विनोदी अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम यांचा जन्म ३ मार्च १९७० रोजी मुंबई येथे झाला.
मराठीत अनेक विनोदवीर आहेत. मात्र या सर्वांमध्ये सर्वात जास्त क्रेझ दिसून येते भाऊ अर्थातच भालचंद्र कदम या अभिनेत्याची. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये झळकणाऱ्या भोळ्या भाऊ कदम यांनी आपल्या विनोदी टायमिंगने महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडले आहे. खरं तर भाऊ यांना खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने. मात्र ही लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले भाऊ कदम जन्म एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बीपीटीत नोकरी होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरचे सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये त्यांचे बालपण गेले. वडील हयात असेपर्यंत घराची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. मात्र वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. बीपीटी क्वॉटर सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले.
बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या भाऊ यांना वर्षातून, सहा महिन्यातून एखादे नाटक मिळत असे. त्यांनी कॉम्प्युटर कोर्स केला होता. त्यामुळे कुटुंबाचे संगोपन करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात काही कार्यालयांत कारकुनीचे काम ते निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे, अशी कामे केली. मात्र घरखर्च चालविण्यासाठी आणखी दुसरा उपाय शोधणे अपरिहार्य होते, म्हणून भाऊ यांनी आपल्या भावासोबत मिळून पानाचे दुकान थाटले. अनेकदा भाऊ पानटपरीवर बसत असे. भाऊ यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती.
त्यांचे गुरु विजय निकम यांच्या म्हणण्यावरुन त्यांच्या आईंनी त्यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची परवानगी दिली. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला. कॉलेज जीवनात असताना त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून ‘कोब्रा 37’ या नावाने आपला एक ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये कमलाकर सातपुते आणि किशोर चौगुले हे प्रसिद्ध अभिनेते सहभागी होते.
विजय निकम यांच्या ‘एवढाच ना’ या नाटकाद्वारे त्यांना पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला. या नाटकात त्यांनी शॉर्ट टर्म मेमरी लॉस असलेल्या व्यक्तीची भूमिका वठवली होती. पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘एक डाव भूताचा’, ‘बाजीराव मस्त’ मी या नाटकांमधील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यांचे ‘रानभूल’ हे नाटक रंगभूमीवर गाजले होते. भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे ४०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
भाऊ यांनी ममता यांच्या बरोबर प्रेमविवाह केला आहे. भाऊ कदम यांना ३ मुली असून मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी नावे आहेत. भालचंद्र कदमांनी अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. हरीशचंद्राची फॅक्टरी, सांगतोय काय, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढ म्हणा, मस्त चाललंय आमचं, नारबाची वाडी, कोकणस्थ, टाईम पास, टाईम पास 2, बाळकडू आणि जाऊ द्या ना बाळासाहेब इतर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट म्हणजे फेरारी की सवारी या यामधून ही भाऊ आपल्याला दिसला.
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply