विक्रम पंडित यांचा जन्म १४ जानेवारी १९५७ रोजी नागपूर येथे झाला.
विक्रम पंडित यांच्या वडिलांचा औषधविक्रीचा व्यवसाय होता. विक्रम पंडित यांनी भारतात आपले शिक्षण पूर्ण करून १९७७ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदव्युत्तर पदवी कोलंबिया येथील विद्यापीठातून घेतली. १९८० मध्ये फायनान्समध्ये एमबीए केलं आणि त्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमधून याच विषयात डॉक्टरेट मिळवली. काही काळ कोलंबियामधील विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र शिकवलं. १९८३ मध्ये त्यांनी मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीत नोकरी स्वीकारली. या कंपनी रूजू होणारे ते पहिले भारतीय होते. १९९० मध्ये कंपनीच्या यूस इक्विटी सिंडिकेट विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त झाली. १९९४ मध्ये त्यांना कंपनीच्या जागतिक इस्टिट्यूशनल सिक्युरिटी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. दोन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यावर त्यांनी २००५ मध्ये कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. ओल्ड लेन एएलसी हा हेज फंड सुरू केला.
हा फंड सिटी ग्रुपने २००७ मध्ये ८० कोटी डॉलरना विकत घेतला आणि पंडित यांचे नाते या ग्रुपशी जोडले गेले. सिटी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष म्हणून पंडित यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांचे नेतृत्व गुण पाहून ११ डिसेंबर २००७ रोजी पंडित यांना सिटी ग्रुपचं सीईओपद देण्यात आलं. तिसऱ्या तिमाहीत ग्रुपची कामगिरी खालावली होती आणि अमेरिकेतील सब प्राइम पेचाने डोके वर काढले होते. कंपनीला २८ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला. कंपनीला यातून बाहेर काढत नफ्यात आणण्याची जबाबदारी पंडित यांच्यावर होती. त्यामुळे पंडित यांनी वर्षाला एक डॉलर पगार घेणार असल्याची घोषणा केली; तसेच कंपनी नफ्यात येत नाही तोपर्यंत या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सलग पाच तिमाहीत ग्रुपला चांगला नफा झाला. त्यामुळे मे २०११ मध्ये सिटी ग्रुपने पंडित यांना २.३२ लाख डॉलर पगार देत असल्याची घोषणा केली. यामुळे सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत पंडित जाऊन बसले. त्यांनी सलग दोन वर्षे एक डॉलरच्या पगारावर काम केले. हाती घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही हा बाणा त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून देत. एक कुशल आणि यशस्वी नेतृत्त्व असल्याचे सिद्ध केले. सिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी म्हणून डिसेंबर २००७ ते २०१२ या काळात त्यांनी काम केले.
सध्या ते ओर्गन समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.काही वर्षांपूर्वी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply