नवीन लेखन...

चित्रपटविषयक ‘एनलाईटनमेंट’ घडवणार फिल्म सोसायटी चळवळ

सुरुवातीला ज्यावेळी जगभरातील सिनेमा बघण्याची प्रचंड ओढ आणि भूक निर्माण झाली त्यावेळी फिल्म सोसायटीने चक्क पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिलं. चांगल्या वाईटचे कंगोरे माहीत नसताना सिनेमा निवडीसाठी तीच दिशादर्शक ठरली. त्यातूनच जागतिक सिनेमाने स्वतःकडे, भवतालाकडे बघण्याचे डोळस अंजन दिले.

मयूर प्रकाश कुलकर्णी – फिल्म सोसायटी कार्यकर्ता

साभार : रुपवाणी


चळवळ म्हणजे काय हे माहीत नसण्याचा तो काळ. मग सिनेमाविषयक चळवळ हा तर दूरचाच विषय. आपल्या देशात सिनेमा आणि क्रिकेटची नशा आपण जाणते व्हायच्या आधीच चढते. मग मी त्याला अपवाद कसा असेन? आजच्यासारखा सिनेमा स्वतःहून आपल्या डोळ्यासमोर येण्याचा तो काळ नव्हता. आठवड्यातून एकदा टीव्हीवर येणारा एखादा जुना सिनेमा, गणपती-शिवजयंतीला गल्लीत येणारा व्हिसीआरवरचा सिनेमा आणि अगदीच भिशीत पैसे साठले तर मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघायला मिळायचा. पेपरमधल्या सिनेमाच्या जाहिराती डोळे भरून पाहतानादेखील सुख मिळायचं. पुढे वय वाढेल तसं सिनेमाशी गट्टी वाढतच गेली. वयाच्या प्रत्येक टप्प्याच्या मानसिक आंदोलनांना सिनेमात हेच उत्तर असायचं. अडीच तासाची घटिका आयुष्यभराची असावी असा आग्रह मन धरायचं. हळूहळू सिनेमा, जगण्याची अतिरंजक स्वप्न दाखवू लागला. हा इतिहास संक्षिप्तपणे सांगण्याचा अट्टाहास यासाठी की आज गेली १५ वर्ष मी फिल्म सोसायटीच्यारूपाने चित्रपट चळवळीचा एक घटक असलो तरी मी मूळचा एक मनोरंजनप्रेमी सामान्य भारतीय प्रेक्षकच होतो.

फिल्म सोसायटीशी माझं नातं केवळ ‘सिनेमावरचं प्रेम’ या एका भावनेने निर्माण झालं.

ओशो म्हणतो “एनलाइटमेन्ट हा एक असा क्षण असतो ज्यांनंतर तुम्हांला तेच कालच जग पूर्णपणे वेगळं दिसतं, जाणवत आणि तुमच्यातील तुमचा नव्याने जन्म होतो.” माझाही नवा जन्म असाच काहीसा झाला असावा आणि तो क्षण फिल्म सोसायटीच्या साक्षीचाच एखादा असावा अशी माझी खात्री आहे. कलामहाविद्यालयात शिकताना सिनेमाच्या विविध अंगांचे एक कलाकार म्हणून कुतूहल खूप वाढत होतं. त्याचा आवाका समजून घेण्यासाठी मी धडपडत होतो. पण एखाद्या गोष्टीचा आवाका समजून घेणं म्हणजे त्याचा पसारा समजणं इतपतच माझी झेप जात होती. सिनेमाविषयक माहिती, अनुभव अंतर्बाह्य समजून घेत स्वतःच्या तर्काने त्याविषयीची जाण वाढण्याची प्रक्रिया घडताना दिसत नव्हती. मनावरील इतक्या वर्षांच्या लोकप्रिय मराठी-हिंदी सिनेमाच्या संस्कारांमुळे मला मर्यादा येत होत्या. अशावेळी फिल्म सोसायटीच्या रूपानं मला जणू ब्रम्हास्त्रच मिळालं.

साधारणतः २००३चं साल असावं. केवळ मनोरंजनात्मक सिनेमा सोडून वेगळ्या धाटणीच्या सिनेमानं पाहणं सुरू केलं होतं. सिनेमाविषयीच कुतूहल नव्याने जागृत झालं होतं. या सिनेमांच्या गोष्टी वेगळ्या, ती सांगण्याची पद्धतही निराळीच. तसं काहीसं पाहावं याची इच्छा वाढू लागली होती. त्याच दरम्यान गोव्यात भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत असल्याचे कळलं. तिथं नेमकं काय काय घडत याची तशी पुरेशी कल्पना नव्हती. भरपूर सिनेमे पाहायला मिळणार आणि गोवा माझ्या कोल्हापूर शहरापासून जवळ हे जाण्याचं सुलभ कारण. आपण ज्या नव्या सिनेमांच्या नादी लागलो आहे त्यांचा जगभरातील सिनेमांचा खजिनाच तिथं सापडेल हे माहिती नव्हतं. मग काय वेड लागल्यासारखे कधी या देशाचा तर कधी त्या देशाचा असं करत ढीगभर सिनेमे पहिले.

तिथंच फिल्म सोसायटीच्या चळवळीची ओळख झाली. असे महोत्सव वर्षातून एकदा भरतात पण या फिल्म सोसायटी अशा प्रकारचे सिनेमे लोकांसाठी वर्षभर दाखवत असते. रसिकांना सिनेसाक्षर करू पाहते याचं खूप नवल वाटलं. कारण लोकांना सिनेमा दाखवण्याच्या या प्रकारात थिएटर खिडकीसारखा कोणताही गल्लाभरू व्यवसाय नव्हता. होतं ते फक्त सिनेमावरच प्रचंड प्रेम आणि तो इतरांनी पाहावा यासाठीचा प्रामाणिक खटाटोप, वेळप्रसंगी पदरमोडही. सुरुवातीला तरी माझ्यासाठी जगभरातला निवडक सिनेमा पाहण्यासाठी फिल्म सोसायटी आणि फेस्टीवल्स हा एकमेव मार्ग होता.

पुढे माझ्या शहराच्या म्हणजे कोल्हापुरातील कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीशी मी आपसूकच जोडलो गेलो. आदरणीय कै. चंद्रकांत जोशी, दिलीप बापट यांच्या नेतृत्वाने ही फिल्म सोसायटी अनेक आर्थिक, तांत्रिक, सामाजिक संकटांना तोंड देत कोल्हापुरात स्थिरावत होती. कोल्हापूर हे जरी मराठी चित्रपटांचं माहेरघर असलं तरी इथं जागतिक सिनेमाचा रसिकवर्ग निर्माण कारण हे काम खूप कठीण होतं. या दोघांनी ते शिवधनुष्य मोठ्या आत्मविश्वासाने पेललं. सोबतीला अनेक सामाजिक चळवळींमध्ये सहभाग असणारे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी हे बलस्थान होते. कोल्हापुरातील कला-साहित्य चळवळीतील जाणत्या व्यक्तींचाही या टीममध्ये सहभाग होता. सर्वांचा नामोल्लेख इथं शक्य नाही. आमच्यासारख्या तरुणांना या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर -सारख्या छोटेखानी शहरात जागतिक सिनेमाचं विश्व खुले झालं. कधी स्क्रिनींग तर कधी ग्राफिक डिझाईनच्या सहभागाने माझा फिल्म सोसायटीच्या कामात चंचुप्रवेश झाला आणि पुढे या सर्वांनी मला या सिनेकुटुंबात सामावून घेतलं. सोसायटीच्या मासिक स्क्रिनींगचे ‘इन्टिमेशन फोल्डर’ची अनेक डिझाईन्स मी केली. थीम बेस असणाऱ्या या इन्टिमेशनचं इतर फिल्मसोसायटी व मान्यवर रसिकांनी कौतुक केलं.

कालांतराने तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या खंबीर प्रशासकीय पाठिंब्यामुळे आमच्या फिल्म सोसायटीने एका आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्याचे धाडस केलं. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म फाउंडेशन, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय अशा शिखर संस्थांच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली.

सुरुवातीला काही वर्ष ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’ आयोजित केल्यानंतर २०१३पासून कोल्हापूरचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. हे सारे महोत्सव कोल्हापूर रसिकांसाठी पर्वणी ठरले. चित्रपट निर्मितीचे औपचारिक शिक्षण न घेतल्याला माझ्यासकट अनेक नवोदित फिल्म-मेकर्ससाठी तर ते अभ्यासवर्गच आहेत. परिणामी आज कोल्हापुरातील जी तरुण पिढी लघुपट आणि चित्रपट निर्मितीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यश कमावतेय त्यामागे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि आयोजित फेस्टिवल्स यांचे योगदान आहे.

फिल्म सोयायटीचे काम करताना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चित्रपट निवड, सजावट, स्क्रिनींग, पब्लिसिटी या विभागात मी आजही आवडीने काम करतो आहे. या वाटचालीत माझ्यासारखीच सिनेवेडी माणसं भेटली, लेखक-दिग्दर्शक भेटले, काहींशी घट्ट मैत्री झाली. मग सिनेमाच्या मनसोक्त चर्चा, माहितीपासून – आवडता सिनेमा पेनड्राईवमध्ये देण्यापर्यंतची मोकळी देवाणघेवाण यातून वेगळी नाती जोडली. हे सारे लिहिताना खरंतर चित्रपट चळवळीसंबंधी गेल्या १५ वर्षातील अगणित प्रसंग, अनुभव डोळ्यासमोर येताहेत. मला ते मोजक्या शब्दात मांडणं अवघडही जातंय. कारण तो सारा प्रवास माझ्यासाठी खुपच उत्कट आणि जिवंतपणाचा आहे. एखाद्या महोत्सवात पाहिलेला सिनेमा आवडल्यास तो आपल्या शहरातील लोकांनीही पाहावा यासाठी केलेली प्रचंड धडपड आणि सिनेमा बघितल्यानंतर थेटरमधून बाहेर येताना लोकांचे दिसणारे रोमाचिंत चेहरे. यातून मिळणाऱ्या समाधानाचे शब्दांकन करण मला शक्य नाही.

चित्रपट चळवळीमुळे चित्रपट रसग्रहणाच्या पातळीवर मोठा बदल माझ्या व्यक्तिमत्त्वात घडला.

सुरुवातीला ज्यावेळी जगभरातील सिनेमा बघण्याची प्रचंड ओढ आणि भूक निर्माण झाली त्यावेळी फिल्म सोसायटीने चक्क पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिलं. चांगल्या वाईटचे कंगोरे माहीत नसताना सिनेमा निवडीसाठी तीच दिशादर्शक ठरली. त्यातूनच जागतिक सिनेमाने स्वतःकडे, भवतालाकडे बघण्याचे डोळस अंजन दिले. एक सिनेरसिक होण्यासोबतच एक दृश्य कलेचा कलाकार म्हणूनही माझी जडणघडण होण्यात चित्रपट चळवळीचे योगदान आहे. माझ्यासाठी कित्येक वर्षे फिल्म सोसायटी आणि महोत्सव हेच सिनेमा माझ्यापर्यंत पोचण्याचे महत्त्वाच्या स्रोतांपैकी राहिले आहेत.

सिनेमामुळे थेट समाज बदलेल का? यावर मला शंका आहे पण सिनेमामुळे एक माणूस नक्कीच सकारात्मक बदलू शकतो यावर माझा दृढ विश्वास आहे. अशी अनेक माणसे एकत्र येऊन सुसंस्कृत समाज नक्कीच घडतो. सिनेमाने मला जगण्याचं भान दिलं, माणूसपणाची जाण दिली. सिनेमाच माझ्या आयुष्याचा दिग्दर्शक आहे आणि चित्रपट चळवळ, फिल्म सोसायटी, महोत्सव हे जणू त्याचे लाइन प्रोड्युसरच. आज जगातील कानकोपऱ्यातील सिनेमा तुमच्या डोळ्यापर्यंत स्वतःहून येण्याइतकी कमाल सहजता तंत्रज्ञानाने केली आहे. तरी फिल्म सोसायटी, चित्रपट महोत्सव, फिल्म कब या आणि अशा माध्यमातून उभ्या राहणाऱ्या चित्रपट चळवळीचे कार्य मला कालातीत वाटते.

मयूर प्रकाश कुलकर्णी
फिल्म सोसायटी कार्यकर्ता

साभार : रुपवाणी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..