लेखक कोण ते माहित नाही पण छान लेख आहे म्हणून शेअर केलाय….
सीकेपी म्हणजे बोम्बलाचं कालवण,
सीकेपी म्हणजे रविवारचं मटण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा रस्सा,
सीकेपी म्हणजे रुचकर हातांचा चवदार वारसा …
या ओळींमधला महत्वाचा भाग म्हणजे रविवारचं मटण. सीकेपी म्हणजे मटण हे समीकरणच आहे आणि सीकेप्यांचा रविवार हा सहसा ‘मटण भात’ या आठवडाभराची शक्ती देणाऱ्या संपूर्ण आहाराशिवाय साजराच होऊ शकत नाही या वाक्यावर मी ठाम आहे. एखाद्या रविवारी जर का चतुर्थी वगैरे येऊन घात झाला तर अनेक कायस्थांचा आठवडा खूप अशक्तपणा आल्यासारखा जातो ही वस्तुस्थिती आहे ..अगदी माझ्या बाबतीतही हे असच घडतं. जर का माझा एखादा रविवार हुकला तर सोमवारचा सत्यानाश झालाच म्हणून समजा..एक तर कारण नसताना उगीच चिडचिड सुरु होते, कामात लक्ष लागत नाही, आपण उगीचच सोमवार पाळतो – आपल्याला कुठे चांगला नवरा शोधायचाय वगैरे विचार मनात येऊ लागतात. अलीकडे मी हे दिवस आणि वार पाळणे सोडून दिलंय .. देवाने नाही फरक केला वारांमध्ये, च्यायला आपण कोण मोठे लागून गेलोय?
हं, तर आपलं मटण. मटण हा सीकेप्यांच्या घरातला एक न ठरवलेला पण यथाशक्ती यथाभक्ती साजरा होणारा इव्हेंट असतो. शनिवार संपत आला की रविवारच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होते. एरव्ही बायकोला काडीचीही मदत न करणारे काही सीकेपी पुरुष रविवारी मात्र मस्त तयार होऊन, हाफ पॅन्ट – टीशर्ट घालून, चांगलीशी पिशवी घेऊन बाजाराकडे कूच करतात. (या वाक्यावर शिव्या खायला मी तयार आहे, पण सत्य आहे ते सत्य आहे). यातच सीकेपी बालकांवर खाद्यसंस्कार चांगले व्हावेत म्हणून घरातल्या ५ वर्षाच्या मुलाला पण बाईकवर बसवून बाजार दाखवण्याची पद्धत रूढ आहे. ‘बाबा, आपण कुठे जातोय’ हे विचारल्यावर त्या छोट्याला, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताने काहीतरी ठोकून कापल्यासारखे दाखवून, आपण मटण आणायला जातोय हे सांगितलं जातं. ते मूल पण बिच्चारं ‘नळीबाऊ’ च्या लालसेने टुणकन तयार होऊन बाईकवर बसतं. आता मटण आणायला हे उत्साही लोक कुठे जातील याचा कोणी विचारपण करू शकणारं नाही. ठाण्याच्या चरईतला एखादा सीकेपी आता घोडबंदरला हिरानंदानी मध्ये शिफ्ट झाला असेल तरीदेखील मटणासाठी हा ठाण्याच्या गर्दीच्या मार्केटमधल्या अनिल गाढवे कडेच येणार. पोखरण रोडवरचा एखादा लोढा मध्ये शिफ्ट झाला असेल तरी तो त्या उपवनच्या अश्फाककडेच जाणार. मखमलीच्या शोएबचा पण तितकाच बोलबाला. खूप वर्षांपूर्वी ठाण्याचे अनेक लोक कळवा आणि मुंब्रा येथे मटण आणायला जायचे.. ताजं ही मिळायचं आणि स्वस्तही. गुडलक, जॉली, वेलकम, महाराष्ट्र, दिलखुष ही सर्वसाधारण पणे या मटणाच्या दुकानांची नावं. एरव्ही अतिशय घाईत जगणारे अनेक मोठे लोक मटणाच्या लाईनमध्ये अतिशय शांत आणि मनापासून उभे असतात. इथे एक किलो मटण घेणारा फुल वट दाखवत जरा सीना टाक, चाप टाक, गर्दन टाक वगैरे ऑर्डर देत असतो. त्याच्या मागे उभा असलेला एखादा पाव किलो मटण घेणारा निमूटपणे, मटणवाला जे काही देईल ते घेऊन समाधान मानतो. पण जर कधी याने मांडीचा भाग वगैरे मागितला तर ‘ पाव किलोत तुझ्या काकानी ठेवलीये का रे मांडी’ असा अपमान झालाच समजा. मटण वाला हा एकमात्र माणूस असा असावा की जो जाहिररीत्या तुमची इज्जत काढू शकतो .. तुम्ही कोणीही असा. मटणाबरोबर कलेजी, खिमा, भेजा वगैरे पाहिजे असल्यास थांबायची तयारी ठेऊन आलेली मंडळी फार पूर्वी त्या मटण वाल्याकडे असलेले नयी दुनिया, इन्कलाब, अपना मसल्लक किंवा नवाकाळ असले १ रुपयात मिळणारे पेपर वाचायचे, आता मात्र मोबाईलवर चेक इन टाकत असतात. मटण घेताना मटण वाला आपल्याला चहा पाजतो हे म्हणजे तुम्ही त्याला खूप जवळ असल्याचं सूचक. मटणाला गेलं की गल्लीतले अनेक जुने मित्र पण भेटतात. तरुणपणी बाजारात न जाता रविवारी क्रिकेट खेळून महिलावर्गात लोकप्रिय झालेले हे मित्र आता मात्र घर गृहस्थीमध्ये आणि विशेषकरून घरच्या महिलेमध्ये रमल्याचे दिसतात. “कायरे आज मटण का ?” हा मूर्ख वाटणारा प्रश्न पण १० मिनिटे गप्पा मारायला पुरेसा असतो. मटण ते मटण, मटणाची सर चिकनला नाही पासून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा त्या निसरड्या लादीवर उभे राहूनच केला जातो.
मटणबरोबर घ्यायच्या इतर अनेक महत्वाच्या वस्तूं मध्ये दोन चिल्ड बिअर किंवा एखादी चपटी घेणे हेही क्रमप्राप्तच. एकदा का मटणाची पिशवी हॅण्डलला लावली के तुमचे पाय आपोआप स्वर्गलोकिच्या सुखाला गवसणी घालणाऱ्या ब्लू हेवन वाईन्स, शंकर वाईन्स वगैरे दुकानाकडे वळतात. मित्र तिथेही भेटतात पण काळ्या पिशवीतल्या मटनामुळे घरची ओढ आज जरा जास्तच असल्याने ही मंडळी किक मारून घर गाठतात. इतक्या गर्दीत कसा नंबर लागला, वजन झाल्यावर कशी वरून जास्त चरबी टाकून घेतली अश्या विजयी सूरात पिशवी अर्धांगिनीकडे सोपवली जाते आणि नंतर मटणाबरोबर आणलेल्या आनंददायी पेयाचा आस्वाद घेणं सुरु होतं. या कार्यक्रमामुळे पिशवी दिल्यापासून ते शिजलेले ताट पुढे येईपर्यंत वेळ कसा जातो ते कळतच नाही..
स्वयंपाक खोलीच्या ओट्यापासून ते बाहेरच्या खोलीत दरवळणाऱ्या, तुमच्या नकळत नाकात शिरलेल्या त्या तिखट वासापाठोपाठ (सुगंध वगैरे काही नाही, वासच म्हणतो आम्ही) तुमच्या समोर हसऱ्या चेहेऱ्याने, आटपला का कार्यक्रम, कितीहो तुम्हाला घाई वगैरे शब्दांच्या सजावटीत ते सजलेलं ताट अवतरतं. मटणासाठीच राखीव असलेल्या भांड्यातलं रटरटणारं गरमागरम मटण वाटीत येऊन स्थिरावतं. एखाद्या खुर्चीत बसून टेबलावर ताणून पाय ठेवल्यासारखी वाटीतून फुशारकी मारणारी ती नळी, ताटात उजव्या बाजूला ती काळपट हिरवट छटा असलेली तव्यावरची कलेजी, सुगरणीचा मूड असेल तर एखादा अंड लेपून तळलेला चॉप, साधा सोप्पा कापलेला लाल कांदा, लिंबाची फोड, एखादी चपाती आणि ताटभर पसरलेला वाफाळलेला पांढरा शुभ्र भात .. यालाच म्हणतात सीकेप्यांचा रविवार.
असा रविवार साजरा झाला तर पुढचा आठवडा कडक गेलाच म्हणून समजा.
काही दिवसांपूर्वी एक गमतीदार पण पटणारी पोस्ट पहिली होती. ‘सीकेपी समाज एकमात्र आहे की तो फक्त श्रद्धा पाळतो आणि मनमुराद जेवतो. पेन्शन हातात आल्यावर तो पहिला रविवार मासे आणि मटण, दुसरा रविवार फक्त मटण, तिसरा रविवार मटणात बटाटे, चौथा रविवार बटाट्यात मटण आणि नंतर पेन्शनची वाट पाहतो’ अशी,रविवार साजरा करायला मटण पाहिजेच हे सांगणारी ही पोस्ट होती.
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.
Leave a Reply