शालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र.
मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील तो दिवस आठवतो. सकाळची वेळ होती. विद्यालयाच्या एका उघड्या दालनातून मी दुसऱ्या जागी जात होतो. अचानक जोराचा पावूस सुरु झाला. पळतच मी शेजारच्या खोलीत शिरलो. ती प्राध्यापकाची खोली होती. त्यावेळी आत कुणीही नव्हते. बाहेर जोराचा पाऊस. मी तात्पुरता अडकून गेलो होतो. आतील टेबलावर एक पुस्तक पडलेले बघितले. Research studies in Organic Chemistry. दोन चार पाने सहज बघितली.
पुस्तकावर कुणाचे नाव नव्हते. मी पण विज्ञान विषय घेऊनच त्या विद्यालयात गेलो होतो. एक विचित्र विचार डोक्यात आला. सभोवतालचे अवलोकन केले आणि ते पुस्तक चक्क उचलून पिशवीत टाकले व पावसातच विद्यालय सोडून घरी आलो. घरी पुस्तक व्यवस्तीत चाळले. माझ्या समजण्यापेक्षा ते खूपच वरच्या दरज्याचे होते. कदाचित ते Higher Studies साठी असावे. मी निराश झालो. थोडीशी खंत वाटली. मला ते त्यानंतर केंव्हाच वाचण्याचा योग आला नाही. एक तर ते पुस्तक Organic chemistry ह्या विषयात प्रबंधासाठी होते आणि माझ्या स्तराला त्याचा कांहीच उपयोग नव्हता. एक निवळ वेडेपणा. फारसा विचार न करता ते तसेच कपाटात ठेवून दिले.
विद्यालयीन, महाविद्यालयीन, आणि वैद्यकीय शिक्षण पुरे केले. शासनाच्या सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करू लागलो. निरनिराळ्या बदलीच्या ठिकाणी रुग्णालयात कामे करावी लागत. पंधरा वर्षाचा काळ गेला होता. एक दिवस एका वृद्ध रोग्याला तपासण्यासाठी मला Emergency Call आला. मी त्यांना बघण्यासाठी गेलो. त्यांचा चेहरा बघताच ते माझ्या परिचित असावे हा भास झाला. परंतु ओळख लक्षात आली नाही. जवळच त्यांचा मोठा मुलगा होता. मी त्यांचे केसपेपर्स बघितले. त्यांचे नांव बघताच माझी शंका खरी ठरली. ते नांव माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. ते माझे विज्ञान शाखेतील प्राध्यापक होते. मी त्यांना ओळखणे नैसर्गिक होते. परंतु ते मला त्यांचा विद्यार्थी म्हणून ओळखणे ह्याची शक्यता कमी होती. प्रथम मी त्यांना तपासले. योग्य ती औषधी चालू करण्याच्या सूचना दिल्या. नंतर लगेच मी त्यांना स्पेशल रूम मध्ये हलविले.
” सर तुम्ही Chemistry चे प्राध्यापक ना ? “ त्यांना कुणीतरी ओळखतो हे जाणताच त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद व्यक्त झाला. आता पेशंट आणि डॉक्टर यांचे नाते न राहता पूर्वीचे शिक्षक व शिष्य असे पवित्र नाते समोर आले. त्यांची सेवा करण्याचा योग मिळाला. ते बरे होताच मी त्यांना माझ्या घरी आणले. खूप गप्पा आठवणी चाळवल्या गेल्या. त्याच ओघांत मी लपवून आणलेल्या त्या पुस्तकाबद्दलची गमतीची घटना सांगितली.
” ते पुस्तक कां ? Jenar Workman ह्यांनी लिहिलेले Research studies in Organic हे पुस्तक. आहो ते तर माझेच होते. त्यावेळी मी खूप शोधले. कुठेतरी हरवले गेले म्हणून, नंतर त्याचा विचारच सोडून दिला. ”
मी लगेच कपाटातून ते पुस्तक आणले आणि त्यांच्या हाती देत म्हटले ” सर मला माझ्या त्या अविचारी घटने बद्दल क्षमा करा. “ प्राध्यापक हसले. माझा हात हाती घेत ते म्हणाले ” अशा लहान सहान गोष्टी जीवनांत घडतच असतात. हेच अनुभव माणसाला परिपक्वतेच्या मार्गावर घेऊन जातात. हे
पुस्तक आता माझ्याकडून तुम्हास सप्रेम भेट समजा.”
आज मला त्या चुकीच्या व अविचारी गोष्टीचे परिमार्जन झाल्याचे जाणवले. त्याच माझ्या प्राध्यापकांच्या मदतीने मी विज्ञान शाखेमधली निरनिराळ्या लेखकांची २०० पुस्तके त्याच महाविद्यालयांतील वाचनालयाला भेट म्हणून दिली. केवळ एक समाधान.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply