ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे,किमी,परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात.या लेकमधील विशिष्ठ तऱ्हेच्या पानवेली हे खाद्य.लेकचे पाणी व हवामान त्यांच्या जनन क्षमतेस उपयुक्त आहे.परतण्याचे दिवसही ठरलेले.त्या दिवशी हजारो पक्षांचे थवे मायदेशीच्या प्रवासास निघतात.हे चक्र नियमीतपणे वर्षानु वर्षें चालू आहे.जगभरातील हजारो पक्षी मित्र या जागेस भेट देतात. राहण्यास उत्तम जागा.लेक विहार करण्यास उत्तम बोटी, पडाव,अनुभवी गाईड,लेकचा प्रचंड विस्तार, कुठेही गर्दी नाही.
साधारणपणे लेकची चार विभागात विभागणी. प्रत्येक विभागाची खोली व खारटपणा वेगवेगळा, त्यामुळे मासे व पक्षी निरनिराळे असतात.लेकमध्ये अनेक लहान मोठी बेटे. त्यावर वस्ती, जवळजवळ लाख एक लोकांचे उदर भरणाचे साधन चीलिका लेक आहे.
बारकूल हे काठावरील राहण्याचे स्थान बाळूगाव रेल्वे स्टेशन पासून ७ किमी.हे स्थानक विशाखापट्टणम ते भुवनेश्वर रेल्वे मार्गावरील अगदी लेकच्या बाजूने १५ मिनिटाचा प्रवासातच लेकच्या भव्यतेची कल्पना येते.
राहण्याच्या बंगल्याच्या व्हरांड्यातून समोर पसरलेला समुद्र रुपी लेक,शांत पाण्यावर केशरी,भगव्या ,लाल रंगाच्या संध्याछाया पसरलेल्या,भन्नाट वाहणारा गार वारा,आणि मनाला मोहून टाकणारी शांतता,रात्रीच्या भोजनात लेक मधील ताजे मत्स्याचे प्रकार ४० तासाचा रेल्वे प्रवास सार्थकी लागला.
सर्व परिसर पुर्वाभीमुख त्यामुळे सूर्योदय सोहळा अखंड चालू,सोनेरी किरणात चकाकणाऱ्या पाण्यात मासे पकडणाऱ्या अनेक होडया हळूवारपणे डुलत मार्गस्थ होत होत्या.अनेक कोळी पाण्यात उभे राहून जाळी फेकत होते.लेक मध्ये २ तास मोटर बोट प्रवास एक अनोखा अनुभव.पाण्याची साधारण खोली २० ते ३० फूट.बोटीचा भन्नाट वेग,पाहता पाहता बाजूचे हिरवे गार डोंगर ,घरे दूर पळत होते.काही मिनिटात बोट भ्रर समुद्रात आल्यासारखी वाटू लागली पण समुद्राचे मुख आमच्या जागेपासून ४५ किमी दूर होते.
वाटेत कालीजाई बेटावरील देवीचे मंदिर परिसर मनाला शांति देणारा. फिरणारी हरणे,घुमणारा घंटानाद,वाहणारा थंडगार वारा,थेट क्षितीजा पर्यंत पसरलेले पाणी,दुरवर पक्षांच्या रांगा दिसू लागल्या.एक हलणारी काळी भिंत,आमच्या बोटी जवळ येत होती.काळ्या बदकांच्या साखळीने आम्हाला सर्व बाजुनी वेढले होते.शेकडोनी तरंगणारी बदके एका सुरात क्व्या क्व्या आवाज करत अगदी बोटीला येऊन भिडली.त्यांचा प्रवास चालू होता.पाठोपाठ कबऱ्या रंगाचे बगळ्या सारखे पक्षांचे थवेचे थवे आमच्या स्वागतास हजर.त्यांचे लांब काडीसारखे पाय.जाड पसरट चोचीनी चिखलातील पानवेली वेचून खाण्यात ते मग्न होते,४ ते ५ हजार किमी प्रवास एकमेव या पानवेली करता तेव्हा खरोखर निसर्ग अगाध आहे,या लेक परिसरात या वेलींचे जंगलच पाण्याखाली पसरलेले. पाण्याची खोली जेमतेम ५ फूट.नावाडी चक्क पाण्यात उतरून पडलेली लांब पिसे गोळा करून आम्हाला देताना पक्षी टक लावून सर्वांकडे पाहात होते. एक पक्षांचा थवा आकाशात उडे,लगेच दुसरा थवा पाण्यात उतरे आणि खाण्यात मग्न होई.एकावेळी एवढे पक्षी प्रथमच पाहात होतो.
या लेकचे विभाग विशिष्ट गोष्टींकरता प्रसिद्ध,सातपदा हा इरावती नावाच्या डॉलफिन्स करता तर बारूनकुडा बेटावर वरुणदेवाचे मंदिर,लागून एक मशीद,त्याचा मुख्य दरवाजा व्हेल माशाच्या जबड्याचा,एका बेटाचा आकार मोत्यासारखा,नाव सोमलो वा हनीमून बेटे,पाण्याची निळाई व निस्सिम शांतता,मधुचंद्रा करता प्रसिद्ध जागा,तपापाणी बेटावर सल्फर युक्त गरम पाण्याची कुंडे,अशा विविधतेने नटलेले चीलिका लेक पर्यटकांना प्रेमात पाडणारे आहे
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply