नवीन लेखन...

चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

कुशल बद्रिके… अर्थात आमचा कुश्या… त्याच्या चित्रपटाच्या पोस्टरसाठी त्याचे फोटोशूट करण्याचा योग आला आणि कुशल अजून वेगळय़ा पद्धतीने समजला…

एके दिवशी सकाळी मला विजू मानेचा फोन आला. ‘उद्या शूट करायचंय. तुझं काय आहे?’
मी म्हटलं, ‘मला जरा शहराबाहेर जायचंय. कामानिमित्त.’
विजू…आता काय करायचं?
मी…नेमकं काय आहे?
विजू…अरे एका सिनेमाच्या पोस्टरचं शूट आहे, ते तू करावं अशी माझी आणि ज्याचं शूट करायचंय त्याची इच्छा आहे.
मी…अरे कोणाचं पण?
विजू…कुश्याचं!
मी…कुश्याचं?

कुश्याचं नाव ऐकताच माझ्या डोक्यात चलबिचल झाली. ‘आपण करू, मी सांगतो थोडय़ा वेळात’, मी म्हटलं. विजू-कुश्याच्या प्रेमापोटी सगळे प्लॅन बदलून ते शूट करण्याचं मी निश्चित केलं. कुश्या म्हणजे कुशल बद्रिके!

दुसऱया दिवशी ठरल्याप्रमाणे विजू माने आणि अशोक नारकर यांच्या ‘स्टुडिओ १०८’मध्ये ‘लूज कंट्रोल’ या आगामी सिनेमाच्या पोस्टर शूटसाठी मी पोहोचलो. माझ्या आधी तिथे कुशल आला होता. शूटला थोडा वेळ असल्याने आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्याने माझ्याकडे फोटोग्राफी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. एक ताकदीचा विनोदी अभिनेता आणि आपला चाहतावर्ग निर्माण केलेला, प्रसिद्धीचं शिखर गाठलेला एक कलासक्त अभिनेता आपल्या आवडीसाठी एक कला शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. एवढंच नाही, तर शांतपणे ती कला समजून, शिकून घेतो. पुढे ती सतत शिकत राहण्याची इच्छा व्यक्त करतो, इथेच कुशल मला अधिक भावला.

शूट करण्याआधी टीममेंबर्सकडून सिनेमाबद्दलची माहिती मला मिळाली. त्यातून कुशलच्या भूमिकेचा अंदाज आला. नंतर कुशल मेकअप करायला बसला. आम्ही एकीकडे कॉश्च्यूमवर नजर टाकत होतो, तर दुसरीकडे पब्लिसिटी डिझाइन्स कशा प्रेझेंट होणार आहेत, याचा अंदाज घेत होतो. शूट सुरू झालं आणि काही तासांत २०-२२ पब्लिसिटी डिझाइन्ससाठी शूट केलं. मध्ये जेवणासाठी ब्रेक घेतला आणि ब्रेकनंतर राहिलेलं शूट संपवलं. या शूटदरम्यान कुशल मला सारखे फोटोग्राफीचे, लायटिंगचे प्रश्न विचारत होता. मी उत्तर देत होतो. पोस्टरचं शूट झाल्यानंतर आम्ही मस्तीच्या मूडमध्ये होतो. याच वेळी कुशलचे काही पोट्रेट मी टिपले. त्यानंतर माझ्या मनातला शूटचा विचार त्याला मी बोलून दाखवला आणि कुशलने क्षणाचाही विचार न करता त्याला संमती दर्शवली. कुशलचा लगेचच मूड बदलला आणि मला कॅमेराबद्ध करता आला तो कुशल वेगळाच होता!

शूटच्या वेळी आणि विशेष करून पोट्रेटस् टिपताना मॉडेलचा मूड खूप महत्त्वाचा असतो. कुशलला अनेक पेहरावात, विनोदी भूमिकेत अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा कुशल विचारी आहे त्यात कला अभ्यासायची, जोपासायची आणि ती सादर करण्याची ताकद आहे. कुशलचे हेच गुण दाखवण्याचा प्रयत्न फोटो टिपताना मी करत होतो. थोडासा गंभीर, विवेकी बुद्धीचा कुशल मला यावेळी टिपता आला. एका प्रकाश स्रोतातल्या (सिंगल लाईट) ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटोची मालिकाच मला यावेळी टिपता आली.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून कुशलने अवघं जग जिंकलं. ‘स्ट्रगलर साला’ या वेब सीरिजमधूनही तो तरुणांच्या मनात घर करून गेला. प्रत्येक एपिसोडला सात-आठ लाख व्युव्हर्स मिळाले. ‘चावट’ ही मराठीतली ट्रेंडिंग सीरिज ठरली. त्यातले काही एपिसोड शूट करायची संधी मला मिळाली. कुशल जे काम करतो त्यात झोकून देतो, पण त्याचबरोबर व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचं गणितही तो नीट जमवतो. कुशल त्याच्या मुलासोबत आणि पत्नीसोबत मनसोक्त भटकतो, मजा करतो. खूप कमी कलाकारांना वेळेचं हे गणित जुळवता येतं.

अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की!

— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com

1 Comment on चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..