विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्म २९ मार्च १९२६ रोजी झाला.
मूळ कोकणातून आलेले बाळ गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालयात, तर पुढील शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातून ते अर्थशास्त्र विषयात ते एमए झाले. बाळ गाडगीळ यांनी नंतर अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठामधून अर्थशास्त्रात एम.एस. केले.. त्यांनी भारत सरकारच्या प्राप्तिकर खात्यात काही काळ नोकरी केली, मात्र त्यांचा खरा ओढा अध्यापनाकडे होता. बाळ गाडगीळ हे सुरुवातीला फर्गुसन कॉलेजमध्ये प्राध्यापक रुजू झाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली येथील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एक वर्ष प्राचार्य म्हणून काम केल्यावर ते परत फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. प्रथम उपप्राचार्य, तर नंतरची ११ वर्षे ते प्राचार्य होते. पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणूनही त्यांनी एक वर्ष काम पाहिले. त्यानंतर बाळ गाडगीळ ते पुण्यातीलच सिंबायोसिस संस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला सल्लागार म्हणून, तर नंतर काही काळ संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम करीत होते.
बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. याखेरीज दोन विनोदी कादंबर्या’, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर तसेच बालवाङमय हे प्रकारही त्यांनी हाताळले .’वळचणीचं पाणी’ हे बाळ गाडगीय यांचे आत्मचरित्र आहे.
बाळ गाडगीळ यांचे २१ मार्च २०१० रोजी निधन झाले.
आपल्या समूहातर्फे बाळ गाडगीळ यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply