सूर्याने आपली केशरी सोनेरी आभा वाळूवर पसरली आणि वाळूचा रंगच बदलून गेला. जिथवर नजर जाईल तिथवर सोनेरी रंगाची उधळण झाली. सोन्याचा व केशराचा सडा मऊ मुलायम वाळूवर पसरला. मावळतीच्या सूर्याचा गोळा जणू अथांग वाळूवर वास्तव्याला आल्यासारखा अप्रतिम दिसत होता. आम्ही ते दृश्य डोळे भरून पहात होत तोच पुन: एक ५-७ घरांची वस्ती लागली. प्रवास सुरू केला तेंव्हा सकाळच्या कोवळ्या ऊन्हात फिकट निळसर दिसणारे आकाश, दुपारच्या टळटळीत ऊन्हात चांदीसारखे चमकणारे आकाश, मधेच मावळतीच्या सूर्याने केलेले सोनसळी केशरी आकाश आणि आता आमची बस थांबली तेव्हा सूर्याचा गोळा क्षितिजाकडे झेपावत असताना इंद्रधनुष्यातले जवळपास सगळे आकर्षक रंग ल्यालेले आकाश…आकाशाचे एवढे विविध रंग इतके दिवस सिमेंटच्या जंगलात राहिल्याने कधी दिसलेच नव्हते. ते अगदी तृप्त मनाने न्याहाळत होतो. अद्याप सूर्य क्षितिजावर रेंगाळत होता. त्याच्या प्रकाशात सगळे अगदी स्वच्छ दिसत होते. रंगीबेरंगी छोट्या चौकोनी गोल तंबूंची वस्ती खूपच उठून दिसत होती. बस त्या वस्तीजवळ थांबली तेव्हा ५-६ गोरीपान गोबरी मुले रंगीबेरंगी पोशाखात व स्कार्फ व टोपीचे गोंडे उडवत वस्तीचे कुंपण ओलांडून बसपाशी आली. आम्ही खाली उतरताच त्या वस्तीचा म्होरक्या आमच्या स्वागताला पुढे आला.
म्होरक्याने आम्ही तिथे उतरताच आम्हाला मोठ्या तंबूपाशी नेले. त्याच्या मागे एक विस्तीर्ण तलाव होता. हाच तो प्रसिद्ध ‘चिंघाई ‘तलाव. चीनमधील हे सर्वात मोठे अंदाजे४३००चौ.कि.मी.व २१ते२५मी. खोल) तळे खाऱ्या पाण्याचे आहे. आकार इतका मोठा की, एका तीरावर उभे राहून दुसरा तीर दिसतच नव्हता. हा तलाव म्हणजे चिंघाई प्रॉव्हिन्सची हद्द सुरू झाल्याची खूणच. १००००’ उंचीवरचा हा तलाव अतिशय थंडगार, स्वच्छ, काळसर पाण्याचा आहे. त्यात विविध प्रकारचे भरपूर मासे आहेत. पूर्वी १०० पेक्षा जास्त नद्या या तळ्याला पाणी पुरवत असत. पण वाळूचे थर या नद्यांमध्ये वाढल्याने त्यातील सुमारे २५ नद्याच शिल्लक राहिल्या आहेत. तळ्याचा आकार कायम कमी जास्त होत असतो. ते लहान व्हायला लागले की, अनेक छोटी छोटी तळी या तळ्याजवळ तयार होतात. २००४ मध्ये असेच एक छोटे तळे तयार झालेले आम्ही पाहिले. या तळ्याच्या पश्चिमेला एक बेट आहे, त्यावर एक महादेवाचे मंदिर आहे. Ma Ha De Va असे त्याचे तिबेटी बौद्ध लोकांमध्ये त्याचे अभिधान आहे. तिबेटी लोकांचे ते तीर्थस्थान असल्याने कोणीही या तळ्यातून बोटीने प्रवास करून देव दर्शनाला जात नाही. वर्षातून तीन महिने ते संपूर्णपणे आटते. तेव्हाच बौद्ध धर्मगुरू चालत जाऊन देवाचे दर्शन घेऊ शकतात. इतर वेळी नाही. चिनी वर्षगणनेप्रमाणे फक्त ‘घोड्याच्या’ वर्षात या तळ्याला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. घोड्यावरून १८ दिवसात किंवा पायी२३ दिवसात ही प्रदक्षिणा यात्रेकरू पूर्ण करतात. तिबेटमध्ये जी ४ तळी पवित्र मानली जातात त्यापैकी हे एक. मानसरोवराशेजारी कैलास पर्वत आहे. त्यामुळे या चार तळ्यात त्याचा मान पहिला. चिंघाई तळे कोणत्याही पर्वत पायथ्याशी नाही, तर वाळवंटात आहे. या तलावाच्या दुसऱ्या टोकास एक (चिंघाईपेक्षा) लहान तळे आहे. वाळवंटात असूनही त्याचे पाणी गोड आहे हे आश्चर्य. अर्थात खरे काय ते गाईडच जाणे, कारण ते पाणी न पचणारे आहे असे त्याने आधीच जाहीर केले होते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या विश्रांतीसाठी ते अतिशय उत्तम आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या खूप जाती इथे पहायला मिळतात. तळ्याच्या काठी वाळूतून थोडे चालून तळ्याच्या पाण्यात पाय बुडवून आम्ही परत तंबूत आलो.
एव्हाना सूर्यदेव दिवसभराचा प्रवास संपवून थकून भागून विश्रांतीसाठी क्षितीजापलिकडे जायला निघाले. जाताजाता त्यांनी आपले केशरी, भरजरी पांघरूण तळ्यावर पसरून तळ्याच्या पाण्याचा रंग बदलण्याची किमया आम्हाला दाखवली. तळे अंधारात अदृश्य होऊ लागताच आम्ही तंबूत परतलो. आता आमच्या स्वागतासाठी तंबूत ५-६ पुरुष व काही स्त्रिया जमल्या होत्या. त्यातील पुरुषांनी नर्तकांचा चकाकता वेष परिधान केला होता. आरसे, टिकल्या लावलेले घेरदार अंगरखे, खाली चुणीदार पायजमे, कमरेवर बांधलेले रंगीबेरंगी रूमाल, डोक्यावर गोल टोप्या असा त्यांचा वेष आकर्षक होता. नर्तिका तर खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी डोक्यावर सोनेरी टिकल्या लावलेल्या जाळ्या बांधल्या होत्या. घट्ट दोन वेण्यांना रंगीबेरंगी गोंडे बांधले होते. बेताच्या उंचीच्या, रंगाने गोऱ्यापान, सुडौल बांधा, धरधरीत नाक (कदाचित मेकपची करामत असेल) असणाऱ्या, हातभर रंगीबेरंगी बांगड्या व पायात जाडजाड तोरड्या घालून छुमछुम करत त्या नर्तिका आम्ही बसलो होतो त्या तंबूत आल्या. तेवढ्यात तंबूचा मागचा पडदा अचानक जमिनीवर पडला व नाचाचीपोज घेऊन उभ्या नर्तिकांमागे आपोआप गडद निळ्या काळसर आकाशाचा पटल, त्यात चमकणाऱ्या चांदण्यांसह निर्माण झाला. आमची टेबले अर्धगोलाकारात मांडली होती. जेवणाची सुरुवात अर्थातच सूप-ब्रेडने झाली.
नंतर नेहेमीप्रमाणे २-३ कोर्स भाज्या व भाताच्या थाळ्या आल्या. इकडे जेवण सुरू होताच नर्तिकांनी आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. तालात पदन्यास करत, एकापाठोपाठ गिरक्या घेत सगळ्याजणी व त्यांचे जोडीदार कधी गोलाकार करत, कधी एकामागोमाग जात तर कधी एकमेकांच्या मिठीत शिरत लीलया सगळीकडे भिरभिरत होते. साथ फक्त ढोलकी सारख्या दिसणाऱ्या वाद्याची व सनईसदृश सुरावटीची. नाचाच्या कोणत्याही खास शिक्षणा शिवाय त्यांनी जी ‘नृत्यकला’ सादर केली ती एकदमच लाजबाब! २ तास कसे संपले कळलेच नाही.
तेथून निघाल्यावर झिनिंगला पोहोचायला फार वेळ लागला नाही. आमचे हॉटेल मुख्य रस्त्यावर होते. त्यामुळे मुक्कामी पोहोचताच सगळे जण पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले. चालणे फार झाले नसले तरी दिवसभराचा प्रवास अंगावर यायला लागला, तसे सारे परतले. सगळीकडे सामसूम झाली. आम्हीही गाढ झोपेत होतो. अचानक रात्री २-३ च्या सुमारास आमच्या खोलीची बेल वाजली. त्या अगोदर कुलुपात किल्ली फिरवण्याचा प्रयत्न झाल्याच्या चाहुलीने चाळवलेली झोप आता पूर्णपणे उघडली. पीपिंग होले मधून पहाण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो, पण अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये काहीच दिसेना. दार उघडावे का अशा संभ्रमात असतानाच बेल पुन: जोरजोरात वाजू लागली व दाराचे हँडल फिरवण्याचा आवाजही येऊ लागला. रिसेप्शनचा फोन उचलला जाईना. आता दारावर धक्के व बरळल्याचाही आवाज येऊ लागला. गाईड व सिक्युरिटीही झोपेत! त्यामुळे गप्प बसून बाहेरचा धिंगाणा थांबण्याची वाट पहाण्याची वाट पहाण्याखेरीज उपायच राहिला नाही. स्थानिक भाषा येत नाही, बाहेर किती जण आहेत याचा अंदाज नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून बसण्याखेरीज इलाजच नव्हता. तास-दीड तासाने धिंगाणा हळूहळू कमी झाला. शेजारच्या खोल्यांपैकी कोणी बाहेर कसे आले नाही याचेही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. सकाळी उलगडा झाला की हा प्रकार करणारा एक दारुडा पूर्वी त्या खोलीत रहात होता आणि अधून मधून तो या हॉटेल मधल्या त्याच्या पूर्वीच्या खोलीत शिरणे, प्रवेश न मिळाल्यास शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे, धिंगाणा घालणे वगैरे करतो. तिथल्या स्टाफला हे नवीन नसल्याने ते तिकडे दुर्लक्ष करतात! चीनच्या भूमीवर आलेल्या पहिल्याच सलामीने आम्हाला नवाच अनुभव मिळाला.
सकाळी आम्ही झिनिंगची सफर केली. चिनी औषधालय, त्याचा कारखाना इ. ठराविक ठिकाणांची पहाणी झाली. शहर जरा उंचावर असल्याने रस्ते खूपच चढ उताराचे आहेत. अगदी कोकणची आठवण करून देणारे. सभोवती गर्द झाडी. जेवणानंतर झिनिंगच्या स्थानिक ‘तू’ या आदिवासी जमातीच्या लोकांना भेट होती. गावातून निघून आमची बस गर्द झाडीत लपलेल्या वळणावळणांच्या व चढ उतारांच्या रस्त्याने जायला लागली. अतिशय सुंदर असा हा साधारण दीड तासाचा प्रवास करून आम्ही त्यांच्या वस्तीवर पोहोचलो. तेथे त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रत्येक झोपडीबाहेर हातगाड्यांवर दुकाने थाटली होती. उत्तम भरतकाम केलेले छोटेछोटे बटवे, स्कार्फ, उशांचे अभ्रे, हस्तकलेचे नमुने असणारे विविध प्रकारचे रुमाल, पिशव्या यांची विक्री या हातगाड्यांवर चालू होती. मध्यभागी चौक व बाजूने २-२ खोल्यांची घरे अशी ५-६ घरांचीच ती वस्ती. चौकात थोडासा उंचावर स्टेजसारखा चबुतरा आणि प्रत्येक घराच्या पडवीत प्रवाशांची बसण्याची सोय केली होती. आमची बस थांबताच २-३ पुरुष व २-३ स्त्रिया पुढे आल्या. हेच ते ‘तू’ जमातीचे लोक. आमच्या गळ्यात स्कार्फ घालून व अत्तरासारखा स्प्रे उडवून त्यांनी आमचे स्वागत केले व आत नेऊन पडवीत बसवले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर चायनीज टी व कुकीज देऊन आमचा पाहुणचार करून त्यांच्यातील मुखियाने कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. चौकातील स्टेजवर पाहुण्यांच्या करमणुकीसाठी वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले. स्टेजच्या मधोमध खांब होता. त्याच्या वरच्या टोकाच्या गोल कड्यावर पक्क्या बसवलेल्या पण जमिनीपासून बऱ्याचवर तरंगतील अशा बांबूच्या काठ्या होत्या. या काठ्या व खांबही रंगीबेरंगी कागद, कापड यांनी सजवलेले होते. पडवीत, मोकळ्या जागेत, छपरांवर पताकांच्या माळा वाऱ्यावर डुलत होत्या. एका बाजूच्या खोलीत वादक बसले होते. आम्ही चायनीज चहा व उकडलेल्या शेंगांचा आस्वाद घेत असताना वाद्ये वाजू लागली व कार्यक्रमाला सुरुवात झाली. कमरेपर्यंत येणारी रंगीबेरंगी पोलकी, त्याखाली पायापर्यंत येणारे रंगीत घेरदार परकर, एक वेणी व तिला झुपकेदार गोंडा, डोईवर मोठ्या घेराची हॅट घातलेल्या काही मुली व रंगीत शर्ट-पायजमे घातलेली मुले हातात हात घालून पुढे आली, आम्हाला विश करून सर्कशीसारख्या कसरती करू लागली. मधल्या खांबाशी लागून असलेल्या कड्यांना लोंबकळून त्यांनी हवेत गोल फेर धरून कसरती सुरू केल्या. त्या पाहून अगदी थक्क व्हायला झाले. निवेदन चिनी भाषेतून होते, तरी देहबोली इतकी स्पष्ट व बोलकी होती, की भाषा समजत नसूनही सर्वकाही समजत होते. हा खेळ बराच वेळ चालला होता. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन त्यांचा महत्त्वाचा खेळ सुरू झाला.
यावेळी खेळ करणाऱ्यांनी आमच्या सहप्रवाशांपैकी मॅडेरिन भाषा येणाऱ्या एका चिनी माणसाची निवड केली. तोही खूप खूष झाला. त्याच्या बायकोने आपला कॅमेरा सरसावला. त्याला घेऊन ते आतल्या खोलीत गेले. थोडा वेळ गेला अन् अचानक आतल्या खोलीतून वाजंत्रीचा आवाज ऐकू येऊ लागला. आमचे लक्ष साहजिकच तिकडे गेले. वाजंत्रीवाले आपल्या वाद्यांसह दोन-दोनच्या ओळीत, तालात मागे पुढे पावले टाकत, मागे पुढे झुलत पुढे आले. त्यांच्या मागोमाग चमकदार रंगीबेरंगी कपडे व मुंडावळ्यांसारख्या माळा सोडलेली टोपी घातलेला, आमचा सहप्रवासी दोघांच्या हातात हात घालून नाचत नाचत आला. त्याच्या मागोमाग त्याचे (तात्पुरते) ‘तू’ आईवडील व भावंडे होती. त्यांचा एक फेरा पूर्ण झाल्यावर स्टेजवर अगोदरच दाखल झालेल्या ‘तू’ पुरोहितासमोर त्याला उभे केले. त्याच्या मागोमाग तशाच चमकत्या पोशाखात ‘नवरी’ ही आपल्या आईवडील व बहिणी-मैत्रिणींबरोबर नाचत येऊन पुरोहितासमोर उभी राहिली. पुरोहिताने त्यांच्या (मँडेरीन) भाषेत काहीतरी विचारले. दोघांनी माना डोलावल्या, दोघांच्या हातात रेशमी स्कार्फ व फुले दिली गेली. ते त्यांनी एकमेकांना द्यायचे होते. स्कार्फ घालताना वधूवरांना उचलणे, उंच करणे, दोघांची उंची सारखी होताच नवरीला खांद्यावर टाकून दुसऱ्याच माणसाने पळवणे, नवऱ्याने त्यांना गाठणे असे बरेच खेळ करून झाले. फुले देताना अचानकच नवरीऐवजी दुसरी जाडी म्हातारी बाई पुढे येणे, तिला नवरदेवाने फुले देणार नाही म्हणणे असे बरेच गमतीजमतीचे प्रकार चालू होते. सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. शेवटी एकमेकांच्या गळ्यात स्कार्फ घालण्यात यश आल्यावर प्रीस्टने त्यांचे लग्न झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर चिनी पद्धतीनुसार एकमेकांच्या आईवडिलांना गुडघ्यावर बसून चहा देणे, त्यांनी वधुवरांना ‘आंगपाओ’ची (चिनी) लालपाकिटे भेट देणे वगैरे ‘विधी’ पार पडले. दोघांनीही पुरोहिताशी हस्तांदोलन करून विवाह संपन्न केल्याबद्दल आभार मानले. सर्व समारंभ अत्यंत गंमतीत व हास्यविनोदात पार पडला. त्या सहप्रवाशाची सिंगापुरी धर्मपत्नीही उत्साहाने सगळे शूटिंग करत होती, फोटो काढत होती. लग्न समारंभ संपल्याची घोषणा झाली व नवरी आपल्या सख्यांबरोबर आतल्या खोलीत गेली. तिचा ‘नवरा’ (आमचा सहप्रवासी) ही कपडे बदलून आमच्यात येऊन बसला.
— अनामिका बोरकर
Leave a Reply