नवीन लेखन...

छुपा देवदूत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४०)

आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता.
ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला.
एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता.
मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो.
तिच्या मृत्यूची बातमी हळू आवाजांत कानोकानी गांवभर पसरली.
गांवकऱ्यांचा राग गेला व हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.
ऊन, थंडी, वारा, पाऊस ह्यापासून तिचं व तिच्या मुलांच रक्षण करणाऱ्या तिच्या जुन्या मोडक्या तोडक्या खोपटासमोर गांवकऱ्यांनी गर्दी केली.
कांही गांवकरी शवावर घालायला पांढरे शुभ्र कापड घेऊन आले तर कोणी तिच्या तीन मुलांसाठी कांही खायला घेऊन आले.
तिघांपैकी मोठा जनार्दन बारा वर्षे पूर्ण झालेला, धडधाकट व दुसऱ्याच्या शेतात काम करायलाही लायक झाला होता.
दहा-अकरा वर्षांची दुसरी मुलगी काशी चुणचुणीत, हुशार व मेहनती मुलगी होती.
योग्य व्यक्ती तिला घडवू शकत होती.
सर्वांत धाकटी, तिसरी मेनका मात्र पूर्ण पांगळी होती.
पहिल्यापासून ती अशी नव्हती पण दोन वर्षांपूर्वी ती खिडकीतून खाली पडली आणि तिच्या पाठीच्या कण्याला इजा झाल्यापासून तिच्या आईने उचलल्याशिवाय ती बिछान्यातून उठूही शकत नव्हती.
“मुलांच काय करायचं, हा गांवकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न होता.
त्यांची आई ह्या जगांतूनच गेली, तिच्या देहाची राख होईल, तेव्हां आता तिची काळजी करण्याचं कारण नव्हतं.
तिचे कुणी नातेवाईक नव्हते पण ही मुलं उघड्यावर पडतां कामा नयेत, उपाशी रहाता कामा नयेत.
कामते नावाच्या शेतकऱ्याने विचार करून, आपल्या बायकोची संमती मिळवून गांवकऱ्यांना सांगितले की तो जनार्दनला घरी घेऊन जाईल व त्याची चांगली काळजी घेईल तर श्रीमती जानकीबाई, ज्यांना एखादी मुलगी हाताशी मदतीला हवी होती, त्यांनी विचार केला की जरी काशीचा अजून दोन तीन वर्षे फारसा उपयोग नसला तरी नंतर तिची चांगलीच मदत होईल व आपण दया दाखवल्याचेही श्रेय आपल्याला मिळेल.
त्या म्हणाल्या, “ह्या मुलीला कांहीच वळण नाही, शिस्त नाही, तेव्हां तिचा त्रासच होण्याची शक्यता आहे पण कोणी हिला न्यायला तयार नाही तर कर्तव्य म्हणून मी हिला माझ्या घरी न्यायला तयार आहे.
कोणी म्हणालं नाही की आम्ही मेनकाला घेऊन जातो.
सर्व लोक तिच्याकडे अनुकंपेने पहात होते आणि त्यांना दुःख होत होते.
कांही बायकांनी तिचे अस्वच्छ कपडे बदलले व नवे चांगले घातले.
मेनकेचे दुःखी डोळे प्रत्येकाच्या हृदयाचे दार ठोठावत होती पण कोणीच हृदयाचे दार उघडायला तयार नव्हते.
अंथरूणाला खिळलेले मूल कुणाला हवे असणार ?
कोणीतरी विचारलं, “मेनकेचं काय करायचं ?”
त्यावर एक रांगडा गडी म्हणाला, “अनाथाश्रमात नेऊन टाका तिला !”
दुसरा म्हणाला, “अपंग मुलाला अनाथाश्रमांत फारच त्रास होईल.”
तो रांगडा इसम म्हणाला, “ते तुमच्या माझ्या मुलांसाठी.
ह्या कारटीला तो बदलही चांगला वाटेल.
तिला स्वच्छ ठेवतील, डॉक्टर तपासेल, बऱ्यापैकी खायला मिळेल, तिच्या सध्याच्या अवस्थेहून ते चांगले असेल.”
त्याच्या म्हणण्यात तथ्य होते पण गांवकऱ्यांना तें खुपत होते.
मुलांच्या आईचे दहन विधी पार पडल्यावर सर्व खोपटाशी परत आले, तेव्हां एकेका गांवकऱ्याने हळू हळू काढता पाय घेतला.
कामतेनी जनार्दनचा हात हातात घेतला व ते आपण जबाबदारीचा वाटा घेतल्याचे समाधान मानत त्याला आपल्या बैलगाडीतून घेऊन गेले.
श्रीमती जानकीबाईंनी काशीला आपल्या बहिणीचा निरोप घेण्याची घाई केली आणि दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात गळा घालून रडत असतांनाच काशीला हाताला धरून आपल्या घरी घेऊन गेल्या.
मग हळूहळू एकेक गांवकरी तिथून निघून जाऊ लागला.
कांही जण मेनकाकडे पहात तर कांही जण तिची नजर चुकवत तिथून बाहेर पडले आणि मेनका एकटीच राहिली.
खोपटाच्या उंबरठ्यावर खटारे बनवणारा जितू सुतार येऊन थांबला आणि घाईघाईने बाहेर जाणाऱ्या लोहाराच्या बायकोला म्हणाला, “तिला असं टाकून जाणं क्रूरपणा आहे.”
लोहाराची बायको म्हणाली, “मग जा घेऊन तिला अनाथाश्रमांत ! तिला तिथेच जावं लागेल.”
ती झपकन निघूनही गेली.
थोडा वेळ जितू तिथेच थांबला मग तो वळला.
मेनका कष्टाने वर सरकून उठून बसली होती आणि डोळे ताणून सर्वजण ज्या दारातून निघून गेले, तिकडे पहात होती.
भीतीची गडद छाया तिच्या कोवळ्या चेहऱ्यावर पसरली होती.
जितूला पाहून तिने श्वास रोखून धरला व ती रडत म्हणाली, “जितू काका, मला एकटीला इथे टाकू नका ना !”
दिसायला खडबडीत चेहऱ्याचा जितू सहृदय होता आणि मुलांसंबंधी त्याच्या मनांत माया होती.
जेव्हा मुलं त्याच्या दुकानांत येत तेव्हा मुलांसाठी बनवलेली लाकडाची खेळणी, तो मुलांनी साठवलेले पैसे कितीही कमी असले तरी त्यांना देत असे.
मेनकेच्या बिछान्याजवळ जात तो वांकून म्हणाला, “बेटी, तुला एकटीला इथे नाही टाकणार.”
मग त्याने तिला एखाद्या स्त्रीच्या हलक्या हातांप्रमाणे तिला शेजाऱ्यांनी आणलेल्या स्वच्छ चादरीत गुंडाळलं आणि स्वतःच्या बळकट हातांनी तिचं गांठोड उचललं.
तिला खोपटाबाहेर मोकळ्या हवेत आणलं मग तो तिला घेऊन झपझप मधल्या शेतातून स्वतःच्या घराकडे निघाला.
स्वतःचं मुलं नसलेली जितूची बायको कांही साधु संत नव्हती आणि दुसऱ्यासाठी कांही करायची तिची वृत्तीही नव्हती.
जितूला आपलं स्वागत ती कशी करेल याबद्दल शंकाच होती.
तो आपल्या बागेचा दरवाजा उघडून आत आला, तेव्हां आंतून खिडकीतून त्याला येतांना पाहिलेली त्याची पत्नी त्याला सामोरी गेली.
जितूने हाताने छातीशी धरलेल्या मेनकेच्या मनांत जितूबद्दल मायेचे आवर्त पसरत होते व जितूही त्यांत गुरफटला जात होता.
त्या दोघांत प्रेमाचा एक बंध आधीच निर्माण झाला होता.
त्याची पत्नी ओरडली, “काय घेऊन आलायत तुम्ही ?”
जितूला मेनका भीतीने त्याला बिलगलेली जाणवले.
तो कांहीच बोलला नाही पण त्याने पत्नीकडे अजीजीने पाहिले व त्याची नजर म्हणत होती, “सगळं सांगणार, थांब जरा आणि नरमाईने बोल.”
जितूची पत्नी राग आणि आश्चर्य ह्यांनी भडकून उठली होती.
ती म्हणाली, “तुम्ही त्या आजारी मुलीला तर घरी घेऊन आला नाहीत ना ?”
जितू म्हणाला, “केव्हां केव्हा स्त्रियांचे हृदय जास्तच कठोर होते.”
नेहमी जितू तिच्या तोंडी लागत नसे.
ती जेव्हां एखाद्या विषयावर चिडून बोलू लागे, तेव्हा तो निश्चयाने अगदी गप्प राही किंवा दुसरीकडे जाई.
जेव्हा आता त्याने गंभीर स्वरांत ठणकावून सुनावले, तें ऐकून व त्याच्या डोळ्यांतील दृढ निश्चय पाहून तिला थोडे आश्चर्यच वाटले.
ती म्हणाली, “स्त्रीहृदय पुरूषाच्या हृदयाच्या निम्म्यानेही कठोर नसते.”
जितूला लक्षात आले की त्याचा निश्चयीपणा तिने ओळखलाय व ती त्याने प्रभावित झालीय.
तो लागलीच थोड्या कडक आवाजांत म्हणाला, “कांही असो पण तिथे जमलेल्या साऱ्या स्त्रिया ह्या अश्राप मुलीकडे पाठ फिरवून एकेक करून हिला एकटीलाच तिथे टाकून निघून गेल्या.”
जितूच्या पत्नीने विचारले, “तिचा भाऊ जनार्दन आणि काशी कुठे होते ?”
कामते आपल्या गाडीतून जनार्दनला घेऊन गेले तर जानकीबाई काशीला घेऊन गेल्या पण कोणालाही ही बिचारी आजारी चिमुरडी नको होती.
“तिला अनाथाश्रमांत पाठवा” असाच धोशा लावला होता सर्वांनी.”
“मग कां जाऊ दिलं नाहीत तिला ?
इथे कशाला घेऊन आलात ?” बायको ओरडली.
तो शांतपणे म्हणाला, “ती स्वतः चालत अनाथाश्रमात जाऊ शकत नाही.
कोणीतरी तिला आपल्या बाहुंनी उचलून अनाथाश्रमापर्यंत न्यायला हवं आणि माझे बाहु तितके बळकट आहेत.”
“मग सरळ तिकडेच कां नाही गेलात ? इथे कां थांबलात ?” तिने विचारले.
जनार्दन म्हणाला, “मी उगाचच जा ये करायला मूर्ख नाही.
आश्रमांत भरती करायला सुध्दा आधी कांही अटी पूर्ण कराव्या लागतात, कागदपत्र जमवावे लागतात.”
त्याचा कांही फार उपयोग झाला नाही.
तिने घाईघाईने विचारले, “मग कधी भेटणार आहात अधिकाऱ्यांना ?”
जितू म्हणाला, “उद्या जाईन त्यांच्या कचेरीत.”
ती म्हणाली, “उद्यावर कां ढकलताय ?
आताच जा आणि परवानगीचे कागदपत्र घेऊन या आणि आजच्या आज आपली सुटका करून घ्या यांतून.”
जितू पुन्हा तिला निश्चयी स्वरांत म्हणाला, “मी अनेकदा संत वाङ्मयात वाचलंय, “जे कां रंजले, गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु जाणावा, देव तेथेंची ओळखावा.”
शिवाय असंही म्हणतात की ‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं.’
गरीबांची सेवा करणाऱ्याला देव नक्कीच त्याचं फळ देतो.
ह्या लहान आईविना पोरीला आपल्याला एक रात्र घरी ठेवायला, तिच्याशी मायेने वागायला जड जाईल कां ?”
बोलता बोलता त्याचा आवाज कातर झाला.
आपल्या डोळ्यात दाटलेलं पाणी पत्नीला दिसू नये म्हणून तो वळला.
त्याच्या पत्नीने उत्तर दिले नाही पण कोमल भावनेने तिच्याही हृदयात हलकेच प्रवेश केला होता.
तो म्हणाला, “प्रिये, तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने पहा, तिच्याशी प्रेमाने बोल.
तिची मृत आई, तिचं एकाकीपण, तिच्या यातना, तिचं, पुढे वाढून ठेवलेलं, दुःखी आयुष्य याचा विचार कर.”
त्याचे कोमल हृदय, आजवर कधीही तो बोलला नसेल अशी भाषा, त्याच्या मुखांतून पाझरवू लागले.
त्याची पत्नी कांहीच बोलली नाही पण ज्या खोलीत त्याने मेनकाला ठेवलं होती त्या खोलीत ती गेली.
जितू तिच्यामागे गेला नाही.
त्याने तिला मुलीबरोबर एकटं ठेवणंच उचित मानलं.
तो घराजवळच असणाऱ्या आपल्या दुकानांत दैनंदिन कामाला निघून गेला.
तो अगदी संध्याकाळी खूप उशीरापर्यंत खूप काम करत राहिला.
तो जेव्हा घराकडे जाऊ लागला तो प्रथम घरात लागलेल्या दिव्यांनी त्याचे लक्ष वेधून घेतले.
त्याला ते शुभ चिन्ह वाटले.
त्याचा रस्ता तिथूनच दाराकडे जात होता.
खिडकीजवळ आल्यावर त्याला आत डोकावण्याचा मोह टाळतां आला नाही.
मेनका एका लोडाला टेकून बसलेली होती.
तिच्या चेहऱ्यावर दिव्याचा छान उजेड पसरला होता.
त्याची पत्नी बिछान्याच्या बाजूला पण खिडकीकडे पाठ करून बसली होती.
त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता.
समोर दिसणाऱ्या मेनकेच्या चेहऱ्यावरूनच त्याला पत्नीच्या मनांतलं ओळखायचं होतं.
मेनकाचे ओठ अधून मधून हलत होते.
तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती देत असावी.
तिचा चेहरा अजून दुःखीच होता पण आता चेहऱ्यावर भय किंवा कटुता दिसत नव्हती.
त्याच्या मनावरच दडपण कमी झाले व त्याने नि:श्वास सोडला.
घरात आल्यावर तो लागलीच त्या खोलीत गेला नाही.
तो स्वयंपाकघरांत गेल्याची चाहूल लागताच पत्नी तिथे लगबगीने आली.
जितूने मेनकाचा विषय न काढणे उचित ठरवून ती कशी आहे, हेही त्याने विचारले नाही.
जितूने पत्नीला विचारले, “जेवायला कधी बसायचे ?”
ती म्हणाली, “लगेच थोड्या वेळांतच !”
तिच्या आवाजांत कांहीच विशेष जाणवले नाही.
ती जेवणाच्या तयारीला लागली.
जितूने धुळीने माखलेले हात, तोंड स्वच्छ धुतले व तो बाहेर येऊन मेनकाच्या खोलीत गेला.
मऊ, सफेद बिछान्यातून दोन नाजूक डोळे त्याच्या डोळ्यांना भेटले.
त्या दृष्टीत कृतज्ञता होती, आदर होता, आर्जव होतं, कोमलता होती.
त्याची छाती अभिमानाने फुलली.
त्याचा श्वास किंचित वेगाने होऊ लागला.
तो आता प्रथमच त्या कृश बांध्याच्या छोट्या मुलीकडे दिव्याच्या उजेडांत निरखून पाहू लागला.
तिचा चेहरा मोहक होता आणि बालपणीचा सहज गोडवा तिच्या आजाराला न जुमानतां तिच्या चेहऱ्यावर कायम होता.
“तुझं नाव मेनका आहे ?” त्याने तिचे कोमल हात हातात घेत हळू आवाजात विचारले.
“हो ! जितू मामा.” तिच्या आवाजाने जणू सतारच छेडली.
“तू खूप वर्षे आजारी आहेस कां ?” त्याने विचारले.
“होय ! मामा !” पुन्हा तोच गोड स्वर !
“डॉक्टर येऊन तुला तपासलय त्यांनी ?”
“डॉक्टर येत असत पूर्वी.”
तिच्या आवाजात संयम होता.
“अलिकडे येत नसत कां ?” त्याने विचारले.
“हल्ली येत नसत.”
“तुला कुठे दुखतं कां ?” त्याने चौकशी केली.
“केव्हा, केव्हां दुखतं पण आता नाही.”
“अलिकडे कधी दुखलं होतं ?”
“आज सकाळी माझी बाजू आणि पाठ दुखत होती.
जेव्हां तुम्ही मला उचललं होतं तेव्हां !”
“तुला उचललं, फिरवलं तर दुखतं तुला ?”
“होय मामा !”
“आतां दुखतंय कां कुठे ?”
“नाही मामा.”
“तुझ्या कुशीत दुखतंय आता ?”
“आता नाही दुखतं.”
“दुखतं, तेव्हां खूप त्रास होतो कां ?”
“हो पण ह्या मऊ बिछान्यांत झोपवल्यापासून नाही दुखत.” ती म्हणाली.
“मऊ बिछान्यात बरं वाटतय ?”
“होय, मामा. खूप बरं वाटतय.”
तिच्या मृदू, मुलायम आवाजात समाधान आणि कृतज्ञता दोन्ही मिसळलेली जाणवत होती.
थोड्या वेळाने त्याची पत्नी खोलीत डोकावून म्हणाली, “जेवण तयार आहे.”
जितूने तिच्याकडे पाहिलं मग परत मेनकाकडे पाहिलं.
त्याची पत्नीला काय तें समजलं.
ती म्हणाली, “आपण आटपून घेऊया मग मी आणीन तिला कांहीतरी खायला.”
तिने आपल्या स्वरांत निष्काळजीपणा दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण जितूने तिला खिडकीतून पाहिलं होतं.
त्याला माहिती होतं की ही बेफिकीरी वरवरची आहे.
जेवताना हा विषय निघणार हे जितूला ठाऊक होतं कारण दोघांच्याही विचारात तोच मुख्य विषय होता.
पत्नी कधी बोलतेय, ह्याची तो संयमाने वाट पहात होता पण ती गप्प होती.
तोही मग कांही बोलला नाही.
जेवण संपतां संपतां अचानक पत्नी म्हणाली, “तुम्ही ह्या मुलीचं काय करणार आहांत ?”
आश्चर्य व्यक्त करत जितू म्हणाला, “मला वाटते तिला अनाथाश्रमात सोडून येण्याबद्दल आपलं बोलणं झालंय !”
पत्नी ह्यावर गप्प राहिली.
पुन्हा तो विषय निघाला नाही.
जेवण होतांच पत्नीने दोन चपात्यांना तूप लावलं.
एका ताटलीत चपात्यांबरोबर थोडी भाजी, चटणी व गूळ घेतलं.
ती ताटली व दूधाचा एक कप घेऊन ती मेनकाच्या खोलीत आली.
तिच्या बिछान्यावर एक लहानसं मेज ठेऊन त्यावर तिने ती ताटली ठेवली.
मेनकाला खूप भूक लागली होती.
ती ते खूप आवडीने खाऊ लागली.
तिचा खाण्यातला आनंद लक्षात येऊन जितूच्या पत्नीने विचारले, “चांगलं आहे कां ?”
क्षणभर मेनका खायची थांबली आणि अशा कांही कृतज्ञ निरागस नजरेने तिला उत्तर दिलं की जितूच्या पत्नीच्या हृदयामधील अनेक वर्षे दडपून ठेवलेले वात्सल्य एकदम उचंबळून आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहरीच्या वेळी जेव्हा जितू म्हणाला की मेनकाला अनाथाश्रमांत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी मिळवण्यासाठी तो आज जाणार आहे, तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, “आपण तिला आणखी एक दोन दिवस आपल्याकडेच ठेवूया.
ती फारच अशक्त आणि असहाय्य आहे”.
“पण तुला तिची कामांत खूप अडचण होईल.”
जितू म्हणाला.
पत्नी म्हणाली, “एक दोन दिवस कांही हरकत नाही. मी सांभाळून घेईन. गरीब बिच्चारी !”
जितू अधिकाऱ्यांना त्या दिवशी भेटायला गेला नाही, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही नाही गेला.
नंतर तो कधीच त्यांच्याकडे गेला नाही कारण आठवड्याभरात त्याच्या पत्नीने मेनकाला आपल्या सुरक्षित घरांतून अनाथाश्रमांत पाठवण्याचा विचारच मनांतून काढून टाकला.
त्या आजारी आणि असहाय्य मुलीने जितूच्या घरात आनंद आणि उत्साह आणला.
ते घर अशा आनंदाला दीर्घ काळ मुकलेलं होतं.
ते घर दुःखी होतं कारण जितूच्या पत्नीला प्रेम करायला, काळजी घ्यायला मूल न झाल्याने ती उदास, रागीट, चिडचिडी आणि भांडखोर झाली होती आणि स्वतःचं स्त्रीत्व, मातृत्व हरवून बसली होती.
आता सतत तिच्याकडे कृतज्ञतेने, प्रेमाने, संयमाने पहाणारी ती असहाय्य मुलगी तिच्या हृदयाला जणू अमृत पाजत होती.
त्यामुळे तिने मेनकाला आपल्या हातात तर घेतलेच होते पण हृदयांतही जागा दिली होती.
ते ओझंच तिला प्रिय झालं होतं.
जितूला तर संपूर्ण गांवात त्याच्याइतका भाग्यवान कोणी दिसत नव्हता.
त्याच्या घरात स्वर्गातून प्रत्यक्ष देवदूतच एका आजारी, असहाय्य आणि दयनीय मुलीच्या रूपात आला होता आणि त्याने त्यांचं संपूर्ण घर आनंद व प्रकाश यांनी भरून टाकलं होतं.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – एंजल इन डीसगाईस

मूळ लेखक – टी. एस. आर्थर (१८०५-१८८५)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..