नवीन लेखन...

छत्रपती संभाजी महाराज

संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

लहानपण
संभाजीराजांचा जन्म मे १४,इ.स. १६५७ रोजीकिल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतरपुण्याजवळीलकापूरहोळ गावचीधाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजीजिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांनाआग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्रयाच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांनामोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरीमथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

तरूणपण व राजकारण्यांशी मतभेद
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठीरायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून टाकले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर व्यस्त होते.१६७० मध्ये सोयराबाईंचा राजाराम हा पुत्र जन्मल्यावर त्या संभाजीराजांचा द्वेष करू लागल्या. भविष्यात संभाजीराजे गादीवर बसले तर राजारामला त्यांचा चाकर म्हणून रहावे लागेल आणि त्याला कधीच सत्ता मिळणार नाही असे सोयराबाईंना वाटले.

सळसळत्या रक्ताच्या तरूण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तो यांची कन्या हंसाबाईने संभाजीराजांवरील एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली. तसेच संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले.पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठिण होते.एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, ‘आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले‘ असे उदगार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील अनुभवी मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण भारतातील मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील श्रुंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.अफझलखान,शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरूष शिवाजी महाराज घरातील भाऊबंदकीपुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण भारतातील मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

श्रुंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहिर करतील.

मोगल सरदार
या सगळया घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरीत झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकुम पन्हाळयाचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबतहंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थयानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अशा बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानीकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूध्द सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.

छत्रपती
जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तीशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूध्द औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यापैकी कोणीही त्यांच्याविरूध्द उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेत्रुत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रुंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

दगाफटका
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लाऊ शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

शारीरीक छळ व मृत्यू
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागारकवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून धिंड काढायचा आदेश दिला. त्यांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास आणि धर्मांतर करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

मार्च ११,१६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल धर्मवीर ही सार्थ उपाधी दिली.

— मराठीसृष्टी टीम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..