” जहाँ डाल डाल पर सोनेकी —- ” गाणारा एकेकाळचा प्रिय रफी आताशा वर्षातून एकदा ऐकू येतो. ” ऐ मेरे वतन के लोगो — ” वाल्या लतावर यंदा थोडी सरकारी मेहेरबानी झालीय. ती बिटींग रिट्रीट मध्ये नव्याने ऐकू येणार आहे. बाकी ” हकीकत—, परमाणू ——, उरी —–, ” ची वार्षिक रेलचेल आजही असेल.
” वक्त बरसो का कर चूका जायां —– ” अशी अनाहूत खरी कबुली देतोय राहुल देशपांडे ! आणि राष्ट्रीय जिलेबीच्या रांगेत उभा राहून मी समोरच्या कोविड उध्वस्त “वासुदेवाकडे” सोयीस्कर दुर्लक्ष करतोय.
शाळेतल्या मुली तीन रंगांचे दुपट्टे ओढून जाताहेत ध्वजवंदनाला आणि समोर सगळे पुरातन ज्येष्ठ नागरीक ठेवणीतले झब्बे-पायजमे घालून नटून -थटून थंडीत गारठलेल्या राष्ट्रध्वजाला सलाम करताहेत. त्यांना (ज्येष्ठ नागरिकांना) उब द्यायला एका राजकीय व्यक्तीने (निवडणुका जवळ आल्या आहेत) चक्क गरमागरम चहाची सोय केलीय.
बाकी ध्वजवंदन, वारंवार झाल्याने पाठ होत गेलेली भाषणे, टीव्ही वरील परेड तसं ” नेमेचि येतो —- ” टाईप. त्यांना सलाम,राष्ट्रगीत ! रंगीत फुगे विकणारे सिग्नलवरील आशाळभूत, संधीसाधू विक्रेते हेही परिचयाचे.
वारंवार ११००० फुटांवरील उणे पस्तीस तापमानात झेंडावंदन करणारे आमचे शूरवीर दाखविले जाताहेत आणि आपल्या श्वानालाही उबदार कपडे घालून सकाळच्या फेरीला निघालेली ललना मला “सुप्रभात ” म्हणतेय.
७३वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply