नवीन लेखन...

चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते.

असाच एक रविवार. सकाळची वेळ. नात्यामधील एका काका-काकूंना सहज म्हणून  भेटावयास गेलो. कौटुंबिक भेट. दोघेही ज्येष्ठ नागरिक (मुले परदेशात हे वेगळे सांगावयास नकोच.) आमच्या अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. आसपासच्या लोकांची खबरही घेऊन झाली. थोड्याच वेळात (अपेक्षेप्रमाणे) चर्चेची गाडी अलगद आरोग्य या विषयावर आली. दोघांच्याही जाडजूड फायली समोर आल्या. मी काहीशा नाखुशीनेच ( काय करणार घरचा डॉक्टर) त्या चाळू लागलो.

आलाच आहेस तर या वयात आम्ही काय खावे, काय खाऊ नये ? ते सांग बरं? काकूच्या या प्रश्नाने ’फायलीत हरवलेला मी भानावर आलो आणि ’चवीने खा म्हणजे तब्येती उत्तम राहतील’ असा सांगता झोलो. ते दोघेही हसून म्हणाले, ’अरे, तुम्ही तर पथ्य म्हणून सर्व चविष्ट पदार्थच बंद करून टाकता. मग चवीने म खाणार तरी कसे ?

’अहो काका चव म्हणजे रस’ मी स्पष्टीकरणादाखल सांगितले. सदर स्पष्टीकरण पूर्णपणे पटल्याचा आव आणत ते म्हणाले, ’अच्छा अच्छा रस होय. मग ठीक आहे. आपला आहार तसा चौरसच असतो ना ग ?’ काकूने समाधानी मुद्रेने होकार दर्शविला. मी म्हटले, चौरस आहार ही संकल्पना तशी अलीकडची. आपल्याकडे षड्रस अत्र सांगितले आहे. षड्रसात्मक अन्नपदार्थाचा नियमित व योग्य प्रमाणातील उपयोग निश्चित आरोग्यदायी ठरतो.

’तो कसा काय ?’ काकू.

षड्रस तुम्हाला ठावूक असतीलच, मधुर (गोड), आम्ल (आंबट), लवण (खारट), तिक्त (कडू), कडू (तिखट), कषाय (तुरट). या चवींच्या भोवती आपला आहार विचार गुंफलेला आहे. वय, प्रकृती, (वात, पित्त व कफ), निवासस्थान / जन्मस्थान, व्याधी, ऋतू इत्यादी अनेक घटकांवर कोणत्या रसाच्या पदार्थाचे सेवन करावे, याबाबतचे सल्ले आम्ही वैद्य देत असतो. अगं, एवढेच नाही तर सकाळ, दुपार व संध्याकाळ यानुसारसुद्धा आहारतिथ्य करावे लागतात. ’मी.

’साखर, लिंबू, मीठ, कारलं, मिरची व सुपारी ही षड्रसांची सोपी उदाहरणे. पण इतर पदार्थांचे काय ? त्यांच्या चवी समजून घ्यायच्या तरी कशी ?’ काका.

मी. ’अगदी बरोबर काका. याचीही सोय आयुर्वेदाने करून ठेवली आहे. काही समान व व्यवहार्य परीक्षणांचा उपयोग करून आपण बऱ्याच पदार्थांच्या चवी जाणून घेऊ शकतो. जे पदार्थ खाल्ले असता तोंडात चिकटा धरल्यासारखे वाटते किंवा त्या पदार्थांना लवकर मुंग्या लागतात ते मधुर रसाचे समजावेत. ’

आंबट पदार्थाच्या स्मरणानेदेखील तोंडाला पाणी सुटते आणि खाल्ल्यावर भुवया, डोळे यांचा संकोच होतो व दात आंबतात.

अन्नामध्ये चव उत्पन्न करणे हे लवण रसाचे अत्यंत महत्त्वाचे काम. मिठाशिवाय जेवणाची कल्पनासुद्धा करवत नाही आपल्याला. मध्यंतरी टीव्हीवर चाट मसाल्याची जाहिरात बघितली. ’इसमें टेस्ट कहां है?’ असे विचारणारे लोक आणि चाट मसाला घातल्यावर तोच पदार्थ चवीने खाणारे लोक, अशी काहीशी जाहिरातीची मा आता या जाहिरातीवरून सहज लक्षात येईल की, चाट मसाला ह लवणधान असला पाहिजे.

पुढचा रस तिक्त म्हणजे कडू हा मुखशुद्धीसाठी उत्तम असल्याने दंतमंजनात याचा उपयोग केला जातो. कडू रस खाल्ल्यावर काही काळ इतर रसांचे ग्रहण होत नाही. उदा. आपण उन्हाळ्यात सुगंधी वाळ्याचे पाणी पितो. तो चावून खाल्ल्यास त्याचा कडू रस सह कळून येत नाही. त्यानंतर लगेच दुसरा पदार्थ खाऊन बघा. चद सहज कळते का ?

कटू म्हणजे तिखट. याविषयी वेगळं काही सांगणेच नको. तोंड भाजणे, नाक-डोळे यातून पाणी येणे हीच खरी या रसाची ओळख. जो पदार्थ खाल्ला असता जीभ जड होते, तो कषाय म्हणजेच तुरट रसात्मक. उदा. बरीचशी कडधान्य कषाय रसाची असतात. बघा प्रयोग करून.

अरे व्वा! एकदम practical परीक्षण आहेत ही. काका आनंदाने उद्गारले.

मी म्हटले, ’अहो, यापुढे जाऊन प्रत्येक रस शरीरात: काय काम करतो ? त्याचा अतिरेक झाला तर काय त्रास संभवतात ? हेदेखील विस्ताराने सांगितले आहे.’

मधुर रस हा बालक व वृद्ध या दोहोंसाठी उत्तम. वृद्धापकाळात होणारी शरीराची झीज कमी करतो. उतारवयात वात नैसर्गिकरित्या बलवान असतो. त्यावर काबू ठेवायचा तर मधुररस हवाच. त्याचे अति प्रमाणातील सेवन हे कफरोग, स्थूलता, प्रमेह या रोगांचे कारण बनू शकते. ’

’अरे, आम्ही पडलो मधुमेही. आम्हाला काय उपयोग या रसाचा ?’ काकू हताशपणे म्हणाली.

मी, ’अगं मधुर रस म्हणजे फक्त श्रीखंड, बासुंदी यांसारखी साखरमिश्रित पक्वान्ने का ? नियमित दूध व तूप यांचे सेवन म्हणजेसुद्धा मधुर रसाचा नित्य उपयोग होऊ शकतो. याशिवाय गहू, जुना तांदूळ, नाचणी-तांदूळ यांची भाकरी, बऱ्याचशा फळ व कंद यादेखील मधुर रसाच्याच. असे पदार्थ या वयात नियमित आहारात हवेत. ’

’अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकासेवर रामबाण आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अतिसेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. ’

’अच्छा म्हणून तुम्ही संधिवातात आंबट कमी खा, असे सांगता काय,’ काकूने स्वतःची समजूत काढून घेतली आणि मी पुढच्या रसाकडे वळलो.

लवण रसात्मक पदार्थ हे अत्यंत उष्ण व तीक्ष्ण असतात. सर्व क्षार म्हणजे मीठ खाण्याचा सोडा, पापड, खार इत्यादी याच वर्गात मोडतात. लोणचं हे आंबट लागते खरे, पण त्यातील खार हा लवणप्रधान असल्याने ज्येष्ठांनी त्याचा वापर मर्यादित ठेवणेच इष्ट. याच्या अतिसेवनाने अकाली केस पिकणे-गळणे व त्वचेवर सुरकुत्या पडणे, तसेच शारीरिक शक्ती कमी होणे असे विकार होतात.

खरं म्हणजे अम्ल व लवण या रसांच्या स्वयंपाकातील वापराला आपण चवीपुरते असे सूचक विशेषण लावत असतो. परंतु आजकालची ’र्गीपज्ञ ऋेेवी’ बघितली तर हेच प्रधान आहेत की ’काय ? असा प्रश्न पडावा. ’

’बाप रे! तरुण पिढीसाठी हे फारच घातक आहे म्हणायचे, ’काकांनी भीती व्यक्त केली. आणि स्वत: ’र्गीपज्ञ ऋेवी’ च्या आहारी न गेल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

मी पुन्हा विषयाला सुरुवात करत म्हटले, ’आता कडू रसाविषयी बघू.

कडू रस शरीरात हलकेपणा उत्पन्न करतो. कृमीरोग, त्वचारोग, मेदोरोग, ज्वर इत्यादी रोगांवर अत्यंत गुणकारी असा हा रस आहे. झीज करणे हा याचा महत्त्वाचा गुणधर्म. त्यामळे या रसाच्या बाबतीत वृद्धांनी हात आखडताच घेतलेला बरा.’

’अरे आम्ही, मधुमेही असल्यामुळे कारलं आणि कडुनिंबाच्या पानांचा रस नियमित घेतो. ते पण वाईट का ? ’महिन्याभरापूर्वीच चालू केलाय’ काकांनीही पुस्ती जोडली.

मी म्हटलं, ’मधुमेह असला तरी कडू रस काही आपला गुणधर्म सोडणार नाही. नियमित न घेता आठवड्यातून दोन दिवसच घ्या, अन्यथा ’Side Effects’ होतील. ’

’आयुर्वेदाला ’Side Effects’काकांनी आश्चर्याने विचारले. मी म्हटले, ’आजकाल कोणीही आयुर्वेदीय (?) सल्ले देतो.. आयुर्वेद हेदेखील एक शास्त्र आहे. ’

सर्वांना समजेल अशा भाषेत लिहिले गेले आहे इतकेच. वैद्य तुमची प्रकृती, ऋतू, पचनशक्ती इत्यादी मुद्दे विचारात घेऊन सल्ले देत असतो. त्यामुळे घरगुती अशा सदरात मोडणारी औषधेदेखील वैद्यकीय सल्ल्याने घेणे योग्य. जेणेकरून तुम्हाला त्या औषधांचा लाभ होईल.

’असो.’

’आता पुढचा रस कटू म्हणजे तिखट. हा रस प्रमाणात खाल्ल्यास सूज, घशाचे रोग, अपचन, कफविकार यांवर गुणकारी आहे. मेद जाळण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या अतियोगाने मात्र बलाक्शय, कंबर पाठदुखी असे विकार उद्भवतात.

तिखट रसावरून एक गंमत आठवली. एकदा देशावरील रुग्ण आला होता. आजारही खास देशावरचा. मूळव्याध. त्याचे बोलणेही त्यांच्या स्वयंपाकाप्रमाणेच जहाल तिखट-मीठ-मसाला याचा वापर जास्त प्रमाणात करता का ?’ असे विचारल्यावर, तिखट खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार ? असा तिखट प्रतिप्रश्न केला. मग त्याला हेच ’रसपुराण ऐकवून दूध, तूप इ. पदार्थांचे महत्त्व पटविले. तेव्हा कुठे ते माधुर्य त्याच्या ठायी येऊन, ’बरं ठीक आहे.’ असे म्हणाला.

’आता शेवटचा रस कषाय. याचे महत्वाचे कार्य स्तम्भन म्हणजे शरीरातील बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांना थांबविणे. ’

काकू, जुलाब होत असतील तर तू कोणता उपाय करशील ?’

जायफळ घालून कॉफी देईन.’ काकू त्वरित उतरली.

’बरोबर’ माझ्याकडूनही दाद गेली. ’जायफळ आणि कॉफी दोन्ही कषाय रसाचेच. रक्तस्त्राव होताना केला जाणारा उपयोग अति मूत्रप्रवृत्ती होत असताना केला जाणारा जांभळाचा वापर ही उदाहरणेही कषाय रसाच्या रसम्मन कार्याचीच. याच्या अतिसेवनामुळे शरीरातील मार्गाचा संकोच होऊन हृदयरोग, मलावष्टंभ इत्यादी रोग होऊ शकतात. ’

’शोधन हे आणि एक कषाय रसाचे कार्य. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी ताम्बुल सेवन करणे हे याचेच उदाहरण, कषाय रसाच्या या कार्यामुळे त्वचा स्वच्छ टवटवीत ठेवली जाते व त्वचेचे आरोग्य राखले जाते. साबणाऐवजी मसुराच्या डाळीच्या पीठाने आंघोळ करून बघा. म्हणजे सहज लक्षात येईल. ’ ’कषाय रस जखम भरून आणण्यासदेखील मदत करतो. म्हणून आम्ही जखमेवर मध लावावयास सांगतो.’

मधाचे उदाहरण ऐकल्यावर दोघांच्याही भुवया उंचावल्याचे माझ्या लक्षात येते ना येते तोच ’मध गोड आहे ना ?’ असा प्रश्न आलाच. मी म्हटलं, ’प्रत्येक पदार्थात एकच रस असला पाहिजे, असा काही संकेत आहे का, प्रथम जाणवतो तो प्रधान रस व नंतर कळतो तो अनुरस. तसेच काहीसे मधाचे. प्रधान रस मधू तर अनुरस कषाय.

काहीवेळा रस अव्यक्तदेखील असू शकतात. उदा. लसूण व आवळा यामध्ये पाच रस असतात, पण सगळे काही जाणवत नाहीत.’

’अरे व्वा! फारच छान माहिती दिलीस.’ काका म्हणाले आणि दोघेही मला जेवून जायला आग्रह करू लागले. मीही फारसे आढेवेढे न घेता होकार दिला. त्यांना फार आनंद झाला. काकू स्वयंपाकघरात गेल्यावर काका पुन्हा विषयाला सुरुवात करत म्हणाले, ’अरे तुम्ही तर कायम त्रिदोष, उष्ण, थंड, पचायला जड हलके या भाषेत बोलत असता. मग रसांच्या बाबतीत असे काही असते का ? मी म्हणालो, ’हो सांगतो.’

’मधुर रस हा पचायला जड, कफ वाढविणारा व थंड आहे.’ अम्ल रस पचायला हलका, पित्त-कफ वाढवणारा व उष्ण आहे.’

’लवण रस उष्ण, पचायला जड व पित्त-कफ वाढविणारा आहे.’

’तिक्त रस कफ-पित्त वाढविणारा, पचनास हलका व थंड आहे.’

’कटू रस उष्ण, पचण्यास हलका आणि वात-पित्त वाढविणारा आहे.’ ’कषाय रस थंड, वात वाढविणारा व पचायला जड आहे.’

’हे एकदम सुटसुटीत झालं बघ. पण याला काही अपवाद असतीलच ना ?’ काका.

मी म्हणालो, ’हो आहेतच की, उदा. जुने तांदूळ, गहू हे पदार्थ 1 मधुर असूनही कफ वाढवत नाहीत, आवळा व डाळिंब अम्ल असूनही पित्त वाढवत नाहीत इत्यादी. ’

तेवढ्यात काकूने जेवणाची वर्दी दिली म्हणून आम्ही जेवावयास गेलो. काकूने सजविलेले ताट बघून मी म्हणालो, ’अगं हा बघ षड्रस विचार. जेवणाचे प्रमुख पदार्थ पोळी, भात हे मधुर म्हणून जास्त प्रमाणात, मीठ मध्यभागीच म्हणजे ना कमी ना जास्त. विविध रसांच्या भाज्यांचे प्रकार हे त्या मानाने उजवे; पण लोणचं, चटणी, दही, लिंबू असे चटपटीत पदार्थ मात्र डावीकडे. आणि जेवणानंतर पचनासाठी तिक्तकटू-कषाय रसात्मक विडा. आहे की नाही शास्त्र आणि व्यवहार यांची सुरेख सांगड. ’

काकू म्हणाली, ’खरं आहे रे बाबा! चवीने खाणार त्यालाच आरोग्य लाभणार.

-वैद्य माधव भागवत

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..