प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास ‘धरावे’ असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली. लौकिकार्थाने एका अक्षराचा बदल ही फार क्षुल्लक बाब ठरते. परंतु एरवी क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी जेव्हा एखाद्या संदर्भाशी जोडून येतात तेव्हा त्यांच्यात इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य येऊ शकते. आनंदीबाईंनी ‘ध’ चा ‘मा’ केला आणि पेशवाईचा व पर्यायाने महाराष्ट्राचा तसेच देशाचा इतिहासच पालटला. प्राणावर बेतलेल्या एखाद्याने अभय मागावे आणि समोरच्याने ते देऊन टाकावे, असे बरेचदा होते. ती एक सर्वसामान्य घटना ठरते, फारसे महत्त्व आणि मूल्य नसलेली. परंतु अशी सामान्य घटना जेव्हा एखाद्या विशालकाय राष्ट्राला हजार वर्षाच्या गुलामीत लोटून जाते तेव्हा त्या घटनेशी जुळलेला संदर्भ अनन्यसाधारण ठरतो. गझनीच्या मेहमुदला अभयदान देताना पृथ्वीराज चौहानला तरी कुठे कल्पना होती की, आपले हे दातृत्व आपल्याच देशाला हजार वर्षाच्या गुलामगिरीत लोटेल म्हणून.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, अशा अनेक लहान – सहान गोष्टी असतात की, ज्यांचे महत्त्व एरवी आपल्या लेखी शून्य असते, परंतु एखाद्यावेळी त्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे किंवा कोणत्या गोष्टीला देऊ नये हा भाग गौण ठरतो. महत्त्वाचे सगळेच असते; फक्त स्थानकालपरत्वे त्या विशिष्ट गोष्टीचे महत्त्व किंवा मूल्य कमी – अधिक होऊ शकते. एखादी व्यक्ती हुशार असली म्हणजे तिला सगळ्याच गोष्टींचे सखोल ज्ञान असते असे नाही, तशी अपेक्षाही बाळगणे चुकीचे आहे, परंतु त्या – त्या प्रसंगी
ाय योग्य आहे किंवा कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावे, याचा विवेक त्या व्यक्तीत शाबूत असतो. हा विवेकच मानवी विकासाच्या सोपानाची
पहिली पायरी आहे. इथूनच
पुढे माणसाच्या माणूसपणाचा प्रवास सुरू होतो. अपघात कसे टाळावेत, अपघातामुळे होणारी प्राणहानी – वित्तहानी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील, यावर विचारमंथन होणे केव्हाही स्वागतार्हच असते. कारण अशा प्रकारच्या चर्चेतूनच बरेचसे प्रभावी उपाय समोर येऊ शकतात. परंतु प्रत्यक्ष अपघात घडला आहे, अपघातातील जखमी रस्त्यावर पडून विव्हळत आहेत आणि त्यांना वेळेवर योग्य ती मदत करण्याऐवजी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून ‘अपघात आणि ते टाळण्याच्या उपाययोजना’ या विषयावर तावातावाने बोलल्या जात असेल तर असे लोकं केवळ विवेकशून्यच नव्हे तर माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचेसुध्दा ठरत नाही. केव्हा, कुठे आणि कशाला महत्त्व द्यावे, याचे प्राथमिक ज्ञानच आपल्याला नसेल तर आपण कोणत्या अर्थाने बुध्दिमान किंवा सुसंस्कृत ठरू शकतो? जे विवेकाच्या बाबतीत. तेच बुध्दीच्या बाबतीत अगदी साध्या – साध्या गोष्टी असतात. त्या पार पाडताना थोडा बुध्दीचा वापर केला तर बराचसा त्रास वाचू शकतो, परंतु मेंदूला तेवढाही त्रास द्यायची कोणाची तयारी नसते. जेवणाच्या पंगतीत नियमितपणे वाढण्याचे काम करणारे अनेक हौशी कार्यकर्ते असतात. त्यांचा उत्साह, त्यांची सेवावृत्ती मान्य, परंतु पात्रावर कुठला पदार्थ कुठे वाढावा, याचे साधे ज्ञान त्यांना असू नये? स्वत:ला माहीत नसेल तर दुसरीकडे कुठे पाहून शिकता येते, पण तेवढा वेळ आणि मुख्य म्हणजे इच्छा कोणाकडे? शेवटी पात्रावर पदार्थ वाढणे ही अतिशय क्षुल्लक बाब ठरते. टीव्हीचा पडदा (काच) किंवा आरसा पुसायचा असेल तर लोकं कपड्याचा वापर करतात. त्या कपड्याचीच घाण त्या काचेला परत लागते. वर्तमानप
्राचे किंवा तत्सम कागद घेवून काच पुसावी, हे समजण्यासाठी एखाद्या विद्यापीठाची पदवी मिळवायलाच हवी कां? खरेतर अशा अतिसामान्य चुका पदवीधर लोकच अधिक प्रमाणात करतात. रस्त्याने कसे चालावे, कचरा कुठे टाकावा किंवा टाकू नये, सायकल – मोटार सायकल – गाड्या सार्वजनिक ठिकाणी कुठे – कशा पध्दतीने उभ्या कराव्यात, या आणि अशाच सारख्या खूप साध्या – साध्या गोष्टी आहेत की, ज्यात एरवी बुध्दीचा अगदी चिमुटभर वापर केला तरी आपल्या सोबतच इतरांचाही त्रास सहज कमी करता येऊ शकेल, पण नाही; या गोष्टी अतिशय क्षुल्लक आहेत, त्यांच्याबाबतीत विचार करायला आमच्या जवळ वेळही नाही आणि आमची बुध्दीही तेवढी रिकामी नाही.
बुध्दी, विवेक, संवेदना यांच्याबाबतीत आपल्या देशातील बहुतांश लोकं इतके उथळ आहेत की, हा देश उभा कसा आहे, चालत कसा आहे याचेच बरेचदा आश्चर्य वाटते. आपल्या शेजाऱ्याशी ज्याचे आयुष्यभर पटले नाही, तो माणूस भारत – पाक मैत्रीसंदर्भात वाजपेयी – मुशर्रफ या दोघांनाही बिनधास्त सल्ले देतो. सायकलचे साधे पंक्चर ज्याला काढता येत नाही ती व्यक्ती मिग विमाने कोसळण्यामागची तांत्रिक कारणे ती विमाने याच्या घरीच बनल्यासारखी सांगतो. हा असला विनोदी प्रकार फक्त आपल्याच देशात घडू शकतो. बरं या बौध्दिक दिवाळखोरीची व्याप्ती मर्यादित आहे, अशातलाही प्रकार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र ती आहेच.
लोकसंख्यावाढ हा देशाच्या प्रगतीपुढील सर्वांत मोठा अडथळा आहे, असे राजकारण्यांपासून अर्थतज्ज्ञापर्यंत सर्वच लोकं ओरडून सांगत असतात. लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी शासन कठोर (?) उपाय योजण्याच्या प्रयत्नात आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आतापर्यंत राबविलेल्या उपायांवर खर्ची पडलेले हजारो कोटी रूपये अक्षरश: वाया गेले. आता नव्याने उधळपट्टी करण्यास सरकार सज्ज आहे. लोकसंख्यावाढ ही अपरिहार्य बाब आहे.
त्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने मृत्यूदर कमालीचा घटला आहे. बालमृत्यूचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. अशा परिस्थितीत लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर चीनप्रमाणे ‘एक दांपत्य एक मूल’ ही योजना जात, पात, पंथ, धर्म इत्यादी बाजूला सारून सक्तीने राबवायला हवी, परंतु वर्तमान शासन प्रणालित कोणतेही सरकार तेवढी हिंमत दाखवू शकणार नाही.
त्यामुळे प्राप्त परिस्थितीत विपुल जनसंख्येच्या आपत्तीलाच इष्टापत्तीत परावर्तित
करणे हाच एक उपाय ठरतो. चीनने तेच केले. मनुष्यबळाचा योग्य वापर करून कुठलीही फारशी मोठी भांडवली गुंतवणूक न करता गृहउद्योगातून दर्जेदार उत्पादने जागतिक बाजारपेठेत फेकल्यामुळे आज तो देश विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आपण ते का करू शकत नाही? आज विदेशी कंपन्या आपले उद्योग इथे आणून इथल्या श्रमशक्तीचा वापर करीत आहेत. केवळ स्वस्त मजुरीच्या लालसेने विदेशी उद्योग इथे येत आहेत. तो काही आपल्या धोरणांचा विजय वगैरे नाही. कुरण आपलेच आहे, फक्त ते पाहायला आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या डोळ्यांची गरज भासली एवढेच. मूळ मुद्दा हा आहे की, देशाच्या विकासात अडसर ठरणारी सर्वात मोठी समस्या हीच मुळात समस्या नाही, उलट त्या ‘समस्येला’ हाताशी धरूनच विकास साधता येऊ शकतो. हे केवळ एक उदाहरण झाले. आपल्यासमोरील बहुतेक समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, त्या समस्यांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की, आज आपण ज्यांना समस्या समजत आहोत आणि ज्यांच्या निराकरणासाठी वेळ, पैसा, मनुष्यबळ खर्च करत आहोत, त्या वस्तुत: समस्याच नाहीत. बुध्दीचा, तार्कीक सुसंगतीचा म्हणजेच ‘कॉमन सेन्स’चा योग्य वापर न केल्यानेच त्या नसलेल्या समस्या आज समस्या बनल्या आहेत. मग ती समस्या पाण्याची असो, अन्नधान्याची असो अथवा दहशतवादाची! अगदी सहज टाळ
ता येण्यासारख्या चुका टाळल्या असत्या, योग्यवेळी योग्य ती खबरदारी घेतली असती तर 99 टक्के समस्यांचा जन्मच झाला नसता.
योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रकांड पांडित्य, उत्तुंग प्रतिभाच असावी लागते असे नाही. अगदी सर्वसामान्य बुध्दी असली तरी पुरेसे आहे. फक्त अट एवढीच आहे की, या बुध्दीचा वापर करता आला पाहिजे. विशिष्ट परिस्थितीत कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावे, याचे तारतम्य असायला पाहिजे. दुर्दैवाने ही अगदी साधी बाबदेखील आपल्याला खूप कठीण वाटते. खरी समस्या आहे ती हीच.
संपूर्ण जग, जगातील प्रत्येक वस्तू-व्यक्ती कुठल्या न् कुठल्याप्रकारे परस्पराशी संबंधित आहे. त्या अर्थाने स्वतंत्र कुणी नाही. तलावात खडा कुठेही पडो, त्यामुळे उठणारे तरंग संपूर्ण तलावभर पसरतात. आपली एखादी चूक आणि त्या चुकीचे परिणाम आपल्यापुरतेच मर्यादित राहत नाही, याचे भान प्रत्येकाने राखायला हवे. पृथ्वीराज चौहानची ‘ती’ चूक वैयक्तिक होती, परंतु त्या चुकीची किंमत उभ्या देशाला चुकवावी लागली. त्या-त्या प्रसंगी ती बाब प्रत्येकालाच क्षुल्लक वाटते, परंतु त्याचे भविष्यातले परिणाम ज्याच्या वेळीच लक्षात येतात, तोच खरा सुज्ञ माणूस! आज देशाला अशा सुज्ञ लोकांची गरज आहे. हा सुज्ञपणा प्रत्येक व्यक्तीत उपजतच असतो. गरज असते ती त्या सुज्ञपणाला विवेकाच्या, जबाबदारीच्या, संवेदनांच्या साच्यात ढाळून योग्य आकार देण्याची. ज्या दिवशी आपल्यातल्या सुज्ञपणाला बुद्धीची झालर लागून योग्य आकार प्राप्त होईल, त्या दिवशी केवळ आपलाच देश नव्हे तर संपूर्ण जगच ‘सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम्’ होईल. आहे बाब छोटीशीच… पण खूप महत्त्वाची!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply