नवीन लेखन...

कोस्टल रोड

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या श्रीवर्धन मध्ये नारळी पोफळींच्या वाड्यातून जाणारे अरुंद रस्ते. तीन चार रस्ते एकत्र येऊन बनणारे अनेक चौक पालथे घालताना कोणालाही रायगड जिल्ह्यातील या तालुक्याच्या लहानशा शहराची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत स्वच्छ आणि तितकाच सुरक्षित आणि देखणा समुद्र किनारा. श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या घटना फारच कमी ऐकू येतात कारण इथला समुद्र किनारा फारसा धोकादायक नाही. नगरपरिषदे कडून किनाऱ्याचे सौंदर्य अतिशय चांगल्या प्रकारे खुलविण्यात आले आहे तसेच त्याची निगा व देखभाल सुद्धा व्यवस्थित केली जाते.

समुद्रात आतपर्यंत घुसलेल्या एका टेकडीच्या पायथ्याशी जिवना कोळीवाडा आणि जिवना बंदर वसलेले आहे. जिवना कोळीवाडा आणि बंदराशी माझे कौटुंबिक नाते निर्माण झाले ते बाबांच्या मित्रामुळे. पोलीस स्टेशनला बाबांजवळ स्वतःच्या भावाची तक्रार घेऊन आलेले जिवना कोळीवाड्यातील तीन बोटींचे मालक काशिनाथ काका बाबांच्या समजावण्यामुळे स्वतःच्या भावासोबत भांडण विसरून गुण्यागोविंदाने राहू लागले.

पोलीस स्टेशन मध्ये काशिनाथ काका त्यांच्या भावाबद्दल तक्रार घेऊन आले पण माझ्या बाबांना त्यांनी लहान भावा सारखं मानले आणि त्याप्रमाणे नाते ते जिवंत असेपर्यंत जपले.

आम्हा भावंडाना सुद्धा सख्या काकाची माया लावली वयाच्या बाराव्या वर्षी एकच वर्ष श्रीवर्धन मध्ये घालवले पण काशिनाथ काकांमुळे श्रीवर्धनशी जोडलेली नाळ आजतागायत ते हयात नसतानाही टिकून आहे. काका वारले पण त्यांच्या मुलांशी आमचे नाते चुलत भावासारखे अजूनही सुरूच आहे.

जिवना बंदरात मोठमोठे ट्रॉलर आणि मासेमारी बोटी ये जा करतात. मोठा धक्का आणि होड्या आणि बोटी लागण्यासाठी असणारी जेट्टी. जेट्टीला लागून उत्तरेला खडकाळ टेकडी आणि पश्चिमेला अथांग समुद्र तर दक्षिणेला श्रीवर्धनचा सुंदर समुद्र किनारा.

श्रीवर्धन च्या जिवना बंदरातून, दिवेआगर, दिघी, मुरुड आणि रेवदंडा मार्गे अलिबागला यायला निघालो.
जिवना बंदर सोडले की लगेचच एक टेकडी ओलांडावी लागते. मग वाळवटी नावाचे एक मुस्लिम बहुल गांव लागते. हे गांव संपले की समुद्र किनाऱ्याला लागून दोन किलोमीटर समांतर रस्ता मग पुन्हा एक लहानसा डोंगर आणि त्यावरील छोटेखानी घाट. या डोंगरावर गाडी चढल्यावर दहा मिनिटे थांबून अथांग सागराला बघितल्याशिवाय पुढे जाण्याची इच्छाच होत नाही. कोणतीही वेळ असो पण तेथून दिसणारा निळा समुद्र खुपच अप्रतिम. समुद्रावरून घोंघावत येणारा वारा अंगावर झेलत झाडाच्या सावलीत तासनतास कोणीही बसू शकतो. डोंगर उतरून थोडं पुढे गेल्यावर लगेचच भरडखोल नावाचे गांव आहे या गावात सुद्धा शेकडो मासेमारी करणाऱ्या बोटी आणि ट्रॉलर्स आहेत. काशिनाथ काकांमुळे बाबांचे या गावात सुद्धा मित्र झाले होते. इथले बरेचसे कोळी लोकांनी गळ्यात माळ घातली होती आणि मांसाहार सोडून हरी भक्त परायण करून देवाचे नामस्मरण करण्यात आनंद मानत होते. भरडखोलचे ह भ प श्री राम महाराज यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलो. भरडखोल गांव हे सुद्धा समुद्रात घुसलेल्या एका टेकडीच्या पायथ्याशी वसले आहे. खाली किनाऱ्यावर वाळू नसून काळा आणि कठीण असा कातळ आहे. लाटांनी झिजलेल्या खडकावर होड्या आणि बोटी लागण्यासाठी पुरेशी जागा आहे. सगळ्या कोळ्यांची घरे समुद्रापासून थोडी वर उंचावर बांधलेली आहेत. राम महाराज यांचे दोन मजली घर तर एकदम समुद्राच्या पुढ्यातच. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले महाराज घराच्या टेरेस वर जाळं विणत बसले होते. ओपन टेरेस वरून खाली कातळ आणि खडकाळ किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि पांढरा शुभ्र फेस उसळताना दिसत होता. महाराज अत्यंत प्रसन्न होते आणि मला व मित्रांना बघून खूप आनंदी झाले. बाबा आणि घरच्यांची ख्याली खुशाली विचारली आणि गप्पा मारायला लागले. सकाळची वेळ होती आणि त्यांच्या घराच्या टेरेस वर समुद्रावरून येणारा खारा वारा एक वेगळेच चैतन्य निर्माण करत होता. निसर्गाच्या कुशीतील त्यांचे वास्तव्य पाहून हेवा वाटत होता. त्यांचा निरोप घेऊन निघालो, पुढे दिवे आगर लागले इथल्या सुवर्ण गणेशाच्या प्रतिमेचे दर्शन न घेता पुढे निघालो. भूक लागली असल्याने एका लहानशा हॉटेल मध्ये गेलो. बटाटा वडा आणि गरमा गरम मिसळ खाल्ली,चव एवढी छान की चार चार पाव खाऊन सुद्धा समाधान झाले नाही.

हॉटेल चे मालक गल्ला सोडून स्वतः विचारायला आले, तुम्हाला चव आवडली का आणखीन काही हवंय का. त्यांचे तसे विचारण्यात कोणतीही व्यावसायिकता जाणवली नाही पण ग्राहकाप्रती आपुलकी आणि स्वतःच्या हॉटेल मधील पदार्थांचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता मात्र दिसली.

दिघी पोर्ट चे काम आणि त्याला लागणारे पोहोच रस्ते जोरात सुरु असल्याने काँक्रीट चे मोठं मोठे रस्ते तयार झालेत. गाडी शंभर च्या वेगाने पळवता येत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ सुद्धा नव्हती. निसर्ग एवढा सुंदर की डोळ्यात मावत नव्हता.

दिघीच्या अगोदर सुद्धा एक डोंगर लागतो. डोंगर चढून खाली उतरताना दिघी खाडीचे अत्यंत सुंदर रूप बघायला मिळते. हिरव्यागार नागमोडी वळणाच्या उतारावरून खाडी किनारा आणि परिसर बघताना वेगळ्याच दुनियेत असल्यासारखं वाटतं. दिघी बंदरात पोचलो तर पलीकडे आगरदांडा बंदरावर जाणारी रो रो बोट जाताना दिसली. केवळ पाच मिनिटासाठी बोट चुकली होती. जेट्टीवर गाडी उभी करून खाली उभ्या असलेल्या मासेमारी करणाऱ्या एका ट्रॉलर वर मच्छी मिळतेय का बघायला गेलो. ट्रॉलर च्या तांडेल ने मासळी दाखवण्या साठी एका खलाशाला तीन वेळा सांगितले, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, दुपारचे बारा वाजले होते तळपत्या उन्हाची तिरीम सरळ डोक्यात जात होती. तांडेल आणि आम्हा मित्रांना काही कळायच्या आत तो खलाशी खाली कोसळला ट्रॉलर च्या लाकडी कडेला आदळून खाली जेट्टीवर एकदा आदळला आणि जेट्टी व ट्रॉलर च्या मध्ये असलेल्या फटीतून खाली पाण्यात पडला. कोणालाच काही कळलं नाही इतक सगळं एका क्षणात घडले. तांडेल ने ट्रॉलर च्या केबिन मधून धावत येऊन खलाशी पडला होता तिथे पाण्यात उडी मारली. त्याचा एक पाय वर ओढून बाहेर काढला मग इतर खलाशांनी आणि आम्ही मित्रांनी त्याला पाण्याबाहेर खेचून वर काढला. त्याचे अंग आणि छाती धडधडत होती, तोंड वाकडे झाले होते आणि फेस येत होता. ट्रॉलर मधून कांदे आणले आणि फोडून त्याच्या नाकाला लावून हुंगवले. हळूहळू तो शुद्धीवर आला. तांडेल सांगू लागला हर्णे गावातला खलाशी आहे पाहिल्यान्दा आणला आम्हाला माहिती नव्हते त्याला आकडी येते. सर्वांनी तांडेल ला सांगितले खाली पडताना जेट्टीवर आदळल्याने त्याच्या छातीला मार लागला आहे, डॉक्टर कडे नेऊन आणा. आता तो वाचलाय चिंता करू नका.

काही मिनिटात आगरदांडा बंदरातून निघालेली रो रो बोट आली. आमच्या गाडीसह इतर गाड्या रो रो बोटीत चढवल्या आणि बोट निघाली. पंधरा मिनिटात बोट पलीकडे. रो रो बोट सेवेमुळे श्रीवर्धन ते अलिबाग हे अंतर जवळपास ऐंशी किलोमीटरने कमी झाले आहे. म्हसळा आणि माणगाव मार्गे जाण्यापेक्षा दिघी मार्गे खूप सोयीचे झाले आहे.

आगरदांडा हुन राजपुरी आणि पुढे मुरूड असा प्रवास होता. आगरदांडा सोडल्यावर कोळंबी शेतीचे प्रकल्प आहेत. तिथल्या एका प्रकल्पावर जाऊन माहिती घेतली. पुढे राजपुरी कोळीवाडा आणि मग राजपुरीचा डोंगर. डोंगरावर गाडी थांबवून खाडीच्या मुखावरील समुद्राला तोंड देणारा जंजिरा किल्ला डोळे भरून पाहिला. जंजिरा आणि त्याच्यासमोर शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला दोन्हीही तिथून बघायला मिळतात. जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी कासवाच्या आकाराच्या एका लहानशा बेट वजा खडकावर बांधलेला तो कासा किल्ला. राजपुरीच्या डोंगरावरून खाली दिसणारे राजपुरी गांव, जंजिरा किल्ला, नव्याने बांधले जाणारे दिघी पोर्ट, दिघी आणि राजपुरी डोंगरांच्या मध्ये उसळणाऱ्या खाडीचे विशाल पात्र असा देखावा इतर कुठेही नसावा.

उंचावरून खाली पसरलेल्या समुद्राला बघता बघता मुरुडच्या दिशेने उतरणीला सुरुवात होते. नारळाच्या झाडीतून डोकावणारी घरे, मुरुड ची खाडी आणि त्यात उभ्या असलेल्या रंगी बेरंगी मासेमारी होड्या, एक अत्यंत सुंदर प्रेक्षणीय देखावा. दोन च्या सुमारास मुरुड तहसीलदर कचेरी ला असलेल्या लहानशा हॉटेल मध्ये जेवण केले आणि निघालो.

मुरुड सोडल्यावर पुन्हा डोंगराचा चढ उतार. चढ चढताना दिसणारा मुरुड च्या नवाबाच्या जुनाट पॅलेस आणि त्यापलीकडील समुद्र आणि समुद्रात पुन्हा एकदा दिसणारा कासा किल्ला. पुढे नांदगाव गावातील सुंदर गणपती मंदिर.

काशीद चा किनारा आणि तेथील सुरूचे बन एकापेक्षा एक सरस आणि सुंदर देखावे. कुठे थांबू आणि कुठे नको असं प्रत्येक ठिकाणी होऊन जायचे. रेवदंडा खाडी पूल उतरत असताना आमच्या गाडीचे पुढचे ब्रेक फेल झाले. ऑइल लीक झाल्याने एका गॅरेज मधून ब्रेक ऑइल घेतले पण लिकेज थांबेना कारण ब्रेक पॅड आणि डिस्क मोठ्या प्रमाणात घासली गेली होती. ब्रेक ऑइलचे जादा कॅन घेतले आणि शक्यतो ब्रेक मारण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारे गाडी चालवून अलिबाग गाठायचा निर्णय घेतला. हळू हळू सेकंड थर्ड गियर पर्यंत कंट्रोल करत निघालो. रेवदंडा मार्केट मधून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेंगदाण्याच्या भट्टी वरून गरमागरम भाजलेले शेंगदाणे आणि वटाणे फुटाणे घेतले. चौल नागांवच्या नारळ पोफळी च्या कमानीगत असलेल्या रस्त्यांवरून जाताना गारवा अनुभवायला मिळत होता.

दिघी मार्गे श्रीवर्धन ते अलिबाग साधारण शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतर असावे पण या कोस्टल रोड वरून जाताना तीन तासात पोचण्याचा विचार न करता निघाले तर सकाळपासून संध्याकाळ झाली तरी कंटाळा येणार नाही.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..