नवीन लेखन...

‘च्या’ठवणी…

घर, देता का कुणी घर…असं अप्पा बेलवलकरांना ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगतामध्ये बोलावं लागलं…मात्र चहा, देता का? असं अजून तरी कुणालाही म्हणायची वेळ आलेली नाही….

न मागता हजर असतो, तो चहा!! सकाळच्या पहिल्या चहा पासून संध्याकाळपर्यंत त्याची अनेकदा आवर्तनं होतातच. निमित्त वेगवेगळं असू शकतं, ठिकाण बदलतं असू शकतं, सोबत वेगवेगळी असू शकते…मात्र तो घेतल्यावर मिळणारं समाधान हे अवर्णनीयच असतं…

चहाची पहिली चव मूल बसायला लागल्यावर त्याची आईच त्याला मिळवून देते. तो पहिलाच बशीतून घेतलेला घोटभर चहा, आयुष्यभराच्या चहायज्ञाची ती नांदी असते…

अगदी लहानपणी मी गावी चहा घेतला तो पितळीतून.. त्यावेळी कप, कुणी पाहुणे आले तरच वापरले जायचे. चहा गुळाचा असायचा. चहाच्या पावडरला खेड्यात चहाची बुक्की म्हटलं जायचं.

थोडा मोठा झाल्यावर फुलपात्रातल्या चहाबरोबर आजीने नागठाणच्या बाजारातून आणलेले बटर खायला मिळायचे. बटर चहात जास्त भिजले तर, ते चमच्याने खावे लागायचे. कधी चौकोनी खारी असायची. ती चहाबरोबर खाताना तिचा चुरा चहात मिसळून एकजीव होऊन जायचा.

शहरात आल्यावर चहा अर्धाकपच मिळायचा. कधी भूक लागलेली असेल तर त्यामध्ये पोहे टाकून, चमच्याने मी चहा पोहे खात असे. वडिलांची सकाळची शाळा असे. दुपारी तीन वाजले की, झोपून उठल्यावर त्यांना चहा लागत असे. आईचं बघून मी हळूहळू चहा करायला शिकलो. दुपारचा चहा मी करीत असे. स्टोव्ह पेटविण्यापासून चहाचे कप भरेपर्यंत माझीच जबाबदारी असे. चहामध्ये आलं घातल्याने माझ्या चहाची ‘वाहवा’ होतं असे.

आईबरोबर कुणाकडे गेलो तर अर्धा कप चहा नक्कीच मिळत असे. सदाशिव पेठेतील आमच्या घरासमोरच ‘लिप्टन’ कंपनीचा चहाचा डेपो होता. त्यांची हिरव्या रंगाची एक सायकल गाडी आमच्या घरासमोरच लावलेली असायची. खाकी कपडे घातलेला एक कंपनीचा माणूस त्या गाडीतून चहा ठिकठिकाणी पोहोचवायचा.

घरामध्ये चहाची सुटी पावडर किराणा दुकानातून आणली जात असे. खूप वर्षांनंतर महाराष्ट्र की कंपनीचा चहा आणायला सुरुवात केली.

काॅलेजला जाईपर्यंत बाहेरचा चहा कधीही घेण्याची वेळ आली नव्हती. काॅलेजमध्ये मधल्या सुट्टीत कॅन्टीनचा चहा मित्रांबरोबर होऊ लागला. तोसुद्धा बरेचदा ‘वन बाय टू’ असायचा. एखादा पाॅकेटमनीवाला मित्र, ‘रूपाली’ किंवा ‘पूरब’ मध्ये नेऊन चहा पाजायचा. काॅलेजची चार वर्षे हा हा म्हणता निघून गेली.

कमर्शियल डिझाईनची कामं सुरुवातीला घरातूनच करीत असे. नितीन अष्टेकर या माझ्या काॅलेजमधील मित्राने अनेक कमर्शियल कामे करण्याची संधी दिली. त्यावेळी त्याने घरचाच चहा गोड मानून घेतलाय. आज तो अमेरिकेत स्थायिक आहे.

आदरणीय म. द. वारे सरांनी भानू बाईंना सांगून ‘गुणगौरव’मध्ये आॅफिस सुरु करण्याची संधी दिली. त्या जागेत अनेक मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ, साहित्यिक, कवी, निर्माते, दिग्दर्शक व्यक्तिमत्त्व आली. त्यांनी आमचा पाहुणचार गोड मानून घेतलाय आणि आम्ही धन्य झालो…

सुरुवातीला कोणी महत्त्वाची व्यक्ती आली की, आम्ही त्यांना ‘चंद्रविलास’ हाॅटेलमध्ये घेऊन जायचो. तिथं चहापाणी झाल्यावर गप्पा व्हायच्या. आतापर्यंत बण्डा जोशी सरांसोबत ‘चंद्रविलास’मध्ये शेकडो वेळा चहा घेतलेला आहे. आॅफिसबाॅयला ठेवल्यानंतर तो स्टीलच्या ग्लासातून चहा आणू लागला. काही दिवसांनी चहासाठी छोटा थर्मास घेतला. चहाची नोंद ठेवण्यासाठी ‘चंद्रविलास’कडे डायरी केली. महिना झाला की, डायरीचा हिशोब करुन पैसे देत होतो.

काही वर्षांनी ‘चंद्रविलास’ बंद करुन शेजारच्या संग्रामकडे चहा सुरु केला. संग्रामने नवीनच स्टाॅल सुरु केला होता. सबकुछ तो स्वतःचं चालवायचा. तो चहा घेऊन येताना कोटसुटात यायचा. त्यामुळे चहा घेणाऱ्यांना त्याचा चहा ‘फाईव्ह स्टार’ वाटायचा. काही वर्षांनंतर त्याने चहाचा स्टाॅल बंद केला.
राजाराम मंडळ चौकात एक नवीन चहाची टपरी सुरु झाली. एक पन्नाशीची मावशी व तिचा मुलगा, दोघं मस्त ‘गवती चहा’ तयार करायचे. आम्ही आमच्याकडे आलेल्या मित्रांना घेऊन त्या चहाचा आस्वाद घ्यायचो. पावसाळ्यात त्या चहाची ‘खरी लज्जत’ अनुभवायला मिळायची. दोन वर्षांतच ती टपरी बंद झाली.

पेरुगेटच्या कोपऱ्यावर ‘हिना की स्टाॅल’ नुकताच सुरु झाला होता. त्या चहाची चव वेगळी असल्याने आम्ही तिकडे जाऊन तर कधी पिशवीतून पार्सल आणून चहाची ‘तल्लफ’ भागवत होतो.

लज्जतच्या चौकातील ‘चण्डीश्वर अमृततुल्य’ चा वेलचीयुक्त चहा एकदा पिऊन समाधान होत नसे. आमच्याकडे आमची भाची, हर्षदा आली की, चण्डीश्वरचा चहा आणि क्रिमरोल ठरलेला!

तीन वर्षांपूर्वी आमच्या जवळच ‘कडक चहा’ चे पाॅश दुकान चालू झाले. त्यांच्याकडे तांब्याच्या चार टाक्यांमधून वेगवेगळ्या स्वादाचे चहा मिळत होते. कडक, वेलची, इराणी, कोरा चहा अशा व्हरायटीमुळे शौकीनांची गर्दी वाढू लागली. एक वर्षभर दुकानाने तुफान व्यवसाय केला. नंतर कुठंतरी गणित चुकलं आणि एकच चहा राहिला. काही दिवसांतच तो ‘कडक’ चहा बंदच पडला.

दरम्यान एका राजस्थानी तरुणाने खालकर मारुती जवळ चहाची टपरी सुरु केली. पाच रुपयांत तो प्रत्येकवेळी ताजा चहा करुन देऊ लागला. जवळच ट्रेनिंग काॅलेज असल्याने त्याच्याकडे चहासाठी गर्दी वाढू लागली. काॅफी तो दहा रुपयांत देत होता. त्यानं मदतीला दोघेजण ठेऊनसुद्धा गर्दी वाढतच राहिली. त्याने ‘लेमन टी’ सुरु केल्यामुळे माणसं चहासाठी ताटकळत उभी राहू लागली. आम्ही राजगुरू सर, कोलते सर, सुरेश पाटोळे आले की, त्याच्याकडे जायचो.

संग्रामने एका मुलाला चहाच्या टपरीसाठी जागा दिली व तिथं ‘शिवा टी स्टाॅल’ सुरु झाला. हा शिवा चहा उत्तम करायचा, त्यामुळे कमी दिवसांत त्याने जम बसवला. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचा चहाचा ‘यज्ञ’ चालू असे. पाच रुपयांत चहा असल्याने गर्दी वाढू लागली. आम्ही चहा मागविल्यावर शिवा स्वतः चहा घेऊन यायचा. नंतर त्याने दोन मुलांना कामाला ठेवले. कोलते सरांच्या मसापच्या हाॅलमधील समारंभासाठी शिवाकडूनच चहा येत होता.

कोरोना सुरु झाला आणि लाॅकडाऊनमुळे आॅफिसं बंद झालं. चहा वाले बंद झाले. खालकर चौकातील राजस्थानी चहावाला पुन्हा दिसलाच नाही. ती रिकामी जागा पाहिली की, इथे फुटपाथभरुन गर्दी असायची हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही…

या कोरोनाने कित्येकांना देशोधडीला लावलं. ज्याचं हातावर पोट होतं, ते आता कसे जगत असतील? राजकारण्यांचा खेळ होतो, पण गरीबांचा जीव जातो…अशी आताची परिस्थिती आहे….

लाॅकडाऊन उठल्यावर पुन्हा सगळं सुरळीत होईल, अशी आजच्या ‘जागतिक चहा दिनी’ आशा करुयात….

पुन्हा ‘चहाचे’ सोनेरी दिवस येतील.. आणि आपण तो ‘अमृततुल्य आस्वाद’ पुन्हा पुन्हा घेत राहू…

© – सुरेश नावडकर २१-५-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..