माझ्या पहिल्या जहाजावरुन साईन ऑफ झाल्यावर मला अमेझॉन नदीकिनारी असलेल्या मनौस पोर्ट मधून घरी पाठवण्यात आले. मनौस शहरातून रिओ दे जानेरो ऐवजी साओ पावलो या इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून साऊथ आफ्रिकन एरवेजची जोहानसबर्ग साठी फ्लाईट होती, तिथून पुढे मुंबई साठी साऊथ आफ्रिकन एयरवेजचीच कनेक्शन फ्लाईट होती. मनौस पासून साओ पावलो पर्यन्त ब्राझील मधील लोकल फ्लाईट होती. मी विन्डो सीट मागून घेतलेली.
संध्याकाळी साडेसहा वाजता विमानाने मनौस मधून टेक ऑफ घेतला. जहाजावरुन अनुभवलेले रिओ निग्रो आणि अमेझॉन नदीच्या पाण्यात असलेल्या रंगातील फारकत आणि पाण्याची वेगवेगळी घनता यामुळे दोन्ही नदी प्रवाहात एकमेकात लवकर न मिसळण्याने एकाच पात्रात दोन नद्या मैलो न मैल पुढे गेल्याचे विमानातून स्पष्ट दिसत होते. अंधार पडायला सुरवात झाली होती तरीपण अमेझॉन नदीची विशालता नजरेत मावत नव्हती. हिरव्या गार घनदाट जंगला वर मावळतीचे सोनेरी किरण पसरले होते. घनदाट जंगलात लोकवस्ती असलेल्या लहान लहान गावांमध्ये दिवे लूक लुकायला सुरुवात झाली होती. विमानाने साओ पावलोच्या दिशेने गिरकी घेऊन जसं जशी उंची गाठायला सुरुवात केली तसतसे नदीचे प्रचंड खोरे असंख्य रक्तवाहिन्यांच्या जाळ्या सारखे भासू लागले होते. असंख्य शिरा आणि धमन्या जशा हृदया कडे येतात आणि बाहेर पडतात तसेच अमेझॉन नदीचे पात्र वाटत होते.
जहाजावर मरीन इंजिनियर व्हायचे म्हणजे एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स करून कमीत कमी सहा महिने पूर्ण करावे लागतात. सहा महिने काम केल्याशिवाय मरीन इंजिनियर किंवा जवाबदार अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येत नाही. आपल्या भारतात ही परीक्षा भारत सरकारच्या समुद्र वाणिज्य विभाग म्हणजेच मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट कडून घेतली जाते. भारतात आणि विशेषकरून मुंबईतील केंद्रावर घेतली जाणारी परीक्षा जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अवघड आणि कठीण समजली जाते. लेखी परीक्षा आणि त्याचसोबत तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते. ज्यामध्ये अधिकारी होण्याकरिता लागणारी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीला किंवा आव्हानाला सामोरे जायची सक्षमता तपासली जाते. म्हणूनच परीक्षा पास झाल्यावर मिळणारे सीओसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पेटेन्सी ज्याला सक्षमता प्रमाणपत्र असेच म्हटले जाते.
परंतु जुनियर इंजिनियर मध्ये सहा महिन्याऐवजी सगळ्या कंपन्या जास्त अनुभव मिळावा म्हणून आठ ते नऊ महिने ठेवत असते. एकदा का परीक्षा पास होऊन सीओसी मिळाले की मग फोर्थ इंजिनियर म्हणून जहाजावर चार ते सहा महिने अशा कालावधीत काम करायला मिळते. त्यानंतर फोर्थ पासून थर्ड इंजिनियर चे प्रमोशन अनुभव आणि त्या त्या इंजिनियरचा कामाबद्दल असलेल्या रिपोर्ट वरून दिले जाते. पुढे आणखीन 12 महिने प्रत्यक्ष जहाजावर काम केल्यानंतर सेकंड इंजिनियर म्हणून काम करण्याकरिता क्लास 2 ची परीक्षा द्यावी लागते. अशाच प्रकारे चीफ इंजिनियर होण्यासाठी क्लास I ची परीक्षा द्यावी लागते. जुनियर इंजिनियर ते चीफ इंजिनियर या शेवटच्या पदापर्यन्त पोचण्यासाठी तीन टप्प्यात परीक्षा द्यावी लागते. फोर्थ, थर्ड आणि सेकंड इंजिनियर म्हणून काम करून प्रत्येक रँक आणि त्या रँकशी संबंधित मशीनरी आणि सिस्टिम यांचा अनुभव घ्यावा लागतो. हा अनुभव घेतल्यावर पुढील रँक मध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक टप्प्यावर लेखी आणि तोंडी अशा दोन्ही प्रकारे कठीण अशीच अग्नीपरीक्षा द्यावी लागते.
जहाजावर फोर्थ इंजिनियरच्या युनिफॉर्म मध्ये खांद्यावर एका सोनेरी पट्टी पासून ते चीफ इंजिनियरची चौथी सोनेरी पट्टी मिळवण्यासाठी जहाजावर ज्या जिद्दीने आणि मेहनतीने काम करावे लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेऊन परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सुट्टीवर घरी असताना स्वतःला दरवर्षी येणाऱ्या आणि बदलणाऱ्या नवनवीन आंतरराष्ट्रीय कायदे आणि शिपिंग मधील घडामोडी यांची माहिती होण्यासाठी कितीतरी कोर्स करावे लागतात. जहाजावरुन उतरल्यावर स्ट्रेस कुठल्या कुठे जायला पाहिजे होता पण परीक्षा आणि अभ्यासाचा विचार आल्यावर पुन्हा एकदा नवीन स्ट्रेस आल्यासारखं वाटायला लागले होते.
अकरा वर्षांपूर्वी मनौस मधून टेक ऑफ घेतल्यावर अमेझॉन नदी जसं जशी मागे पडत गेली आणि अंधार पडू लागला तस तसे पुन्हा एकदा परीक्षा आणि खांद्यावर येणाऱ्या सोनेरी पट्टीपेक्षा प्रेयसी सोबत होणाऱ्या लग्नाची लग्नाची चिंता वाटू लागली होती. पण इकडे आईने माझ्या घरी आणि प्रियाने तिच्या घरी आधीच फिल्डिंग लावून ठेवली होती.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply