गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…
चिऊताईने एक शक्कल लढवली. तिने आपल्या सर्व बाळांना हातात थाळी घेऊन वाजवायला सांगितली. तिचा असा समज झाला की, त्या थाळ्यांच्या कर्णकर्कश्य आवाजाने कावळा उडून जाईल…
परंतु तसं घडलं नाही. कावळ्याने येतानाच कानात घालण्यासाठी कापसाचे बोळे आणले होते. ते त्याने आपल्या कानात खुपसले. सहाजिकच त्या थाळ्यांच्या आवाजाचा त्याच्यावर काहीएक परिणाम झाला नाही.
चिऊताई हुशार होती, तिने सगळ्या बाळांना समजावून सांगितले की, ‘कुणीही घरटं सोडू नका. हे घरट्यातलं ‘लाॅकडाऊन’ समजा. बाहेर पडलात तर जीव गमावून बसाल.’ त्या असंख्य बाळांमधील काही खोडकर, व्रात्य बाळांनी चिऊताईचं ऐकलंच नाही. ती घरट्याबाहेर पडली. लागलीच त्या कावळ्याने त्यांना ‘गट्टम’ केलं…
त्या दुष्ट कावळ्यानंं चिऊताईला जेरीस आणण्यासाठी आपल्या तोंडावाटे विषारी वायू घरट्यावर सोडला. चिऊताईने आपल्या सगळ्या बाळांना मास्क घालण्याची व्यवस्था केली. सुमारे नव्वद टक्के बाळांनी मास्क घातला. जे विनामास्कचे हिंडत होते, ते त्या विषारी वायूने चक्कर येऊन घरट्याबाहेर पडले, त्यांचा त्या कावळ्याने फडशा पाडला…
एक वर्ष चिऊताईने घरट्यात बसून काढले. ती कंटाळली होती. मात्र हा कावळा घरट्यासमोरुन हलण्याचे काही नाव घेत नव्हता. चिऊताईनं कावळ्याच्या त्या विषारी वायू पासून बाळांचा जीव वाचवण्यासाठी लस तयार केली. तिचा डोस देण्यासाठी यंत्रणा राबविली. मात्र यंत्रणा राबविणारे मतलबी निघाले, त्यांनी लसीचा गोंधळ करुन लसीकरणाचा बोऱ्या वाजवला.
ज्यांना पहिला डोस दिला, त्यांनाच दुसऱ्या डोससाठी २८, ४५, ८४ असे दिवस वाढवत नेले. नंतर लसीकरण केंद्रं बंद ठेवू लागले. बाळं वैतागून गेली. बिचारी चिऊताई कपाळाला हात लावून बसून राहिली.
त्या विषारी वायूने काही बाळं हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली होती. त्यांच्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनं चिऊताईने आणून दिली. त्या इंजेक्शनची काही गुंड बाळांनी पळवापळवी केली. ज्यांना गरज होती त्यांना काळ्या बाजाराने ती विकली…
चिऊताईला नंतर कळविण्यात आलं की, आता रेमडेसिविर वापरु नका. ती गोंधळून गेली. त्या दुष्ट कावळ्यापासून वाचण्यासाठी ती प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होती, मात्र माणुसकी सोडलेली व्यवस्था तिला प्रत्येक वेळी नामोहरम करीत होती…
चिऊताई त्या दुप्ट कोरोना कावळ्याच्या ‘दार उघड’ या कारस्थानाला बळी न पडता अजूनही आपल्या बाळांचं रक्षण करते आहे…ती हिंमत हारलेली नाहीये…तिला खात्री आहे, एक दिवस तो कावळा कंटाळून निघून जाईल व आपली बाळं पूर्वीप्रमाणे बिनधास्त आनंदाने, खेळीमेळीने बागडतील….
© – सुरेश नावडकर
९७३००३४२८४
२२-५-२१.
Leave a Reply