स्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख…
केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. अनेक मराठी सिनेमे, मालिका यातील अभिनयातून तिने रसिकमन जिंकलं…
रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे. लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता स्मिताची दमछाक झाल्याचं ती सांगत असतानाच हा ब्रेक अवघ्या अडीज ते तीन वर्षांत संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकदीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. ‘कनिका’ या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोटय़ा मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले.
स्मिताने इंडस्ट्रीत ब्रेक घेण्यापूर्वी म्हणजेच २०१४ साली तिचे फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. शूट नेमकं काय असेल, त्याचा लूक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूटची तारीख नक्की करण्यात आली. स्मिताचा सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा, त्यातील रंगसंगती, दागिने, मेकअप, हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं होतं. स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधित संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता. शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा, कलाकुसरीने सजलेले दागिने, त्यावरचा मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता. स्मिताच हे लोभस रुपडं मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं.
वृत्तपत्रासाठी हवे असलेल्या फोटोंचा साचा ठरलेला होता त्यानुसार सुरुवातीला वृत्तपत्राची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच मराठमोळ्या पेहरावात फुल लेन्थ, मिड लेन्थ, हेडशॉटस असे काही फोटो घेतले. फ्लॅट लायटिंग करून फोटो टिपल्यानंतर स्मिताच्या चेहऱयाचे वेगळ्या लायटिंगमध्ये काही फोटो मला टिपता आले. यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो टिपण्याचा मोह मला आवारात आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पोट्रेट्समध्ये स्मिता अधिक खुललेली दिसली. शूट सुरू होऊन साधारणपणे तीन तास झाले असावेत. स्मिताचे पारंपरिक वेषभूषेतले फोटो टिपल्यानंतर तिचे मॉडर्न लूकमधले फोटो टिपण्यासंबंधित तिच्याशी मी बोललो. स्मिताला संकल्पना आवडली आणि आम्ही लगेच छोटा ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीला लागलो.
माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरशी बोलून आम्ही लगेचच तिच्यासाठीचा नवा मॉडर्न लूक ठरवला. लाल रंगावर काळ्या रंगाची डिझाईन असलेला वनपीस स्मितासाठी यावेळी आम्ही निवडला. आधीच्या पारंपरिक वेशभूषेला संपूर्णपणे तडा देणारा हा तिचा लूक होता. यासाठी तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं काही नव्याने करायला साधारणपणे दीड तास गेला. स्मिता या मॉर्डन लूकमध्येही अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या बोलक्या चेहऱयाने हा लूकदेखील तितकाच खुलवून आणला होता.
स्मिता शूटच्यावेळी मदतशीर होती. तिला सांगितलेले पोजेस ती देत होतीच शिवाय त्यात वेगळेपणा कसा आणता येईल यासाठीही तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला तिचे काही रंगीत फोटो टिपल्यानंतर लायटिंग बदलून ड्रमॅटिक म्हणजे प्रकाश आणि सावलीचा खेळ करून केलेल्या लायटिंगमध्ये तिचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो मी टिपले. यापूर्वीच्या शूटच्यावेळी स्मिताच्या पेहरावाला अनुसरून तिचा शृंगार केला होता. कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली, गळ्यात भव्य हार, दागिने, नाकात नथ असा सारा शृंगार असलेल्या स्मिताचा चेहरा मी आधी टिपला होता. यानंतरच्या मॉर्डन लूकमध्ये मात्र तिने काहीच शृंगार केला नव्हता. तरीहीदेखील तिचा हा चेहरा आधीच्या चेहऱयाएवढा किंबहुना त्याहून अधिक खुललेला दिसत होता, हे विशेष. तिच्या ही चेहऱयाची जादू यावेळी मला अनुभवता आली.
स्मिताचं शूट सुरू करण्यापूर्वी मेकअपच्यावेळी स्मिताशी मनमुराद गप्पा झाल्या. केदार शिंदेचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा म्हणजे तिच्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच ठरल्याचं ती सांगते. मोजके सिनेमे ठरवून करणाऱया कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख करून देता येईल. कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास, त्यातील बारकावे लक्षात घेऊन मगच ती सिनेमे निवडते आणि एकदा का सिनेमा निवडला की मेहनत घ्यायची तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होते.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply