नवीन लेखन...

चार्टर्ड अकाऊंटंट्स डे

१ जुलै १९४९ साली ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) या भारतीय व्यावसायिक लेखा संस्थेची स्थापना झाली म्हणून हा दिवस ‘सीए दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘य एष सुप्तेषु जागर्ति’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ‘असा माणूस जो झोपी गेलेल्यांना जागं करतो’ हा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. कंठोपनिषदातील हे वाक्य श्री अरबिंदो यांनी १९४९ च्या स्थापनेच्या दिवशी ICAI ला ब्रीदवाक्य म्हणून दिलं.

जी. पी. कपाडिया हे देशातील पहिले सीए होते. ICAI अंतर्गत रजिस्टर झालेले पहिले चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून जी. पी. कपाडिया ओळखले जातात. १९४९ ते १९५२ पर्यंत ते ICAI चे अध्यक्ष देखील होते. पहिली महिला चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा मान ‘आर. सिवभोगम’यांना मिळाला. त्याकाळातील समजुतीनुसार सीए हे पुरुषांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं, पण तरीही त्यांनी या क्षेत्रात येत हा मान पटकावला. ‘निश्चल नारायणम’ हा सीए ची परीक्षा उत्तीर्ण होणारा सर्वात तरुण सीए आहे. २०१५ साली त्याने परीक्षा पास केली त्यावेळी त्याचं वय अवघं १९ वर्ष होतं. त्याचं वय २१ वर्षावेक्षा कमी असल्याने त्याला त्यावेळी ICAI चा मेंबर होता आलं नाही.

ICAI मध्ये आरक्षण नाही. त्यामुळे इथे फक्त आपल्या मेहनतीवर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही येऊ शकता. ही या संस्थेची जमेची बाजू म्हणता येईल.

व्यवसाय मोठा असो की छोटा, व्यवसाय सांभाळताना सी.ए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटंटची गरज भासतेच. ऑडिटिंग, टॅक्सेशन, अकाऊंटिंग आणि आर्थिक नियोजन आदी कामं सीएला करावी लागतात. हे काम करताना तुमच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते. मात्र, तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला अर्थार्जन (पैसे) मिळवून देणारं असा हा व्यवसाय आहे.

सीए अर्थात ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ हा करिअरचा एक उत्तम पर्याय मानला जातो; परंतु यासाठी आवश्यक ती कौशल्ये असणे गरजेचे आहे. गणिताची आवड, आकडेमोड, भाषेवर प्रभुत्व, कंपनी ज्ञान इत्यादी बाबी सीएसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. सीए किंवा सीएसचे अभ्यासक्रम पूर्ण करून पूर्ण वेळ सीए किंवा सीएस होण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. पण असे असले, तरी अद्यापही देशात मोठय़ा संख्यने सीए-सीएसची आवश्यकता असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यासाठीच सीए-सीएसच्या करिअरची माहिती सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक सीए-सीएस स्वत: पुढाकार घेत आहेत. सीएसाठी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट’चा अभ्यासक्रम आहे. खरे म्हणजे सीए कोर्स हा पदवी वा पदवीत्तोर कोर्स नाही तर तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे. सीएची परीक्षा अतिशय कठीण असते. निकाल अतिशय कमी लागतो तरी लाखो विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया ही चार्टर्ड अकाऊंटंटस (सीए)च्या व्यवसायाचे नियमन करणारी संस्था १९४९ साली लोकसभेने संमत केलेल्या कायद्यानुसार स्थापन झाली. जी व्यक्ती या संस्थेने घेतलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होते तिला सदस्यत्व घेता येते. या संस्थेचे सदस्यत्व घेणे अनिवार्य नसले तरी सीएचा व्यवसाय केवळ सदस्यांनाच करता येतो. म्हणजेच नोकरी करणारे सदस्य नसले तरी चालते.

हा कोर्स करण्यासाठी कोणा सीएच्या फर्ममध्ये तीन वर्षाची उमेदवारी करावी लागते, जिला आर्टिकलशिप असे म्हणतात. या तीन वर्षात इन्स्टिटय़ूटने निश्चित केलेले वेतन दिले जाते, जे अर्थातच माफक असते. म्हणजेच या तीन वर्षात त्या विद्यार्थ्यांला विशेष काही अर्थार्जन होत नसल्याने तो आपल्या पालकांवर अवलंबून असतो. या तीन वर्षाच्या आर्टिकलशिपपैकी शेवटचे सहा महिने एखाद्या उद्योगात अ‍ॅप्रेंटिसशिप करता येते. ज्यांना पुढे नोकरी करायची असते त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उद्योगातही अ‍ॅप्रेंटिसशिप करता यावी म्हणून ही सोय केली गेली आहे. या उमेदवारीच्या काळात पहिल्या दिवसापासून सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा असते.
एखाद्या कंपनीचा वार्षिक अर्थिक ताळेबंद मांडण्यात सीएची महत्त्वपूर्ण भूमिका असते. सीएचे काम सीए फक्त टॅक्स रिटर्न्सळ भरतो, असा गैरसमज आहे; परंतु सध्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणात सीए विविध प्रकारची कामे करू शकतात. व्यावसायिक भाषेत सीएला फायनान्शियल डॉक्टर म्हटले जाते, तसेच व्यवसायाच्या दृष्टीने देखील सीए महत्त्वाचा असतो. व्यवसायातील नफा-तोटा आणि व्यवसायावर अप्रत्यक्षपणे नजर ठेवण्याचे जोखमीचे काम त्याला करावे लागते. पूर्णवेळ, अर्धवेळ अशा दोनही स्वरूपांत काम करता येते. जीएसटी, इन्कम टॅक्स, व्हॅट, सव्‍‌र्हिस टॅक्स आणि एलबीटी आदी करांसंबंधीची महत्त्वाची कामे सीए करतो.

सीएचा व्यवसाय करणा-यांसाठी तर खूपच क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी ऑडिट करणे म्हणजे हिशेब तपासणे हे एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठा देणारे काम असते, ज्या कामाला सर्टिफिकेशनचे काम असे म्हटले जाते. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक कंपनीला, मग ती प्रायव्हेट लिमिटेड असो वा पब्लिक लिमिटेड असो, ऑडिट करून घ्यावे लागते. याव्यतिरिक्त बँका, विमा, स्टॉक एक्सेंज तसेच फेरासारखे वित्तीय कायदे वगैरे कायद्यानुसार ऑडिट वा सर्टिफिकेशन करून घ्यावे लागते. याशिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कायद्यांनीसुद्धा ज्यांची उलाढाल एका विशिष्ट मर्यादेहून जास्त आहे त्यांना ऑडिट करून घेणे अनिवार्य केले आहे. विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढय़ा वगैरेंनासुद्धा ऑडिट करून घ्यावे लागते. अनेक उद्योग कायद्याने करावयाच्या ऑडिटच्या व्यतिरिक्त इंटर्नल ऑडिट करून घेतात ज्याचा अहवाल व्यवस्थापनाला दिला जातो. हे एक मोठे क्षेत्र सीएंना उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त सीए कर सल्लागाराचे कामसुद्धा करतात. यात प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर आणि सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर यांचा समावेश होतो. सल्ला देण्याव्यतिरिक्त त्या त्या कायद्याप्रमाणे वेळोवेळी विवरणपत्रे भरणे, कराची रक्कम निश्चित करणे, कर निर्धारण करून घेणे या कामाचा समावेश होतो. मॅनेजमेंट अकाऊंटिंग, बजेटिंग, फोरकास्टिंग, मॉनिटरिंग, मालमत्तेचे वा कंपनीचे वा भागांचे व्हॅल्युएशन करणे अशा अनेक प्रकारच्या सेवा देण्याची भूमिका सीएना पार पाडावी लागते.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..