माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !
“चिंचोरे गुरुजी” ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !
चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, “आमची पंचविशी” ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !
माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….
विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, “बापू, “शिक्षक” शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक”, माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, “आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं” डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, “उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे”! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !
मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा “शिक्षक दिनी” सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, “पंडित” हे नाव सार्थ करणारे “पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी” ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा “आदर्श शिक्षक” हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !
माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, “तुला रं गाड्या भीती कशाची” हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !
तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,
— उपेंद्र पंडित चिंचोरे
Leave a Reply