नवीन लेखन...

चष्मा (गूढकथा)

आषाढाच्या महिन्यातली ती एक किर्रर्र रात्र होती. दमट उकाड्याने आसमंत गुदमरला होता. काळ्या ढगांच्या लाटांवर लाटा उसळत होत्या. मधेच एखादी विजेची चमकदार आणि धारदार लकेर तो काळोख चिरून काढताना, ढग यातनांनी विव्हळत आहेत, असा भास होत होता.

पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही?

अंधाराला डोळे थोडेसे सरावल्यावर त्यांनी उशाला ठेवलेला चष्मा डोळ्यावर चढवला. थोडे बरे दिसू लागले. डोक्यावरचा पंखा फुल स्पीडवर होता, पण हवेची एक लहर सुद्धा, त्याच्या कोरड्या त्वचेपर्यंत पोहंचत नव्हती. त्यांनी शेजारी नजर टाकली. तेथे कोणी तरी झोपलेले होते, डोक्यावर पांघरून घेऊन. कोण आहे? अश्या उकाड्यात डोईवर पांघरून घेऊन कशी झोप येणार? कोण असावं? अरे हो, हे आबा, आपले कारलीचे आजोबा! याना असच झोपायची सवय आहे! म्हणजे हे कारली आहे?

त्यांनी हात लांब करून उशाजवळच्या लोट्यातलं पाण्याचा घोट घेतला. आणि हातातला पेला जमिनीवर पडला! भयंकर मोठा आवाज घरभर घुमला.

“बाबा! झोपकी निवांत! आणि आम्हालाही झोपू दे! काय पाडापाडी लावलीयय?” पोराचा वैतागलेला सूर पंतांना बेचैन करून गेला. कारली, आबाच्या विचार तंद्रीतून त्यांचे मन बाहेर पडले. त्या जुन्या आठवणी सूड खातात. नसते भास! दुसरं काय? त्यांनी झिरोच्या लाईटचे बटन भिंतीवर चापचून दाबले. त्या उजेडात जमिनीवर पडलेला पेला जागेवर ठेवला. लाईट बंद करून त्यांनी अंथरुणावर अंग टाकले. आता झोप लागणे कठीणच.
आज आजोबांची आठवण का यावी? आणि कारलीला असल्यासारखेही वाटण्याचे काही कारण नाही. मग का? ते लहानपणी आजोळी, आबाकडे उन्हाळ्याच्या सुटीत कारलीला जायचे. आंब्याच्या झाडाखाली हुंदडण्यात दिवस जायचा. रात्री जेवण झाली, कि आजोबा भुताच्या गोष्टी सांगायचे, आणि स्वतःच भुतासारखं डोक्यावर धोतर घेऊन झोपी जायचे.

कारलीच्या आठवणीत पंतांचे मन गुंतले. मिटल्या डोळ्यासमोर, ते डोक्यावर पांघरून घेतलेले आजोबा, माडाची वाऱ्यावर झुलणारी झाड, रात्रीच्या सावल्या असं काही काही येत राहील. त्यांना झोप लागली.

पुन्हा अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! मघा सारखीच!

‘धन्यवाद, आपण आपल्या डोळ्यांनी आम्हास ——-‘ तेच! हो! तेच वाक्य पंतांच्या कानात घुमले!! त्यांना दरदरून घाम आला.
ती ‘वस्तू’ जागेवरच असेल ना? काल झोपताना पाहायला हवे होते! त्या पोराचं काही खरं नाही. काल सकाळी ट्रंक उघडली, तेव्हा शशी शेजारीच खेळात होता! ‘आजोबा, त्या बॉक्स मध्ये काय आहे? मला बघायचंय!’ असे त्याने विचारलेही होते. आपण घाईत ती छोटी पेटी, कपड्याखाली दडवली म्हणा. पण या वयात मुलाची उच्छुकता जबरदस्त असते. आपलीही होतीच की! पण काही झाले तरी, ‘त्या’ वस्तूला जपायला हवं! शशीच्या हाती ती लागत कामा नये!

अंधारातच त्यांनी आपली लोखंडीपत्र्याची पेटी पलंगाखालून बाहेर ओढली.

खर्रर्र — आवाज घरभर पसरला!

“बाबा! बाबा! झोपा कि! काय चाललंय तुमचं?” खाड्कन दार उघडून, त्यांचा वैतागलेला मुलगा श्रीधर, त्यांच्या बेडरूममध्ये आला.
“काही नाही. जरा महत्वाचं आठवलं ते पाहायचं होत, म्हणून—-”

“बाबा, हि गोळी घ्या! झोपेची आहे! तुमच्या पेटीतील काय हुडकायचे ते सकाळी बघा!”
श्रीधरने ती लहानशी गोळी पंतांच्या तळहातावर ठेवली. आपल्या समोर ती त्यांना घ्यायला लावली. आणि मगच तो रूमबाहेर पडला.

पंतांच्या हातापायातले ताण गेले. नाईलाजाने त्यांनी गोळी घेतली. झोपेने चवताळून त्याच्यावर हल्ला चढवला. सकाळी डोळा उघडला तेव्हा साडेआठ झाले होते.                                                                                                                                                ०००

खडबडून त्यांनी आळस झटकला. पलंगाखालीची पत्र्याची पेटी ओढून बाहेर काढली. घाईत झाकण उघडून पेटीच्या तळाला हात घातला. त्यांना अपेक्षित वस्तू तेथे नव्हती! त्यांनी भराभर पेटीतील सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून टाकले. ती ‘वस्तू’ कोठेच नव्हती! कोठे गेली?
“शालन, माझ्याकडे एक, माझ्या आजोबांची आठवण होती. याच पेटीत ठेवली होती मी! आता दिसत नाही! तू पाहिलीस का?” त्यांनी आगतिकपणे सुनेला विचारले.
“काय होत?”
“एक जुना चष्म्या होता!”
“नाही. बाबा, अहो, असेल तेथेच कोठे तरी. हल्ली तुमच्या लक्षात राहत नाही! ठेवला असेल तुम्हीच कोठे तरी!”

हे हि खरे होते. त्यांनी पुन्हा सर्व कपडे, झटकू-झटकू पहिले. पलंगावरची गादी, उशी, उशीचे अभ्रे, त्यांचं कपाट, पुस्तकाचं रॅक. सगळी खोली धुंडाळली! ती वस्तू, म्हणजे चष्म्याचे घर, कोठेच नव्हते!

अरे बापरे! एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलीच नव्हती. सकाळी पेटीला, नेहमी असणारे कुलूप नव्हते! हे काम नक्की शशीचे!
“शालन, शशी कोठेय?”
“कुठाय? म्हणजे? कुठं असणार? शाळेत गेलाय.”
“कधी येणार?”
त्यांच्या या प्रश्नाला शालनने उत्तर दिले नाही. फक्त म्हाताऱ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, आणि आपल्या कामाला लागली.
०००

” शालन, आग, शशी शाळेतून कधी येतो?” पंतांनी सकाळपासून तिसऱ्यांदा आपल्या सुनेला विचारले.
“बाबा. अहो, त्याची शाळा तीन वाजता सुटते. घर गाठायला त्याला साडेतीन होतात. हे नेहमीचंच आहे. अन तुम्हालाहि चांगलंच माहित आहे! आज काय लावलंय, हे तुम्ही सकाळ पासून? नसता वैताग!” शालिनी त्रासून म्हणाली.
पंत गप्प बसले. त्यांनी घड्याळात पहिले दोन वाजले होते. अजून दीड तास होता! पण शशीची वाट पहाण्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय पण नव्हता. ते अस्वथपणे हॉलमध्ये फेऱ्या मारू लागले.

आज या म्हाताऱ्याचं काही तरी बिनसलंय. आता रोज शशीची वेळ माहित असून सारखं विचारतोय, ‘शशी कधी येणार?’ याच असं काय त्या लेकरावाचून अडलं आहे, कोणास ठाऊक? या म्हाताऱ्याचं काही खरं नसत. काल बेरात्री उठून, काय खुडबुड करत होता कोणास ठाऊक? काही तरी हुडकत होता, हे मात्र खरं? काय, मेल त्या जुन्या चष्म्यात पडलंय कोण जाणे? त्या तीन टिकल्याच्या चष्म्यासाठी म्हाताऱ्याचा जीव खाली वर होतोय!

शालन जर कळले असते कि, त्या ‘चष्म्यात’ काय आहे. तर तिचे डोळे पांढरे झाले असते!
०००
छोटा गंगाधर आजोळी आला, कि सार आजोळ आनंदानं भरून जायचं. आजीला रोज नवे नवे पदार्थ करायला लागायचे. मामा, मावश्याना, त्याला कोठे ठेवू अन कोठे नको असे व्हायचे. मामा रोज त्याला आपल्या सायकलवर दूर फिरवून आणायचा. गंगू होताच तसा गोड! चटपटीत बारा तेरा वर्षाचं पोर.  मामेभावा सोबत लपाछपीला तर, ऊत यायचा. कोकणातला तो मोठ्याल्या ओसऱ्यांचा वाडा, आसपासच्या आंब्याचा पोकळीच्या बागा, केळीची रुंद पानाची झाड. लपायला अनंत जागा! या आनंदात मात्र घरातील एक व्यक्ती मात्र सामील असली तरी, थोडी धास्तावलेली असे. ते म्हणजे गंगाधराचे आजोबा. आबा. त्याला कारण हि होतेच. गंगाधर म्हणजे उचापती कार्ट! इतर घरच्या पोरासोरांना रागावता यायचं, पण हे पडलं जावयाचं पोर, कस रागावणार?

अश्याच एक उन्हाळ्याच्या सुटीत गंगू आजोळी अवतरला. सकाळी आंबील पिऊन, पोर घरभर लपाछपी खेळत होती. आबांनी सकाळची पूजा आटोपून घेतली. दोन फुल आणि हळदी कुंकवाचे पंचपाळे घेऊन आपल्या खोलीतआले. छताच्या सवन्यातुन सूर्याचा प्रखर झोत येत होता. त्या झोताखाली, बसून त्यांनी पलंगाखालची, आपली लाकडी ट्रंक बाहेर ओढली. जुन्या कपड्यांच्या खालून त्यांनी एक छोटस चष्म्याचं घर काढलं. मनोभावे त्याला नमस्कार केला. हलक्या हाताने त्या चष्म्याच्या घराचे झाकण उघडले. आतील पांढऱ्या फ्रेमचा, काळ्या काचा असलेल्या चष्म्यास हळद कुंकू वाहिले. अक्षदा वाहिल्या.

“असाच, शांत रहा! हीच हात जोडून विनंती रे बाबा!” अशी प्रार्थना त्यांनी डोळे मिटून मनातल्या मनात केली.आज शनी आमोश्या होती. खडतर दिवस. आज त्या चष्म्याची पूजा करण्याचा आबांचा गेल्या तीस वर्षाचा रिवाज होता!
“आबा! त्या पेटीत चष्म्यासारखं काय तरी दिसतंय! मला बघायचंय! हातात घेऊन! द्या ना?” गंगाधर आग्रहानं म्हणाला. आबा केव्हढ्यानंदा तरी दचकले! हे कार्ट आलं कुठून?

“अरे, गंगू. कशाला माझ्या खोलीत आलास? जा, बाहेर खेळायला!”
“आबा, आम्ही लपाछपीच खेळतोय! मी या खोलीत लपलोय! पण तो चष्मा द्या ना?”
“चल पळ! ती वस्तू खेळायची नाही! जा, जा निघ! माझ्या खोलीतून जा बाहेर!” आबा त्याच्यावर खेसकलेच!

गंगाधर हिरमुसला होऊन घराबाहेर पडला खरा, पण रागातच. परसातल्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. आबा बॅड बॉय आहे! कस रुड बोलला? मी काय रोज रोज येतो का? फक्त सुट्टीतच येतोना? पण तो गॉगल एकदम भारी दिसत होता! एकदा घालून पहायला पाहिजे! पण आबा त्याची पूजा का करत होता? या कोकणातल्या म्हाताऱ्याचं काही खरं नसत. कशाची पण पूजा करतात. एक नारळ घेतात नि पिंपळाच्या झाडाखाली ठेवतात! पर्वा तर झाडाखालच्या दगडाची पूजा केली होती! तसंच ते पूजेचंपण काहीतरी फॅड असेल. असेना. आपल्याला तो चष्मा पाहिजे म्हणजे पाहिजे! रात्री आबा लवकर जेवतो अन आठवाजताच झोपतो, डोक्यावर पांघरून घेऊन. तोच मोका साधायचा! गंगाधरांन मनाशी बेत पक्का केला.
“गंगू SSS, चाल जेवायला!” मामीने मागच्या दारातून हाळी दिली, तशी गंगाधराने झाडावरून उडी घेतली. पोटात भूक लागलीच होती.
०००
रात्री आठ वाजता पोरांच्या बरोबर आबानीपण, नेहमी प्रमाणे जेवून  घेतले. दोन तीन भुतांच्या गोष्टी पोरांना सांगोतल्या. बारकी पोर उघड्या ढाळंजत, गार पडलेल्या गोधडीवर झोपी गेली. दिवसभर खेळून दमलीच होती, त्यात आबांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी! गांधारला मात्र, त्या चष्म्याची उच्छुकता झोपू देत नव्हती. थोड्याच वेळात मोठी माणसंपण झोपी गेली. घर शांत झाले. निरव शांत!

गंगाधर हळूच अंथरुणातून उठला. ढाळजसमोरच्या अंगणात झाडाच्या सावल्या भुतासारख्या दिसत होत्या. आज रोजच्यापेक्षा ज्यास्त अंधार वाटत होता. आभाळात मिणमिणत्या चांदण्या होत्या, पण चंद्राचा पत्ता नव्हता. गंगाधरने कानोसा घेतला. सगळे झोपलेले होते. कोठेच आवाज होत नव्हता. फक्त एक कुत्र कुठेतरी रडत असावं. बाकी शांत होते.

आबांची खोली ढाळाजच्या डाव्या कोपऱ्यात होती. उकाड्यामुळे त्यांनी खोलीचे दार उघडेच ठेवलेले होते. घरात बारीक प्रकाशाचा लाईटचा दिवा जळत होता. आबाच्या पलंगासमोर एक जुनाट टेबलफॅन चालू होता. गंगाधरला आबांची पेटी कोठे आहे माहित होते. दुपारीच त्याने पाहून ठेवली होती. हळूच त्याने पेटीचे झाकण थोडेसे उघडले, आणि आत हात घातला. थोडे कपड्याखाली चाचपल्यावर त्याचं हाताला सकाळची चपटी चष्म्याची पेटी लागली. त्याने ती बाहेर काढली. आवाज न होवू देता, मोठ्या पेटीचे झाकण बंद केले. आबांनी अंथरुणात चुळबुळ केली. झोप चाळवल्या सारखी. गंगाधरचे पाय लटपटू लागले. आबा जागे झाले तर? चोर समजून —-. गंगाधर तेथेच कोपऱ्यात श्वास रोखून उभा राहिला. पण काहीच झाले नाही. म्हातारा पुन्हा हलकेच घोरू लागला. गंगाधरने त्या चष्म्याच्या घरातून चष्मा काढला, आणि डोळ्यावर घातला. त्याच वेळेस मघाशीच ते कुत्र, जिवाच्या आकांताने रडू लागलं. गंगाधरला तो चष्मा थोडासा कोमट वाटला. त्यातून आजूबाजूची खोली स्पष्ट दिसत होती. हा, किंचित लालसर झाक मात्र होती. बहुदा काच त्या रंगाची असेल. पण घरातला अंधारा कोपरा पण, कसा काय इतका स्पष्ट दिसतोय? काही तरी खास गोष्ट यात असावी. पण हा चष्मा आपल्याला कसा दिसतोय? हे गंगाधरला पहायचे होते. त्याने आसपास नजर टाकली. आजोबांच्या खोलीत आरसा नव्हता. पुन्हा एकदा त्याने आसपास नजर फिरवली. या वेळेस त्याला अजून काहीतरी विचित्र भासले. त्याने पुन्हा पहिले. खोलीतली प्रत्यक गोष्ट ठळकपण दिसत होती. टेबल, त्यावरील फॅन, त्याच्या शेजारचा पाण्याचे भांडे-पेला, भिंतीवरचे कॅलेंडर,अगदी सगळं स्पष्ट दिसत होत. दिसत नव्हते ते फक्त आजोबा! पलंग, त्या वरील चादर, उशी दिसत होती, पण आजोबा दिसत नव्हते! त्याने चष्मा काढून पहिले, तर नेहमी प्रमाणे डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेले आजोबा दिसले. चष्मा घातला कि दिसेनात. का?
” धन्यवाद, आपण आपल्या डोळ्यांनी आम्हास पहाण्याची परवानगी दिलीत. आता आम्ही आमचे भक्ष्य स्वतः हस्तगत करू शकतो. दुसरे योग्य माध्यम आम्हास लाभत नाही, तोवर आम्ही तुमच्या सोबत आहोत.”

कोणीतरी आपल्या डोक्याच्या आत सांगत आहे असा भास, गंगाधराला झाला. कोण आपल्या डोक्यात बोलतंय? याचा काय अर्थ?
येव्हड्यात कोठे तरी खुडबुड झाली. घाबरून गंगाधराने आजोबाच्या खोलीबाहेर धूम ठोकली. आपल्या जागेवर येऊन पांघरणात गुडूप झोपल्यासारखा पडून राहिला. मग केव्हातरी त्याला झोप लागली.

सकाळी आजीच्या रडण्याने त्याला जाग आली. घरात सगळेच रडत होते. काहीतरी वाईट झाले होते. हळूहळू त्याच्या लक्षात आले. कालरात्री आजोबा मेले होते! चष्म्यातून त्यांना पहिल्याच काही संबंध असेल का? ते मरणार म्हणूनच ते चष्म्यातून दिसले नव्हते, असे काही असेल का? ‘आपले भक्ष्य स्वतः हस्तगत करू!’ असे आपल्या डोक्यात कोण बोलत होत? आणि ते ‘भक्ष्य’ म्हणजे आजोबाच होते? गंगाधराच्या मनात या प्रश्नांनी गोंधळ घातला होता. तो चष्मा गंगाधरने आपल्या पिशवीत ठेवून दिला.

गंगाधर मोठा होत गेला. त्या त्याच्या डोक्यातल्या वाक्याचा अर्थ, आणि संदर्भ त्याच्या मेंदूने उलगडून सांगितला होता. त्या चष्म्याच्या माध्यमातून ती अभद्रशक्ती देहातील आत्म्याचे हरण करते! हे त्यांना आलेल्या अजून एका प्रसंगाने सिद्ध केले होते! त्यावेळेस त्यांचा तरुण काका बळी गेला होता! तो चष्मा कितीही आणि  कोठेही फेकून दिला तरी.परत गंगाधराकडेच सापडत असे! ‘—–तोवर आम्ही तुमच्या सोबतच आहोत!’ याचाही प्रत्यय त्याने घेतला.

गंगाधरचा, गंगाधर पंत झाला. अजून वय वाढले तसे, त्यांच्या नावातले ‘गंगाधर’पण निखळून गेले. आता ते फक्त पंतच राहिले होते! तो चष्मा आजून त्यांच्याकडेच लपून होता. दोन जीव मारण्यात आपला, अगतिकपणे का होईना, सहभाग होताच. हि खंत त्यांचे काळीज कुरतडत आली होती! अगदी काल पर्यंत ती अशुभ वस्तू आपल्या जवळ होती, आज मात्र  नव्हती! जर, शशीने ती घेतली असेल तर?– तर, दोन शक्यता होत्या. एक, शशी त्या शक्ती साठी, ‘योग्य माध्यम’ निघाला तर, तो त्या चष्म्यातून ज्याच्याकडे पाहिलं, तो जगणार नव्हता! आणि दुसरी शक्यता म्हणजे तो चष्मा परत येणार होता!

०००

तीन पासून पंत दाराजवळ घुटमळत होते. दुपारच्या जेवणातही त्यांचे लक्ष्य लागले नव्हते. दुपारची वामकुक्षीची वेळ पण टळून गेली होती. साडेतीन झाले. शशी अजून आला नव्हता. शालनला विचारण्यात अर्थ नव्हता. ती जेवण करून तिच्या बेडरूम मध्ये लोळत पडली होती. चार झाले. शशीचा पत्ता नव्हता!

आता पंतांना धीर निघेना शशीने तो चष्मा घालून पहिला असेल का? त्यातून त्याने किती जणांना पहिले असेल? कितीजण त्याला दिसले असतील? आणि कितीजण दिसले नसतील!? अनर्थ होणार तर नाही ना? शेवटी पाचचे ठोके पडले. पंतांनी पायात सपाता घातल्या. दाराच्या लॅचची किल्ली घेतली, आणि त्यांनी दार उघडलं. घराबाहेर पाऊल टाकणार, इतक्यात शशी पाठीवर दप्तराचे ओझे सांभाळत आलाच. सहावीच्या पोराला, या शाळवाल्या लोकांनी पार हमाल करून टाकलाय. ज्ञानापेक्षा पुस्तकांचेच ओझे ज्यास्त!

“अरे शशी, इतका उशीर का लागला? शाळातर तिनलाच सुटतेना?”
“आजोबा, अहो आज ना आमची क्रिकेटची मॅच होती. म्हणून शाळा सुटल्यावर आम्ही ग्राऊंडवर गेलो होतो.”
“बर, तू तो —”
“बाबा! अहो काय लावलंय तुम्ही? त्या लेकराला घरात तर येऊ देत! घोटभर पाणी पिल्यावर, करा तुमच्या चांभार चौकश्या!”
हल्ली हि शालन जरा सैल बोलायला लागली आहे. नाही का? कमावता होतो तेव्हा, मजाल नव्हती बोलायची. म्हातारपण अजून काय काय दाखवणार कोणास ठाऊक?

शशी थोडा स्थिरावल्यावर, आणि आसपास शालन नाही असे बघून, त्यांनी शशीला हळूच विचारले.
“शशी, अरे, तो माझ्या पेटीतला चष्मा तू घेतलास का? म्हणजे, पहायला रे.”
“नाही! मला नाहीत तुमचा तो चष्मा!” शशीने पंतांची नजर टाळत, तुसडेपणे पंतांना उडवून लावले.
शशी खोटं बोलतोय हे त्यांच्या अनुभवी नजरेने ताडले.
“अरे, चुकून तुझ्या दप्तरात आलाय का बघ. नाहीतर ते दप्तर दे माझ्याकडे, मीच पहातो!”
शशीने आपले दप्तर घट्ट छातीशी आवळून धरले. शालन ताड्कन बेडरूमचे दार आपटून बाहेर आली.
“बाई, बाई, बाई! आता मात्र कहर झाला. म्हातारं माणूस म्हणून किती सांभाळून घ्यायचं कोणास ठाऊक? अहो, तो सांगतोय ना ‘नाही घेतलं.’ म्हणून! विश्वास नाही का त्याच्यावर? कशाला तो खोटे बोलेल? अन तुम्ही तर त्याची झडतीच घ्यायला निघालात कि!! गुन्हेगार सारखी! बाबा! आज निक्षून सांगते तुम्हाला, मला हे असलं वागणं मुळीच खपायच नाही! जमत असेल तर रहा, नाहीतर तुमची सोय कोठेही करून घ्या! चल रे शश्या, अभ्यासाला बस! नको या म्हाताऱ्याच्या नादी लागूस!” शशीला बळेच आपल्या बेडरूम मध्ये तिने ओढून नेले.
शेजारच्या मंदाकिनीने लगेचच कालिंदीला मोबाईलवर मेसेज टाकला.
‘शालनच अन तिच्या सासऱ्याचं घमासान झालाय! ग्रुपवर दे सोडून! हो, मी कनान ऐकलंय! १००% खरे!’

हताश, अपमानीत, मनावर खोल भळभळणारी जखम घेऊन पंत आपल्या खोलीत परतले. मनोमन श्री स्वामीसमर्थना हात जोडले.
‘देवा, समर्था, आयुष्यात कधी सन्मानाची अपेक्षा, नाही रे केली. पण अपमानाची नेहमीच भीती वाटत आली. आजवर कधी अपमानाची होण्याचा प्रसंग आला नव्हता. ती कमतरता आज भरून निघाली. आजवर तुला काही मागितलं नाही. आज मागतो! आज गुरुवार आहे, तुझ्याकडे येण्यासाठी पवित्र दिवस! आज मला ‘मरणाचे’ वरदान दे! निर्लज्य जगण्यापेक्षा, सन्मानाचे मरण दे!’
प्रार्थना झाल्यावर, त्यांनी डोळे मिटून हात जोडले. आणि पलंगावर पडून राहिले. जिव्हारी लागलेला घाव डोळ्यातून पाणी काढत राहिला.

००००

आईने दिलेल्या सामोशाचा फन्ना, उडवून शशीने फ्रीझमधली कोलाची बाटली तोंडाला लावली. साल, आईनं भलतंच झापलय आजोबाला. चालता है! मघाशी शाळेतून येताना, ऊन लागत होत, म्हणून आपण आजोबांचा तो गॉगल डोळ्यावर लावला होता. तर तो समोरचा लालशर्टवाला माणूस दिसलाच नाही! बाकी सगळे दिसत होते. तेव्हा, डोक्यात कोणी तरी, काहीतरी बोलत होत. त्या घाईत काय ते लक्षात नाही राहील. अन मागून येणाऱ्या ट्रकनं त्या लालशर्टवाल्याला उडवू दिल! टीव्हीत दाखवतात तसेच! काय हॉरिबल साईट होती.

शशीने अदमास घेतला. आई कोणा सोबत तरी मोबाईलवर बोलत होती. आजोबा बहुदा झोपले असावेत. चला, तो आजोबांचा गॉगल परत त्यांच्या पेटीत टाकून देऊ. उगाच आपल्यावर डाऊट नको. आईने घेतले सांभाळून. पण बाबाचा, आजोबा लाडका आहे. बाबा आपले दप्तर नक्की पाहिलं.
त्याने तो गॉगल आपल्या दप्तरातून काढला. पाय न वाजवता आजोबांच्या खोलीत गेला. आजोबा झोपले होते. एकदा, फक्त एकदाच घालून बघू गॉगल, पुन्हा तर ठेवूनच द्यायचा आहे. भारी दिसत यातून. थोडस लालसर, तरी एकदम क्लीयर! त्याने तो चष्मा डोळ्यावर लावला!
आजोबांची खोली लालरंगात नाहून निघाली होती. आजोबांचा पलंग, गादी उशी लालच दिसत होती. अन आजोबा? ते तर दिसतच नव्हते! त्याने झटक्यात चष्मा कपाळावर सरकवून पहिले. आजोबा शांत झोपले होते! पुन्हा चष्मा डोळ्यावर लावला तर, ते दिसेनात!

“धन्यवाद, आपण आपल्या डोळ्यांनी आम्हास पहाण्याची परवानगी दिलीत. आता आम्ही आमचे भक्ष्य स्वतः हस्तगत करू शकतो. आम्हास दुसरे योग्य माध्यम आम्हास लाभत नाही, तोवर आम्ही तुमच्या सोबत आहोत.” कोणी तरी अगदी स्पष्ट आवाजात सांगत होते! तेही शशीच्या डोक्यात! मघाशी घरी येताना हेच वाक्य असेच ऐकू आले होते! शशी बावचळला. त्याने हातातला चष्मा घाईने समोरच्या माळ्यावर फेकून दिला.

अचानक आजोबाना ढास लागली. ते खोकू लागले. त्यांचे डोळे पांढरेपडू लागले.
“आई, बघ आजोबाला काही तरी होतंय!”
शालन आजोबांच्या खोलीकडे धावली.

पण तिला उशीरच झाला होता!

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..