महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उध्दव यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.
उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले.
२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी पाटणकर यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.
आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून २०१९ च्या निवडणुकीत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणार्याा शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण केले. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश संपादन केले आहे. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे, तसेच शिवसेनेने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळविले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.
उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply