आमचा हात पुरणार नाही अशा उंचीवर विराजमान झालेला मर्फी रेडिओ हे लहानपणीचे आमचे करमणुकीचे दुसरे साधन. फक्त वडील, क्वचित आई आणि अगदीच क्वचित बिघाड झाल्यावर दुरुस्त करणारे वाणी काका यांनाच रेडिओला स्पर्श करायची परवानगी होती.
साहजिकच आमचे करमणुकीचे आद्य साधन म्हणजे -चित्रपट ! नाटक हा प्रकार आजही भुसावळला किंवा एकुणातच खान्देशात रूढ नाही. “सुनबाई घर तुझंच आहे” हे त्याकाळी आमच्या शाळेच्या मदतीसाठी झालेलं आणि मी पाहिलेलं पहिलं नाटक. रेल्वे ग्राउंडवर सारं गांव लोटलं होतं – दोन/तीन/पाच रुपयांची तिकिटे काढून. नंतर पाहिलं -” कट्यार” जळगांवच्या बालगंधर्व मधील ओट्यावर ! नंतर तो भूभाग कायमचा सोडला.
नाही म्हणायला गणेशोत्सवात एखादे व्याख्यान आणि दरवर्षी गल्लीत होणारा तमाशा ! झाली मनोरंजनाची वार्षिक बेगमी. “दिवाळी पहाट ” वगैरे तेव्हा नसायचे आणि ऑर्केस्ट्राही. मागील आठवड्यात स्थानिक मित्राने व्हाट्सअप वर “दिवाळी पहाट ” चा फोटो पाठविला,तेव्हा गहिवरून आले. तब्बल पंधरा वर्षे चाललेला हा उपक्रम जणू सांस्कृतिक बॅकलॉग भरून काढतोय असे वाटले.
चित्रपटांच्या गावातील हालचालींबद्दल माहिती देणारे तीन स्रोत होते –
पहिला रेडिओ- जाहिराती, गाणी, बिनाका वगैरे. पण हा थोडा उशिरा वाट्याला आला.
दुसरा चित्रपटांच्या पाट्या- वसंत टॉकीज कडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडांवर मोठाल्या पाट्या असत, गावातील चारही टॉकीज मधील चित्रपटांच्या. एखाद दुसरी छोटी पाटीही असायची मरीआईच्या मंदिरासमोरील इमारतीवर !
तिसरा- सिनेमाच्या चिठ्ठया ! गल्लीतून जाणाऱ्या टांग्यात बसून माईकवर जाहिरात केली जात असे- आलेल्या नव्या चित्रपटाची. बरेचदा चिठ्ठया वाटल्या जात. आम्ही टांग्यामागे धूम पळत सुटायचो आणि चिट्ठी पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करायचो. आम्ही गिऱ्हाइक नाही हे चाणाक्षपणे जाणून घेत ती व्यक्ती अथवा टांगेवाला आमच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे.
मग मी माझ्या वयस्क आजींना त्या मोहिमेवर धाडायचो. लाडक्या नातवासाठी त्या इमारतीचे तीन जिने उतरून टांग्याजवळ जायच्या आणि मला चिट्ठी आणून द्यायच्या. इतरांना हिरमुसलेले बघणे मी एन्जॉय करायचो. मग माझ्या एका फाईलमध्ये मी ती चिट्ठी जपून ठेवायचो. त्या दिवशी मित्र-मंडळींशी बोलण्याला एक नवा विषय मिळायचा. तो चित्रपट पाहिलाच जाईल असे मात्र नव्हते. दुसऱ्या दिवशीही टांगा आला तर पुन्हा धावपळ- आदल्या दिवशी मिळाली नसली चिट्ठी तर नव्याने पळापळ, पण मिळाली असली तरीही दुसरी प्रत ! आणि मग आपल्याकडे extra असलेल्या चिठ्ठयांची मित्रांशी देवाणघेवाण. छोटासा आनंद !
बरेचदा चिठ्ठया स्थानिक प्रेस मध्ये छापलेल्या असल्या की त्या साध्या ब्लॅक अँड व्हाईट असत पण क्वचित रंगीतही. मग त्याचे मूल्य वाढायचे. ” नीलकमल ” ची खूप देखणी रंगीत चिट्ठी मित्राबरोबर हिसकाहिसकीत फाटल्याने झालेले भांडण (खरंतरं मारामारी) जशी आजही आठवतेय तसेच दुसऱ्या चिट्ठीसाठी टांगेवाल्याकडे तोंड वेंगाडलेलेही लख्ख डोळ्यांसमोर आहे. गंमत म्हणजे जळगांवला काही दिवसांनी गेलो असता मामेभावाच्या गल्ल्यात तीच चिट्ठी दिसली तेव्हा वाटलेली असूया अजूनही ताजी आहे.
” दस्तक ” च्या चिट्ठीवर रेहानाची काहीशी उत्तान(?) पोझ दिसल्यावर माझ्या वडिलांनी आजींनाच बोल लावले होते. आताच्या OTT जमान्यात ते दोघेही नाहीत हे किती बरे !
आजकाल टीव्ही च्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सेटवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाणारी दिग्गज नामवंत मंडळी पाहिली की सिनेमाच्या चिठ्ठया आठवतात-
साधे सोपे जीवन, साधे सोपे मनोरंजन आणि साधी सोप्पी जाहिरात – प्रेक्षकांना चित्रगृहाकडे खेचून नेणारी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply