नवीन लेखन...

चतुर्भुज गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक २०)

गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल.
कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो.
आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला.
अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे.
पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते.
इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं.
आपल्या आईला भेटायला परी गोमुला घरी घेऊन जाणार होती.
सुरूवातीला गोमुचा आत्मविश्वास नेहमीप्रमाणेच जबरदस्त होता.
पण त्या दिवशी आम्ही तिघे पुढे बोलतांना आपल्या आईबद्दल परीने सांगायला सुरूवात केल्यावर गोमुच्या मनांत पूर्वीचे प्रसंग येऊ लागले.
परीची आई आपल्याला पूर्वी कधी भेटलेली तर नसेल ?
▪
परी सांगत होती.
“वडिलांच्या मागे आईने मला वाढवण्यासाठी खूप कष्ट केले.
जवळचे काका, मामा कोणी मदत करायला पुढे आले नाहीत.
पूर्वी कधी तिने कुणाकडे जाऊन स्वैंपाक करायचा विचारही केला नसता.
पण त्या परिस्थतीत तिने तो विचार केला.
ती घरोघरी स्वैंपाकाची कामं करायला लागली.
ती स्वैपाक उत्तम करत असे.
तिला चार पैसे मिळू लागले.
तिने मला चांगले शिक्षण मिळावे म्हणून पांचगणीच्या मोठ्या शाळेंत माझे नांव घातले.
स्वत:ला कधी दोन साड्यांपेक्षा अधिक साडी नाही घेतली.
काटकसरीने संसार केला.
पण मला काही कमी पडू दिलं नाही.
तिथे येणाऱ्या इतर मुलींच्या बरोबरीने मला सगळं मिळावं, असा तिचा आग्रह असे.
मीही कधी तिची निराशा केली नाही.
परीक्षा उत्तम प्रकारे पास झाले.
माझ्या आयुष्यात त्यामुळे तिचं स्थान पहिलं आहे आणि ते पहिलंच रहाणार.”
▪
“तुझ्या आईंच नाव काय ?” मी सहजच विचारलं.
कष्ट करून मुलीला शिक्षण देणाऱ्या आईचे मला कौतुक वाटत होतं.
माझ्यातला पत्रकार ‘ह्यावर स्टोरी करतां येईल कां?’ हा विचार करत होता.
परी म्हणाली, “माझ्या आईच नांव राधा. सर्व तिला राधाबाई म्हणतात.”
मी आणि गोमु दोघेही जरा चमकलो.
मला ती बावाजीकडली राधाबाई आठवली.
तीही स्वैपाकाचीच कामं करत असे.
गोमुलाही बहुदा तिची आठवण झाली असावी.
तो जरा अस्वस्थ झालेला दिसला.
तो म्हणाला, “तुझी आई ग्रेट आहे. आपण तिला भेटायच्या आधी तिला माझ्याबद्दल सांगणार आहेस की आपल्या भेटीनंतर सांगणार आहेस ?”
परी म्हणाली, “राजा, तुला काळजी करायचं कांही कारण नाही.
माझ्या आईसाठी माझी इच्छा पुरवणं हे महत्त्वाचं असतं.
आजपर्यंत तिने कधीच मला कोणत्याही गोष्टीला नाही म्हटलेलं नाही.
आपल्या लग्नालाही ती सहज संमती देईल.”
▪
“सध्या तुम्ही कुठे रहातां ?
दोघीचं घरी असतां ?”
वृत्तपत्रांत काम करून मला मुलाखतीत काय वाटेल ते प्रश्न विचारायची संवय झाली होती.
ती म्हणाली, “तीही एक गंमतच आहे. सुरूवातीला आम्ही भाड्याच्या घरीच रहायचो.
नंतर माझी आई एकदा बागेंत बसलेली असतांना एक व्हिलचेअर घसरत घसरत येऊन तिच्यासमोरचं उलथली.
आईने पाहिलं तर त्यांत एक वृध्द गृहस्थ अडकलेले.
ती धांवली. तिने त्यांची व्हिलचेअर उचलून सरळ केली आणि त्यांना कसंबसं उचलून चेअरमध्ये बसवलं.
ते गृहस्थ म्हणाले तिथे त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेली.
त्यांना खरचटलं होतं तो भाग डेटाॅल लावून साफ केला आणि वर त्यांच्याकडलं सोफ्रामायसीन लावलं.
मग ती निघाली तर त्या वृध्द गृहस्थांनी तिला जाऊ दिलं नाही.”
एवढी स्टोरी सांगून परी थांबली.
एव्हांना गोमु आणि मी दोघांनी ओळखलं होतं की गोमु ज्या पारशी म्हाताऱ्याकडे कम्पॅनियन होता, त्याच्याकडे ज्या बाई राहिल्या होत्या त्याच त्या राधाबाई, परीच्या आई.
आम्ही दोघांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं.
▪
गोमुचा परीच्या आईला खूष करण्याचा उत्साह आता थोडा मावळला होता.
त्याला गोवाडीया बावाजी आठवला आणि त्याच्या बंगल्यावर शेवटी भेटलेल्या राधाबाईही आठवल्या.
त्या म्हाताऱ्याने आपल्याबद्दल काय काय त्या बाईला सांगितले असेल, ह्याचा विचार करून तो अस्वस्थ झाला.
मग त्याला वाटलं परीची आई अशी कशी एखाद्या माॅडर्न मुलीसारखी त्या गोवाडीयाबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये’ रहायला तयार झाली असेल?
गोष्ट सांगताना मध्येच थांबलेली परी पुढे सांगू लागली.
“पुढे मजाच झाली. त्यांच नाव होतं गोवाडीया. खूप श्रीमंत होते ते. मोठा बंगला होता.आई त्यांना बाबाजी म्हणत असे.
ते आईला म्हणाले, ‘तू आता इथेच रहा. माझी काळजी घे आणि माझ्या नोकरांवर देखरेख कर.’
आईला प्रश्न पडला.
सगळी कामं सोडून तिथे रहायचं आणि हा म्हातारा गृहस्थ गेला तर परत कामं शोधायची.
दुसऱ्या बाजूला तो सगळी कामं करण्याबद्दल मिळत होते त्याच्या चौपट पैसे देईन म्हणत होता.
पैशाची जरूरी तर होतीच.
कारण माझं काॅलेजचं शिक्षण तेव्हां व्हायचं होतं.
मुख्य म्हणजे आईला बाबाजींची दयाही वाटत होती.
आई विचार करत्येय असं पाहून ते म्हणाले, “हे बघ, आपण मिया बीबी म्हणून राहू.
आता तेच्यासाठी लगीन करायला नाय लागत. लिव्ह ईन रिलेशनमधी रहायचं.”
आई म्हणाली, “माझी एक मुलगी आहे, पांचगणीच्या शाळेंत.
तिला विचारावं लागेल मला.”
▪
मुलगी आहे कळतांच त्या बाबाजींनी ताबडतोब मलाच फोन केला आणि सगळी हकिकत सांगितली.
त्यांचे प्रपोजलही सांगितलं आणि फोन आईकडे दिला.
मी आईला म्हटलं, ‘आई, एवढी वर्षे माझ्यासाठी तू एकटीने काढलीस.
तुला बाबाजीं बरोबर रहावेसे खरंच वाटते कां ?’
आई म्हणाली, ‘मला त्यांची दया वाटते.
ह्या वयांत ते व्हील चेअरवर असतांना फक्त त्यांना वाटतय तर करावी मदत, असा विचार मी करत्येय.
बाकी ते लिव्ह इन वगैरेला कांही अर्थ नाही.’
मी आईला सांगितले, ‘आई, तू रहा तिथे.
तुलाही आधार होईल आणि दहा घरी फिरावं लागणार नाही.’
आई तिथे राहिली.
बाबाजी म्हणाले म्हणून त्याला लिव्ह इनचं स्वरूपही दिलं.
आईने त्यांची खूप मनापासून सेवा केली.
एक क्षणही त्यांना नजरेआड होऊ देत नसे.
त्यांना फिरवून आणत असे.
दोघं गप्पा मारत असत.
त्यांच्या औषधाच्या वेळा ती नीट सांभाळी.
त्यांची प्रकृतीही थोडी सुधारली.
मी मध्ये दोनदां सुट्टीत आले.
तेव्हां तर ‘मारी डीकरी, मारी डीकरी’ करून त्यांनी मला भंडावून सोडले.
मला खूप कपडे घ्यायला लावले.
पुस्तकं मागवून दिली.
आईही खुशीत होती.”
▪
“पण हेही सुख आईच्या नशीबी दोन वर्षेचं होते.
काहीं आजारांचं निमित्त झालं आणि बाबाजी अचानक गेले.
आईने मला बोलावून घेतले.
आई पुन्हां एकटी पडणार होती.
माझं शिक्षण पूर्ण व्हायला अजून एक वर्ष बाकी होतं.
मी आले तेव्हा आई त्याच घरांत होती.
पण आता ते घर सोडावे लागणार होते.
आठवडाभर राहून, आईची रहायची सोय लावून जायचं मी ठरवलं कारण पूर्वीची भाड्याची जागा आईने सोडली होती.
दोन दिवसांनी बाबाजींच्या घरी दोन वकील आले.
मला वाटलं, आता आम्हांला लागलीच घर खाली करावं लागणार.
पण त्यांनी आश्चर्याचा धक्काच दिला.
ते म्हणाले, ‘बाबाजींनी काही पैसे धर्मादाय संस्थाना दिलेत आणि आपली सगळी प्राॅपर्टी आणि उरलेले पैसे तुम्हां दोघींच्या नावावर केले आहेत.
सर्व तुमच्या नांवावर करण्यासाठी कांही फाॅर्मॅलीटीज पुऱ्या करायला लागतील.
त्या करण्यासाठी आम्हांला परवानगी द्या.’
आम्ही दोघी चकीत होऊन एकमेकींकडे पहात राहिलो.
पण ते स्वप्न नव्हते.”
▪
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परीने गोमुला आपल्या आईला भेटायला घरी बोलावले होते.
त्या दिवशी कसली तरी सुट्टी होती.
मी घरीच होतो.
गोमु सकाळी नऊलाच माझ्याकडे येऊन बसला होता.
तो खूप गंभीर होता.
काय बोलावे त्याला सुचत नव्हते.
शेवटी तो म्हणाला, “पक्या, मला वाटते मी तिथे जाण्यात अर्थ नाही.
राधाबाई मला नक्की ओळखतील आणि त्यांना वाटेल की मी पैशासाठीच परीशी मैत्री केली.”
मी म्हणालो, “शक्य आहे. पण परी सांगेल ना की तुला तिच्या संपत्तिबद्दल कांहीच माहिती नव्हती.
कशाला घाबरतोस ?”
गोमु विचार करत म्हणाला, “अरे, बावाजीने तिच्या आईला माझ्याबद्दल काय काय सांगितले असेल, कुणास ठाऊक ?
माझी बदनामी केली असेल.
तुला आठवतंय ना, त्या शकुशी बोलण्याच्या नादांत माझ्या हातून त्याची गाडी सुटली होती.
तेही सांगितलं असेल त्याने.
नो आय हॅव नो होप्स.”
मी म्हणालो, “तू मला एकच सांग.
तुझं आता परीवर खरंखुरं प्रेम आहे ना ?”
गोमु म्हणाला, “शंभर टक्के आहे.”
मी त्याला सांगितलं, “मग ठीक आहे.
तुमच्या दोघांच्या प्रेमाखातर तुला ही रिस्क घ्यावीच लागेल.
इथपर्यंत येऊन तू आता परीला दगा देऊ नकोस.
तिच्या आईने नाही म्हटलं तर काय करायचं ते तिला ठरवू दे.”
▪
दुपारी आम्ही दोघे त्याच्या हाॅटेलवर जाऊन जेवलो.
जेवतानाही गोमुचं जेवणात लक्ष नव्हतं.
तो मला म्हणाला, “पक्या, तू येशील माझ्याबरोबर ?”
त्याची ती अवस्था बघून मला महाभारत युध्दात ऐनवेळी गळफटलेल्या अर्जुनाची आठवण आली.
परंतु मी श्रीकृष्ण नव्हतो.
तरीही मीही श्रीकृष्णाप्रमाणेच त्याला सांगून टाकले की ही तुझी लढाई तुलाच लढायची आहे.
बाकी उपदेश कांहीं केला नाही.
जेवतांना परीचा फोन आला, “आम्ही दोघी वाट पहातोय. बरोबर पाच वाजतां ये.”
संध्याकाळी साडेचारला गोमुने माझ्याच खोलींत तयारी केली.
पहिल्यांदाच त्याला माझा शर्ट उसना घेण्याची जरूरी वाटली नाही.
मॅनेजर झाल्यामुळे त्याच्याकडे नव्या शर्टाबरोबर एक रेडीमेड कोटही होता, तोही त्याने घातला.
गोमु रूबाबदार दिसत होता.
गेले काही महिने दोन्ही हाॅटेल्सचे काम पहाता पहाता त्याचे शारिरीक वजनही घटले होते.
मी त्याला बाय, बाय करणार, एवढ्यांत गोमुचा फोन वाजला.
परीचाच होता.
परी म्हणाली, “तय्यार आहेस ना !”
गोमु म्हणाला, “होय.”
परी म्हणाली, “कुठे आहेस ? प्रकाशकडेच ना ! मग त्यांनाही बरोबर घेऊन ये.”
▪
मी कसा तरी गडबडीत तयार झालो आणि बरोबर पांच वाजतां आम्ही परीच्या घरी म्हणजे गोवाडीयाच्या बंगल्यावर पोहोंचलो.
तो बंगला गोमुच्या चांगल्या परिचयाचा होता.
शेवटचा तो इथे आला होता, तेव्हां राधाबाईंनी दार उघडले होतं.
ह्यावेळी बेल वाजवायची वेळच आली नाही.
परी आमची वाटच पहात होती.
ती पुढे आली आणि आम्हाला दिवाणखान्यांत घेऊन गेली.
तिथे तिच्या आई, राधाबाई अंगाभवती शाल लपेटून बसल्या होत्या.
एसीमुळे दिवाणखाना गार झाला होता.
राधाबाई म्हणाल्या, “या, बसा.”
आम्ही दोघे बसलो.
बसतांना गोमुने माझा हात दाबला.
मला गोमुचा हात आधीच गार झालेला वाटला.
परीने आमची आईला ओळख करून दिली.
गोमुकडे पाहून राधाबाई हंसल्या आणि म्हणाल्या, “ह्यांना ओळखते मी आधीपासून.
बाबाजींचे एकेकाळचे कंपॅनियन ना तुम्ही ?”
गोमुने हात जोडले आणि तो कांही पुटपुटला.
पण तिकडे लक्ष न देतां त्या म्हणाल्या, “बाबाजींनी तुम्हांला काढून टाकले पण नंतर माझ्यापाशी सारखे तुमच्याबद्दल बोलत.
‘गोमु पोऱ्या लै च्यांगला होता,’ असे म्हणत.
मी त्यांना इंग्रजी वाचून दाखवू शकत नसे.
तेव्हा तर ते हमखास तुमची आठवण काढत.
मी विचारलं देखील की ‘आपण त्यांना परत बोलवायचं कां ?’
तर ‘नाही’ म्हणाले.
पण त्यामुळे मी एकदा पाहूनही तुम्हाला विसरले नाही.
परीने मला गोमु, गोमाजी हे नांव सांगितले, तेव्हाच मी ओळखले की ते तुम्हीच असणार.”
परी म्हणाली, “आई, मला बोलली नाहीस ते.”
राधाबाई म्हणाल्या, “अंग वेडे, किलोभर पेढे मागवले आणि ‘त्यांच्या मित्रालाही बोलाव’, म्हटले, ते काय उगीच !”
गोमुने माझा हात इतक्या जोरात दाबला की मी ओरडणारच होतो पण आवरलं स्वत:ला.
▪
लौकरच सुमुहूर्तावर गोमु चतुर्भुज झाला.
दोन्ही हाॅटेलं भरभराटीला आलेली आहेत.
सध्यां तरी नव्या संसारात आपण डोकावायचं नाही असं मी ठरवलंय.
–– अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..