नवीन लेखन...

चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-

१) ” दिवार ” – एका ब्रेड चोरणाऱ्या मुलाचा पाठलाग करताना शशी त्याला गोळी घालतो. सत्य कळल्यावर परिमार्जन म्हणून त्या मुलाच्या घरी जातो – काही मदत करायला ! वडील (सेवानिवृत्त शिक्षक – हंगल ) मोठ्या मनाने मुलाचा गुन्हा कबूल करतात आणि पत्नीच्या विरोधाला न जुमानता शशी कपूरच्या कृत्याला समर्थन करतात. निघताना सहज शशी त्यांची चौकशी करतो आणि भारावून जात कबुली देतो – ” एवढा मोठा धडा फक्त शिक्षकाच्या घरातूनच मिळू शकला असता.” शिक्षकांचे समाजातील कर्तृत्व (सेवानिवृत्तीनंतरही) अधोरेखित करणारा हा प्रसंग स्वतःच एक “शिक्षक” बनून राहिला आहे.

२) ” चायना गेट ” – नसीर आणि अमरीश पुरी यांच्यातील विसंवाद धर्मावर येऊन धडकल्यावर ओम पुरी तात्काळ “मिशन “रद्द ची घोषणा करतो. सगळी टीम आश्चर्यचकित होते. त्यांच्यासाठी हे पाऊल अनपेक्षित असते. पुढे फक्त ओम पुरी आणि त्याच्या अभिनयावर प्रतिक्रिया देणारे त्याचे सहकारी ! संपूर्ण पार्श्वभूमी तो कथन करतो, पडद्यामागचे इंगित पहिल्यांदाच सांगतो आणि त्यामागचे स्वतःचे सहन करणे ! नेतृत्वाला अशा कसोट्यांमधून जात संघाला आकार द्यायचा असतो. अपेक्षित परिणाम साधत तो प्रसंगातून “बाहेर” पडतो. आपण मात्र आतच घुटमळत राहतो. क्षणार्धात संघ सांधला जातो या शॉक ट्रीटमेंट नंतर आणि पुढचे काम सोपे होते.

३) ” मशाल “- “अश्रूंची झाली फुले “वर बेतलेला हा हिंदी चित्रपट !दिलीपकुमारच्या उतरणीच्या कालखंडातील असला तरी त्याच्या “आत ” चित्रपट किती उरलाय याचे मनोज्ञ दर्शन घडवतो. घराबाहेर काढल्यावर, पत्नी सुधाला रस्त्यावर वेदनांनी तळमळताना पाहून तो भंगतो आणि येत्या -जात्या वाहनाला विनवणी करतो. मधूनच पत्नीला धीर देतो. बघता -बघता त्याचे विफल प्रयत्न त्या मानी स्त्रीला सहन न झाल्याने ती निघून जाते आणि उरतात दिलीपचे अवशेष ! हा प्रसंग अंगावर काटे आणतो पण अजून एक आश्चर्य आपली वाट पाहत असते. आपल्या बदललेल्या वाटेचा खुलासा आत्मीय अनिल कपूरला करताना (शेवटी कोणालातरी आपण “जवाबदेह” असतोच की !) हे अभिनयाचे विद्यापीठ ( फक्त सुधा नसलेले ते दृश्य प्रत्येक फ्रेम मध्ये ) पुन्हा एकदा तितक्याच प्रखरतेने सादर करते. दोन्ही ठिकाणी एका अणुचाही फरक नाही. हे “सातत्य ” स्तिमित करून जाते. दिलीपच्या या प्रसंगाच्या उल्लेखाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टी एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाही. जागतिक अभिनयाची ओळख हा कलावंत सहज करून देतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अभिनय म्हणजे काय याचा वस्तुपाठ सादर करतो.

४) “स्वदेश “- शाहरुखचा “नासा ” मुखवटा उतरवून त्याला सच्चा भारत दाखविण्याचा आरसा बनलेला हा प्रसंग तसा लांबलचक आहे. हरिदास कडून घेतलेले कर्ज वसूल करण्याच्या मोहिमेवर कावेरी अम्मा शाहरुखला पाठविते.जाता -येता त्याला भारत “दर्शन” घडते. तो अंतर्बाह्य बदलतो. कावेरी अम्माचा हेतू सफल होतो. आपणही प्रसंगभर अडखळत ,धडपडत शिकतो. मनोरंजनाच्या पल्याड नेऊन हा प्रसंग आपलं शहाणीव वाढवतो आणि कावेरी अम्मा बरोबरच आशुतोष आणि त्याच्या संघाला आपण कुर्निसात करतो.

असे खूप प्रसंग आहेत जे मनाच्या आतल्या कप्प्यातील शोकेस मध्ये ठेवले आहेत. आज जरा त्या स्मृतिचिन्हांवरील धूळ थोडी झटकली इतकेच !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..