अंदाजे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी मुंबादेवीचं देऊळ आताच्या बोरीबंदर स्थानकाच्या जागी होतं. या देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंबई पडलं. तेराव्या शतकात कुताबडीन नावाच्या मुस्लीम सरदारानं हे मंदिर उद्ध्वस्त केलं. पुढे चौदाव्या शतकात या मंदिराची पुनःस्थापना झाली. १७६० मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा या मंदिराची तोडफोड केली. त्यानंतर ते काळाआड झालं, पण तरीही पुढच्या काळातही ही जागा एक पवित्र स्थान बनलेलीच राहिली.
हळूहळू इथल्या बोरीच्या झाडांच्या जंगलात मूल्यवान वस्तू आणि महत्त्वाचे सरकारी कागद ठेवण्याचं कोठार बनलं. या वस्तूंनाही ‘बोरी’ म्हणत. त्या मुंबई बंदरातून इंग्लंडला रवाना होत. त्यावरून या जागेला ‘बोरीबंदर’ असं नाव प्रचलित झालं. अशा या पवित्र जागेवर १६० वर्षांपूर्वी भारतातलं पहिलं रेल्वेस्टेशन बांधलं गेलं. १६ एप्रिल १८५३ हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णदिन होता. त्या दिवशी पहिली रेलगाडी या स्टेशनमधून ठाण्याकडे निघाली होती. त्या वेळचं स्टेशन अतिशय छोटं, कौलारू, बैठ्या इमारतीत होतं. भारतात रेल्वे इतक्या झपाट्याने पसरेल असं ब्रिटिशांना कधी वाटलंच नव्हतं, पण मुंबई हे भारतामध्ये रेल्वे प्रसार होण्यात महत्त्वाचं केंद्र होणार हे जाणून १८७८ साली या जागी भव्य स्टेशनची वास्तू उभारण्याची योजना आखली गेली. व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधत नव्या स्टेशनच्या बांधणीला सुरुवात झाली आणि १८८८ च्या मे महिन्यात स्टेशन पूर्णपणे कार्यरत झालं. राणीच्या नावावरून व्हिक्टोरिया टर्मिनस (V.T.) असं स्थानकाचं नामकरण करण्यात आलं.
फ्रेडरिक स्टीव्हन हे या भव्य वास्तूचे शिल्पकार होते. त्यांनी इटालियन गॉथिक पद्धत व मोगल शिल्पकला यांचा सुरेख मिलाफ करून एक अद्वितीय शिल्प उभारलं. मध्यात मोठा घुमट, बाजूनं लहान घुमट, नक्षीदार कमानी यांमुळे कॅथीडूलचा भास होतो. घुमटाच्या टोकावरील दगडाची मूर्ती हे प्रगतीचं चिन्ह आहे. ‘प्रगती देवते’ची उंची साडे-सोळा फूट असून, महत्त्वाच्या चबुतऱ्यांवर अभियांत्रिकी, शेतकी, वाणिज्य, विज्ञान व व्यापार, या शास्त्रांवर आधारित प्रतीकात्मक कोरीव कामं केलेली आहेत. ही कामं इटालियन ग्रॅनाईट खांबांवर केलेली आहेत. आकाशाला भिडणारे मनोरे, डोळ्यांत भरणारा मध्यातील घुमट, लाकडांवरील नक्षीकाम, जमीन व भिंतीना वापरलेला इटालियन मार्बल, लोखंड व पितळ (ब्रास) यांनी नटविलेले जिने, बाजूचे गुळगुळीत गोलाकार कठडे, त्याच्या उंच पायऱ्या, मोगल महालांची आठवण करून देतात.
मुख्य घुमटाचा व्यास ३३० फूट आहे. बाजूनं विशिष्ट पद्धतीनं आधार दिलेला असून, त्यावर पूर्ण घुमट उभा आहे. घुमटाच्या मध्यात कोणताही खांब नाही. त्यावरील एका स्त्रीच्या प्रतिमेच्या उजव्या हातात आकाशाला भिडणारी मशाल, तर डाव्या हातात आरे असलेले चक्र आहे, परीसारखे पंख रस्त्याच्या बाजूला पसरलेले आहेत आणि तिने मनोऱ्यांच्या आधाराने पंखांचा तोल सांभाळलेला आहे. प्रवेशद्वारावर सिंहाची प्रतिकृती आहे. तो सिंह म्हणजे ग्रेट ब्रिटनचं सामर्थ्य आणि वाघाची जी प्रतिकृती आहे ती म्हणजे भारताचं शौर्य! स्थानकाच्या नवीन बांधणीच्या वेळी छत निळ्या रंगाचं करण्यात आलं. भिंतींच्या गडद लाल रंगावर सोनेरी बुट्टी चितारण्यात आली. सोनेरी तारे, चकाकणाऱ्या संगमरवरी दगडाच्या लाद्या, जागोजागी पिवळ्या दिव्यांनी लखलखणारी अतिभव्य झुंबरं, या सगळ्यांमुळे हे स्थानक कमालीचं लक्षवेधी ठरलं आहे. साहजिकच, हे स्थानक ‘डोळे दिपविणारं शिल्प’ म्हणून जगभर ख्यात झालं.
बोरीबंदर स्टेशन पाहताना लंडन शहरातील सेंट पॅनक्रॉस रेल्वेस्टेशन सारखा भास होतो. ही भव्य देखणी वास्तू बांधण्यास २.६ लाख पौंड खर्च आला होता, पैकी फ्रेडरिक यांनी आपली फी रुपयांत १८ लाख इतकी स्वीकारली होती. हे स्टेशन जागतिक वास्तुशिल्पांमधील एक जागतिक वारसा (World Heritage Structure) बनून राहिलं आहे.
३६५ दिवस, २४ तास अखंड कार्यरत असणारं हे रेल्वेस्टेशन आहे आणि म्हणून ‘वारसा यादी’त त्याचं महत्त्व अधिक आहे.
प्रत्येक दिवशी १६१८ गाड्यांचं वेळापत्रक सांभाळणारं, दिवसाला ६० ते ६५ लाख प्रवासी ये-जा करत असलेलं असं हे महान व्ही.टी. स्टेशन भारतीय रेल्वेचं भूषण आहे. आज हे स्टेशन ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ म्हणून ओळखलं जातं.
अशा या गौरवशाली भव्य स्टेशनात २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ९.३० वाजता काळिमा फासणारं एक अघोरी नाट्य घडलं. ती रात्र स्टेशनच्या इतिहासातील भीषण काळीरात्र ठरली. हजारो प्रवासी आपल्या सामानासकट दूर पल्ल्यांच्या गाड्या निघणाऱ्या प्लॅटफॉर्मसमोरील हॉलमध्ये बसलेले होते, काही कळण्याच्या आत दोन पाकिस्तानी अतिरेकी खांबांचा आडोसा आणि आधार घेत चौथऱ्यावर उभे राहिले व त्यांनी आपल्या मशिनगन्समधून बेछूट गोळीबार सुरू केला. काही मिनिटांत ५८ प्रवासी यमसदनास गेले. १०४ जबर जखमी झाले. असाच बेछूट गोळीबार करत ते लोकल लाईनच्या प्लॅटफॉर्मकडे वळले; पण अभूतपूर्व प्रसंगावधान राखत, गाड्यांची माहिती देणाऱ्या निवेदकानं सर्व प्रवाशांना तातडीनं प्लॅटफॉर्म रिकामा करण्याचं आवाहन केल्यानं नंतर मात्र एकाही प्रवाशाचा बळी गेला नाही. अतिरेक्यांचं येथील नियोजन फसलं. या घटनेनं संपूर्ण देश हादरून निघाला, पण त्यानंतरच्या दोन तासांत कर्मचाऱ्यांनी धैर्यानं स्टेशन पूर्ववत स्थितीत आणलं. लांब पल्ल्याच्या गाड्या सुटू शकल्या. मनं खचली होती, पण मोडली नव्हती. छत्रपतींचं नाव सार्थकी लागलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (C.S.M.T.) म्हणजेच पूर्वीचे बोरीबंदर किंवा व्हिक्टोरिया टर्मिनस (V.T.) स्थानकावर आज असलेल्या ८ नंबर प्लॅटफॉर्मच्या जागी ‘फाशी तलाव’ होता. अट्टल गुन्हेगारांना तेथे दगडधोंडे मारून जनता देहान्ताची शिक्षा देत असे. या स्टेशन उभारणीसाठी समुद्रात मातीची भर करून सुमारे ८० एकर जागा संपादित करण्यात आली.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply