सुमारे चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट..१९८१ साल असावं.मी पाचवी -सहावीत असेन.बहीण माझ्यापेक्षा बरीच मोठी.ती कॉलेजात होती.
बहीण माझं रोल मॉडेल..ती जे करेल ते करायचं एवढीच त्या वयात अक्कल होती.त्यामुळे तिची पाठ मी सोडत नसे. ती कुठे जातेय या सुगाव्यावर मी असे..अन् तिला मात्रं त्या वयात मला घेऊन जायला लाज वाटायची..त्यांच्या त्या फुलपाखरीवयातल्या रेशमी गप्पागोष्टींत माझा अडसर व्हायचा.त्यामुळे ती मैत्रिणींकडे ,हॉटेलात, पिक्चर पहायला जाताना मला चुकवून जात असे. मैत्रिणीच्या घरी आधीच कपडे नेऊन ठेवी नि माझ्यासमोर घरच्या कपड्यांवर बाहेर पडे. मी गाफील..मग ती मैत्रिणीच्या घरी जाऊन कपडे बदलून इष्टस्थळी रवाना होई.. ती गेलेली कळल्यावर मी रडत बसत असे..
त्या दिवशी असच झालं.
ती मला चुकवून मैत्रिणींबरोबर ” एक दुजे के लिये ” पिक्चर पहायला गेली..
हो पिक्चरच …आम्ही त्याकाळात हिंदी
चित्रपटाला ” पिक्चर ” नि मराठी चित्रपटाला ” सिनेमा ” हा मराठी शब्द वापरत असू. बाकी इंग्रजी चित्रपट हे आमच्या फार पलीकडचे होते..अजून न त्यांचा ” मूव्ही”
व्हायचा होता.
तर तेंव्हा ” एक दुजे के लिए ” हा कमल हसन व रती अग्नीहोत्रीचा पिक्चर सुपर हिट झाला होता.
पेपरमधून त्याचं परीक्षण रकानेच्या रकाने भरून येत होतं.
कमल हसनच्या अभिनयाचा डंका सगळीकडे वाजू लागला होता.
रती अग्निहोत्रीच्या सौंदर्यात तरूण रत झालेले होते.प्रत्येक मुलीच्या जागी त्यांना रतीच दिसत होती.
आयांनाही सून म्हणून रतीसारखं निष्पाप सौंदर्यच हवं ,असं वाटू लागलं होतं..
समाजधुरीणांना मात्रं असलं प्रेम ,त्यापायी केलेली आत्महत्या यामुळे ” तरूण पिढी ” बिघडणार अशी भीती वाटत होती व त्याचा डंका ते पिटत होते..
” एक दुजे के लिए ” पिक्चर मात्रं देशभर हाऊसफुल होत होता. त्यातील गाणी हवेत वा-यासारखी पसरत होती..तरुणांच्या तोंडात,गळ्यात,मनात,हृदयात ती रुतून बसली होती…
तर असा हा ऐतिहासिक पिक्चर माझी बहीण मला सोडून पाहून आली..
नि वर घरी परत आल्यावर त्या पिक्चरची रसाळ स्टोरी तिने मला सांगितली..शेवटच्या आत्महत्येच्या दु:खान्ताने आमच्या दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं..!!
माझी मात्रं आईकडे ” मलाही एक दुजे के लिये पहायचाय ” ही भुणभुण सुरू झाली.
आईलाही तो पहावासा वाटत असावा. तिने बाबांना विचारलं.
“मी नाही असल्या थिल्लर पिक्चरला येणार ” बाबांनी जाहीर केलं.
शेवटी माझी थोरली काकू तयार झाली..तिला पिक्चरची भारी आवड ..म्हणजे वेडच म्हणानां..”संत तुकाराम” पासून ते “कुर्बानी” पर्यंत कोणताही सिनेमा ती तितक्याच तन्मयतेने पहात असे..त्यामुळे तिने हा पिक्चर पहायला आनंदाने होकार दिला..
त्या दिवशी मला शाळेला ख्रिसमसची सुट्टी होती. ती साधून
मी ,माझी आई आणि माझी थोरली काकू असं आमचं त्रिकूट सांगलीला ” एक दुजे के लिये ” पहायला रवाना झालं..
त्याकाळी नवीन सिनेमा प्रथम सांगलीत येत असे ..जुना झाल्यावर मिरजेत…
आम्ही थिएटरला पोहोचलो..थोडा उशीरच झाला होता.
थिएटर ( तेंव्हाच्या आमच्या भाषेत थेटर ) बाहेर मोठं पोस्टर लावलं होतं .त्यावर कमल हसन व रती अग्नीहोत्रीचे फोटो होते..
आम्ही धावत पळत आत शिरलो. गडबडीने तिकीटे काढून खुर्चीवर स्थानापन्न झालो. पिक्चर सुरू झाला होता.
पडद्यावर कमल आणि रतीचं काहीतरी सुरू होतं..
थोड्या वेळाने कमल आणि रती अमेरिकेत पोहोचले.
न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन असं कोणतंतरी मोठं शहर असावं..( त्या वयात आम्हाला अमेरिका हे एक शहरच वाटे.आमची आतेबहीण तिथे असल्याने अमेरिका हे नाव तरी माहीत होतं.त्यामुळे अमेरिकेहून कोणीही आलं तरी तुम्हाला आमची जयाआक्का भेटते का हो अमेरिकेत ?..असं आम्ही विचारायचो ?) तिथे ख्रिसमसच्या मिरवणुका सुरू होत्या..मोठमोठ्या गाड्या विविध प्रकारच्या , रंगीबेरंगी फुलांनी अतिशय सुरेख सजवलेल्या होत्या..
झेंडू,शेवंती फारतर गुलाब आणि हो सोनचाफा.. यापलीकडे फुले असतात हेही माहीत नसलेल्या आम्हा मिरजकर त्रिकुटाला ती तसली फुलं पाहून लईच भारी वाटलं..आई नि काकूतर आनंदाने माना डोलवू लागल्या..
त्या ख्रिसमसच्या मिरवणुकांनी डोळे दिपले नि तृप्त झाले.. आम्ही खूश झालो..
” पण ताईने स्टोरी सांगताना या मिरवणुकांबद्दल का सांगितलं नसेल ?” माझ्या डोक्यात कीडा वळवळला..
पिक्चर पुढे जात होता..
पण ताईने सांगितलेल्या पिक्चरमधल्या घटना,स्थळे कुठेच भेटत नव्हती.. मी आई नि काकुला तसं म्हटलंही..
” अगं , गप् बस गं … पुढे येईल ते सगळं..जे चाललय ते नीट बघ ” म्हणत त्या माझ्यावर डाफरल्या नि पिक्चरमधे तल्लीन झाल्या..
मध्यंतर झालं .आईस्क्रीम,वेफर्स खात सगळं थिएटर न्याहाळलं.. बहुतेक सगळं थिएटर रिकामं होतं नि जे काही प्रेक्षक होते ते ख्रिश्चन बांधवच होते..
मध्यंतर संपल्याची घंटा वाजली.
पुन्हा पिक्चर सुरू झाला..
पिक्चरची कथा,गाणी सगळं वेगळच..
आई नि काकुचं एकच उत्तर ” पुढे येईल ”
शेवटी ” The End ” ची पाटी आली ..पिक्चर समाप्त झाला. कमल नि रतीने काही आत्महत्या केली नाही..उलट ते सुखाने राहू लागले..
आतामात्रं आई नि काकू बिथरल्या..
“समाजधुरीणांनी तक्रार केल्यामुळे शेवट बदलला असेल का?” असा एक विचारही त्यांच्या डोक्यात शिरून वेगाने बाहेर पडला..
विचाराबरोबर आम्हीही दारातून बाहेर पडत होतो..
शेजारीच डोअरकीपर होते..
” काय हो डोअरकीपर .. हा ” एक दुजे के लिये ” पिक्चरच होता नं ? नाही म्हणजे शेवट वेगळा होता म्हणून विचारलं …” आईने चाचरत पृच्छा केली.
” अहो मावशी , एक दुजे के लिये ” परवाच गेला. हा
” दो दिल दिवाने ” शिणेमा हाय..सगळा पिक्चर पाहिलात तरी तुम्हाला समजलं नाही व्हय ?”
तो डोअरकीपर हसायला लागला..
कुठून कुठून येत्यात ही चांगल्या कपड्यातली गावंढळ माणसं…..असा भाव त्याच्या चेह-यावर उघड उघड दिसत होता.
” अहो पण पोस्टरवरतर कमल आणि रतीचेच फोटो आहेत” . ही फसवणूक झाली.आमचे पैसे परत करा.”
” मावशी, हेच हिरो-हिरॉईन या पिक्चरमधेपन हायत.पोस्टरवरचं नाव वाचलत का इंग्रजीतलं?
तुम्हाला इंग्रजी काय येणार म्हणा..” असं बोलून
डोअरकीपर हसत निघून गेला..
आई नि काकूला इतकं खजील झालेलं याआधी नि नंतरही कधी पाहिलं नाही..
दोघींनी दोन्ही खांद्यावर पदर घेतले , माना खाली घातल्या नि हरलेल्या योद्ध्याप्रमाणे चालू लागल्या..
एकवेळ हार पचते पण फजिती जिव्हारी लागते..
लबाड थिएटर मालकाने ” एक दुजे के लिये ” च्या जागी
कमल नि रतीचाच पडेल पिक्चर ” दो दिल दिवाने ” ख्रिसमसचा महूर्त साधून लावला होता..
आमच्यासारखे वेंधळे चुकले मुसाफिर नि ख्रिश्चन बांधव त्याच्या चलाखीला बळी पडत होते..
” पण बरं झालं गं चुकून का होईना आपल्याला हा पिक्चर पहायला मिळाला..नाहीतरी आपण मेल्या कशाला जातोय अमेरिकेतला ख्रिसमस बघायला..”
माझ्या काकू नि आई खचणा-यातल्या नव्हत्याच..!!
” घरी यातलं काही बोलायचं नाही बरंका..” एक दुजे के लिये” च पाहिला म्हणून सांगायचं ..तुला आवडणारा डोसा नि कसाटा आईस्क्रीम खायचय नं?” जवळच्याच मधुबन हॉटेलात शिरत दोघीही एकमुखाने बोलल्या…..
आई नि काकू दोघींनीही या जगातून कधीच एक्झिट घेतली..
कदाचित त्यांच्यापैकी कोणीतरी अमेरिकेत अवतरून अमेरिकेतला ख्रिसमस प्रत्यक्ष साजराही करत असेल..
पण प्रत्येक ख्रिसमसला मला मात्रं त्या ” अमेरिकेच्या ख्रिसमसची” नि माझ्या आई-काकुची,माझ्या ताईची आठवण आल्यावाचून रहात नाही..
हसून हसून डोळ्यात पाणी येते नि त्या पाण्यातून त्यांच्या आठवणी पाझरत राहतात…!!
नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
Leave a Reply