मध्यप्रदेशातील चित्रकूट ही श्रीरामांची कर्मभूमी आणि नानाजी देशमुखांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांची जागा आहे. ‘विवेक व्यासपीठा’तर्फे ‘चित्रकूट प्रकल्प यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. कुर्ला टर्मिनस ते चित्रकूट ही यात्रा-स्पेशल गाडी दिमाखात प्लॅटफॉर्मवर उभी होती. १७ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक डब्याला नद्यांची नावं देण्यात आली होती. मंदाकिनी, दमणगंगा, कावेरी, गंगा, यमुना, ही नावं झळकत होती व प्रत्येक डब्यावर ऋषितुल्य नानाजी देशमुखांचा रूबाबदार फोटो लावलेला होता. तब्बल ८५० प्रवासी २० ते २५ सक्रिय कार्यकर्त्यांच्या मदतीने २२ तासांचा १२०० कि.मी. प्रवास सुखात पूर्ण करणार होते. प्रत्येक प्रवाशाला गळ्यात अडकविण्याचं कार्ड दिलेलं होतं. प्रत्येकाचं नाव, डब्याचं नाव, आसन क्रमांक त्यावर दिलेला होता. प्रत्येक डब्याजवळ उभे असलेले कार्यकर्ते, ज्येष्ठांना डब्यांत चढण्यात मदत करत होते. संपूर्ण गाडी विवेक व्यासपीठानं आयोजित केलेली असल्यामुळे त्यांनी जे थांबे ठरविले होते तिथेच गाडी थांबणार होती. ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, हेच फक्त थांबे. त्या थांब्यांच्या परिसरातील प्रकल्प पाहणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढण्याकरता ही उत्तम सोय केलेली होती. प्रत्येकाला चित्रकूट प्रकल्प, रामदर्शन यांबद्दल माहिती असलेली मासिकं भेट देण्यात आली. नानाजींच्या कार्याची माहिती प्रत्येकापर्यंत पोचविण्याचा हा अनोखा उपक्रम होता. सत्तरी ओलांडलेले २० ते ३० टक्के प्रवासी काठीचा आधार घेत थेट रत्नागिरी, औरंगाबादपासून आले होते. लाडवांसह सर्व जेवणाचे सीलबंद ट्रे आणि चहा-नाश्ता अशा गोष्टी अगदी हातांत आणून देणाऱ्या तत्पर कार्यकर्त्यांची साखळी १७ डब्यात सज्ज होती. संघ परिवाराच्या शिस्तीचा अनुभव लहानपणापासून घेतलेला होता. तीच शिस्तबद्धता आज संपूर्ण गाडीत दिसत होती. मध्यातील एका डब्यात संपूर्ण ऑफिस थाटलेलं. रात्री प्रत्येक डबा आतून बंद केल्याने सुरक्षितता १०० टक्के होती. सतना रेल्वे जंक्शन हे मध्य प्रदेशातील रेल्वे मार्गावरचं महत्त्वाचं स्टेशन. या स्टेशनात आमची गाडी ३ दिवस उभी होती. येथून चित्रकूट ८० कि.मी. अंतरावर होतं. चित्रकूटला जाण्यासाठी स्टेशनबाहेर २० बसेस क्रमांक देऊन उभ्या केलेल्या होत्या. प्रत्येक प्रवाशाची सोय केलेली होती. कुठेही तसूभर चूक होत नव्हती. चित्रकूट येथे रेल्वे स्टेशन आहे, पण त्या ठिकाणी १७ डब्यांची गाडी उभी ठेवण्याची सोय नसल्याने ही व्यवस्था करण्यात आली होती.
चित्रकूट दर्शनात तीन मुख्य विभाग आहेत. राम, लक्ष्मण, सीता, दशरथ, भरत, हनुमान यांची मंदिरं; तुलसीदास, वसिष्ठमुनींच्या वास्तव्याच्या जागा; कामदनाथ परिक्रमा, राम गुंफा, गुप्त-गोदावरी स्थान, स्फटिक शिला, अनसूया मंदिर, मंदाकिनी घाट, या सर्व रामायणकाळातील वास्तू तिथे उत्तम स्थितीत पाहता येतात.
हा सर्व प्रदेश हजारो वर्षे अतिशय मागासलेला व अत्यंत गरिबी असलेला होता, येथील जनतेची उन्नती करण्याची धुरा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांनी घेतली व ३५ वर्षे अखंड झटत हा प्रदेश सुजलाम् सुफलाम् केला. ‘दीनदयाळ रिचर्स सेंटर’च्या तळमळीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम जोशाने पुढे नेला आहे. ५०० खेड्यांत झालेला कायापालट पाहून आपण थक्कच होतो. टाटांच्या मदतीने ४३ एकरांत उभारलेल्या आरोग्यधामामध्ये संपूर्णपणे आयुर्वेदिक वनस्पतींपासून औषधं बनविली जातात. लहान मुलांना शिक्षण व खेळ दोन्ही एकत्रितपणे साधता येईल अशी ‘नन्हा-नन्ही पार्क’ची योजना, खेडोपाडी वसतिगृह असलेल्या शाळा उभारण्याचे व शिक्षण देण्याचे प्रकल्प ही नानाजींच्या अफाट कार्याची शक्तिस्थळं. ही म्हणजे चित्रकूटला मिळालेली अनोखी देणगी आहे. हे सर्व प्रकल्प रामाच्या आदर्श जीवनाचे द्योतक म्हणून आहेत. या ठिकाणी रामाचा आदर्श सामान्य जनतेपुढे दाखविण्याचा महान प्रकल्प ‘राम दर्शन’ या भव्य पेंटिंग प्रदर्शनातून चित्रकार सुहास बहुलकरांनी उभा केला आहे. त्यासोबत मांडलेली सुवचनं आदर्श जीवनाची मार्गदर्शक आहेत. चित्रकूटला जाऊन हे सारं एकदा तरी अनुभवावं असंच आहे. दोन दिवसांत ७० ते ८० कि.मी. परिसरातील सर्व प्रकल्प पाहताना आम्ही एका वेगळ्याच विश्वात वावरत होतो. ८५० लोकांची राहण्याची, जेवणाखाण्याची उत्तम सोय करणं, परतीचा प्रवास त्याच गाडीने यशस्वीपणे पार पाडणं, यांत विवेक प्रतिष्ठानचं कौतुक करावं तेवढं थोडंच! भारतीय रेल्वे अशा प्रकल्पासाठी खास सोयी उपलब्ध करून देते हे अभिमानास्पद आहे. असे प्रयोग यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरू शकतात म्हणून त्या प्रयोगाचं हे स्मरण!
-डॉ. अविनाश वैद्य
अप्रतिम संकल्पना. आणि सुंदर विश्लेषण