वसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले.
वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे राहिल्यामुळे वसुधाचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध कधी आलाच नाही..
बाहेरची सगळी कामं वसंतरावच बघायचे. कामावर जाताना किंवा येताना बॅंकेची, लाईट बिलाची, महापालिकेच्या कराची कामं ते करुन येत असत. महिन्याचा किराणा, भाजी मंडई अशी घरची जबाबदारी ते स्वतःच पार पाडत..
निवृत्तीनंतर काही वर्षांनी एकदा ते आजारी पडले. त्यावेळी वसुधाची फार धावपळ झाली. शेजारच्या काकूंनी त्यांना मदत केल्यामुळे, वसंतरावांच्या आजारपणातून त्या सुखरुप बाहेर पडल्या..
वसंतरावांनी आजारपणात होणारी पत्नीची ओढाताण पाहिली आणि त्यांना पुढे काय होणार, याची अहोरात्र चिंता वाटू लागली.. दोघांनीही सत्तरी पार केल्याने दोघांपैकी कोणीही आजारी पडलं तर दुसऱ्याला धावाधाव ही करावी लागणारच होती..
एका रात्री वसंतरावांना झोपच येईना.. त्यांच्या मनात सारखा एकच विचार वारंवार येत राहिला… आपल्यानंतर ‘हीचं’ कसं होणार? ते रात्रभर तळमळत राहिले.. पहाटे त्यांना त्यावर उपाय सुचला आणि तो अंमलात आणण्याचा विचार करता करता, त्यांना गाढ झोप लागली..
सकाळी उठल्यावर त्यांनी स्वतःचं आवरुन घेतलं व पत्नीलाही तयार व्हायला सांगितलं. दहा वाजता दोघेही बाहेर पडले. वसंतराव, वसुधाला बॅंकेत घेऊन गेले. तिथे तिला पुढे करुन, दोघांच्या नावाचे पासबुक भरुन घेतले. तेथील काऊंटरवरील कर्मचाऱ्यांशी, त्यांनी पत्नीची ओळख करुन दिली. बॅंकेला लागूनच एटीएम होतं. तिथं तिला घेऊन गेले. तिलाच डेबिट कार्ड मशीनमध्ये घालून, लग्नाच्या तारखेचा पिन नंबर दाबायला सांगितला… मशीनमधून पैसे कसे काढायचे ते शिकविले…
वसुधाला आता, वसंतरावांच्या अनुपस्थितही एटीएममधून पैसे काढण्याचा आत्मविश्वास वाटू लागला.. वसंतरावांनी गॅस कसा बुक करायचा, ते देखील वसुधाला शिकवलं..
दुसरे दिवशी वसंतराव, पत्नीला घेऊन लाईट बिल भरायला गेले. तिथं रांगेत उभं राहून तिच्या हस्ते बिल भरलं व पावती घेतली.
एकदा त्यांनी पत्नीला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे करभरणा कसा केला जातो, ते दाखवले. विमा कंपनीचं ऑफिस दाखवलं. येताना दोघेही मंडईतून भाजीपाला घेऊन आले.
वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले..
वसंतरावांना सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो.. नंतर ते फिरायला बाहेर पडतात.. आल्यावर त्यांच्या आंघोळीची सोय करायची.. टाॅवेल काढून, तो हातात द्यायचा.. कपडे काढून द्यायचे.. मग नाष्टा..
मग एकदा वसुधा, खोटं खोटं आजारी पडल्या.. वसंतरावांनाच त्यांनी चहा करायला सांगितला.. किचनमध्ये शोधाशोध करुन त्यांनी केलेल्या ‘फिक्या चहा’चे, वसुधानं तोंडभरून कौतुक केले..
मग त्यांच्याकडून कांदेपोहे करवून घेतले.. त्यात जरा हळद जास्तच पडली होती, तरीही त्या पोह्यांना ‘लाजवाब’ म्हणून वसुधानं अभिप्राय दिला.. दुपारी मुगाची खिचडी कशी करायची ते सांगितले.. हळूहळू वसंतराव स्वयंपाक करण्यात तरबेज झाले.. वसुधाला, वसंतरावांनी कमी कालावधीत, स्वावलंबी झाल्याचं मनोमन कौतुक वाटू लागलं.. त्यांची, माझ्यानंतर ‘ह्यां’चं कसं होणार? ही चिंता आता मिटली होती.. वसंतरावांना देखील, माझ्या वसुधाला आता सर्व व्यवहार एकटीने करता येतात, हे जाणवल्यावर शांत झोप लागू लागली..
आता ते दोघेही निर्धास्त होते, त्या येणाऱ्या ‘क्षणा’साठी!.. जो दोघांपैकी, एकाला आधी घेऊन जाणार होता.. आणि दुसरा राहिलेले दिवस, स्वावलंबी होऊन जगणार होता..
कारण.. आपलं सहजीवन, हे आकाशात उडवलेल्या नाण्यासारखं आहे… ते नाणं कधीना कधी जमिनीवर पडणारच आहे… प्रश्र्न फक्त एकच राहतो.. छापा की काटा?
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४.
५-१२-२१.
Leave a Reply