शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) :
पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं
अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी
दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं
सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई
पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे
‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’
बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं
निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं
लाखांचे पोशिंदे तुम्ही, खुशाल जावें पुढती
अडवूं-तुडवूं दुश्मन आम्ही, मृत्यूची ना भीती. ”
–
बाजी प्रभू ( सोबत्यांना स्फूर्ती देत ) :
ज़बरी दुश्मन, मुठभर आपण, परंतु निधडी छाती
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
निबिड अरण्यामधल्या खिंडित अरुंद छोटी वाट
आली कितिही तल्वारींची लाटेवरती लाट
सहज थोपवूं इथें शत्रुच्या महापुराची शक्ती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
वेगें दौडत विशाळगड नृप अपुला गाठूं पाहे
अपुल्या निष्ठेची-शौर्याची आज परीक्षा आहे
स्वराज्ययज्ञीं शोणित शिंपुन देऊं प्राणाहुती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
‘दीनदीन’चा निनादतो स्वर, ‘हरहर आपण गर्जू
शत्रूच्या समशेरींपुढती खड्ग आपुलें परजूं
तल्वारींच्या खणाखणीनें करूं मृत्युची आरती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
अतुलनीय शौर्य-धैर्य अपुलें, मरणाचें भय कैचें ?
वेगें विचरूं , जैसे तांडवनृत्य महादेवाचें
अशक्य ठरवूं दुश्मनास पाऊल टाकणें पुढती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
घटी-प्रहर-पळ अचल, अचंबित काळ थांबुं दे आज
तोफांचे ध्वनि येईतों स्पर्शणार ना यमराज
तोंवर अरिवर अखंड बरसूं लवलवणारी पाती ।।
तुफान रोखूं, बनुनी ठाकूं सह्यकड्यांच्या भिंती ।।
–
शाहीर पहिला :
अखेर आले गडावरूनी तोफांचे आवाज
म्हणती बाजी, ”अंतिम मुज़रा स्वीकारा महाराज
मराठदेशा, ठेव ज़ागती अविरत स्वराज्यज्योती ” ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
–
शाहीर दुसरा :
ऐसे लढले बाजी, ऐसे शूर मावळे लढले
मर्दुमकीची शर्थ करूनी धारातीर्थीं पडले
स्वराज्य राखाया स्वीकरली खुशिनें वीरगती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
धन्य स्वराज्याचे पाइक ते, धन्य धन्य ते गाजी
धन्य धन्य ती घोडखिंड अन् धन्य वीर ते बाजी
धन्य मृत्यु ते, पावन ध्येया संजीवन जे देती ।।
तुफान रोखत, बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।।
– – –
(१३.०७.१६ : पावनखिंड-स्मृतिदिन )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply