आंग्रे काळात अष्टागरातील नागाव ग्रामातील कर्तबगार व्यक्तीमध्ये साबाजी तुकाजी चिटणीस व कृष्णाजी तुकाजी चिटणीस या कायस्थ समाजातील पुरुषांचा विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. त्या काळात खार जमिनी लागवडीस आणण्याचा उपक्रम साबाजी व कृष्णाजी या चिटणीस बंधुद्वयांच्या भगीरथ प्रयत्नांनी सिध्दीस गेला हे मोठ्या अभिमानाने नमूद करावयास पाहिजे. कोकणच्या जीवनात खाऱ्या जमिनींचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या बंधुद्वयांच्या या कर्तृत्वाला आदरपूर्वक अभिवादन करावयास पाहिजे.
नागावातील कर्तबगार व्यक्तींत साबाजी तुकाजी चिटणीस व त्याचा भाऊ कृष्णाजी तुकाजी अविस्मरणीय आहेत. साबाजी प्रभूचे नाव आंगऱ्यांच्या इतिहासात इ.स. १७०७ पासून इ.स. १७७१ इतका दीर्घकाळ येते. इ.स. १७७१ ऑगस्ट ४ रोजी त्याचे पुण्यात देहावसान झाले. त्याने कान्होजी, सेखोजी, मानाजी व राघोजी या चार सरखेलांची कारकीर्द पाहिली, अनुभवली, चालविली. इ.स. १७३२ त तो सेखोजी आंगऱ्यांचा दिवाण होता. कान्होजींच्या कारकीर्दीत त्याने अनेक महत्वाची कामे केली. मुत्सद्दी म्हणून त्याचा अनेक ठिकाणी गौरव केला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. इ.स. १७६८ मध्ये त्यांचे व राघोजी आंगऱ्यांचे बिनसल्यामुळे त्याने कारभार सोडला व तो पुण्यास जाऊन राहिला. साबाजीचे खार जमिनींच्या विकास कार्यातील कर्तृत्व नमूद करणारा इतिहासातील मूळ परिच्छेद खाली उद्धृत केला आहे.
–“१) या थोर पुरुषाचे कोकणावर महान उपकार आहेत. इ.स. १७३९-४० मध्ये साबाजीने तपे श्रीगाव येथे दर्यागर्क आणि विहेगर्क असलेली खांचली नावाची खार बंदिस्त केली. गर्क म्हणजे बुडालेली. जेथे पूर्वी खारी जमीन होती तेथे पाणी येऊन खाजण माजले होते व खाऱ्या जमिनीत उत्पन्न होणारी जंगले वाढली होती. या बेवारशी जागेस भातजमीन बनविण्याच्या दृष्टीने त्याने बंदिस्ती केली व उत्पन्न काढण्यास प्रारंभ केला.
२) चौलच्या सुभाटात पूर्वी मौजे जाहिरे उर्फ वहागाव नावाचे बंदर खाडीच्या काठी होते ते ओहरून तेथे खाजण तयार झाले असे पाहून साबाजी व कृष्णाजी यांनी १५ नोव्हेंबर १७५५ रोजी गावठाणचे पूर्वेस खार बांधली. मानाजी आंग्रे यांनी खार बांधण्यास प्रोत्साहन दिले. खारीच्या बाहेरील बांध (म्हणजे कोटा) चांगला मजबूत चुनेगच्ची बांधला होता. पण पावसाळ्यात पाण्याच्या वेगाने बांध दोन वेळा फुटला व साबाजीचे दोन प्रयत्न व्यर्थ गेले. तेव्हां साबाजीने पावसाच्या पाण्याचा नेट नाहीसा करण्याकरिता गावचे पूर्वेकडे असलेले खडक सुरुंग लावून फोडले. जोरदार पावसाळी प्रवाहास नवीन मार्ग करून दिला व खार तिसऱ्यांदा बांधून काढली. या कामी त्यास दहा हजार रुपयाहून जास्त खर्च आला. त्याच्या या दीर्घ प्रयत्नाकडे अनेकांचे लक्ष होते. व खार पक्की झाल्यावर त्याला फार मोठी प्रसिध्दी मिळाली.
३) जदीद खार म्हणजे नवी खार व ४) नऊदर वगैरे आणखी नवी स्थळे साबाजीच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक बेवारशी, बेरकमी म्हणजे ज्यांतून उत्पन्न होणार नाही अशी बाह्यतः परिस्थिती वाटेल अशा जागी साबाजीने नवे नवे शिलोम निर्माण केले व ते दस्तुरात आणले.
साबाजीच्या प्रयत्नांस साथ देण्याचे कार्य अनेकांनी केल्यामुळे अष्टगरात साबाजीच्या दीर्घ आयुष्यातच पुढील खारजमिनी तयार झाल्या १) खार खारपूर (इ.स. १७१८-१९), २) खार मेढेखार (१७२१), ३) मांडवे येथील खार (१७५५ ऑगस्ट), ४) चावरे येथील खार (१७५९), ५) चेअल येथील खार (१७६०), व ६) चिंचोटी येथील खार दुधाळे (१७६४-६५) सारांश साबाजी तुकाजीने शेतीबाबतचे एक नवे पर्व अष्टगारात सुरु केले. नंतरच्या काळातही कितीतरी खारी आंग्रे राजवटीत बांधल्या गेल्या. खारी बांधण्याची ही प्रेरणा साबाजीची आहे या कामात त्याचा भाऊ कृष्णाजी याचाही भाग आहे. खारीमुळे आंग्रे राजवटीत बाताचे उत्पन्न भरपूर वाढले व लोकांचे जीवन सुखी होण्यास मदत झाली. खार जमिनीचा प्रश्न हा कोकणच्या जीवनमरणाचा प्रश्न पूर्वी होता. पण तो तीव्र नव्हता. आज तो तीव्रतम झाला आहे. अशा काळात साबाजीचे स्मरण होणे व त्याने दाखविलेल्या बिनतोड, विधायक मार्गाची आठवण होणे स्वाभाविक आहे. ”
सुधाकर शां. चिटणीस, नागांव – अलिबाग
संदर्भ: गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे प्रकाशित, शां.वि. आवळसकर लिखित ग्रंथ
कायस्थ वैभव या अंकातून संकलित
संकलक : शेखर आगासकर
Leave a Reply