सदाशिव पेठेत ऑफिस सुरु केल्यापासून सर्वात जवळचं चहाचं एकमेव ठिकाण म्हणजे ‘चंद्रविलास उपहार गृह’ होतं! १९८५ ला इथं चहा फक्त दीड रुपयाला मिळायचा.
आमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते. लाकडी खुर्च्या, जाड फरशीची टेबलं होती. दोन्ही समोरासमोर भिंतीवर जुन्या काळातील काचेवर मागील बाजूने रंगवलेल्या मोरांची, सिनसिनेरीची उभी चित्रे होती; जी अजूनही आहेत. त्या चित्रांच्यावरती राजा रविवर्माच्या लक्ष्मी, सरस्वतीच्या फ्रेम्स लावलेल्या होत्या. हाॅटेलात प्रवेश केला की, आधी काऊंटर. काऊंटरच्या मागे चार जणांना बसायला टेबल खुर्च्या. समोर किचन. त्यांच्या अलीकडे शेल्फ. त्यातून दिसणाऱ्या शंकरपाळी, शेवचिवड्याच्या भरलेल्या पराती. एका ताटात कांदाभजी, वडे, सामोसे. उजव्या बाजूला फ्रिज, त्यांच्या पलीकडे दोन टेबल आणि समोरची तीन टेबलांची रांग. एकावेळी वीस बावीस माणसं बसलेली दिसली म्हणजे जागा ‘हाऊसफुल्ल’! अशा वेगळ्या लुकचे हाॅटेल दुर्मिळ असल्याने एका मराठी चित्रपटाचे शुटींगही इथे झालेले आहे.
काही दिवसांनंतर वडिलांच्या जागेवर झोरे स्वतः बसू लागला. एकजण चहा, वडे तळण्यासाठी. एकजण टेबल पुसणे व चहा, डिशेस देण्यासाठी. मालक झोरे मात्र गल्ल्यावर पैसे घेण्यासाठी व ‘च्या’भर रे अशी ऑर्डर देण्यासाठी बसलेला. कित्येकदा कामगार नसेल तर झोरे स्वतःच चहा करणे, डिश देणे, टेबल पुसणे अशी सर्व कामं वेगानं करायचा. काऊंटरवर गल्याशेजारी ‘काॅईनबाॅक्स फोन’चा लाल डबा असायचा.
आम्ही ऑफिसबाॅय ठेवल्यावर चहासाठी डायरी ठेवली. सकाळी अकरा वाजता व दुपारी चार वाजता आमची चहाची वेळ ठरलेली असे. कधी चमचमीत खाण्याची इच्छा झालीच तर वडा सॅम्पल किंवा मिसळ पावची ऑर्डर आम्ही देत असू. काही वर्षांनंतर डायरी मधील फुगणारे आकडे बघून आम्ही ‘डायरी’ बंद केली.
खालकर चौकात ‘तथास्तु’ची भव्य इमारत उभी राहिल्यावर ‘चंद्रविलास’नेही नूतनीकरण केले. जुनी अवजड टेबलं, खुर्च्या जाऊन स्टीलची चकाचक टेबल व बाकडी आली. भिंतीवर रंगकाम केले. दोन पंखे बसविले. साईनबोर्ड नव्या स्वरुपाचा लावला. आता ‘तथास्तु’ची गिऱ्हाईकं ‘चंद्रविलास’ मध्ये खरेदीनंतर येऊन बसू लागली. दुपारच्या वेळी झोरेचा मोठा मुलगा काऊंटरला बसू लागला. हाॅटेलमध्ये पदार्थांची नावे व दर असा बोर्ड होता मात्र झोरेने त्यावर कधीच दर लिहिले नाहीत. तो तोंडाने सांगेल तेच बिल समोरच्याने मुकाट द्यायचे असा ‘अलिखित’ नियमच होता. कधी त्याला विचारले की, खिचडीचा दर जास्त वाटतोय. त्यावर तो उलट प्रश्र्न करायचा, ‘साबुदाणा-शेंगदाणे किती महाग आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?’
सकाळी हाॅटेलात गेलं की, झोरे स्वतःहून विचारायचा कांदाभजी, पोहे, उपीट गरम आहे, आणू का? इथं तर्रीबाज वडा सॅम्पल, तिखटजाळ मिसळ खाण्यासाठी दर्दी खवैय्ये आवर्जून यायचे. सकाळी दहापर्यंत पोहे, उपीट मिळायचे. शेजारच्या ट्रेनिंग काॅलेजमधील अनेक कर्मचारी दुपारचा डबा खायला इथं यायचे, त्यासाठी त्यांना इथली एखादी तरी डिश घेणं हे आवश्यक असायचं.
आम्ही बण्डा जोशी, राजगुरू सर, आनंद बोंद्रे, सुभाष नलावडे, रमेश देशपांडे, प्रोफेसर, वाळुंज सर, थोरात सर, सुबोध गुरूजी, अनिल उपळेकर, चित्रकार भरम, इ. मित्रांबरोबर अनेकदा इथं चहा व खाणे केलेले आहे. चहाबरोबर शंकरपाळी हे सर्वात बेस्ट काॅम्बिनेशन आहे. ती नसेल तर कांदा घातलेला शेव चिवडा, जोडीला तळलेली मिरची! कधी चहा-खारी, चहा-बिस्कीट खाण्याचा मोह होतोच. उन्हाळ्यात थंड कोकम सरबत, पावसाळ्यात गरमागरम भजी व हिवाळ्यात उबदार, गरम चहाची चवदार साथ ‘चंद्रविलास’ने आम्हाला दिलेली आहे.
आता झोरे मालकाचं वय झालेलं आहे. तो क्वचितच दिसतो. मोठा मुलगा मात्र मालकाची गादी चालविण्यात आता तरबेज झालाय. कधी मदतीला कोणी नसेल तर तो स्वतः चहा करुन देतो. फक्त त्यासाठी ‘स्पेश्यल’ चहाचे पैसे मोजावे लागतात…
— सुरेश नावडकर
मोबाईल: ९७३००३४२८४
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-८-२०.
#marathisrushti #marathi
Leave a Reply