चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला. वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या “गजगौरी’ मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. १९३१ मध्ये सांगलीत “बलवंत चित्रपट कंपनी’ सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम चंद्रकांत यांना मिळालं.
पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे चंद्रकांत यांची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या दीनानाथांनी चंद्रकांत यांचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं. बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे “सावकारी पाश’ या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.
गोपाळाचं “चंद्रकांत’ असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. “राजा गोपीचंद’ या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी “चंद्रकांत’ हे नाव लावण्यात आलं. “सावकारी पाश’ या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. “सावकारी पाश’ हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
“थोरांताची कमळा’ या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी “शेजारी’ चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टियस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. “छत्रपती शिवाजी’ चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली.
व्ही. शांताराम यांच्या “शेजारी’ या चित्रपटापासून चंद्रकांत “प्रभात’मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. “युगे युगे मी वाट पाहिली’, “पवनाकाठचा धोंडी’, “संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. “खंडोबाची आण’ या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.
“रामराज्य’ चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. “स्वयंवर झाले सीतेचे’मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा “ग्राफ’ टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच “रामराज्य’ या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा “बनगडवाडी’ हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.
चंद्रकांत हे नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. “भरतभेट’ चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही.
निसर्ग हाच श्वाहस मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली. स्वतः चित्रीत केलेली ३५० ते ४०० चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी १९८४ मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत ३० लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे “चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया’ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो.
चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्मीलरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं. आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी “राम-लक्ष्मण’ नावानं ओळखली जायची.
चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मंदार जोशी
चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
Leave a Reply