१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला.
साबानंद मोनप्पा उर्फ एस. एम. पंडित यांचा जन्म १९१६ साली गुलबर्गा येथे झाला. त्यांचा लहानपणापासून चित्रकलेकडे ओढा होता. त्यांचे पहिले गुरू होते, शंकरराव आळंदकर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे धडे गिरविल्यावर चित्रकलेचा डिप्लोमा घेण्यासाठी ते चेन्नईला गेले. तीन वर्षांनंतर गुलबर्ग्याला आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईला प्रस्थान केले.
मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी जे. जे. चे प्रिन्सिपाॅल ज्येष्ठ चित्रकार एम. व्ही. धुरंधर होते. ब्रिटीश प्राध्यापक साॅलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा पंडितांना लाभ झाला. ब्रिटीश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान इथे त्यांनी प्राप्त केले.
हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९३८ मध्ये त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात चित्रपटांची पोस्टर्स करण्यातून केली. ‘फिल्म इंडिया’ या हिंदी चित्रपटविषयक मासिकाचे संपादक बाबुराव पटेल यांच्या मासिकांच्या मुखपृष्ठांचे त्यांनी अनेक वर्षे काम केले. १९४४ साली शिवाजी पार्क येथे स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला. याच एस. एम. पंडितांच्या स्टुडिओमध्ये रघुवीर मुळगावकर यांनी सुरुवातीची काही वर्षे उमेदवारी केली.
याच कालावधीत पंडितांनी ‘राम सीता’ हे चित्र पार्ले कंपनीच्या कॅलेंडरसाठी काढले, ते प्रचंड गाजले. कंपनीने त्या कॅलेंडरच्या साठ हजार प्रती काढून विकल्या. इथूनच पंडितांचे ‘कॅलेंडर पर्व’ सुरु झाले. त्यांनी चितारलेल्या देवदेवता व पौराणिक विषयावरील चित्रांना प्रचंड मागणी होती. देशभरातून त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरु झाला. त्या काळात ते रोज पंधरा ते सोळा तास बैठक मारुन चित्रं साकारत होते. कॅलेंडरच्या प्रतीं हजारोंच्या नव्हे लाखोंच्या संख्येने छापली जाऊ लागली. भारतातील घराघरात पंडितांची कॅलेंडर विराजमान झाली.
त्या काळात मेट्रो गोल्डन मेयर्स या हाॅलिवुड कंपनीच्या इंग्रजी चित्रपटांची पोस्टर्स अमेरिकेतून येत असत. ही पोस्टर्स इथंच करु शकेल अशा चित्रकाराच्या शोधात ती कंपनी होती. त्यासाठी पंडितांचे काम पाहून त्यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक पोस्टर कलरचा वापर पंडितांनी केला. मेट्रो सिनेमा थिएटरच्या शोकेसमध्ये पंडितांची पोस्टर्स झळकू लागली व ती रसिकांची आकर्षण ठरली. त्यानंतर भारतातील इतर ठिकाणीही पोस्टर्स निर्मिती सुरु झाली.
चित्रपटसृष्टी व कॅलेंडरच्या विश्वात, पंडितजी व्यस्त असले तरी त्यांचा पिंड हा अध्यात्मिक होता. ते कालीमातेचे उपासक होते. ज्योतिष विद्येचे अभ्यासक होते. १९६६ मध्ये त्यांनी गुलबर्गा येथे कालीमातेची व शिवाची प्राणप्रतिष्ठा केली व घर बांधून आर्ट गॅलरी उभारली.
१९६८ मध्ये व्यावसायिक कामातून निवृत्ती स्वीकारुन पंडितांनी अतिशय काव्यात्मक, वास्तववादी दर्शन घडविणारी भव्य तैलचित्रे साकारली. त्यासाठी आपल्या पौराणिक कथांमधील सर्वज्ञात विषय त्यांनी निवडले. त्याचबरोबरीने अतिशय दर्जेदार व्यक्तिचित्रं त्यांनी साकारली. राजा रविवर्मा नंतर पौराणिक विषय हाताळणारे ते एकमेव ताकदीचे चित्रकार ठरले.
कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकासाठी विवेकानंद यांचे तैलचित्र करण्याआधी पंडितांनी रामकृष्ण परमहंस व शारदा माता यांची चित्रं तयार केली. अंतर्मुख होऊन विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल चिंतन मनन करुन अध्यात्मिक साधना केली. त्यांचे फलस्वरुप त्यांच्या दृष्टीपुढे जे साक्षात्कारी दर्शन झाले, ते त्यांनी भव्य कॅनव्हासवर उतरविले. हे चित्र म्हणजे व्यक्तिचित्रण प्रकाराला, अभिजात कलाकृतीच्या उच्चतम पातळीला नेणारे एक आदर्श उदाहरण आहे.
१९७८ मध्ये लंडनला झालेले पंडितांच्या चित्रांचे प्रदर्शन खूप गाजले. त्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी आप्तेष्टांच्या आग्रहाखातर मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवले. त्याला रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यानंतर हेच प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कलादालनात भरविले होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मला हे प्रदर्शन व साक्षात एस. एम. पंडितांना पहाण्याची संधी मिळाली. युद्धभूमीवर अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण हे भव्य चित्र, स्वामी विवेकानंद व अशी अनेक चित्रे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. पंडितजी एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे धीरगंभीर दिसले होते…
३० मार्च १९९३ रोजी आपल्या अलौकिक चित्रकलेचं भांडार मागे ठेवून वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी चित्रतपस्वी पंडितजी स्वर्गस्थ झाले.
महाराष्ट्रातील दीनानाथ दलाल, एस. एम. पंडित व रघुवीर मुळगावकर हे तीन चित्रकार खऱ्या अर्थाने कलात्रिमूर्ती होते! त्यांनी जी कलासाधना केली आहे, ती पिढ्यानपिढ्या नवोदित चित्रकारांना प्रेरणा देत राहील…
– सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply