१९५१ सालची गोष्ट आहे. मुंबईतील माहिममधील एका दवाखान्यात एक स्त्री आपल्या तीन वर्षांच्या मुलीविषयी काळजीने डाॅक्टरांना विचारीत होती, ‘डाॅक्टर, ही माझी मुलगी, भिंतीवर पडणाऱ्या स्वतःच्या सावलीकडे पाहून सतत नाच करीत असते. यामागे तिला काही मानसिक आजार तर जडलेला नाही ना?’ डाॅक्टरांनी एकदा त्या गोंडस मुलीकडे पाहिले आणि तिच्या आईला सांगितले, ‘अहो, तिला नृत्याची उपजतच आवड आहे. तिला तशी संधी मिळाली तर चित्रपटात काम करुद्या.’ ती बिचारी आपल्या मुलीला घेऊन घरी आली.
तिला योगायोगाने एका चित्रपटात पहिलं काम मिळालं, अभिनेत्री श्यामाच्या लहानपणाच्या भूमिकेचं. पाच वर्षांची असताना दुसऱ्या चित्रपटात लहान राधा-कृष्ण मधील ती राधा झाली. तिनं दहाव्या वर्षी ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘आइये मेहरबा..’ गाण्यात मधुबालाच्या मागे ग्रुपमध्ये शर्ट पॅन्ट व टोपी घालून डान्स केला. ती मुलगी म्हणजेच निर्मला नागपाल उर्फ सरोज खान!
नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲवाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲवाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे.
सरोज खानच्या यशस्वी कारकीर्दीची खरी सुरुवात झाली ती ‘तेजाब’ पासून. माधुरी दीक्षितच्या ‘एक दोन तीन..’ गाण्यामुळे चित्रपट सुपरहिट झाला आणि या चित्रपटापासून नृत्य दिग्दर्शनाला फिल्मफेअरने ॲवाॅर्ड देणं सुरू केले. ‘खलनायक’ चित्रपटाचे वेळी सुभाष घईंनी माधुरीला सांगितले की, सरोज जे नृत्य करुन दाखवेल त्यातले तू सत्तर टक्के जरी आत्मसात केले तरी खूप झाले. परिणामी तो चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. माधुरी आणि सरोज हे नंतर समीकरणच झाले.
श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ गाण्याने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतरच्या श्रीदेवीच्या अनेक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन सरोजनेच केलेले आहे.
सरोजच्या या हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदानाला रसिक कधीच विसरणार नाहीत.. हे जरी खरं असलं तरी त्यासाठी तिने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेली मेहनत ही अविस्मरणीय अशीच आहे.
‘हावडा ब्रिज’ पासून नायिकेच्या मागे असलेल्या ग्रुप डान्सरमधून काम करता करता बी. सोहन लाल या साऊथकडील नृत्य दिग्दर्शकाकडे तिनं नृत्य दिग्दर्शन सहाय्यकाचे काम करताना नृत्याचे धडे गिरवले. नृत्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता पदन्यासाचा सतत ध्यास घेऊन सत्तरच्या दशकातील सर्व नामवंत अभिनेत्रींकडून अप्रतिम अशी नृत्ये करवून घेतली.
१९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वेल थीफ’ चित्रपटांतील क्लायमॅक्स प्रसंगातील ‘होटोपें ऐसी बात’ या गाण्याच्या शुटींगच्या वेळची गोष्ट आहे…
मेहबूब स्टुडिओमध्ये या गाण्यासाठी कला दिग्दर्शक टी. के. देसाई यांनी सिक्कीमच्या राजदरबाराच्या लावलेल्या भव्य सेटवर दिग्दर्शक विजय आनंदने संपूर्ण टीमला सांगितले की, ‘हे गाणे चित्रपटाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. प्रत्येकानं आपली कला पणाला लावून काम करणे अत्यावश्यक आहे.’
कॅमेरामन व्ही. रात्रा यांनी नृत्य दिग्दर्शक बी. सोहन लाल यांच्याशी चर्चा करुन आठ मिनिट व चौदा सेकंदाच्या या गाण्याची भरपूर शाॅट डिव्हीजन केली. बी. सोहन लाल यांची दिग्दर्शनाची खास पद्धत होती. त्यांनी आपल्या तिन्ही सहाय्यकांना या गाण्याची कामे वाटून दिली. त्यातील वैजयंतीमालाकडून नृत्य करवून घेण्याचे काम निर्मलाकडे सोपविले. स्वत: बी. सोहन लाल कॅमेरामन बरोबर टेक घेत होते. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर गाण्याचे शुटींग पूर्ण झाले. त्यावेळी फिल्म डेव्हलप केल्याशिवाय शुटींग कसे झाले हे कळत नसे. त्या गाण्याचे जेव्हा रशेस विजय आनंद, देवआनंद, वैजयंती माला, बी. सोहन लाल, टी. के. देसाई सर्वांनी पाहिले तेव्हा सर्वांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद झाला. त्यावेळी बी. सोहन लाल यांनी सर्वांसमक्ष निर्मलाचे कौतुक केले. उत्तरादाखल एकोणीस वर्षांची निर्मला उर्फ सरोज, विनम्रतेने आपल्या गुरूंना म्हणाली, ‘सोहनलालजी, आपण माझे गुरू आहात, मी या गाण्यासाठी केलेले काम हीच माझी गुरूदक्षिणा!!’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-७-२०.
Leave a Reply