नवीन लेखन...

कोट

मला या लग्ना -कार्या बद्दल काही मूलभूत प्रश्न आहेत. जसे लग्नातले भटजी दाढी का करत नाहीत?, (हल्ली भटजीला एकटं वाटूनये म्हणून नवरदेव पण दाढी ठेवतात म्हणे !),अश्या कर्यात, बहुतौन्श बायका निळ्या रंगाच्या साड्या का घालतात? वगैरे वगैरे. तसेच लग्ना – कार्यात, पिवळा किंवा मोतिया रंगाचा नेहरू शर्ट आणि विजार घालून उगाच मांडवात लुडबुड करणाऱ्यांची एक जमत असते. अप्पा जोशी त्यातलाच. वयाच्या छत्तिसाव्या वर्षी, (म्हणजे विकसित ढेरी पूर्ण स्थिरावल्यावर ) शिवलेला हा ड्रेस, आज सहासष्टीत हि जसाच्या तसा वापरतो! नाही म्हणायला, तो दोनदा धुतलाय, एरव्ही फक्त इस्तरी!

आजकाल लग्ना -कार्यात घालण्याच्या कपड्याचे एक नवच खूळ निघालंय. ‘इथनिक ‘ ड्रेसच! साधारण संदलच्या उंटाच्या पाठीवर जसा भडक रंगाचा मद्रा घालतात, तसल्या जातिकुळीतल्या कापडाचा लांब बंद गळ्याचा शर्ट (म्हणू का नेहरूशर्ट? का कोट? माझेच मत अजून पक्के नाही. ), त्यावर बटबटीत सोनेरी, चंदेरी कशिदाकारी आणि खाली चुडीदार पैजामा. उंच्या पुऱ्या पुरुषांना हा ड्रेस शोभून हि दिसतो. आमचा शाम्या, स्वतः ला पहिल्या लाइनीतला फॅशनेबल समजतो! त्याची चॉईसहि चांगली असते. पण, श्याम्या अन त्याचे कपडे हे कॉम्बिनेशन —–एकदम खतरा असते!. चपलीच्या तळाव्या पासून, ते राठ व ताठ केसा, पर्यंत उंची पाच फुटला चार दोन इंच कमी!, वर भक्कम ढेरी! त्याने ‘इथानिक ‘ ड्रेस घेतला, तो खांद्याच्या मापाने. बरे ट्रायल तरी घ्यावी? ते हि नाही. कार्या दिवशीच त्याने स्वतःला अन नव्या कपड्याला कुंकु एकदाच लावले. पैजामा इतका लांब होता कि, बगलेत बांधावा लागला! ,शर्ट मात्र घोट्याच्या, दोन इंच वर पर्यंत आला!

“सुरश्या, श्याम्याच्या विजारीचे पैसे वाया गेले रे!,त्याला विजारीची गरजच नव्हती, नुसते पायमोजे घातले असते तरी भागलं असत! ” तात्या सोमण माझ्या कानाशी पुटपुटला. सोमण्याना कडम माणूस, काय पण बरळतो. शेवटी हौस असतेच ना?

काल पर्यंत, लग्नात(स्वतःच्य) भटजी इतकाच कोट टाय मस्ट असायचा! नवरदेव, ढगळ पॅन्ट, आडमाप कोट, टाय, कपाळाला लाल भडक कुंकवाचा टिकला, टिकला कसला ? मळवट वाटावा असा पसरलेला टिळा!, डोक्यावर बिन रंगाची, बिन आकाराची, सोनेरी काडी असलेली, खपटाची टोपी अन हातात नारळाची दुरडी! असलं बावळट ध्यान करून उभा राहायचा! (उगाच नावे ठेवत नाही? मी यातूनच गेलोय! अजून लग्नाचा फोटो आहे! पहायचा असेल तर या!). हौसेला इलाज नाही!(माझ्या लग्नातली कोटाची हौस आमच्या आई साठी केली होती!) या लग्नातल्या कोटाची एक गम्मत आहे. हा पुन्हा वापरला जात नाही. मी तर, वापरू शकलो नाही. कारण मीच त्याच्या मापाचा राहिलो नव्हतो! तसे हि कोट, टाय चे माझे फारसे सख्या नाही. खरे सांगतो, मला अजून त्या टायची गाठ (जिला नॉट म्हणतात ) बांधता येत नाही. पण काही बिघडत नाही, कारण आयुष्यात ‘तिची’ माझी, तशी फारशी गाठ पडलीच नाही!

काही जणांची मात्र कोटाची हौस काही कमी होत नाही. मे महिन्यातले लग्न. भर उन्हाळा. आग्रहाचे आमंत्रण. चार-चार फोन झाले. म्हणून गेलो. वराकडील, वय वर्ष आठ च्या वरील सर्व पुरुष मंडळी कोटात! स्वागत साठी मुख्य प्रवेश द्वारा जवळच्या ‘उग्र काळ्या कोटला’ पाहून तर मी बीचकलोच! का काय? कुठे हा ‘ टिकट बताव ! ‘ म्हणायचा हि भीती वाटली! असा तो आणि त्याच्या कोटाचा अविर्भाव होता! आलेल्या समस्त आमन्त्रितान कडे, क्षुद्र कटाक्ष टाकत, हे ‘कोट ‘ दिवसभर आणि मांडवभर नाचत होते, आणि यांनी फक्त याच साठी आम्हाला, चार -चार फोन करून बोलावले आहे असे वाटत होते! अस्तु.

का कोण जाणे, मला कोटातील माणसांशी सलगी करावीशी वाटत नाही. ‘keep Distance ‘ चा अलिखित इशारा कोट देतोय असे वाटत रहाते. त्यात एक प्रकारचा मग्रूर ताठरता भासते. कदाचित हा माझा भ्रम हि असेल. एक प्रकारचा कोरडे पणा असतो. कोट पाण्याने न धुता ड्राय क्लीन केल्याने हि, असे असेल का? नसता थोडासा ओलावा त्यात झिरपला असता!

एकंदर ‘कोटान ‘ पासून जरी मी फटकून वागत असलो, तरी माझ्या आयुष्यात एक सलगी करावासा वाटणार ‘कोट ‘ येऊन गेलाय! माझ्या लहानपणी, आमच्या शेजारी एक पोक्त शिक्षक रहात. ते फारशे कोणाशी बोलत नसत. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा शर्ट अन त्यावर पांढरा खादीचा कोट. संध्याकाळचं जेवण झाले कि मी त्यांच्या कडे जायचो. ते नुकतेच बाहेरून आलेले असायचे. हलकेच मला जवळ घेऊन , माझ्या साठी मुद्दाम शाळेतून आणलेला, रंगीत खडूचा तुकडा देत. कदाचित रंगांचा आशीर्वाद तेथेच मिळाला असावा! मायेने मांडीवर घेऊन एखादे स्तोत्र, भीमरूपी किंवा असेच काही तरी, म्हणत व म्हणताना केसातून हळुवार आपला हात फिरवत. त्यावेळी त्यांच्या कोटाच्या बाहीचा काठ माझ्या गालावर फिरत असे! मोर पिसा सारखा! मी पाळण्यात घातल्या सारखा झोपी जात असे. मग अण्णा (माझे वडील ) केव्हा तरी मला घरी नेत.

ते शिक्षक वारले तेव्हा त्यांच्या कोटाच्या खिशात पांढरा रुमाल, घड्याळ, काही सुटी नाणी आणि एक निळ्या रंगाचा खडूचा तुकडा निघाला म्हणे! आज मला त्यांचे नाव, त्यांचा चेहरा काहीच आठवत नाही, त्यांचा तो ‘ मायाळू कोट ‘ मात्र चांगलाच आठवतो! ‘लहान पण देगा देवा’ म्हणण्याजोगे माझे बालपण ‘सुखाचे नव्हते. पण पुन्हा तो ‘मायाळू कोट ‘ मिळणार असेल तर, मी लहान होण्यास तयार आहे!

—  सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..