नवीन लेखन...

चित्रभाषा

मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. उपकरणे व संदेशाच्या मर्यादा यातून विचार, प्रतिक्रिया व्यक्त करण्यावर बंधने आली. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.

बदल घडवून आणणारे ते संक्रमण. सांकेतिक प्रणाली हे एक संक्रमण आहे, व्यक्त कसे व्हावे या तंत्राचे. काही काळाने सांकेतिक प्रणाली ही जागतिक भाषेची लिपी बनेल. जगभर प्रसिद्ध पावणारी संपर्कसाधने एकच भाषा, एकच लिपी यांचे युग आणतील. संक्षिप्त शब्दांचे कोश, चित्रकोश तयार होतील. तांत्रिकदृष्ट्या मोठा पल्ला आपण गाठलेला असेल. झटपट संपर्क, छोटा संदेश, वेळेची बचत व पर्यायाने काम मार्गी लावण्याची वाढलेली क्षमता हे बदल दिसतील.

सांकेतिक प्रणाली, इमोजि यातून व्यक्त केलेली मतं खरोखरीच आपल्या मनीचं सांगत असतात की त्यात टक्केवारी असते? असल्यास किती? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या फंदात मत व्यक्त करणारा पडत नाही. तो भाव-भावनांना साजेशी इमोजी निवडतो. हर्ष, खेद, प्रेम वगैरे भावना तसेच आवड-निवड, पाठिंबा-विरोध, स्तुती-निंदा या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी इमोजी आहेत. काही मर्यादेत भावनांची पातळी दर्शविता येते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत उपकरणांनी वेगाने प्रगती केली आहे. पण व्यक्त होण्याच्या बाबतीत आपण उलट दिशेने जात आहोत. एकच उदाहरण पुरेसे आहे या संदर्भात. एखाद्याच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष, फोनवर वा संदेशाच्या रूपाने शुभेच्छा पाठविल्या जातात. संदेशासाठी ‘HBD’ हे संक्षिप्त रूप रूढ झाले आहे. काहीजण फुले, केक, आइस्क्रीम यांची चित्रे पाठवतात. चार फुले व तीन केक पाठविणार्‍याची श्रेणी ही दोन फुले व एक केक पाठविणार्‍यापेक्षा वरची ठरते का? हा संदेश ज्याला मिळतो ती उत्सवमुर्ति हे ठरवीत असेल का? सख्ख्या भावाने पाठविलेला ‘HBD’ व दूरच्या नातलगाने पाठविलेला ‘HBD’ सारखाच असतो का? वरकरणी सारखाच आहे. मग भावात व लांबच्या नातलगात काहीच का फरक नाही? फरक आहे. हा संदेश जरी शाब्दिक पातळीवर सारखा असला तरी भावनिक पातळीवर त्यातील फरक समजू शकतो. भावाने फोन केला वा भेटला तरच ती पातळी समजेल. एका प्रकारच्या रेग्युलेटरने १ नंतर २ ने निश्चित होणार्‍या वेगाने पंखा फिरतो, पण दुसर्‍या प्रकारच्या रेग्युलेटरने १ व २ च्या मधल्या वेगानेही तो फिरू शकतो. इमोजी पहिल्या प्रकारचा असल्याने, आपल्या भावनांचे Rounding up करतो. हातात हात घेतल्यावर अनुभवास येणारा दाब, हात हलविण्याची क्रिया व वेळ यांची अनुभूती हस्तान्दोलनाची इमोजी देईल काय? नाही. प्रत्यक्ष भेट होणे शक्य नसल्यास आपण संदेशाचा आधार घेतो, पण भावनिक पातळीवर तडजोड करून.

नव्याला विरोध या भूमिकेतून हे प्रतिपादन केलेले नाही. का असावा सुलभतेला विरोध? सर्वजण याचे लाभार्थि आहेत. आपल्या भावनांचे मोजमाप करणारी मेंदूतील प्रणाली या संक्रमणात कशी व कोणत्या दिशेने बदलेल याचा शोध घेता यावा म्हणून केलेले हे विवेचन आहे.

— रविंद्रनाथ गांगल 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..