लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली. त्या पीओपीवर बसतील तेवढ्या आवडत्या कवींची नावे रेखाटली. हा अभिनव उपक्रम पैठण गेट परिसरातील बौद्धवाड्यातील कवी सुनील उबाळे यांनी राबविला आहे.
कवी सुनील उबाळे यांना लहानपणापासून कवितांसह साहित्य वाचनाची आवड आहे. एकांतात बसून कविताही तयार करीत. कुसुमाग्रजापासून ते बहिणाबाई चौधरी, नामेदव ढसाळ, सुरेश भट, मंगेश नारायण काळे, दासू वैद्य, इंद्रजित भालेराव, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, अभय दाणी, श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे, विरा राठोड, ललिता गादगे, प्रिया धारूरकर, क्षमा बर्डे अशा शेकडो कवींचे कवितासंग्रह वाचून काढले. आपल्या जगण्याला या कवितांना अर्थ दिला असल्यामुळे ते सतत डोळ्यासमोर असले पाहिजेत, असे सुनील उबाळे यांना वाटे. मात्र, रंग देण्याचा व्यवसाय. त्यावरच कुटुंबाची गुजराण होते. त्यात आपली आवडही जोपासायची. काटकसर करीत काही दिवस थांबून त्यांनी पत्र्याच्या घराला पीओपी केली. त्या पीओपीवर आवडत्या कवींची नावे रेखाटली आहेत. या अभिनव अशा उपक्रमाचे साहित्य क्षेत्रातून कौतुक होत आहे.
१३५ कवींच्या नावांना पुरली जागा
कवी सुनील उबाळे यांच्या आवडत्या कवींची यादी मोठी आहे. त्यांनी वाचलेल्या कवींची संख्या शेकडोत आहे. मात्र, त्यांच्या घराच्या हॉलच्या पीओपीवर एकूण १३५ कवींच्या नावालाच जागा पुरली आहे. त्यात अतिशय आवडत्या कवींची निवड केली आहे.
पुढच्या महिन्यात येणार काव्यसंग्रह
कवी सुनील उबाळे यांचा २००६ साली फक्त तुझ्यासाठी…’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. आता त्यांचा ‘उलट्या काडीचं घर हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.
Leave a Reply