नवीन लेखन...

‘चौरंग’चा न्याय!

अलीकडे वर्तमानपत्रवाल्यांनी ग्राहकांना वर्षभरासाठी सवलतीत पेपर घरपोहोच देण्याच्या योजना राबविल्या.. सहाजिकच मी देखील ‘लोकमत’ पेपर सुरु केला. मात्र गेले वर्षभर, रोजचा पेपर उघडूनही पहाण्याचेही धैर्य मला होत नाहीये..

कधी धीर एकवटून पेपर उघडला तर पानोपानी स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्याच वाचायला मिळतात. कोणत्याना कोणत्या प्रकारे स्त्रियांवरती समाजातील लांडग्यांनी अन्यायच केलेला दिसून येतो.. अशा बातम्या वाचून सर्वसामान्य माणसाला मानसिक आजार होऊ शकतात..

पूर्वी हुंड्यासाठी ‘छळाच्या बातम्या’ असायच्या. खेड्यात असं घडू शकतं हे कोणीही मान्य करेल.. त्यांना तारतम्य नसतं, ती मंडळी सुशिक्षित नसतात, रुढी परंपरांना नको तेवढं महत्त्व देतात, इत्यादी. मात्र शहरात असणारे सुशिक्षित, पदवीधर, डाॅक्टर, इंजिनियर देखील अशाच प्रकारचा स्त्रियांचा छळ करतात हे वाचून आश्चर्य वाटतं..

खेड्यातील अशा पीडित महिलांच्या विहीरीत, नदीमध्ये उडी घेऊन, घरातील पंख्याला फास घेऊन आत्महत्या केल्याच्या बातम्या येतात तर शहरातील महिलांना पद्धतशीरपणे संपवले जाते..

May be an anime-style image of textशहरातील ‘आयटी’ मध्ये नोकरी करणाऱ्या तरुणींना कॅबमधून ने-आण करणाऱ्या ड्रायव्हरनी बलात्कार करुन, जिवे मारुन टाकल्याच्या बातम्या अनेकदा वाचलेल्या आहेत. त्या नराधमांना पकडून वर्षानुवर्षे पोसले जाते. शेवटी पुराव्याअभावी, त्यांची निर्दोष मुक्तता केली जाते.

जंगलाजवळील खेड्यातील झोपडीत झोपलेल्या आईजवळील लहान मुलांना बिबट्याने उचलून नेल्याच्या बातम्या मी अनेकदा वाचलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात तशीच बातमी वाचनात आली, एका सहा वर्षांच्या मुलीला तिच्या आईच्या कुशीतून काढून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नरभक्षकाची बातमी आली आहे. त्याला अटक होईल, अनेक वर्षे तारखा पडत राहतील, ती पीडित मुलगी वयस्कर झाली तरीही तिला न्याय काही मिळणार नाही..

मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं होतं की, तुरुंगातून तीनशे कैद्यांना रजेवर सोडलं होतं, ते रजेची मुदत संपली तरी देखील तुरुंगात परतले नव्हते.. त्यातील कित्येक कैदी हे स्त्रियांवरती अत्याचार करणारे होते.. मुळात त्यांना पुन्हा समाजात सोडणं हेच चुकीचे आहे, कशावरुन ते पुन्हा तोच गुन्हा करणार नाहीत?

खेड्यातील स्त्रियांना एकटं गाठून धनदांडगे बळजबरी करतात व कुठे वाच्यता केली तर कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली जाते. पोलीसांकडे गेलं तर त्यांची फिर्यादही नोंदवून घेतली जात नाही. अशा बातम्यांचा पाठपुरावाही कोणी करीत नाही, शेवटी फाईल बंद केली जाते..

मध्यंतरी हैद्राबाद पोलीसांनी त्या बलात्कार करणाऱ्या तिघांनाही एन्काऊंटर करुन यमसदनी पाठवले, त्यावर उलटसुलट चर्चा खूप झाली.. मात्र त्यांनी केले ते योग्यच होते. असे प्रत्येक राज्यात होणे अत्यावश्यक आहे. मात्र अशा गुंडांना पाठीशी घालणारे, अनेक समाजद्रोही असल्यामुळे ते पुन्हा मोकाट सुटतात..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशी कृत्य करणाऱ्यांचा ‘चौरंग’ केला जात असे. म्हणजे कोपरापासून दोन्ही हात व गुडघ्यापासून दोन्ही पाय कलम केले जात असत. तो गुन्हेगार आयुष्यभर जमिनीवरुन चालताना चौरंगासारखा दिसत असे..

आता ही शिक्षा पुन्हा अंमलात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची आवश्यकता आहे.. आम्ही अभिमानाने म्हणतो, ‘राजे, आपण पुन्हा जन्माला या.. मात्र माझ्या घरात नाही, तर शेजारच्या घरात!’ कारण पुन्हा शिवबा घडविण्यासाठी जिजाऊने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले होते.. ते आम्ही पूर्णपणे विसरुन गेलेलो आहोत…

शिवबा जन्माला येईल न येईल, हे घडेल तेव्हा घडेल.. आज गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला एक विनंती आहे की, असे गुन्हे करणाऱ्यांचा तू समूळ नाश करुन टाक.. जे कायद्याने होऊ शकत नाही ते तू तुझ्या शस्त्र-अस्त्राने कर.. म्हणजे समस्त स्त्रीवर्गाला, मोकळा श्वास तरी घेता येईल..

आजच्याच ‘लोकमत’मधील ‘हॅलो पुणे’ मध्ये बातमी आलेली आहे..

‘सांस्कृतिक शहरात मुली असुरक्षित, ठिकठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे’ मुलगी घरी सुरक्षित येईल का? याची पालकांना चिंता.. गुन्हेगारीमध्ये झाली वाढ..

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१९-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..