नवीन लेखन...

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो.  त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिळणारा आनंद, ह्याची आमच्या मनावर  प्रचंड पकड घेतली गेली. ती इतके वर्षे झाली, तरी आजतागायत कायमच आहे.

वाल्मिकी रामायण हे मूळ समजले गेले. त्यानी सांगीतलेले कथासार हे अजरामर झाले. सर्वानी त्यांत रुची व्यक्त केली. कांही त्याला कवीची कथा रम्यता समजले. कांही म्हणतात तो इतिहास होता. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्याप्रमाणे सर्वांनी आपआपल्या समजानुसार  त्याला मान्यता दिली. मात्र मुळ कथेच्या गाभ्याला कुणीच धक्का पोहोंचविला नाही. निरनीराळे विचार व वर्णने निर्माण झाली. ती फक्त त्यातील व्यक्तीरेखा वर्णन करताना. त्यांच्या स्वभावांत त्याना जे दिसून आले ते सांगीतले गेले. घटना मात्र कायम ठेवल्या गेल्या.

हेच बघना. जर रामाला परमेश्वरी रुप दिले गेले तर त्यांच्यामध्ये सारे दिव्यत्वाचे, भव्यतेचे, उत्तमातील उत्तम गुणघर्म असणारच. शेवटी महानतेची सर्व पैलू वेगवेगळ्या दिशानी रामांत असणारच. व ती होतीही. त्याचमूळे श्री रामप्रभू हे सर्वांचे आदरणीय ठरले. त्यांना वनांत पाठवण्याचे दुष्कृत्य राणी कैकयीनेच केले, हे सर्वानी मान्य केले आहे. आणि त्याच क्षणी आरोप प्रत्यारोप, वाईटपणा, दुष्टतां, स्वार्थीपणा, हट्टीपणा, इत्यादी दुर्गुण कैकयीच्या माथी मारले गेले. कथानकाच्या ओघांत व प्रसंगाच्या गुंतागुतीमध्ये हे सारे योग्य वाटू लागले. प्रत्येकजण स्वतःच्या विचार टिपणीला समाधानाची चादर घालू बघत होता. कैकयीला तिच्या कृत्याबद्दल कोणती तरी, कांही तरी शिक्षा व्हावी ही सर्व सामान्याची मानसिकता. परंतु ती खूप जुन्या काळातील घटना. आज केवळ कैकयीला दुषणे देत, कांहीजण त्यांत समाधान बघतात.

रामाच्या काळांत व त्याच्या कथेत दिव्यत्वाला फार महत्व होते. रामाचा जन्म हाच मुळी दुष्टांचा संहार करण्यासाठी होता. रावण व त्याच्याप्रमाणे जे अनेक राक्षसी वा असूरी वृत्तीचे होते, त्याना नष्ट करणे गरजेचे होते. प्रजेला सामान्य जनाना सुख देणे हे महत्वाचे. जे रामाने केले.   रावण तसा रामाच्या खूप आधीचा राजा होता. त्याचे दशरथाबरोबर देखाल युद्ध झाले होते. त्यामुळे रावणाविषयी संपुर्ण ज्ञान राणी कैकयीला होतेच. तीच फक्त राजा दशरथाला त्याच्या राजकारणांत सक्षमतेने मदत करीत असे. युद्धभूमिवर देखील अनेक प्रसंगी तीने हाती शस्त्र घेऊन लढा दिल्याचा ऊल्लेख आहे. एकदा राजा दशरथाबरोबर एका प्रसंगांत अतुलनीय शौर्य व चतुरता कैकयीने दाखविली. युद्धांत जन्म मरणाचा – मान सन्मानाचा महान प्रसंग. योग्य आणि प्रासंगीक साहस  कैकयीने केले. दशरथाला यश मिळाले. राजाने खुश होऊन राणी कैकयीला दोन वरदान देऊं केले.

तीच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले गेले. शब्दांना जीवापेक्षा जास्त जपण्याचा तो काळ होता. “ज्यान जाये पर वचन न जाये”   म्हणतात ते यालाच. पण राणी फार चतूर होती. ते वरदान त्याच क्षणी घेण्याची ती वेळ अयोग्य होती. दुर दृष्टीने परीपूर्ण व जबरदस्त महत्वाकांक्षी कैकयी हीने नम्रतापूर्वक ती जणू दोन ब्रह्मास्त्रे भावी आयुष्य व योग्य प्रसंगाचा आराखडा घेत ठेवणीत ठेऊन दिली.

कैकयी ही राज कुमारी होती. एका राजाची मुलगी. नंतर राजा दशरथाबरोबर विवाहीत झाली. तीच्या रक्तांत- स्वभावांत राजकारण, चातूर्य, दुरदृष्टी, ही मुरलेली होती. निजी स्वार्थ, त्वरीत स्वार्थ, वैयक्तीक स्वार्थ असल्या क्षुद्र गोष्टींचा ती केव्हांच विचार करु शकणार नव्हती. आज पेक्षा उद्याचे भव्य दिव्य व टिकणारे सत्य बघण्याची, जाणण्याची तीची दूरदृष्टी क्षमता होती.

लंकेचा राजा रावण लंकेत दक्षिणेत होता. त्याच वेळी राम आयोध्येत उत्तरेत होते. इतक्या दुर अंतरावर रामाला पाठविणे ही फार मोठी कामगीरी होती. रामाच्या क्षमतेचा प्रश्नच नव्हता. सदा विजयी होणारी ती शक्ती होती. यश आणि विजय रामाच्या ललाटी विधात्यानेच कोरलेले होते. फक्त त्याला त्या कार्यांत जाण्यासाठी उद्युक्त करणे, चेतना देणे हे महत्वाचे होते. त्या काळी पायीं चालणे वा घोडा गाडी हीच संपर्काची साधने होती. त्यामुळे हजारो मैलांचा प्रवास करुन, दक्षिणेकडे जाऊन परत सर्वांनी येणे हे काम १२ ते १४ वर्षाचा काळ घेणारे असणारच. हा हिशोब आपण आजही करु शकतो. त्यामुळे राणी कैकयीने रामासाठी वनी जाण्याचा काळ जो सुचविला तो अत्यंत चतुरपणाने व तर्काला साजेल असाच वाटतो. रामाला वनांत अर्थात दक्षिणेकडे पाठविण्याचा हट्ट, हाच संपूर्ण कथानकातील प्रमुख गाभा वाटतो. बाकीच्या घटना ह्या फक्त प्रसंगाची जोड करणाऱ्या वाटतात. त्यांत कैकयीची इच्छा विशेष वाटत नाही.

कैकयीने रामाच्या राज्याभिषेकांचा अत्यंत महत्वाचा क्षण साधला. हा संपूर्ण रामायण जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तिच्या दुरदृष्टीने रामाने राज्यावर बसून राज्य कारभार संभाळणे हे ध्येय तीला न पटणारे होते. रावण व इतर दक्षिणेतील असूर यांचा पाडाव करणे ह्याने कैकयी पछाडली होती. हे सारे वाटेल ती किमत देऊन. वेळ पडल्यास जीव धोक्यात घालून वा नष्ट होऊन करण्यास ती प्रेरीत झाली होती. रामाला अशा राज्याभिषेकाच्या भव्य दिव्य आनंदी प्रसंगी रोकणे, सिंहासना पासून त्याला दुर सारणे आणि त्याला वनांत जाण्यास भाग पडणे, हे सारे केवळ कल्पनेच्या बाहेरचे होते. अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. राम सर्वांचा अत्यंत आवडता, प्रेमळ. कैकयीचा देखील आदरयुक्त प्रिय असा.

भरत जो कैकयीचा आपला मुलगा, तो देखील रामावर जीवापार प्रेम करीत असे. तो कदाचित् आईच्या रामास वनांत पाठविण्याच्या संकल्पनेस कडाडून विरोध करील. ऐकणार नाही. कांहीतरी विपरीत घडेल याचा तीला अंदाज होता. म्हणूनच तीने भरताला त्या महत्वाच्या समयी त्याच्या मामाकडे पाठवण्याची चाल खेळली. यांत ती त्या क्षणी तरी यशस्वी झाली. सर्व कौटूंबीक वातावरण जणू राममय झालेले होते. ह्यावर ब्रह्मास्त्र टाकून ते वातावरण उध्वस्त करावयाचे म्हणजे केवळ अशक्य होते.

कैकयीने रामप्रेमानी ओतप्रोत भरलेल्या ह्रदयावर, दगड ठेऊन अघात केला. राजा दशरथाला पूर्वी दिलेल्या वरदानाची आठवण देत कैकयीने पहीली मागणी केली.

” रामाला चौवदा वर्षे वनांत धाडा”    हा तीचा अट्टाहासी परंतु दुरदृष्टीचा जबरदस्त वार होता. दुसरी मागणी होती, जी की पहील्या मागणीसाठी पुरक होती. निर्माण होत असलेल्या प्रसंगाला मदत करणारी होती. राज सिंहासन हे रिकामे राहूच शकत नाही. त्याची अशा प्रसंगी तात्पूरती योजना करावी लागते. ती होती रामाच्या गैरहजेरीत भरताला त्या सिंहासनावर स्थानापन्न करण्याची. ही योजना व रचना तात्पुरती होती. कारण शास्त्र धर्माप्रमाणे असलेल्या राज्याचे कुळच ती राजगादी चालवावी असे असते. राजा व त्याचा प्रथम पुत्र, त्यानंतर त्याचाही पुत्र ही संकल्पना होती. हे राजमान्य व जनमान्यही होते. आयोध्येची गादी त्यामुळे दशरथानंतर रामासाठीच होती. व त्याच वंशावळीत जाणारी. प्रसंगोचीत कांही काळासाठी भरत जरी त्यावर आरुढ झाला, तरी त्यावर काळाचे बंधन असणारचय.  हे कैकयी जाणून होती. जरी हा फेरफार राजा दशरथाच्या इच्छेने,  आज्ञाने होत असला तरी ते शास्त्र संमत नव्हते. त्याला म्हणता येइल प्रासंगीक बदल. एका योजनेने बांधलेला.

घटना घडत गेल्या. इच्छीत अपेक्षीत आणि योजलेले वेगवेगळ्या मार्गानी होत गेले. कैकयीला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागले. परंतु ती अचल होती. धीर होती. सशक्त होती. गंभीर होती. प्रासंगीक भावनेने व निरनिराळ्या विचाराच्या दबावाने हदरुन जाणारी नव्हती. तीने सारे आरोप पचविले. सारा क्रोध सहन केला.

तीने प्रथम राजा दशरथाला सर्व दृष्टीकोणातून सत्य व परिस्थीतीची जाणीव करुन दिली. रावणाचे दुषकृत्य आणि जुलमी राजवट, सामान्य प्रजेला सहन करावा लागणारा अत्याच्यार ह्या गोष्टी दशरथाला संपूर्णपणे माहीत होत्या. त्याचा नायनाट करणे हे देखील दशरथ जाणून होता. आणि त्याच वेळी त्याला रामाच्या शक्तीची दिव्यत्वाची पूर्ण जाणीव होती. विश्वास होता. थोडीशीही शंका नव्हती. राणी कैकयीची योजना दुरदृष्टीकोण हे सारे तर्काला धरुनच असल्याची खात्री राजाला पटलेली होती. दिलेल्या शब्दाचा मान राखणे हे जरी असले, तरी तत्वतः दशरथाने कैकयीचे विचार त्या क्षणी मानले होते. अत्यंत कठीण असा निर्णय त्याला घ्यावा लागला.  ह्यावेळी मात्र घटनेची तिवृता भयंकर होती. दुर्दैवाने रामपुत्र प्रेमामुळे दशरथाला  रामवियोगाचे दुःख सहन झाले नाही. भावनेच्या चक्रांत तो अडकला. त्यांतच त्याचा अंत झाला.

पूर्वी असाच एक प्रसंग झाला होता. बालक राम-लक्ष्मण नुकतेच धनुर्विद्या शिकून गुरुकुलातून आयोध्येस परत आलेले होते. बाल वय त्यांच. खेळण्या उड्या मारण्याचे. त्याच वेळी अचानक  श्रेष्ठ महर्शी विश्वामित्र राजदरबारी आले. दशरथानी त्यांचे स्वागत केले. परंतु राजाला त्यांच्या एक धक्कादायक विनंतीची सोडवणूक करावी लागली.

” राजा तुझे दोन शुर वीर पराक्रमी पुत्र राम व लक्ष्मण यांना माझ्या नियोजीत यज्ञाच्या सुरक्षतेसाठी पाठव ”  राजा दशरथ हादरुन गेला. प्रथम राजाने सारे सैन्य यज्ञ रक्षणासाठी देण्याचे सुचवीले. परंतु  महर्शी विश्वामित्रानी ते अमान्य केले. कठोर अंतःकरणानी राम लक्ष्मणाला वनी पाठवले गेले.

रामराज्याभिषेकाच्या ऐन वेळी निर्माण केले गेलेले तुफान रामकथेला वा इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. माता राणी कैकयीची केवळ राजकीय दुरदृष्टी. अर्थात दुर्दैवाने त्याघटनेत राजा दशरथाचे प्राण गमावले गेले.

कैकयीच्या दुरदृष्टीचा इतिहास येथेच थांबला नाही. तीच्या चाणाक्य दृष्टीने रामायण कथासारमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोविला. राम रावण युद्ध संपले. रावण मारला गेला. रामाला विजय मिळाला. देवी सिता हीचा वनवास व बंधन संपले. रामाने तीला आणले. रावणाचा लहान बंधू बिभीषण ह्याला लंकेच्या राज सिंहासनावर बसविले. एक आनंदी व उल्हासीत विजय वातावरण निर्माण झाले होते. रामाने वीर हनुमानाला आज्ञा केली.

”  हनुमंता तू आत्ताच आयोध्येला जा. राजा भरत आणि माता कैकयी ह्याना येथील यशाचा सर्व वृतांत सांग. आम्ही वचना प्रमाणे १४ वर्षे पूर्ण केलेले आहेत. आमची तेथील सर्वांची भेट घेण्याची तीवृ ईच्छा झालेली आहे. त्यांची मान्यता घेऊन, तो निरोप मला सांग. त्यानंतरच आम्ही परतीच्या प्रवासाला निघूत ”

रामाची आज्ञा घेऊन, वीर हनुमानानी राम-सिता व लक्ष्मण याना अभिवादन करीत आकाशांत झेप घेतली.  हनुमान थोड्या वेळांतच तो आयोध्यानगरी पोंहोचला. तो भरत राज्याच्या दरबारी आला. त्याचे राजा व इतरांनी प्रचंड स्वागत केले. हनुमानानी आदराने भरताला सारी यशोगाथा सांगीतली. राम व देवी सिता हे येथे परत येण्याची आपली अनुमती मागत असल्याचे सांगीतले. भरताच्या डोळ्यांत राम प्रेमाने अश्रु आले होते. गळा दाटून आला होता. त्यानी त्वरीत सहमती व्यक्त केली. सर्वानी लवकर आयोध्येस यावे ही आशा व्यक्त केली. सभागृहामध्ये गंभीर शांतता पसरली होती. एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजमातेच्या दालनांत माता कैकयी देखील होती. ती अचानक पुढे आली. हनुमानाशी ती बोलू लागली. ” हे वीर हनुमंता, तुम्हा सर्वांच्या यशासाठी अभिनंद आणि आशिर्वाद देते. माझा एक मार्गदर्शक संदेश तू माझ्या रामाला पोहोंचता करशील कां ? ”

” राम सर्वांसह परत येत आहे त्यांच स्वागत. परंतु  माझी एक इच्छा आहे. रामाने परतीच्या प्रवासांत नागपावा   ह्या प्रदेशामधून यावे  ”    सर्व सभा स्तंभित झाली. राजा भरत तर फारच चकीत झाला. कारण कैकयीने सुचविलेला प्रस्ताव परतीच्या प्रवासाला हानीकारक होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर बरेच वाढणारे असून कित्तेक दिवस घेणारे होते. आणि  नागपावा ह्या प्रदेशांत राज्य होते ते कुलतुरा ह्या असूराचे. हा रावणाचाच नातेवाईक होता. तो शूर असून अहंकारी होता. ऋषीमुनी व सामान्य जनाचा छळ करीत असे. राम जर त्या प्रदेशातून जाण्याचा प्रयत्न करील, तर त्याला विरोध होईल. कदाचित् युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  निराशजनक वातावरण, परंतु माता कैकयीचा स्वतःचा हा प्रस्ताव. सर्वजन हातबल झाले.

” जशी माता कैकयीची आज्ञा ” म्हणत हनुमंताने तीला अभिवादन केले. तसेच इतर मातांना,  राजा भरताला आणि इतर राजदरबारातील व्यक्तीना अभिवादन केले. हनुमानाने सर्वांचा निरोप घेत आकाशांत छलांग मारली.

जसे अपेक्षिले तसेच घडले.

माता कैकयीचे आज्ञा रुपी मार्गदर्शन, रामाने आदरयुक्त मानले. राम व त्याच्या सैनाला नागपावा प्रदेशांतून जाण्यास राजा कुलतुरा याने प्रचंड विरोध केला.  शेवटी त्याची परिणीती युद्धांत झाली. त्यांत राजा कुलतुरा मारला गेला. रामाने त्याच्या गादीवर तेथीलच एका योग्य व चांगल्या व्यक्तीला राज्याभिषेक करुन स्थानापन्न केले. आनंदाचा जल्लोश करीत राम आपल्या सर्व साथीदार व सैन्यासह आयोध्येस परतला.

जीवनाच्या नैसर्गिक चक्रांमध्ये अनेक घटना घडत असतात. त्यांचे परिणाम अभ्यासले जातात. सर्वांचे संकलन बनत असते. चांगल्या वाईटावर भाष्य होते, आणि इतिहास बनत असतो. कित्येकदा सक्षम व्यक्ती घटनाना वेगळीच कलाटनी देतात. ही ऐतिहासीक मंडळी समजली जातात. ती एक वेगळाच इतिहास बनवितात. कैकयीने इतिहास घडविला. रामकथेतील अत्यंत प्रभावी पात्र म्हणून तीची गणना होते. कथानकाप्रमाणे ज्या कार्यपुर्तीसाठी राम आवतार झाला ते पूर्ण करुन घेण्याचे महत्वाचे श्रेय कैकयीकडेच जाते.

रावण व इतर असुरांचा नाश करणे, हे ध्येय तीने मनांत बाळगले होते. त्यांतही कैकयीने कल्पलता दाखवली. रावणानंतर त्याच्या सहकारी, नातेसंबंधी, असूर प्रवृतीचा आणि सर्वांत महत्वाचे शेवटचा व्यक्ती राजा कुलतुरा याचा नायनाट करण्याची योजना केली. तीला संपूर्ण जाणीव होती की तो हटवादी, अहंकारी आहे. कुणालाही त्याच्या प्रदेशामधून जाऊ देणार नाही. राज्यात हस्तक्षेप करु देणार नाही. त्याच वेळी कैकयीला संपूर्ण विश्वास होता की राम अत्यंत शक्तीशाली, पराक्रमी सक्षम योद्धा आहे. जो रावणासारख्या बलाढ्य राजाचा नाश करु शकतो, तो इतर कुणाही असूर प्रवृतीचा नाश करणार. हीच माता कैकयीची यशस्वी योजना. ज्यांत आहे चतुरपणा आणि दुरदृष्टीचे आवाहन. ज्यात मुरले आहे राजकारण.

सामान्य व्यक्तीजन कोणत्याही घटनेकडे भावनीक दृष्टीने प्रथम बघत असतो. तो प्रासंगिकता व समयआधारीत मत व्यक्त करतो. त्यावेळी विचारांची प्रगल्भता तेथे नसते. कैकयीने आपल्या मुलाला भरताला आयोध्येचे राजसिंहासन मिळण्यासाठी प्रयत्न करावा. परिस्थीती तशी निर्माण करावी, शब्दवचनांचा खेळ करावा, आणि त्या सर्वांमधून वैयक्तीक स्वार्थ साधावा हे घडले. बऱ्याच जणानी रामाच्या प्रेमापोटी कैकयीला खूप नांवे ठेवली. निरनीराळी अपशब्द भाषा वापरली. कैकयी ही स्वार्थी होती असे एकदम ठरवून टाकले. हे सारे वेळेनुसार होते हे सत्य. आशाही भावनांची कदर केली जाते. परंतु कालांतरानंतर घटनांची उकल होते. शेवटचे परिणाम हाती येऊ लागतात. इतिहास उलगडू लागतो. तो बनू लागतो. त्याच वेळी वेगळे सत्य समोर येते. अप्रतीम असे प्रसंग, घटनांची गुंतागुंत व सोडवणूक. प्रत्येक व्यक्तीची भव्य रेखा आनंदी करते. रामायण हे त्याचमुळे महाकाव्य वा भव्य इतिहास समजला जातो.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail-  bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..