापुढं चारित्र्याची किंमत कमीच वाटायला लागते. एवढा मोठा गंभीर बदल समाजाच्या वागण्याबोलण्यात घडून गेला पण आपल्याला त्याचा पत्ताही लागला नाही. गरीब किंवा असहाय्य स्त्रिया आजही पूर्ण सुरक्षित नाहीत. पण ‘मी टू’ मध्ये असणारा स्त्रीवर्ग असा नाहीय. त्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर हा खूप वेगळा आहे.
आपली सारासारबुद्धी आणि विवेक दोन्हीही जागं ठेवून विचार केला तर असं स्पष्ट दिसेल की, “मी टू” प्रकरणात संमतीचा भाग मोठा आहे. केवळ शारीरिक भूक भागवणं वेगळं ! आणि स्वत:ला काहीतरी मिळवायचंय म्हणून समोरच्याची शारीरिक भूक आपण आपलं शरीर देऊन भागवणं वेगळं ! दोन्हीतल्या भावनिक गुंतवणुकीची आणि दोन्ही गोष्टीमागील हेतूची तुलना होणं शक्यच नाही. स्त्री ने तिच्या सौंदर्याचा अभिमान अवश्य बाळगावा, पण त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला की ते तारण ठेवण्याची वेळ येतेच. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमधला एक दुर्लक्षित भाग असा आहे की, मागणी करणाऱ्यानं ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा उद्योग केलेला नाही. त्यानं खाजगीत अगदी स्पष्टपणेच मागणी केली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, मागणी करणाऱ्याच्या अपेक्षा अगदीच स्पष्ट होत्या आणि आपली मागणी समोरची व्यक्ती नक्कीच पूर्ण करेल याविषयीची खात्रीही असणार! मग अशा प्रकरणांमध्ये गुंतलेले पुरूष किंवा स्त्रिया आधी समोरच्या व्यक्तीला चाचपून पाहतील आणि मगच असलं धाडस करतील, हे साधं सरळ लाॅजिक आहे. मानवी वर्तनाचा जुजबी अभ्यास असणारा कुणीही हे सहज सांगू शकेल की, कुणाकडेही त्याच्या शरीराची मागणी करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. किंबहुना अशा बाबतीत ही माणसं नेहमीपेक्षा कितीतरी अधिक सावध आणि चोखंदळ असतात. आपल्या मागणीला कोण बळी पडू शकेल, कुणाला सहजपणे ब्लॅकमेल करता येईल, कुणाला आमिषं दाखवता येतील, कुणाला स्वप्नं दाखवता येतील याचा परफेक्ट अभ्यास केलेलाच व्यक्ती असं धाडस करीत असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आपला आपल्या स्वत:विषयीचा जितका अभ्यास नसतो तितका इतरांचा आपल्याविषयीचा अभ्यास असतो. म्हणूनच, आपल्या वागण्या-बोलण्यातून समोरच्याला नेमकं काय दिसतंय, जाणवतंय याचाही अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे, असं मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला म्हणावसं वाटतं.
उद्या जर घरातल्या मुली ‘तुम्हाला अमुक अमुक हिराॅईन ने तसं वागलेलं चालतं, मग मी तसं वागले तर बिघडलं कुठं?’ असा वाद घालायला लागल्या तर प्रकरणं पालकांच्या हाताबाहेर जातील, हे उघड आहे. आज घराघरांमध्ये जे वाद मुलींच्या पोशाखांवरून होतात, उद्या तेच वाद या गोष्टींवरून सुरू होतील. ते सोडवण्याचे मार्ग समाजाकडे आहेत का? ‘अमुक हिरो चारचौघात शर्ट काढून फिरतो, ते तुम्ही चवीनं पाहता. मग मी तसा फिरलो तर बिघडलं कुठं?’ असं म्हणत मुलं रस्त्यावर फिरायला लागली तर काय करायचं?
उद्या जर घराघरातल्या स्त्रिया ‘मी टू – मी टू’ असं म्हणायला लागल्या तर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होईल ? समाजात त्या विषयासंबंधी कोणती प्रतिमा तयार होईल, याची थोडीशी तरी कल्पना करायला हवी. स्त्री-पुरूष संबंधातील चिरंतन सत्य काय आहे, हे जाणून घेतलं- समजून घेतलं तर मनातली वावटळ शांत होईल.
— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..